डोंबिवलीतील श्वानप्रेमी मिनल गोडबोले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2020
Total Views |
Minal Godbole _1 &nb





श्वानप्रेमापोटी, त्यांच्या काळजीपोटी डोंबिवलीतील मिनल गोडबोले यांनी श्वानांसाठीचे पाळणाघर सुरु केले. आज जाणून घेऊया ‘पेट कॅफे’ ही नवीन संकल्पना रुजवणार्‍या त्यांच्याविषयीच...
 
 
प्राण्यांविषयी प्रेम वाटत असल्याने अनेक जण घरात कुत्रा पाळतात. पण नोकरीमुळे दिवसभर त्यांची काळजी घेणे शक्य नसते. कधी कधी तर बाहेरगावी जाताना पाळीव प्राण्यांना कुठे ठेवायचे, असा प्रश्न पडतो. अशा पाळीव प्राण्यांची मायेने काळजी घेण्याचे काम मिनल गोडबोले करीत आहेत.
 
 
मिनल या मूळच्या डोंबिवलीकर आहेत. डोंबिवली पश्चिमेतील एका चाळीत त्यांचे बालपण गेले. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर राणाप्रताप या शाळेतून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पेंढारकर महाविद्यालयातून त्यांनी एम. कॉमपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. डोंबिवलीच्या ज्ञानमंदिर महाविद्यालयात त्यांना नोकरीची संधी चालून आली.
 
 
मिनल आणि त्यांच्या आई या दोघींनाही कुत्र्याची आवड होती. मिनल लहानपणापासून चाळीत येणार्‍या मांजरांची खूप काळजी घेत असत. प्राण्यांविषयी आवड असली तरी प्रत्यक्षात एखादा कुत्रा घरी आणून त्याचे संगोपन करणे शक्य नव्हते. मिनल यांना कुत्र्याचे संगोपन करणे आपल्याला शक्य होणार नाही, या परिस्थितीची जाणीव असल्याने त्यांनी आई-वडिलांकडेही कधी तसा हट्ट धरला नाही. त्या लग्न होऊन गोडबोलेंच्या घरी आल्या.
 
 
गोडबोलेंच्या घरी प्राण्यांविषयी आत्मीयता असल्याने त्यांच्याकडे एक कुत्रा होता. पण मिनल यांच्या लग्नापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. तो कुत्रा मृत्युमुखी पडल्याने मिनल यांचे पती गजानन हे नैराश्यात गेले होते. मिनल यांना लग्नानंतर दोन वर्षांनी मुलगी झाली. मुलगी पाच वर्षांची झाली, त्यावेळी त्यांनी कुत्र्याचे एक पिल्लू घरात आणण्याचा निर्णय घेतला. ‘सॅम’ असे त्याचे नाव होते.
 
 
गोडबोले कुटुंबीयांची ‘सॅम’शी एक वेगळी ‘अटॅचमेंट’ झाली होती. एक महिन्याच्या ‘सॅम’ची सर्व काळजी गोडबोले कुटुंबीय घेत असत. त्याचे लसीकरण, खाण्या-पिण्याच्या वेळा तंतोतत पाळल्या जात होत्या. मिनल यांच्या मुलीचाही या कुत्र्यांशी वेगळाच ऋणानुबंध जुळला होता. तिला शाळेत ‘माझे कुटुंब’ या विषयावर निबंध लिहिण्यास सांगितला. त्यात तिने ‘माझा भाऊ सॅम’ असा उल्लेख केला होता. ‘सॅम’ हे भावाचे नाव वाचून शिक्षकही गोंधळून गेले होते.
 
 
पालकसभेत त्यांनी मिनल यांच्या कानावर या निबंधातील नावाची मज्जा सांगितली. सुरुवातीला मिनल यांना काहीच उमगले नाही. त्यानंतर ‘सॅम’ हा आपला कुत्रा असून मुलीने त्याला आपल्या कुटुंबातील सदस्य मानले असल्याचे दिसून आले. एके दिवशी लग्न समारंभासाठी मिनल व त्यांच्या कुटुंबीयांना जायचे होते. यावेळी त्यांनी ‘सॅम’ला एका पाळणाघरात ठेवले. त्या पाळणाघरातून परत आल्यावर ‘सॅम’ने अंघोळ घालून घेतली.
 
 
मिनल ‘सॅम’ला उन्हाळ्यात आईस्क्रीम खाऊ घालत होत्या. नेहमीप्रमाणे आईस्क्रीम खाऊन झाले. त्यानंतर ‘सॅम’चा मृत्यू झाला. ही गोष्ट त्यांच्या मनाला चटका लावून गेली. पाळणाघरात पहिल्यांदाच सॅमला ठेवले आणि त्याचा मृत्यू झाला, असे त्यांचे मन म्हणत असे. मात्र, तोच ‘सॅम’ त्यांची प्रेरणा आहे आणि ‘सॅम’च्या आठवणींनी त्या आजही भावूक होतात.
 
 
मिनल यांनी मुलीच्या जन्मानंतर तिच्या संगोपनासाठी नोकरी सोडली होती. मिनल मुलीमध्ये गुंतल्याने त्यांनी पुन्हा नोकरीत रूजू होण्याचा विचार कधी केला नाही. ‘सॅम’च्या मृत्यूनंतर घरी गेल्यावर ‘सॅम’ दिसणार नसेल तर घरी जाण्यात काही अर्थ नाही, असे त्यांना वाटत होते. ‘बंटी’ गेल्यावर मिनल यांचे पती एवढे भावूक का झाले, हे त्यांना ‘सॅम’च्या मृत्यूनंतर समजले होते. प्राण्यांच्या पाळणाघराची डोंबिवलीत अनेक ठिकाणी सोय होती. पण केवळ श्वानांसाठी वेगळे पाळणाघर असावे, या हेतूने मिनल यांनी एक जागा भाडेतत्त्वावर घेतली.
 
 
डोंबिवली पूर्वेला साडेपाच हजार स्क्वेअर फुटांची जागा मिनल यांनी श्वानांचे पाळणाघर सुरू करण्यासाठी घेतली. हे पाळणाघर सुरू करताना ‘सॅम’ त्यांची प्रेरणा आहे. हे पाळणाघर म्हणजे मिनल यांची ‘पॅशन’ आहे. त्यामुळे कोणताही व्यावसायिक हेतू त्यांनी या पाळणाघरांमागे ठेवला नाही. साडेपाच हजार स्क्वेअर फूट जागेतील प्रत्येक कोपरानकोपरा-प्रत्येक भिंत ही श्वानांसाठी सजविण्यात आली आहे. या सर्व डिझाईनच्या संकल्पना मिनल यांच्या आहेत. ही सजावट करताना त्यांनी टाकाऊ वस्तूतून सुंदर अशी सजावट केली आहे. त्यामुळे हे पाळणाघर बघणार्‍यांच्या डोळ्यांचे पारणे फेडते.
 
 
‘पेट कॅफे’ ही नवीन संकल्पना त्यांनी याठिकाणी आणली आहे. ज्यांना प्राण्यांची आवड आहे पण त्यांना घरी त्यांचे संगोपन करणे शक्य नाही, अशा व्यक्ती या कॅफेत येतात. श्वानांशी खेळतात. त्यांच्याशी मस्ती करतात. या पाळणाघरात श्वानांना गाजर, केळी, सफरचंद, काकडी अशा पौष्टिक गोष्टी खायला दिल्या जातात. या पाळणाघराच्या पहिल्या मजल्यावर श्वानांसाठी खेळण्यासाठी जागा ठेवली आहे. त्या जागेत आर्टिफिशिअल गवत अंथरून त्यांची सजावट केली आहे. याशिवाय काही जम्पिंग खेळणी ठेवल्या आहेत.
 
 
या खेळण्यांच्या साहाय्याने खेळून श्वान आपला वेळ पाळणाघरातदेखील आनंदात घालवितात. याच मजल्यावर श्वानांसाठी स्विमिंग पूल बनविण्यात आला आहे. सध्या कोरोनामुळे स्विमिंग पूल बंद आहे. प्रत्येक श्वानांसाठी सहा फुटाच्या केबिन बनविल्या आहेत. सर्व ठिकाणी सीसीटीव्ही आहेत. या श्वानांना पाणीदेखील फिल्टर करून दिले जाते. सध्या या पाळणाघरात दहा श्वान आहेत. काही श्वानमालक कार्यालयात जाताना तर काही समारंभाला जाताना त्यांना पाळणाघरात सोडतात. मिनल यांनी दि. १४ मार्चला या पाळणाघराचा शुभारंभ केला आणि दि. १७ मार्चला ‘लॉकडाऊन’ सुरू झाले.
 
 
त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत पाळणाघर बंद होते. एवढा खर्च करून जागा भाड्याने घेणे, ती सजविणे यात बराच मोठा निधी खर्च झाला होता. त्यात ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्याने त्या नैराश्यात गेल्या होत्या. पण त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना मोलाची साथ दिली. सध्या सामाजिक अंतराचे सर्व नियम पाळून ‘पेट कॅफे’ला येऊ शकतात. इतर प्राणी ठेवण्याबाबत विचारणा होत आहे. पण त्याबाबत अद्याप विचार केलेला नाही. श्वानांसाठी मार्गदर्शन घ्यायलाही अनेकजण त्यांच्याकडे येतात. मिनल त्यांना मार्गदर्शन करतात. पण आपण डॉक्टर नसल्याचेही त्या आवर्जून सांगतात.


- जान्हवी मोर्ये
@@AUTHORINFO_V1@@