नवे पटेल की नव्या सोनियाजी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2020
Total Views |
Sonaia Gandhi INC _1 
 
 
 
काँग्रेससमोरील यक्षप्रश्नआज अहमद पटेल यांच्या उत्तराधिकार्‍याची निवड करताना त्यांचे महत्त्व अधोरेखित होते हेही नसे थोडके. त्यामुळेच नव्या सोनियाजी निवडणे जेवढे सुलक्ष असेल तेवढे नवे अहमद पटेल निवडणे सोपे राहणार नाही हे निश्चित. यातूनच पटेल यांचे महत्त्वच अधोरेखित होते. किंबहुना तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरते.
 
दोन सर्वोच्च व्यक्तित्वाचे उत्तराधिकारी एकाच वेळी निवडण्याचा यक्षप्रश्न हल्ली काँग्रेस पक्षासमोर उभा झाला आहे. त्यातील एका नेत्याच्या उत्तराधिकारात आपल्या नेत्याचे नाव घुसवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने करुन पाहिला, पण बारा तासांच्या आत तो त्याला सोडावा लागला. उत्तराधिकार्‍याचा शोध घेण्यास कारणीभूत ठरणार्‍या या दोन व्यक्ती म्हणजे स्वत: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि दुसरी व्यक्ती म्हणजे त्यांचे राजकीय सल्लागार आणि काँग्रेसचे कोषाध्यक्ष अहमद पटेल.
 
काँग्रेसाध्यक्षाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली, असे म्हणतात. त्यासाठी एक हजार मतदारांकडे पत्रे पाठविण्यात आली आहेत, असेही सांगितले जाते. पण त्याबाबतचा तपशील मात्र हाती आलेला नाही. त्या पत्रांमध्ये उमेदवारांची नावे आहेत काय किंवा त्याबाबत काही नियम सांगितले गेले आहेत काय, याबाबत अद्याप काहीही जाहीर झालेले नाही. पण सोनियाजींच्या प्रकृतिअस्वास्थ्यामुळे काँग्रेसला नवा अध्यक्ष निवडणे अपरिहार्य आहे हे निश्चित.
 
तो कोण असेल याबाबत अंदाज करण्याची गरज नाही, पण त्याबाबत अनिश्चितता कायम आहे हे नक्की. एकवेळ नव्या काँग्रेसाध्यक्षाची निवड सोपी असेल पण अहमद पटेल यांचा उत्तराधिकारी शोधणे आणि तो प्रस्थापित करणे हे मात्र काँग्रेससाठी फार कठिण काम ठरणार आहे. कारण, अहमद पटेल यांनी आपल्या व्यवहारामुळे त्यांच्या पदाचे महत्त्व खूप वाढवून ठेवले आहे. म्हणायला ते काँग्रेस अध्यक्षांचे राजकीय सल्लागार होते. पण प्रत्यक्षात मात्र तेच अर्थात सोनियाजींच्या संमतीने अध्यक्षपद सांभाळत होते. त्यांनी ते कधीही जाणवू दिले नाही, ही त्यांच्या कार्यशैलीची किमया. पण गंमत अशी आहे की, जोपर्यंत सोनियाजींचा उत्तराधिकारी अधिकृतपणे निश्चित होत नाही तोपर्यंत अहमद पटेल यांचा उत्तराधिकारी निश्चित होऊच शकत नाही. काँग्रेसमधील हे वास्तव आहे.
 
दुर्दैव असे की, अहमद पटेल यांच्या व्यक्तित्वाचे आणि अर्थात कर्तृत्वाचे मूल्यांकन ते हयात असताना यथार्थ रीतीने काँग्रेसमध्येही झाले नाही. त्यामुळे ते माध्यमात झाले नसेल तर त्यात काहीही आश्चर्य नाही. सोनिया गांधींचे कपटी राजकीय सल्लागार अशीच त्यांची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न झाला. विरोधी पक्ष आपल्या राजकारणासाठी तो करणारच. पण काँग्रेसनेत्यांनीही त्यांची तशी प्रतिमा कायम ठेवण्यात धन्यता मानली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कर्तृत्वाचे झालेले मूल्यमापन पाहता त्यांचीच काँग्रेसाध्यक्षपदी निवड व्हायला हवी होती असे वाटायला लागते.
 
पण राजकारण हा इतका साधासोपा खेळ नाही. तो अतिशय क्रूर खेळ आहे आणि त्यात अहमद पटेल यांच्यासारख्या नेत्याचा बळी जाणे अपरिहार्यही आहे. खासदारकीशिवाय सत्ताकारणातील अन्य कोणतेही पद न मिळताही त्यांनी गेली जवळजवळ २० वर्षे सोनिया गांधींबरोबर त्यांची सावली बनून काम केले, सर्व पक्षातील नेत्यांशी संवादसंबंध कायम ठेवले, काँग्रेससाठी तर संकटमोचकाचीच भूमिका पार पाडली तरीही चाणक्यासारखे काम करुनही त्यांची प्रतिमा मात्र ‘मॅकियाव्हिली’सारखीच राहिली हे त्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल. पण आज त्यांच्या उत्तराधिकार्‍याची निवड करताना मात्र त्यांचे महत्त्व अधोरेखित होते हेही नसे थोडके. त्यामुळेच नव्या सोनियाजी निवडणे जेवढे सुलक्ष असेल तेवढे नवे अहमद पटेल निवडणे सोपे राहणार नाही हे निश्चित.
 
 
यातूनच पटेल यांचे महत्त्वच अधोरेखित होते. किंबहुना तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरते. पटेल यांच्या संभाव्य उत्तराधिकार्‍यांची एक यादीच ‘इंडिया टूडे’च्या ताज्या अंकात देण्यात आली आहे. त्यात अशोक गहलोत, कमलनाथ, मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे, पवन बन्सल, दिग्विजय सिंग, अधिररंजन चौधरी यांच्या नावांचा उल्लेख जसा आहे तसेच त्यांच्या ‘प्लस-मायनस’चा ऊहापोहही आहेच. पण त्यात एक महत्त्वाची उणीव अशी आहे की, त्यांच्या नावांचा ऊहापोह करताना लेखकाने सोनिया गांधीच काँग्रेसाध्यक्ष राहतील असे जणू गृहित धरलेले दिसते.
 
कारण, २३ कथित बंडखोर नेत्यांपैकी मुकुल वासनिक वगळता अन्य कोणत्याही नेत्याचा उल्लेख त्या यादीत नाही. ना गुलाम नबी आझाद ना आनंद शर्मा. पी. चिदंबरम, जयराम रमेश, मनीष तिवारी, कपिल सिब्बल, जयराम रमेश, शशी थरुर यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना जणू काँग्रेसमध्ये स्थानच नाही असे त्यातून सूचित होते ते वेगळेच. अर्थात, जोपर्यंत नवा काँग्रेसाध्यक्ष कोण हे ठरत नाही तोपर्यंत नवे अहमद पटेल निश्चित होणे शक्यच नाही. पण अडचण अशी आहे की, ते पद कुणाकडे जाते याचा अद्यापपर्यंत तरी थांगपत्ता लागत नाही.
 
काँग्रेसच्या इतिहासावर नजर टाकली तर असे दिसते की, गांधी-नेहरु परिवाराबाहेरील व्यक्ती काँग्रेसाध्यक्ष झालीच नाही अशी वस्तुस्थिती नाही. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, चक्रवर्ती राजगोपालाचारी, पट्टाभी सीतारामय्या, के. कामराज, एस. निजलिंगप्पा, देवराज अर्स, पी. व्ही. नरसिंहराव, सीताराम केसरी यांच्यासारखे नेहरु घराण्यात नसलेले नेते काँग्रेसचे अध्यक्ष झालेले आहेत. एवढेच नाही तर नेताजी सुभाषचंद्र बोस हे गांधीजींनी अधिकृत केलेल्या उमेदवाराचा पराभव करुन काँग्रेसाध्यक्षपदी निवडून आले होते. काही ब्रिटिशही काँग्रेसाध्यक्ष झाले होतेच.
 
पण पं. जवाहरलाल नेहरु यांच्यानंतरची काँग्रेसाध्यक्षपदाची परंपरा पाहिली तर त्यावर नेहरु घराण्याचेच वर्चस्व आढळून येते. कारण, पंडितजींनंतर इंदिराजी, त्यांच्यानंतर राजीवजी आणि त्यांच्यानंतर सोनियाजी ही नेहरु परिवारातील मंडळी सातत्याने गेली सत्तरेक वर्षे त्या पदावर आहेत. किंबहुना नेहरु घराण्याबाहेरचा अध्यक्ष या पक्षाला मानवतच नाही अशी भावना काँग्रेसजनांमध्ये निर्माण झाली आहे. त्याचे कारणही आहे. इंदिराजी, राजीवजी आणि सोनियाजींनी काँग्रेसला प्रत्येक वेळी विजयाची सुवर्णसंधी प्राप्त करुन दिली आहे. अपवाद फक्त आणीबाणीतील १९७७च्या लोकसभा निवडणुकीचा. वास्तविक २०१४ व २०१९च्या लोकसभा निवडणुकींनी त्या संदर्भात काँग्रेस पक्षाचा भ्रमनिरास केला आहे पण अजूनही नेहरु-गांधी घराण्याची काँग्रेसवरील पकड काही ढिली होत नाही. २०१४ नंतर ती केव्हाही सावरु शकली नाही तरीही.
 
या पार्श्वभूमीवर जेव्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा विचार होतो तेव्हा गाडी राहुल गांधींशिवाय दुसर्‍या नेत्यापर्यंत पोहोचतच नाही. खरेतर २०१९च्या पराभवानंतर त्यांनी काँग्रेसाध्यक्षपदाचा रीतसर राजीनामा दिला आहे आणि गेल्या एक वर्षात अनेकदा आग्रह होऊनही त्यांनी तो परत घेतलेला नाही. त्यातून त्यांचा निर्धार प्रकट होतो असे म्हणता येईलही, पण गेल्या वर्षातील त्यांचा व्यवहार पाहता ते पुन्हा काँग्रेसाध्यक्षपद स्वीकारणारच नाही, असा संकेत मात्र मिळत नाही. (शनिवारच्या काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधीच पुन्हा एकदा पक्षाध्यक्षपदी हवेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.)
 
अध्यक्ष नसले तरी त्यांच्या मातोश्रींच्या माध्यमातून तेच पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत, असा संदेश सर्वदूर पोहोचला आहे आणि पोहोचतही आहे. मध्यंतरी काँग्रेसने उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रियांका वाड्रा यांचे घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न जरुर केला. पण तो सफल झाला नाही. त्यामुळे हल्ली सुरु असलेल्या कथित प्रक्रियेनंतर राहुल गांधीच पक्षाध्यक्ष झाले तर ते आश्चर्य ठरणार नाही. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कितीही पीछेहाट झाली असली तर आज भाजपला पर्याय देणारा एकमेव पक्ष काँग्रेसच आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही.
 
उर्वरित भाजपविरोधी पक्ष राज्याराज्यांमधील कुटुंबांनी आपली दुकाने म्हणून वाटून घेतली आहेत. मग त्यापैकी कुणाला तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रीय पक्ष म्हणून निर्वचन आयोगाची मान्यता मिळाली असली तरीही त्यामुळे फरक पडत नाही. दुकानदारी म्हणून न चालविणारा पक्ष म्हणजे कम्युनिस्ट पक्ष. पण त्याची इतकी शकले झाली आहेत की, भाकपा आणि माकपा यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. एकवेळ काँग्रेसचे अखिल भारतीय स्वरुप मान्य केले तर भविष्यातील संभाव्य पंतप्रधानपदावर इतर कुणाचा हक्कच पोहोचत नाही.
 
२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न विरोधी नेत्यांनी करुन पाहिला. पण काँग्रेसने तो हाणून पाडला. वास्तविक तो प्रश्न त्यावेळी सुटला असता तर कदाचित आज वेगळे चित्र दिसू शकले असते. पण शेवटी ‘रात गयी बात गयी’ हेच खरे असते. आता तर अशी स्थिती निर्माण झाली आहे की, जो नेता काँग्रेसचा अध्यक्ष होईल तोच २०२४च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार बनेल. ती संधी राहुल गांधी सोडतील किंवा त्यांना सोडू दिली जाईल, याची अजिबात शक्यता नाही. त्यामुळे राहुल गांधींची काँग्रेससाठी आणि त्यांच्यासाठी काँग्रेसाध्यक्षपदाची अपरिहार्यताच अधोरेखित होते. फक्त त्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल.
 
एकवेळ सोनियाजींचा उत्तराधिकारी निश्चित झाला की, अहमद पटेल यांचा उत्तराधिकारी ठरायला फारसा वेळ लागणार नाही. पण तो वर उल्लेख केलेल्या नेत्यांपैकी कुणीही नसेल हे सहज सांगता येईल. कारण, त्यांच्यापैकी कुणीही राहुल गांधींच्या कार्यशैलीत बसणारा नाही. त्यांची काँग्रेस पक्षातील तपश्चर्या खूप असेल, त्यांच्याजवळ क्षमताही असेल पण त्यांच्यापैकी कुणीही राहुलच्या कार्यशैलीत बसत नाही आणि ते स्वाभाविकही आहे.
 
मला तरी राहुलच्या कार्यशैलीत बसणारा एकच नेता दिसतो व तो म्हणजे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणजितसिंह सुरजेवाला. त्यांना जनाधार नाही हे हरियाणातील एका पोटनिवडणुकीनेच सिद्ध केले आहे. आक्रमकतेच्या बाबतीत ते राहुल गांधींच्या एक इंचदेखील मागे नाहीत. ते त्यांनी वेळोवेळी सिद्धही केले आहे. पण ते अहमद पटेल यांची जागा घेऊ शकतील, असे मात्र नाही. कारण, पडद्याआड सर्व अधिकार आपल्या हातात ठेवूनही कोणत्याही पदाचा आग्रह न धरण्याची कला त्यांना साधेल, असे आजच त्यांच्या कार्यशैलीतून मात्र सूचित होत नाही.
 
 
- ल. त्र्यं. जोशी 
@@AUTHORINFO_V1@@