दोन दिवसांमध्ये कर्नाळ्यातून पक्ष्यांच्या १०३ प्रजातींची नोंद

    20-Dec-2020
Total Views | 716
bird _1  H x W:


पहिल्यांदाच पार पडली पक्ष्यांची शास्त्रीय गणना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - कर्नाळा पक्षी अभयारण्यात प्रथमच शास्त्रोक्त पद्धतीने पक्षीगणना पार पडली. शनिवार आणि रविवारी पार पडलेल्या पक्षीगणनेत एकूण १०३ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली. वन्यजीव विभाग ठाणे आणि 'ग्रीन वर्क ट्रस्ट' संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
 
 
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आणि पक्ष्यांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कर्नाळा पक्षी अभ्यारण्यात पहिल्यांदाच पक्षी गणना पार पडली. महत्त्वाचे म्हणजे शास्त्रीय पद्धतीने पक्षी मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाइन ट्रान्झॅक्ट आणि पॉइंट काऊंट पद्धतीव्दारे ही गणना करण्यात आली. १९ ते २० डिसेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत पार पडलेल्या पक्षी गणनेत एकूण २७ लोक सहभागी झाले होते. यामध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यांबरोबरच पक्षीतज्ज्ञ, छायाचित्रकार, ई-बर्ड या संकेतस्थळाच्या वापरकर्त्यांचा समावेश होता. या पक्षीगणनेची सुरुवात राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम) सुनिल लिमये यांच्या हस्ते झाली. यावेळी ठाण्याचे उपवनसंरक्षक (वन्यजीव) भानुदास पिंगळे, सहाय्यक वनसंरक्षक नंदकुमार कुप्ते, कर्नाळ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण आणि 'ग्रीन वर्क ट्रस्ट'चे निखिल भोपळे उपस्थित होते. 

bird _1  H x W: 
 
 
पक्षी गणनेसाठी १२.४८ चौ.किमी क्षेत्रात पसरलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात एकूण ९ लाइन ट्रान्झॅक्ट आणि ५ पाॅईंट काऊंट तयार करण्यात आले होते. पक्षी गणनेत सहभागी झालेल्या लोकांचे नऊ संघ तयार करण्यात आले. प्रत्येक लाइन ट्रान्झॅक्ट हे ५०० मिटर अंतराचे होते. अशा प्रत्येक ९ लाइन ट्रान्झॅक्ट परिसरामध्ये डाव्या-उजव्या तसेच समोरील बाजूस २० मीटर पर्यंत दिसणाऱ्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली. तसेच रात्री ७ ते ८ वाजेपर्यंत अभयारण्यातील एकूण ९ लाइन ट्रान्झॅक्ट फिरून निशाचर पक्ष्यांचा आवाजाने त्यांच्या नोंदी घेण्यात आल्या. यामाध्यमातून पक्ष्यांच्या एकूण १०३ प्रजातींची नोंद करण्यात आली असून यामध्ये अ‍ॅल्पाइन स्विफ्ट, इंडियन स्कॉप्स आउल, इंडियन ईगल आउल, इंडियन पिट्टा, कॉमन हॉक कोकिली आणि पेरेग्रीन फाल्कन अशा पक्ष्यांचा समावेश असल्याची माहिती निखिल भोपळे यांनी दिली. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121