
साई संस्थानाने लावलेले फलक म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अपमान
मुंबई : श्री क्षेत्र शिर्डी येथे भाविक भारतीय संस्कृतीला अनुसरून पेहराव करून मंदिरात येत नसल्याचं साई संस्थानच्या गेल्या काही दिवसात लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी भाविकांच्या पेहरावाविषयी निर्णय घेत काही फलक मंदिर परिसरात लावले. त्यावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना थेट शिर्डीत येऊन फलक काढून टाकू असा इशारा दिला.
लाखो भक्तांसाठी श्रद्धेचं स्थान असणारं ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र शिर्डी . साईबाबांच्या चरणी लीन होऊन भक्तीत दंग होणारे अनेक भाविक दरवर्षी मंदिरात येत असतात. साई संस्थानतर्फे, " साईभक्तांना विनंती आहे की, आपण पवित्र स्थळी प्रवेश करत असल्याने कृपया भारतीय संस्कृतीला अनुसरून वेशभूषा परिधान करावी." असा सुचनावजा विनंती करणारा फलक लावण्यात आलेले आहेत.
साई संस्थानाने केलेल्या या आवाहनावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांचं मत स्पष्ट केलं. " हा फलक लावणं म्हणजे संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अपमान आहे. साई संस्थानाने हे फलक काढले नाहीत तर ते काढण्यासाठी आम्हाला तिथे यावं लागेल." असं तृप्ती देसाई यावेळी म्हणाल्या. शिवाय त्यांनी मंदिरातील पुजाऱ्यांच्या पेहरावाविषयी सुद्धा भाष्य केलं.