दिव्यांगांमध्ये ‘जिद्द’ जागविणार्‍या शिक्षिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2020
Total Views |

bhosale_1  H x


आज, दि. ३ डिसेंबर. जागतिक अपंग दिन. त्यानिमित्ताने देशातील पहिल्या ‘जिद्द’ या ठाण्यातील दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना ‘आत्मनिर्भर’ बनविणार्‍या निवृत्त प्रा. श्यामश्री भोसले यांच्याविषयी...
 
शिक्षिकेची नोकरी करून सामाजिक बांधिलकी जपल्यानंतर निवृत्तीनंतरही आपल्या या पेशाला जागत जिद्दीने समाजसेवेची धुरा पेलणे तसे विरळच. त्यातीलच एक म्हणजे, ठाण्यातील श्यामश्री अजय भोसले या शिक्षिका. ठाणे जिल्हा बालकल्याण समितीच्या माजी सदस्या असलेल्या श्यामश्री भोसले या ठाणे महापालिकेच्या देशातील पहिल्या धर्मवीर आनंद दिघे ‘जिद्द’ या गतिमंद व अस्थिव्यंग (दिव्यांग) शाळेच्या निवृत्त प्राचार्या आहेत.
 
केवळ शालेय शिक्षण न देता, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागवून या विशेष मुलांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचविणार्‍या श्यामश्री भोसले यांनी समाजसेवेचा एक वेगळा आयाम समाजासमोर ठेवला आहे. त्यांच्या या परोपकारी वृत्तीची चित्तरकथा ‘जिद्द’ शाळेतून प्रशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहिलेले विद्यार्थी जेव्हा सांगतात, तेव्हा श्यामश्री भोसले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडतात.
 
गतिमंद, दिव्यांग आणि सर्वसाधारण मुलांमध्ये खूपच फरक असतो. अशा मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी ‘आत्मनिर्भर’ बनविणे हे मोठे जिद्दीचे काम असते. श्यामश्री भोसले एक असे व्यक्तिमत्त्व की, ज्यांनी जिद्दीने हे शिवधनुष्य पेलले, इतकेच नव्हे, तर निवृत्तीनंतरही विशेष मुलांना प्रशिक्षण देण्याचे आपले कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे. तब्बल २६ वर्षे सेवा बजावून ‘जिद्द’ शाळेतून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी समाजसेवेचा हा वसा आजतागायत सोडलेला नाही.
 
दिव्यांग मुलांना प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यात ‘स्व’ची जाणीव निर्माण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ दिले. ‘जिद्द’ शाळेतील मुलांमधील ‘जिद्द’ ‘याची देही याची डोळा’ पाहणार्‍या श्यामश्री भोसले त्यांच्याबद्दल भरभरून बोलतात. त्यांच्याशी संवाद साधला असता, निवृत्तीनंतरही त्या अशा विशेष मुलांच्या क्षेत्रात मनापासून कार्य करत आहेत. ‘जिद्द’ शाळेनंतर ‘जागृती पालक संस्थे’सोबत कार्यरत असताना त्यांना मानसिक बळ मिळाले असले, तरी आर्थिक स्रोत नसल्याने गोरगरीब पालकांना न्याय मिळवून देताना त्यांना संघर्ष करावा लागत आहे.
 
तरीही खचून न जाता, त्या आजही आपले कार्य नेटाने पार पाडीत आहेत. ‘कोविड’च्या काळात त्यांनी राज्यभर पालकांचे ग्रुप तयार करून त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्याचे काम सुरूच आहे. मित्रपरिवाराच्या परोपकारातून विविध उपक्रम राबविण्यासह ‘कोविड’काळात ६० दिव्यांगांच्या कुटुंबांना मदतीचा हातदेखील त्यांनी दिला. हा शिरस्ता सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दरमहा सुरूच असल्याचे त्या सांगतात.
 
अनेक दिव्यांग मुले आज स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभी राहिली आहेत. यातील राबोडीतील बिलाल शाह हा अस्थिव्यंग विद्यार्थी आज यशस्वी अभियंता बनला आहे, तर शीतल गायकवाड, ज्योती सुतार यांनाही त्यांनी सक्षम बनवले. असे अनेक दिव्यांग विद्यार्थी नोकरी-व्यवसायात आणि राजकारणातही टिकून राहिले आहेत.
 
आज ठाणे, मुंबई, पुण्यातील संस्थांना भेटी देताना त्यांना अनेक सुहृदयी भेटले. खारघर येथील एनआयएमएच महाविद्यालयातील मुलांना शिकविल्यानंतर अल्प कालावधीत त्यांच्याशी मैत्री करून त्यांना दिलेले सल्ले त्यांनी ऐकले आणि आज ते स्वतःच्या पायावर उभे असल्याचे बघून मनाला पुन्हा उभारी मिळते.
 
क्षेत्र कोणतेही असो, त्यात मनापासून काम केले की, आपल्याला मिळणारा आनंद आणि आपल्यापासून दुसर्‍यांना मिळणारा आनंद हा सर्वोच्च असतो,” असे त्या सांगतात.ज्या विद्यार्थ्यांना घडविले आणि जे विद्यार्थी स्वावलंबी झाले, हीच गुरूसाठी सर्वात मोठी गुरुदक्षिणा असते. तेव्हा, त्यांच्या या समाजसेवेमुळे आजही ‘जिद्द’ शाळेतच नव्हे, तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात श्यामश्री भोसले हे नाव ऐकले की, त्यांचे कार्य समोर उभे राहते. त्यांचे हे कार्य भविष्यात असेच सुरू राहील व त्यातून अनेक दिव्यांग मुलांचे आयुष्य नव्याने सुरू होईल, यात शंका नाही.
 
पूर्वाश्रमीच्या श्यामश्री चंद्रकांत मंडलीक या ठाण्यातील सेंट जॉन शाळेच्या विद्यार्थिनी. एसएनडीटीमधून त्यांनी विशेष मुलांसाठी असलेला अभ्यासक्रम पूर्ण करून सेंट जॉन शाळेतच शिक्षिकेचा पेशा स्वीकारला. पती मर्चंट नेव्हीमध्ये असल्याने कायम बोटीवर, सासरे सैन्यदलात, सासूबाई मनोरुग्णालयाच्या कर्मचारी असे सर्वच सेवाव्रती घरात असल्याने नोकरी करण्यापेक्षा आपणही समाजासाठी काहीतरी करावे, ही भावना मनात होतीच अन् १९८५ साली ‘जिद्द’ शाळेची कवाडे समाजसेवेसाठी खुली झाली. शिक्षणाचे हे व्रत निष्ठेने पार पाडल्याचे श्रेय त्या आपल्या कुटुंबाला देतात. पालकांनी केलेले संस्कार व पाठिंब्यामुळेच हा पल्ला गाठता आला. अशा विशेष जनांची सेवा करण्याची संधी या जन्मी लाभली म्हणून त्या ईश्वराचेही आभार मानतात.
 
सामाजिक जीवनात श्यामश्री भोसले यांनी असंख्य पुरस्कार पटकाविले, त्यांची यादी करायला कदाचित लेखणी तोकडी पडेल. आज जागतिक अपंग दिन सर्वत्र साजरा होतो. पण, दिव्यांगाच्या २१ ‘कॅटेगिरी’ आहेत. मात्र, त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत. याविषयी प्रबोधन होणे आवश्यक असल्याचेही त्या आवर्जून नमूद करतात.



- दीपक शेलार  
@@AUTHORINFO_V1@@