वैदिक सणांचे योग रहस्य भाग- ६

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2020
Total Views |
Hindu_1  H x W:
 
 


लक्ष्मीपूजन
अमावास्येला संध्याकाळी लक्ष्मीपूजन करतात. आपल्या सर्व मुहूर्तांमध्ये अमावास्या वाईट मानली आहे. त्याला अपवाद दोनच. सर्वपित्री आणि लक्ष्मीपूजन. भौतिक व्यवहार जिच्यामुळे सुकर आणि सुखद होईल ती लक्ष्मी. प्राचीन काळात धनाची कल्पना गौ, भूमी, धान्य, अपत्ये आणि सुकीर्तीच्या रूपाने वसत होती. नंतरच्या काळात विनिमयाचे साधन जे सुवर्ण आणि मुद्रा त्याला महत्त्व आले. आज तीच कल्पना लक्ष्मीभोवती रेंगाळते आहे. वास्तविक साधना धर्माचा विचार केल्यास धनवान वा लक्ष्मीपुत्र तो की जो ’संपन्ननारायण स्मृती’असे मानतो. परंतु, असे मानणार्‍याला व्यवहारात स्थान नसते.
 
 
अधिकांश लोक विनिमयाच्या माध्यमालाच लक्ष्मी समजतात आणि तिचे अमावास्येला पूजन करतात. साधकाला अप्रकाशातून प्रकाशाकडे जायचे असल्यामुळे सर्वच दृष्टीने त्याला हिरण्यमय व्यवहार नकोसा होतो म्हणून साधकांचे लक्ष्मीपूजन अमावास्येला असण्याचे कारण तरी होते. म्हणून प्रकाशप्राप्तीकरिता तो अप्रकाशापासून म्हणजे अमावास्येपासून आपल्या साधक जीवनाची सुरुवात करीत असे. ‘असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मामृतं गमय॥’ म्हणून तमाने भरलेली अमावस्या त्याची सुरूवातीची जागा होय.
 
ज्ञानप्राप्तीचा प्रकाश पाहण्याकरिता साधक भगवंताला प्रार्थना करतो ’हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुख तत्त्वं पूषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये ॥’ साधक सत्य धर्माची वाटचाल करण्याकरिता हिरण्यमय पात्राला, जे की सत्यधर्माच्या मुखावर बसले आहे, ते दूर करण्यास सांगतो, तर आम्ही व्यवहारी साधक मात्र ते हिरण्यमय पात्र त्यावर अधिक घट्ट बसविण्याकरिता प्रयत्न करतो आणि त्याकरिता लक्ष्मीची पूजा करतो. घुबडाला रात्रीच्या वेळेस दिसत असते. घुबड लक्ष्मीचे वाहन मानण्यात एक महान सिद्धांत गोवला आहे. वाहन म्हणजे त्या अवस्थेकडे नेणारे साधन, अंधारातून प्रकाशाकडे म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारी साधकाची गतिमान अवस्था म्हणजे लक्ष्मीचे वाहन घुबड होय.
 
 
जो अंध:कारसुद्धा पाहील त्याचे इष्टदैवतलक्ष्मी असणारच! लक्ष्मी म्हणजे संपन्नतेचे प्रतीक आहे. परंतु, संपन्नता कोणती आणि कशाची? विपदो नैव विपद: संपदो नैव संपदः। विपद विस्मरणं विष्णो: संपन्ननारायण स्मृतिः॥ लक्ष्मीपूजन अमावस्येच्या संध्याकाळी असते आणि तिचे वाहन घुबड असते हे खरे. तिन्ही सांजेची वेळ जरा चिंतेचीच असते. ‘जाहल्या तिन्ही सांजा घणघण घंटानाद। कुणीकडे घालू साद गोविंदा रे॥’ कवी मायदेव म्हणतात, तर ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या, दिले वचन मला हृदयी माझ्या’ असे म्हणणारी आतुर विरहिणी दारावर चिंतेने वाट पाहत असते. त्याच चिंता अवसरी चिंतेला चितास्थान देऊन लक्ष्मीमातेची आराधना करायची असते. असे हे अमावास्येचे लक्ष्मीपूजन व्यावहारिक दृष्टीने सुवर्णमुद्रा जमविण्याचे, तर खर्‍या साधकाला अलक्ष निरंजनाकडे घेऊन जाणारे!
 

बलिप्रतिपदा
 
प्रतिपदेला बलिपूजन असते. नरकासुराचा वध करून आणि खर्‍या अर्थाने लक्ष्मीपूजन केल्यामुळे आता साधकाला एक प्रकारचे दिव्य बल येत असते. बल किंवा शक्ती विवेकयुक्त राहिल्यास त्या बलापासून नराचा नारायण होत असतो. परंतु, फारच थोड्यांच्या वाट्यास असले विवेकसंपन्न बल येते. बल म्हटले की, उन्माद आलाच, असा उन्माद आला की महाबली साधक त्याला स्वतःला आणि समाजाला जाचक होत असतो. ‘दुर्वासचरित्र’ सर्वांना माहीतच आहे. दुर्वास एक बलसंपन्न साधकश्रेष्ठ खरे, पण त्यांच्या शक्ती उन्मादामुळे ते सर्वांनाच नकोसे वाटत असत. त्यांचा वास म्हणजे जवळीक कोणालाच सहन होत नसे. म्हणूनच त्यांना ‘दुर्वास’ असे म्हणत असत. साधकाची असली बलसंपन्न अवस्था म्हणजे बली राजा होय.
 
बली राजा भगवंतभक्त खरा, परंतु बलोन्मादामुळे तो असुर बनून त्याचे अधःपतन होईल, असे वाटल्याने त्याने केलेल्या शंभराव्या यज्ञात बटू वामनाच्या रूपाने येऊन भगवंतांनी त्याला तीन पद दक्षिणा मागितली. बली अजून भगवंतभक्त असल्याने तीन पदाची दक्षिणा त्याने मान्य केली आणि उदक सोडले. दैत्यगुरू शुक्राचार्य आडवे आले, झारीतील तोटीत बसले. भगवंत छिद्रान्वेशी! साधकाच्या प्रत्येक गोष्टी ते जाणतात. त्यांनी दर्भाने झारीचे रंध्र मोकळे केले आणि तेथे लपून बसलेल्या शुक्राचार्यांचा डोळा फुटला. झारीतून उदक पडले.
 
भगवंतांना त्रिपदाचे स्थान प्राप्त झाले. भगवंतांना बलीच्या भल्याकरिताच त्याला सुतल पातालात पुन्हा बसवून त्याच्यातून नारायण उत्पन्न करायचा होता. त्रिपदाचे दान मिळाल्यावर भगवंताने एक पद स्वर्गात, दुसरा पृथ्वीवर आणि तिसरा कोठे ठेवायचा? तर भक्तश्रेष्ठ बलीने तो स्वतःच्या मस्तकावर धारण केला. भगवंतांनी त्याबद्दल त्याला योग्य फळ दिले. त्याला भगवंतांनी सुतल पाताळात घालून तेथे बसविले. या कल्पांतापर्यंत ज्ञानेश्वर माऊलींप्रमाणे बलिराजा भक्ती करीत राहणार! आणि त्याचे स्थानस्तर बलीला मिळाले. साधकाला योग्य साधना करण्याकरिता आणखी काय हवे असते?
 
 
वरील कथेचा खरा अर्थ न कळल्यामुळे काहीजण भगवंतांवर तोंडसुख घेतात आणि म्हणतात की, ’ज्या बलीने एवढी भक्तीभावना ठेवली त्याला भगवंतांनी काय फळ द्यावे?’ परमभक्ताला आपल्या हृदयाशी घट्ट न धरता भगवंतांनी त्याला लाथ मारून पाताळात घातले. कसला हा भगवंत आणि कसला हा नेभळट भक्तराज बळीराजा? आम्ही असतो तर असल्या भगवंताला मुळीच विचारले नसते! परंतु, भक्तिमार्गात ज्या महानुभावांनी आपला सर्व अहंकारच मुळी भगवंताला अर्पण केलेला असतो. त्याला भगवंताचे चरण म्हणजे भगवंताचे हृदयच होय.
 
भक्तिमार्गाचे निरहंकारी रहस्यजीवन ज्यांना माहीत नाही ते लोक वरील प्रकारे म्हणणारच. प्रत्येक साधकागणिक असली बलिप्रतिपदा येणारच. ती मग तुम्ही साजरी करा की नका करू. ती दिवाळीतच येईल असेही नाही. परंतु, बलवान साधकाची अतिरिक्त शक्ती ठायीच पचविण्याकरिता साधकागणिक भगवंत असेच बलीला पदन्यास करून सु+तल पाताळात बसवितात. पातालही सात आहेत, तल, अतल, तलातल, वितल, सुतल, इत्यादी. बलीला सुतलातच बसावे लागते.
 
 
काही साधक या कथेचा केवळ ऐतिहासिक दृष्टीने अर्थबोध करण्याचा प्रयत्न करतात. ते पाताळ म्हणजे पृथ्वी गोलार्धाच्या दुसर्‍या बाजूला असणार्‍या अमेरिकेत जाऊन तेथे या बलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. तेथे हा बली कोणाला सापडला असेल, ते सांगता येत नाही. परंतु, बली राजाचा शोध घेण्याची घाई नाही. कारण या कल्पांतापर्यंत बली राजा जीवंत आहे.
(क्रमशः)
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
9594737357/9702937357

@@AUTHORINFO_V1@@