प्रतापी संघ कार्यकर्ता मुकुंदराव वझे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2020
Total Views |

mukundrao vaze_1 &nb


संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्याकडून ज्यांनी संघप्रतिज्ञा घेतली, अशा दुर्मीळ कार्यकर्त्यांमध्ये कल्याणच्या मुकुंद विष्णू वझे यांचा समावेश होतो. दि. १३ जून, १९३६ साली सती मैदानावर ठाण्याच्या आबा घाणेकर यांनी कल्याणमध्ये संघाची पहिली शाखा सुरू केली. दुसरी शाखा लगेचच हिराबागेत सुरू झाली व नंतर पार नाक्यावर सरकार वाड्यात ‘खंडोबल्लाळ’ नावाची शाखा सुरू झाली. सुरुवातीचे संघचालक रावळभाई होते. आप्पा पाटणकर, बाळासाहेब पटवर्धन व त्यांचे सुभेदारवाडा हायस्कूलमधील मित्र हे पहिले स्वयंसेवक. पारनाक्याच्या शाखेमध्ये मुकुंदराव यांचा संघ प्रवेश झाला. संघाचा परीसस्पर्श झाल्यावर संघाच्या संस्कारातून त्यांचे कर्तृत्व भरले व एक मोठा सामाजिक कार्यकर्ता तयार झाला.


बालपण व मलंगगड संबंध


मुकुंदराव यांचा जन्म कल्याणच्या दत्त आळीत २० डिसेंबर, १९२० रोजी झाला. त्यांचे वडील विष्णुपंत हे मलंगगड देवस्थानाच्या पुजार्‍यांचे म्हणजे केतकरांचे कारभारी होते. त्यामुळे लहानपणापासूनच मुकुंदराव माघ पौर्णिमा उत्सवात मलंगगडावर जात असत. १९३० साली प्लेगमध्ये त्यांच्या आई व भावाचे निधन झाले. त्यावेळी ते केवळ दहा वर्षांचे होते. त्यामुळे नंतरच्या काळात मलंगगडावरील कार्यक्रम व संघ शाखा हेच मुकुंदराव यांच्या जीवनाचा भाग बनले. सकाळी रिक्रिएशन व्यायाम शाळेमध्ये व्यायाम, नंतर शाळा व संध्याकाळी शाखा यामध्ये ते रममाण होऊन गेले. मुकुंदराव मल्लखांब उत्तम खेळत व त्यांच्या इतर स्वयंसेवकांच्या मल्लखांब प्रात्यक्षिक यावर खुश होऊन इंग्रज अधिकार्‍यांनी सरकारवाडा मैदानावर बांधकाम करण्याचा विचार सभेत करून ते मुलांना खेळण्यासाठी दिले होते. १९३७ साली त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. परंतु, ते मलंगगडावर कायम उत्सवासाठी जात असत. मलंगगडावरील उत्सवात त्यांची इतकी मदत केतकर आत्याबाई यांची व्हायची की त्याने त्यांना दत्तक घेण्याचा विचार बोलून दाखवला, पण ते प्रत्यक्षात होऊ शकले नाही. असे असले तरी ते शेवटपर्यंत माघ पौर्णिमेच्या उत्सवात श्रद्धेने मदतीसाठी जात असत. पुढे झालेल्या ‘मलंग मुक्ती जागरण’ कार्यक्रमात मुकुंदराव यांची मोठी मदत मलंगभक्त दादा गोखले, धर्मवीर आनंद दिघे, विश्व हिंदू परिषदेचे सत्यपाल मलाणी आणि दिनेश देशमुख यांना झाली. सत्य माहितीवर आधारित असा ’बुवा मलंग ते हाजी मलंग’ असा एक लेखही त्यांनी लिहून दिला होता.


प्रतिज्ञित स्वयंसेवक ते प्रचारक मुकुंदराव


पू. डॉ. हेडगेवार मधून मधून कल्याणला येत असत. साधारण १९३८ साली विठ्ठलवाडीच्या विठ्ठल मंदिरात झालेल्या संघाच्या कार्यक्रमात पूजनीय डॉ. हेडगेवार आले होते. किशोर मुलांनी त्यांना कल्याण स्थानकावर उतरवून घेऊन रेल्वेट्रॅकमधून चालत विठ्ठलवाडीला नेले होते. तेथे झालेल्या कार्यक्रमात ज्या स्वयंसेवकांना पूजनीय डॉक्टरांनी प्रतिज्ञा दिली, त्यात एक मुकुंदराव वझे होते. त्याच वर्षी कल्याणच्या सहा जणांबरोबर ते संघशिक्षा वर्गाला गेले होते.१९३८-३९मध्ये ‘वूलन मिल कंपनी’च्या आवारात अंबरनाथला मुकुंदरावांनी संघाची शाखा सुरू केली. त्यासाठी ते रोज सायकलवरून कल्याणहून अंबरनाथला जात असत. नंतर त्यांना मुंबई म्युनसिपाल्टीच्या शाळेत नोकरी लागल्यावर नोकरी सांभाळून ते भिवंडी व अंबरनाथ येथे शाखेसाठी जात असत. १९४२ साली पूजनीय श्रीगुरुजींनी प्रत्येक स्वयंसेवकाने एक वर्ष संघासाठी द्यावे, असे आवाहन केल्यानंतर त्यावेळी कल्याणात प्रचारक असलेले व नंतर प्रसिद्ध पत्रकार झालेले वासुदेव राव तथा वा. य. गाडगीळ यांच्या प्रेरणेने त्यांनी आपली नोकरी सोडून प्रचारक जाण्याचा निर्णय घेतला व १९४२ झाली ते संघाचे प्रचारक झाले. काही वर्षे सुरुवातीला पालघर-डहाणू-उंबरगाव येथे व पुढे संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे ते प्रचारक झाले. अनेक गावे-पाडे यांमध्ये त्यांनी संघाच्या शाखा सुरु केल्या.


लग्न व संघबंदी विरोधात सत्याग्रह


काही वर्षे संघप्रचारक म्हणून काम केल्यावर, वझे कुटुंबाला वंश चालवण्यास त्यांच्याशिवाय कोणी नसल्याने त्यांच्या मावशीचा त्यांच्यामागे ‘लग्न कर’ असा आग्रह सुरू झाला. मुकुंदराव ऐकत नाही म्हटल्यावर त्या थेट पूजनीय श्रीगुरुजींना जाऊन भेटल्या. पूजनीय श्रीगुरुजींनी मुकुंदरावांशी हा विषय काढला तेव्हा “स्वातंत्र्य मिळाल्यावर मी लग्न करीन तोपर्यंत मला प्रचारक राहू द्यावे,” अशी त्यांनी विनंती केली. शब्द दिल्याप्रमाणे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते प्रचारक म्हणून थांबले व १९४८ साली इंदिराबाई अभ्यंकर यांच्याशी विवाह केला. गांधीहत्येच्या पार्श्वभूमीवर संघावर सरकारने बंदी घातली त्या बंदीविरोधात डिसेंबर १९४८ पासून सत्याग्रह सुरू झाले. नवीन लग्न झालेले असूनही, ‘राष्ट्रकर्तव्य प्रथम’ म्हणून मुकुंदरावांनी २६ जणांच्या पहिल्या तुकडीचे नेतृत्व करुन सत्याग्रह केला. सरकार वाडा पारनाका येथे हा सत्याग्रह झाला. न्यायालयात मुकुंदरावांनी गुन्हा ना-कबुल करून धमाल उडवून दिली. पोलिसांना गुन्हा सिद्ध करता येईना. यात एक तारीख पडली. दुसर्‍या तारखेला त्यांनी बंदी विरुद्ध ‘जेल भरो’ सत्याग्रह केल्याचे सांगितले. न्यायालयाने त्यांना चार महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा दिली.

जनसंघासोबत संसार


विवाहानंतर ते कल्याण सोडून डोंबिवलीला राहू लागले. स्थानकाजवळील नवरे चाळीत, पुढे इस्त्रीचे दुकान टाकले व मागच्या बाजूला ते राहू लागले. त्यांची उंची कमी असल्यामुळे पायाखाली पाट ठेवून त्यांना कपड्यांना इस्त्री करावी लागत असे. संसार आनंदात सुरु होता. १९५२साली जनसंघाची स्थापना झाली. जनसंघही संघटनदृष्ट्या आपल्या पायावर उभा करण्यासाठी जनसंघाला ही पूर्णवेळ प्रचारक असावेत असे ठरवण्यात आले. उत्तम वक्तृत्व व संघटन कौशल्य असणार्‍या कार्यकर्त्यांचा शोध सुरू झाला. रामभाऊ गोडबोले यांचेकडे ते काम सोपवण्यात आले. संघ प्रचारक असलेले रामभाऊ म्हाळगी व प्रचारक म्हणून थांबलेले मधुकरराव महाजन या दोघांना जनसंघाचे काम सांगण्यात आले. मुकुंदराव यांचेही नाव पुढे आले व रामभाऊंनी त्यांना गृहस्थी प्रचारक व्हावे, असा आग्रह धरला. त्यासाठी थोडे मानधन पक्ष देणार होता. देशांतर्गत परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन मुकुंदरावांनी तयारी दर्शवली व ते १९५२ पासून जनसंघाचे प्रचारक झाले. तीन आठवडे ते महाराष्ट्रात प्रवास करीत व एक आठवडा स्थानिक काम करीत. असे त्यांचे काम सुरू झाले. मुकुंदराव वझे, रामभाऊ म्हाळगी व मधुकरराव महाजन यांनी नियोजन करून महाराष्ट्रात मोठी शहरे तालुके ग्रामीण भाग यात पायाला भिंगरी लावून जनसंघाच्या शाखा सुरू केल्या. उत्तमराव पाटील यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. १९५४ साली पदवीधर मतदारसंघातून त्यांना आमदार करण्यात या त्रिमूर्तीला यश मिळाले. त्याच साली रामभाऊ म्हाळगी यांच्या प्रयत्नाने कल्याणात १९५४ साली जनसंघाची स्थापना झाली. संघाचे काम जुने असल्याने जनसंघाची टीमही लवकर उभे झाली. या टीमच्या जोरावर मे १९५५ साली जनसंघाचे कल्याण तालुका अधिवेशन कल्याणकरांनी भरवले त्याला प्रेमजीभाई असर हे आले होते.

गोवा मुक्ती आंदोलन
१९५५ साली गोवा मुक्ती आंदोलनही सुरू झाले. या आंदोलनात मुकुंदराव यांनी भाग घेतला व त्यांना कारावास भोगावा लागला. ऑगस्टमध्ये मुकुंदरावांच्या आयुष्यात एक कसोटीचा प्रसंग आला. १५ ऑगस्ट १९५५ रोजी कल्याणच्या टिळक चौकात राज्यपालांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे अनावरण ठरले होते. मोठा समारंभ होणार होता. पण, आदल्या दिवशी गोवा मुक्ती आंदोलनात पोर्तुगिजांच्या गोळीबारात हिरवे गुरुजी ठार झाले. त्यामुळे हा समारंभ होऊ नये, असे कल्याणातील तरुणांना वाटत होते, तर हा समारंभ होणारच, असा स्थानिक नेत्यांचा हट्ट होता. शेवटी दि. १५ ऑगस्टला तरुणांनी हरताळ घडवून आणण्याचे ठरवले. रातोरात गावात पत्रके लागली. परिस्थिती हाताळण्यासाठी मुकुंदरावांना डोंबिवलीहून बोलविण्यात आले. भगवानराव जोशी व भाऊराव सबनीस मुंबईला जाऊन राज्यपालांना पहाटेच भेटले व त्यांना परिस्थितीचे गांभीर्य सांगून त्यांनी कार्यक्रमाला येऊ नये, असे सांगितले. इकडे कल्याणला निषेध मिरवणूक नगरपालिकेकडे निघाली. त्यांच्यासमोर भडक भाषणे झाली. जमाव हिंसक झाला. स्वागत कमानी त्यांनी तोडून टाकल्या. नगरपालिकेत शिरून त्यांनी मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांची तस्वीर खाली खेचली. अशावेळी मुकुंदराव पुढे झाले. त्यांनी मोठ्या धैर्याने निषेध मिरवणुकीचे शोकसभेत रूपांतर केले. त्यांनी गोव्यातील हुतात्म्यांना व हिरवे गुरुजींना जमावाला श्रद्धांजली वाहायला लावली. अत्यंत भावना हेलावणारे भाषण केले. जमावाला शांत केले व राज्यपालांची भेट रद्द झाली हे सांगून आज जनभावनेचा विजय झाला, असे सांगितले. अशारीतीने नेतृत्वाच्या कसोटीत मुकुंदराव यांनी स्वतःलाव जनसंघाच्या तरुण कार्यकर्त्यांना यशस्वी केले.


जनसंघ निवडणुकीच्या रिंगणात
केंद्र शासनाच्या द्वैभाषिक राज्याच्या निर्णयाविरुद्ध संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली, यात सर्व विरोधी पक्ष काँग्रेसच्या विरुद्ध एकत्र झाले व सर्व निवडणुका संयुक्त महाराष्ट्र समितीच्या चिन्हावर लढवण्याचे ठरवले. मुकुंदराव पक्ष कामासाठी महाराष्ट्रात फिरत असताना डोंबिवलीच्या निवडणुका लागल्या. मुकुंदराव राहत असलेला भाग महिला वॉर्ड म्हणून जाहीर झाला. महिला उमेदवार पक्षाकडे नसल्याने इंदिराबाई वझे यांनाच कार्यकर्त्यांनी फॉर्म भरायला लावला. मुकुंदराव यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या डोंबिवलीतील कामामुळे इंदिराबाई मोठ्या मताधिक्क्याने निवडून आल्या. जनसंघाचे चिन्ह असते तर आज त्या जनसंघाच्या पहिल्या निर्वाचित सदस्य म्हणून मान्यता पावल्या असत्या. संयुक्त महाराष्ट्र समितीत जनसंघाचे प्रतिनिधी म्हणून विनायकराव आपटे, मधुकरराव महाजन व मुकुंदराव वझे होते. त्यामुळे एस. एम. जोशी, डांगे, यांच्या समवेत अनेक सभांमध्ये तेही भाषण करीत असत. १९५७च्या लोकसभा निवडणुकीत जनसंघाच्या वाट्याला धुळे येथील जागा आली. तेथून उत्तमराव पाटील यांना उभे करण्यात आले. मुकुंदरावांनी दीड महिना तेथे मुक्काम ठोकला. सर्व वनवासी भाग पायाखाली तुडवला. कार्यकर्त्यांची उत्तम फळी उभी केली. उत्तमरावांची शुद्ध प्रतिमा, निर्मल समाजकार्य व कार्यकर्त्यांची शक्ती यामुळे प्रचंड मताधिक्क्याने उत्तमराव पाटील हे निवडून आले व जनसंघाचे पहिले खासदार म्हणून दिल्लीला गेले. १९६२ सालच्या विधानसभा निवडणुका या भारतीय जनसंघाने स्वत: लढावयाचे ठरविले. त्यात कल्याणहून कृष्णराव धुळप यांच्या विरुद्ध मुकुंदरावांना उभे करण्यात आले. जनसंघाच्या दोनच उमेदवारांची अनामत रक्कम वाचली, त्यात एक मुकुंदराव होते. ही निवडणूक झाल्यानंतर मुकुंदराव जनसंघाचे प्रचारक म्हणून थांबले.

शिक्षकी पेशा
काही दिवस क्लासेसमध्ये शिकविल्यावर त्यांनी ‘छत्रपती शिक्षण मंडळा’त शिक्षक म्हणून नोकरी सुरू केली. ते बीए होतेच, त्यानंतर त्यांनी एमए व बीएड करून आपल्या शिक्षकी पेशाचे शिक्षण पूर्ण केले. लवकरच येथील टिटवाळा-मांडा येथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. सेवानिवृत्त होईपर्यंत 1978 पर्यंत ते त्या शाळेत मुख्याध्यापक होते. शाळेत येणारी सर्व मुले ग्रामीण भागातून येणारी होती. त्यांना उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. शासनाकडून शाळेसाठी जागा, देणगीदार मिळवून शाळेची इमारत बांधली. त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना १९७८ साली ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ मिळाला.मुख्याध्यापक असतानाही त्यांचे सामाजिक काम चालूच होते. सुरुवातीला संघाचे ठाणे विभाग कार्यवाह म्हणून त्यांनी काम केले, नंतर विश्व हिंदू परिषदेचे ते ठाणे जिल्हा अध्यक्ष झाले. संघावर बंदी घालूनइंदिरा गांधींनी आणीबाणी आणली. मुकुंदराव वझे यांनी आणीबाणी विरोधी सत्याग्रह मोखाड्याच्या वनवासी बंधूंबरोबर शिवाजी चौकात केला. या सत्याग्रहामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. आणीबाणीतच पू. बाळासाहेब देवरस यांचा साठावा वाढदिवस आला. त्यानिमित्ताने कल्याणमधील स्वयंसेवकांच्या इच्छेनुसार त्यांनी पुढाकार घेऊन त्रिविक्रम मंदिरात जाहीर रीतीने सत्यनारायणाची पूजा आयोजित केली. या कार्यक्रमासाठी शेकडो लोकांनी हजेरी लावली.


समाजोपयोगी वानप्रस्थाश्रम


सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी ‘रेड क्रॉस’ रक्तपेढीचे काम सुरू केले. कल्याणकरांना वेळेवर रक्त मिळेल, असा कायम प्रयत्न केला. रक्तदान शिबिरे घेतली. दत्त आळीतील दत्त मंदिराचे ते विश्वस्त होते. तेथेही अनेक सुधारणा त्यांनी केल्या. ‘स्वर्ग सोपान मंडळ’ नावाची संस्था काढून अंत्यविधीचे साहित्य मिळेल, अशी सोय केली. दुसरी जागा मिळाली नाही म्हणून आपल्या वाड्यात ते सामान ठेवले. जनतेला कमी खर्चात साहित्य मिळावे म्हणून कापड, इतर साहित्य होलसेल मधून ते आणत असत. ‘नमस्कार मंडळ’ या संस्थेचेही ते विश्वस्त होते. मंडळाच्या व्यायाम शाळेत बसायला व्यवस्थापक मिळेना तेव्हा त्यांनी स्वतःवर ती जबाबदारी घेतली. सकाळी व संध्याकाळी ते व्यायामशाळा उघडायला, बसायला येत असत. योग्य शिक्षक मिळणेपर्यंत त्यांनी एसएनडीटी महिला विद्यापीठात बाहेरुन बसून पदवी मिळवू इच्छिणार्‍या कल्याणमधील विद्यार्थिनींना ’ज्ञानप्रबोधिनी’च्या वर्गात इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन केले. कायम कार्यरत असतानाच २५ डिसेंबर, १९९०साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला. स्वतःची अंत्ययात्रा कोणाच्या खांद्यावरुन नाही, तर ढकलगाडी वरून घेऊन जावी, असे त्यांनी आपल्या मुलाला सांगितले होते. त्यानुसार त्यांची इच्छा पूर्ण करण्यात आली.
कार्यकर्ता, वक्ता दशसहस्त्रेषु
अत्यंत उत्तम असे वक्तृत्व मुकुंदराव यांचे होते. अत्यंत मुद्देसूद खुसखुशीत शैलीमध्ये गोष्टी सांगत ते आपला मुद्दा स्पष्ट करीत असत. त्यामुळे त्यांचे बोलणे कधीही कंटाळवाणे झाले नाही. जीवनभर अनेक संस्थांत त्यांनी काम केले. संस्थांना कार्यकर्ते मिळवून दिले. निधी मिळवून दिला. सुयोग्य मार्गदर्शन केले. कधीही रिकामे बसले नाही. अत्यंत कष्टातून त्यांनी संसार उभा केला. त्याचबरोबर सामाजिक कामही पाहिले. असा कार्यकर्ता दुर्मीळच! अशा कार्यकर्त्यांमुळचे संघ व इतर संस्थांचे काम आज महाराष्ट्रात वाढलेले आपल्याला दिसते. जन्मशताब्दी निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन...!



- प्रवीण देशमुख
@@AUTHORINFO_V1@@