अमरत्वाचे पुजारी मा. गो. वैद्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2020
Total Views |

म ग वैद्य_1  H



मा. गो. वैद्य यांच्या व्यक्तित्वाचे मोजक्या शब्दांत वर्णन करायचे झाल्यास ‘ऑलराऊंडर’ किंवा ‘मॅन ऑफ ऑल सीझन्स’ असेच करावे लागेल. संघाने त्यांना एखाद्या क्षेत्रात काम करण्यासाठी पाठवावे आणि त्यांनी नाही म्हणावे, असे कधीच घडले नाही.

शनिवार, दि. १९ डिसेंबर, २०२०ची दुपार. साधारण ४च्या सुमारास बातमी आली, आदरणीय मा. गो. वैद्य यांच्या निधनाची. तशी सकाळीच विनोद देशमुखांनी त्यांच्या प्रकृतीच्या गांभीर्याची कल्पना दिली होतीच. गेल्या आठवड्यातच त्यांना ‘स्पंदन’मध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, कोरोनाची लागण झाल्याने त्यांना धंतोलीतील डॉ. माहूरकर यांच्याकडे दाखल करण्यात आले. तेथे कोरोनावर मात करुन ते पुन्हा ‘स्पंदन’मध्ये परतलेही होते. डॉ. हर्षवर्धन मार्डीकर व त्यांचे सहकारी उपचारांची शर्थ करीत होते. पण, नियतीची इच्छा काही वेगळीच होती. शरीर अशक्त झाले असतानाही वैद्य यांची मृत्यूशी झुंज सुरुच होती. पण, शेवटी मृत्यू तो मृत्यूच. त्याच्यापुढे कुणाचे चालेल? मागोही त्याच्यासाठी अपवाद असू शकत नव्हते. मात्र, ‘ते गेले’ यावर विश्वासच बसत नाही. अगदी अलीकडील कोणत्याही कार्यक्रमात बोलताना त्यांच्या भाषणाची सुरुवातच मुळी ‘१०० वर्षे जगणारच’ अशा निर्धाराने होत असे. त्यासाठी १०० वर्षे पूर्ण व्हायला किती वर्षे, किती महिने आणि किती दिवस राहिलेत हेही ते सांगत असत. दरम्यान, भेटीगाठी सुरुच असत. कार्यक्रमातील सहभागही राहतच होता. संघाची प्रभात शाखा आणि प्रार्थना तर त्यांची कधीच चुकली नाही. अलीकडे अगदीच अशक्य झाल्याने ते प्रभात शाखेत जाऊ शकत नव्हते, पण ‘नमस्ते सदा वत्सले’मध्ये कधीच खंड पडला नाही. सकाळच्या वेळी त्यांच्या भेटीगाठी सुरुच होत्या. भेटायला येणार्‍यांशी गप्पागोष्टी होत असत. जुन्या आठवणींची उजळणी होत असे. प्रत्येकाला त्याच्या स्थितीनुसार सूचक मार्गदर्शनही होत असे. शरीर थकले होते. ‘काठीचा आधार घेऊन चालत होते’ असे मात्र म्हणता येत नसे. हातात काठी असे, पण त्या काठीसाठी मागो हे आधार होते. आवाजात तर किंचितही बदल झाला नव्हता. पण, तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या भेटीला गेलो असता ‘१००वर्षे जगणे किती कठीण आहे’ हे त्यांनीच सांगितले आणि काळजात चर्रर्र झाले. त्यानंतरही दोनदा माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांना त्यांच्या घरी भेटलो. दोन्ही वेळेला त्यांनी पुस्तके वाचून त्यावरचा अभिप्राय लेखी स्वरुपात पाठविला. पुस्तके चांगली झाल्याचे तर कळविलेच, पण त्याबरोबर त्यातील शुद्धलेखनाच्या वा अन्य त्रुटी सांगायला विसरले नाहीत. त्यांचे ते अभिप्राय माझ्यासाठी एक अमूल्य ठेवाच आहे.


मूळचे बाबुराव वैद्य असलेल्या या महानुभावाची मा. गो. वैद्य ही दै. ‘तरुण भारत’मध्ये प्रवेश केल्यानंतरची ओळख. दै. ‘तरुण भारत’चे संपादक या नात्याने त्यांना लेखन करावे लागले. प्रत्येक लेखक आपण कोणत्या नावाने लिहायचे हे ठरवित असतो. बाबुरावांनी मा. गो. वैद्य या नावाने लिहायचे ठरविले. पण, माझी त्यांच्याशी मूळ ओळख ‘बाबुराव वैद्य’ म्हणूनच होती. ‘बाबुराव’ आणि ‘मागो’ यात काय फरक आहे, असा प्रश्न कुणाला पडेल; पण त्याचे उत्तर सोपे आहे. दै. ‘तरुण भारत’मध्ये प्रवेश करण्यापूर्वीचे ‘बाबुराव’ आणि दै. ‘तरुण भारत’मधील प्रवेशानंतरचे ‘मागो.’नागपुरात संघाच्या विविध जबाबदार्‍या सांभाळत असतानाच त्यांना भारतीय जनसंघात पाठविण्यात आले. नागपूर शहर व जिल्हा जनसंघाचे संघटनमंत्री म्हणजे पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून त्यांनी त्यावेळी जबाबदारी सांभाळली. खरेतर राजकारण हा त्यांचा पिंड नाही. संस्कृतचे विद्वान प्राध्यापक म्हणून त्यावेळी ते ओळखले जात. पण, संघाने एखादी जबाबदारी सोपविली आणि बाबुरावांनी ती स्वीकारली नाही, असे कधीच घडले नाही. तसे तर पत्रकारिता हाही त्यावेळी त्यांचा पिंड नव्हता. त्यांच्या परखड स्वभावानुसार त्यांनी ते अधिकार्‍यांना सांगितलेही असेल. पण एकदा का जबाबदारी स्वीकारली की, ती पार पाडण्यासाठी स्वत:मध्ये आवश्यक ते बदल करणे, त्यासाठी कठोर परिश्रम करणे आणि यशस्वी होऊन दाखविणे याचे नाव बाबुराव वैद्य. त्यानुसारच त्यांनी जनसंघाची जबाबदारी स्वीकारली.


मागो दै. ‘तरुण भारत’च्या माध्यमातून पत्रकारितेत कसे आले याची मला ‘फर्स्टहॅण्ड’ माहिती असण्याचे कारण नाही. त्याबद्दल ते आपल्या ‘रंंग माझ्या जीवनाचे’ या पुस्तकात लिहितात, “जादा पगाराच्या सरकारी नोकरीकडे पाठ फिरवून मी खासगी कॉलेजात राहिलो, तेव्हा मला तोंडावर मूर्ख म्हणणारे लोक होतेच. ‘हिस्लॉप कॉलेज’ची नोकरी सोडून मी दै. ‘तरुण भारत’मध्ये आलो, तेव्हाही अनेकांनी मला मूर्खात काढले. संघाचे सरकार्यवाह असलेल्या बाळासाहेब देवरसांनी दै. ‘तरुण भारत’मध्ये येण्याचा विषय काढला आणि माझ्याकडून उत्स्फूर्तपणे होकार निघाला. माझे मलाच नंतर नवल वाटले.”मागोंच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. आतापर्यंत विविध क्षेत्रांत अनेक भूमिका त्यांनी पार पाडल्या. ‘नवयुग’ (आताचे ‘महाल’मधील ‘जिजीबाई लाभे विद्यालय) विद्यालयातील शिक्षक म्हणून, सुप्रसिद्ध भाषातज्ज्ञ डॉ. रघुवीर यांचे साहाय्यक म्हणून, मॉरिस (आताची वसंतराव नाईक मानव संसाधन संस्था)कॉलेजसारख्या सरकारी संस्थेत आणि ‘हिस्लॉप’सारख्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून, दै. ‘तरुण भारत’चे संपादक व ‘श्रीनरकेसरी प्रकाशन’ संस्थेचे अध्यक्ष म्हणून, ‘नुटा’सारख्या प्राध्यापकांच्या संघटनेचे आघाडीचे कार्यकर्ते म्हणून, नागपूर विद्यापीठाच्या कार्यकारिणीचे सदस्य म्हणून आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे मनोनीत सदस्य म्हणून या भूमिकांचा उल्लेख करावा लागेल. कौटुंबिक क्षेत्रात पुत्र, पाल्य, पती, बंधु, दीर, काका, मामा, आजोबा आणि पणजोबा या भूमिका पार पाडण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे. पण, या सगळ्या भूमिका पार पाडताना त्या त्या भूमिकेला त्या त्या क्षेत्रातील प्रस्थापित परंपरांचा मान ठेवून त्यांनी संघ स्वयंसेवकाला साजेशा पद्धतीनेच न्याय देण्याचा प्रयत्न केला. सामान्यत: संघस्वयंसेवक आपल्या भूमिकेवर खूपच ताठ असतात, प्रसंगी ते तर्ककर्कशही बनतात असा समज आहे. मागोंच्या वाणीतही एकप्रकारचा दरारा असल्यामुळे तेही तसेच असावेत, असे त्यांच्या प्रथम भेटीत तरी कुणाला वाटत असेल.


पण, त्यांच्या जेवढे जवळ गेले तेवढे ते ‘मृदुनी कुसुमादपि’ असेच वाटतात. शिस्तीचे भोक्ते असले तरी त्यामुळे त्यांच्या वागण्यात करडेपणा कधीच आला नाही. उलट सर्वांना हसतखेळत सोबत घेऊन चालण्याची ‘सर्वेषाम् अविरोधेन’ वृत्तीच त्यांनी आत्मसात केली. त्यामुळेच ते काँग्रेसचे बाबासाहेब घारफळकर यांच्यापासून अजातशत्रू रिपब्लिकन नेते रा. सू. गवई व मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांपर्यंत आणि प्रा. र. वि. रानडेंपासून, तर ए. बी. बर्धन यांच्यापर्यंतच्या कम्युनिस्टांपर्यंत सर्वांचे चाहते बनले. मागोंच्या व्यक्तित्वाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनाची मांडणी संघानुकूल केली. इतकी की, ती काढून टाकली तर त्यांच्या जीवनात सामान्यत्वच उरु शकते. स्वत:ची नोकरी निश्चित करण्यापासून, तर मुलांच्या जीवनाचे नियोजन करण्यापर्यंत त्यांनी कधीही संघ दृष्टिआड होऊ दिला नाही. मुलामुलींच्या लग्नाचे मुहूर्त ठरवितानाही त्यांनी प्रथम संघातल्या जबाबदारीचा विचार केला व नंतर मुहूर्त ठरविले. अपवाद फक्त एकच. त्यांच्या धाकट्या मुलीचे लग्न झाले तेव्हा ते ‘मिसाबंदी’ म्हणून नागपूर कारागृहात बंदिस्त होते. पण याचा अर्थ असाही नाही की, त्यांनी मुलांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले वा त्यांच्यावर जबरदस्ती केली. माणसाने कसे जगावे याचा वस्तुपाठ त्यांनी स्वत:च्या व्यवहारातून दिला. मुलांवर त्यानुसार संस्कार झाले. ते त्यांनी ग्रहण केले. त्यामुळेच त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र डॉ. मनमोहन वैद्य संघाचे सहसरकार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत, तर डॉ. राम संघाचे कधी अमेरिकेत राहून तर कधी इंग्लंडमध्ये राहून कार्य करणारे संघ प्रचारक बनले आहेत. ज्यांना संघासाठी पूर्णवेळ देता आला नाही तेही संघसंबधित कुठल्या तरी कार्यकलापातच रममाण झाले आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे ते सर्व उच्चविद्याविभूषित आहेत. त्यांना अन्य क्षेत्रात वाव वा रस नव्हता, असेही नाही. पण संघानुकूल जीवन जगायचे, असे एकदा ठरल्यानंतर त्यांनी आपल्या आयुष्याची मांडणी त्यानुसार केली.त्यामुळे ते आणि संघ यामधील अभिन्नत्वच अधोरेखित होते.


मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्णन करताना म्हणत असतो की, ‘सकृतदर्शनी सामान्य वाटणारे पण मुळात असामान्य असणारे जितके लोक संघात आहेत, तितके जगातील कोणत्याही तशा प्रकारच्या संघटनेत नसतील.’ बर्‍याच लोकांना हे खरे वाटत नाही. पण कुणी संघाचा जेव्हा सखोल अभ्यास करील तेव्हा कुणालाही हे पटल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच मागोंच्या जीवनातून संघ वेगळा करता येत नाही आणि संघातून त्यांना वेगळे काढता येत नाही.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्व या संकल्पनेचे अधिकृत भाष्यकार म्हणून सरसंघचालकांकडेच पाहिले जाते व ते खरेही आहे. पण, हिंदुत्वाची ती संकल्पना अधिक स्पष्ट करण्यात मागोंचेही मोठे योगदान आहे, असे मी मानतो. त्यांनी लिहिलेली ‘हिंदुत्व : जुने संदर्भ, नवे अनुबंध’, ‘हिंदू, हिंदुत्व, हिंदूराष्ट्र’ ही पुस्तके त्या संदर्भात लक्षणीय ठरतात. ‘धर्म’ आणि ‘रिलिजन’ या शब्दांतील फरक स्पष्ट करण्याचे मोठे कार्यही त्यांचेच. त्यांचे म्हणणे असे की, ‘रिलिजन’ हा धर्माचा पर्यायवाची शब्द नाही. किंबहुना ‘धर्म’ या शब्दाचे इंग्रजी भाषांतर उपलब्धच नाही. ‘इझम’ हा त्यादृष्टीने अतिशय संकुचित शब्द. ‘कम्युनिझम’ या शब्दाने त्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. त्या अर्थाने हिंदू हा धर्मच नाही. ती एक जीवनपद्धती आहे. इस्लाम, ख्रिश्चॅनिटी हे ‘रिलिजन’ आहेत. त्या अर्थांनी त्या उपासनापद्धती आहेत. त्यांच्या ‘हिंदू ही जीवनपद्धती आहे’ या भाष्यावर तर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. माझे असे मत आहे की, हिंदुत्वाला व्यापक बनविण्यात मागोंचे फार मोठे योगदान आहे.


संपादकपदावरुन निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी आपल्या लिखाणात खंड पडू दिला नाही. त्यानंतर ते ‘भाष्य’ या नावाचा स्तंभ दै. ‘तरुण भारत’मध्ये लिहू लागले. हा स्तंभ त्यांनी तब्बल २५ वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत अतिशय सातत्याने चालविला. कदाचित मराठी पत्रकारितेत सातत्याने इतका काळ नियमितपणे चाललेला हा एकमेव स्तंभ असावा. दै. ‘तरुण भारत’ची जबाबदारी संपल्यानंतर त्यांच्याकडे संघात अ.भा. कार्यकारी मंडळाचे सदस्य, बौद्धिक प्रमुख, राष्ट्रीय प्रवक्ते अशा जबाबदार्‍या आल्या. त्यासाठी त्यांना देशभर प्रवास करावा लागत असे. पण ते कुठेही असले तरी त्या ठिकाणाहून ‘भाष्य’चा मजकूर शुक्रवारपर्यंत दै. ‘तरुण भारत’मध्ये पोहोचलाच पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असे. शुक्रवार हा त्यांचा उपवासाचा दिवस. नागपुरात असताना तो मजकूर सहज दै. ‘तरुण भारत’मध्ये पोहोचू शकत असे. पण, भारताच्या एका टोकावरुन मजकूर पाठविणे मोठे जिकिरीचे काम होते. एकतर संदेशवहन व्यवस्था आजच्याएवढी त्यावेळी जलद नव्हती. हाताने मजकूर लिहून तो फॅक्सद्वारे नागपूरला पाठवावा लागत असे. त्यात लाईन डाऊन असली तर अडचण येत असे. पण शुक्रवारी त्यांचा मजकूर दै. ‘तरुण भारत’मध्ये पोहोचला नाही व रविवारी ‘भाष्य’ प्रसिद्ध झाले नाही, असे कधी घडले नाही. छोट्या-छोट्या वाटणार्‍या पण प्रत्यक्षात महत्त्वाच्या गोष्टी जाणणे हा त्यांच्यावर झालेल्या संस्कारांचा आणि त्यांच्या स्वत:च्या ग्रहणशक्तीचा आणि निर्धाराचा परिणाम. मा. गो. वैद्य यांच्या व्यक्तित्वाचे मोजक्या शब्दांत वर्णन करायचे झाल्यास ‘ऑलराऊंडर’ किंवा ‘मॅन ऑफ ऑल सीझन्स’ असेच करावे लागेल. संघाने त्यांना एखाद्या क्षेत्रात काम करण्यासाठी पाठवावे आणि त्यांनी नाही म्हणावे, असे कधीच घडले नाही. खरेतर संघात वाढदिवस साजरे करण्याची प्रथा नाही. पण, मा. गो. वैद्य हे असे कदाचित एकमेव व्यक्तित्व असावे की, ज्यांना रेशीमबागेत सन्मानपूर्वक निमंत्रित करुन विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले. संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्यापासून तर विद्यमान सरसंघचालकांपर्यंत सर्व सरसंघचालकांच्या सहवासात राहण्याचे भाग्य लाभलेल्या मोजक्या स्वयंसेवकांपैकी ते सर्वात ज्येष्ठ स्वयंसेवक होते.आज आदरणीय बाबुराव आपल्यात नाहीत. परिपाठाप्रमाणे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. अचेतन देह अग्निनारायणाला समर्पित केला जाईल. शोकभावना तर देशविदेशातून प्रकट केल्या जातील. पण, बाबुरावांसारखी माणसे कधीच स्मरणातून जात नाहीत. कारण, त्यांनी त्यांच्या कृतार्थ जीवनातील आचारणामुळे केव्हाच अमरत्व प्राप्त केलेले असते. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!



- ल . त्र्य. जोशी 
९४२२८६५९३५
@@AUTHORINFO_V1@@