मुकुंदराव वझे यांचे कृतज्ञ पुण्यस्मरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2020
Total Views |

mukunrao vaze_1 &nbs


मध्यंतरी कल्याणहून वामनराव साठ्यांकडून निरोप आला- “या वर्षी २० डिसेंबरला मुकुंदराव वझे यांचा जन्मशताब्दी दिन आहे. या निमित्ताने मुकुंदरावांच्या पुण्यस्मरणार्थ अवश्य लेख लिहा.” एकतर वामनरावांविषयी तसेच गोपाळराव टोकेकरांविषयी माझ्या मनात निर्भेळ आदराची भावना आहे. कारण, कल्याण शहरात रा. स्व. संघाचे रोपटे रुजविणार्‍या कर्मयोगी पिढीचे हे दोघे जण प्रतिनिधित्व करतात आणि दुसरे म्हणजे, दस्तुरखुद्द मुकुंदराव धुळे येथे जनसंघ प्रचारक म्हणून राहिले आहेत. साठेक वर्षांपूर्वी त्यांच्याशी दिलखुलास गप्पा करण्याचे भाग्य मला लाभले आहे. तेव्हा अशा समर्पित जीवनाच्या एका धन्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्याची सोनेरी संधी मला मिळत आहे. प्रस्तुत लेखाची ही पृष्ठभूमी आहे.


सन १९५७ची संसदीय निवडणूक माझ्या डोळ्यांसमोर आहे. शालेय शिक्षण संपवून महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षात प्रविष्ट झालेला एक पोरसवदा युवक व त्याच्याशी अत्यंत जिव्हाळ्याने हितगुज करणारा एक विरक्त प्रचारक असे दृश्यही माझ्या मनःचक्षुंसमोर आहे. गांधीजींच्या मृत्यूनंतर जेमतेम एक दशक संपुष्टात येत होते. संघ-जनसंघासमोर आव्हानांचे डोंगर उभे होते. पण, त्याहीवेळी आमचे तत्कालीन जिल्हाप्रचारक नानाराव ढोबळे व मुकुंदराव वझे यांच्यासारख्या मंडळींची जिद्द मला भारावून टाकायची. धुळ्याला टॉवर बागेजवळ तेव्हा काँग्रेसभवन बांधले जात होते. एकदा संध्याकाळी मुकुंदरावांबरोबर मी त्या काँग्रेस भवनासमोरून पायपीट करीत होतो. विस्मयाची गोष्ट म्हणजे, मुकुंदराव त्या भवनाकडे बोट दाखवून मला सांगून गेले. ‘उद्या याच भवनास जनसंघाला कार्यालय थाटावे लागेल!’ निवडणुकांमध्ये पानशेत अनुभवणार्या, सगळ्या पुरोगाम्यांच्या लेखी ‘गयाबीता’ ठरणार्या, शेटजी-भटजींच्या संघटनेचा एक प्रचारक मात्र निर्धारपूर्वक भविष्याची वचनचिठ्ठी लिहिण्यास सिद्ध होता. सन २०१४पासून अवघ्या भारतवर्षात संघजन या देशाची विषयपत्रिका ठरवित आहेत. समाजजीवनाच्या वर्तुळात केंद्रस्थानी विराजमान होऊन सांस्कृतिक राष्ट्रवादाची विजयगाथा गात आहेत, तर काँग्रेसवाले, तसेच समाजवादी-साम्यवादी वर्तुळाच्या परिघावर केविलवाणी अवस्था अनुभवत आहेत. ज्या हिंदुत्व विचारांवर शिव्यांची लाखोली वाहण्यात या तकलादू पुरोगाम्यांनी पुरुषार्थ मानला होता, त्याच हिंदुत्वाची ‘डालडा’ कॉपी विकण्यात ही मंडळी वर्तमानात धन्यता मानत आहेत!

मुकुंदराव वझे व नानाराव ढोबळे दोघेही स्वातंत्र्यप्राप्तीच्या वर्षात कल्याण परिसरात संघकार्य करीत होते. ‘हिंदू सारा एक’ हा संस्कार जनमनावर रुजवीत होते. त्यांच्या दुर्दैवाने गांधीजींचा खून झाला आणि तमाम प्रादेशिक राष्ट्रवादी पुढारी हिंदुत्वनिष्ठांवर ‘राष्ट्रपित्याचे मारेकरी’ असा शिक्का मारण्यास पुढे सरसावले. आता 63 वर्षे उलटली आहेत. गांधी खून खटल्यात संघजन निर्दोष आहेत, असे न्यायसंस्था कधीच सांगून मोकळी झाली आहे आणि काँग्रेसवालेच गांधीविचारांवर कुठाराघात करीत आहेत. उपभोगप्रिय, स्वच्छंदी व दिशाहीन वर्तनाची प्रमाणे तुम्हा आम्हाला पुरवित आहेत.मुकुंदराव वझे यांचे कृतज्ञतापूर्वक पुण्यस्मरण या पृष्ठभूमीवर केवढे औचित्याचे व अगत्याचे आहे, हे वेगळे सांगण्याची गरज आहे का? मुकुंदरावांचा जन्म २० डिसेंबर या तिथीचा. विसाव्या वर्षाचा उंबरठा ओलांडण्यापूर्वीच त्यांनी संघाचे स्वयंसेवकत्व स्वीकारले. महत्भाग्य म्हणजे साक्षात संघसंस्थापक डॉक्टर हेडगेवार यांनीच त्यांना व मधुकरराव महाजनांना प्रतिज्ञा सांगून शुभाशीर्वाद दिले. या दोघांनी या प्रतिज्ञेच्या प्रकाशात जीवनाचे सोने केले. मुकुंदराव, मधुकरराव, नानाराव या युवकांनी ‘हिंदुत्व हेच या देशाचे राष्ट्रीयत्व आहे’ हा मंत्र हृदयात जपला. इथला अहिंदूदेखील संस्कृतीच्या रेशीम धाग्यांनी हिंदूमात्राशीच जोडलेला आहे, पण जिनांच्या नेतृत्वामुळे भरकटलेला आहे. तेव्हा प्रथम आपण ‘हिंदू सारा एक’ हे गीत गाऊ. कालांतराने सच्च्या, पारदर्शक मुसलमान-ख्रिश्चनालाही या गीतगायनात सामावून घेऊ. हा निश्चय सन १९५७मध्ये केवढ्या भव्य महत्त्वाकांक्षी उंचीचा होता, हा विचार करून पाहा! माझ्यासारख्या नव्या कोर्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला त्याकाळी समर्पित संघ कार्यकर्त्यांविषयी कुतूहलमिश्रित आदर वाटत असे. निवडणुकीतले यश-अपयश अळवावरच्या पाण्यासारखे आहे. जीवाला जीव देणारी, निःस्वार्थ भावनेतून ध्येयनिष्ठ माणसे जोडणारी संघटना बांधणे हेच कार्य राष्ट्रबांधणीचे व शाश्वत किमतीचे आहे. हा संस्कार ज्यांच्या निर्व्याज स्नेहामुळे मनःपटलावर टंकित झाला, त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटणे स्वाभाविक आहे की नाही?

स्वातंत्र्यलढा चालू असतानाच ‘उद्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रिय भारतवर्षाचे पुनर्निर्माण कसे करायचे’ या विचाराने मुकुंदरावांची पिढी झपाटली. माझे कुटुंब, माझी जात, माझी भाषा, माझा प्रांत... या वर्तुळांच्या पलीकडे झेप घेऊन ‘भारतीय भूत्वा, भारतं भजेत्’ ही पंक्ती साकार करण्यासाठी सार्वजनिक जीवनात ही पिढी उतरली. मंगल मंदिराची पायाभरणी करण्यासाठी आधारशिला म्हणून जगण्यातच रंगून गेली. या आधारशिलांच्या आत्मसमर्पणातूनच राममंदिराच्या उभारणीचा महामार्ग प्रशस्त झाला. सत्ता मिळवायची स्वत:साठी नव्हे, तर प्रभू रामचंद्राची जन्मभूमी मुक्त करण्यासाठी! या तत्कालीन संकल्पाची अपूर्वाई कोणत्या शब्दात गावी?मुकुंदराव चार चौघांसारखेच राहत असत, आबालवृद्धांबरोबर गप्पागोष्टी करीत असत, पण वक्ता म्हणून व्यासपीठावर आले की वाक्गंगेने श्रोतृवृंदाला न्हाऊ घालत, बैठकीतून निरहंकारी वागणुकीचे वस्तूपाठ मांडणे ही तर त्यांची खासियत होती! योगवासिष्ठात वसिष्ठ मुनींनी प्रभू रामचंद्रांना उपदेश केला आहे, ‘अन्तस्त्यागी, बहि:संगी लोके विहर राघव।’ चार चौघांबरोबर सलगी करायची, पण त्यांच्या सहवासातून स्वत:ची प्रतिष्ठा वाढविण्याचा कद्रूपणा करायचा नाही, हे मुकुंदराव वझे यांच्याकडून सहा दशकांपूर्वी कळले. त्यामुळेच योग वासिष्ठातल्या उपदेशाचा अर्थ सहजपणे मनाला भिडला.

मी कॉलेजचा अभ्यास करीत होतो, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र या विषयांची पाठ्यपुस्तके वाचत होतो. Self-interest मौलिक असतो हे सांगणारे स्मिथ, रिकार्डो वाचत होतो. संघ शाखेच्या मैदानावर मात्र मुकुंदराव वझे यांच्या आचरणातून भाषणातून 'Cosmo-Centric transactions' म्हणजे ‘सर्वभूतहितरत व्यवहार’ करण्याचे धडे गिरवत होतो. इतर संस्था-संघटना स्पर्धात्मक, प्रतिक्रियात्मक, नकारात्मक विधिनिषेधांचा प्रचार करण्यात गर्क होत्या. मुकुंदरावांचा संघ आणि जनसंघ मात्र सहकारात्मक, विधायक, रचनात्मक संस्कार करण्यात धन्यता मानत होते.आम्हा महाविद्यालयीन तरुणांवर व समर्पित संघप्रचारकांकडून संस्कार झाले, ते किती अनमोल होते हे आज कळते व मन मोहरुन जाते.म. गांधीजी व त्यांच्याही पूर्वी लोकमान्य टिळक दीनदुबळ्या व्यक्तींच्या कल्याणसाठीच सुस्थितीतल्या नागरिकांनी निरपेक्ष समाजसेवा केली पाहिजे, हे सांगत जीवन जगले. स्वत:च्या वागणुकीतून या जगण्यातली जादू किती गहिरी असते, याचे मोल स्वयंसेवकांवर बिंबवण्यात डॉ. हेडगेवारांनी पुढाकार घेतला अन् डॉक्टर व गुरुजी यांच्या मार्गदर्शनाच्या प्रकाशात मुकुंदराव, मधुकरराव तसेच ढोबळे व पालकर या कुळातले नानाराव आमच्यासमोर उपस्थितझाले. राजकारण दहा टक्के समाजकारण ९० टक्के असे काही जण केवळ बोलतात, मुकुंदरावांच्या पिढीने ‘राजकारण शून्य टक्के तर समाजकारण, संस्कृतिकारण मात्र शतप्रतिशत’ हा मंत्र केवळ बोलण्यात नव्हे, तर प्रत्यक्ष जगण्यात व वागण्यात खरा करुन दर्शविला.

आम्ही महाविद्यालयीन युवक एका बाजूला राणा भीमदेवी भाषणे ठोकणारे, दुसर्या दिवशी वृत्तपत्रात या भाषणातली ओळ छापून आली, तर वेडावून जाणारे गावगन्ना पुढारी बघत होतो. त्याच वेळी दुसर्या बाजूला परिस्थिती विपरीत असूनही प्रचारकहोऊन गल्लीबोळातून पायपीट करणारे नि:संग मुकुंदराव वझे पाहत होतो. अभ्यास करुन, स्वतःला विसरुन भाषणे देणारे आणि त्यानंतर पुनश्च नव्या विषयाचा गृहपाठ करण्यात सहजपणे रंगून जाणारे वझे, ढोबळे, पालकर कुठे आणि स्वतः भोवतीच धुपारत्या ओवाळून घेणारे पुरोगामी पुढारी कुठे, असा प्रश्न त्याही वेळी आम्हाला विस्मित करायचा. म्हणता म्हणता अशीच काही वर्षे गेली, मुकुंदराव प्रचारकत्व संपवून कल्याण शहरात परतले. मग या प्रचारकाने एम.ए. पदवी मिळवून शिक्षकाचे व्रत स्वीकारले. संन्याशाने गृहस्थाश्रमात प्रवेश केला. साहजिकच विद्यार्थ्यांना एका आदर्श शिक्षकाचे दर्शन घडले. नागरिकांना इतर आश्रमांच्या कल्याणाची काळजी करणार्या गृहस्थाश्रमी सज्जनाचा सहवास लाभला. संघात आणि जनसंघात जी जडणघडण झाली, ती लाख मोलाची असते, अशा जडणघडणीतून कारुण्यरुप व करुणाकर लोकनेता घडतो, याचाच सर्वांना साक्षात्कार झाला.मुळात जनसंघाची स्थापना करताना पंडित दीनदयाळ उपाध्यायांना महर्षी दयानंद आणि लोकमान्य टिळक यांचा वारसा समृद्ध करणार्या एका राजकीय पक्षाला साकार करायचे होते. भारत वर्षातल्या विचारधारेला कालसुसंगत रुप द्यावे तर जगातल्या विविध विचारांना भारतानुकूल करुन घ्यावे, हीच दीनदयाळजींची ‘तमन्ना’ होती. स्वतः दीनदायाळ म्हणजे त्यागी-विरागी परिश्रमशील संघटक होते. मुकुंदराव वझे यांनी दीनदयाळजींच्या स्वप्नांना व्यवहारात उतरविण्याचा आयुष्यभर प्रामाणिक प्रयास केला.मुकुंदरावांच्या जनसंघाचा कालांतराने ‘भारतीय जनता पक्ष’ हा नवावतार नागरिकांना पाहण्यास मिळाला. हा पक्षच कार्यकर्त्यांच्या निर्धारामुळे केंद्रात तर निर्भेळ सत्ताधीश झालाच, पण भारतातल्या कैक राज्यातही सत्तास्थानी विराजमान झाला. हिंदुत्व विचार भारताला एकसंध ठेवू शकतो. समाजातील उच्चनीचता मिटवू शकतो. मनुष्य परिवर्तन करु शकतो, हे सिद्ध करणारा संघजनांचा हा प्रवास एका श्लोकाची आठवण जागविणारा आहे. रा. स्व. संघाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांमुळे एका रोपट्याचे सदाहरित, डौलदार वृक्षात रुपांतर झाले आहे.

ज्या सुभाषितकर्त्याने हा श्लोक रचला आहे, त्याला दाद दिलीच पाहिजे. पाहा हा श्लोक किती मार्मिक आहे-“कश्चिन नवम् पल्लवमाददाति। कश्चित् मसूनानि फलानि कश्चित्। परं करालेऽपि निदाघ काले। मूले न दाता सलिलस्य कश्चित्॥”(आता वृक्ष बहरलेला आहे, फुललेला आहे, कुणी एखादा येतो व या वृक्षाची नवी कोवळी पालवी घेऊन जातो, दुसरा कुणी फुले (मसूनानि) तर तिसरा कुणी फळे घेऊन जातो... या मंडळींनी लक्षात ठेवावे की, जेव्हा हाच वृक्ष शैशवात रोपट्याच्या रुपात होता. भीषण म्हणजे कराल अशा ग्रीष्म ऋतूशी (निदाद्य काल) टकरा देत होता, तेव्हा या रोपट्याच्या मुळाशी जलसिंचन करण्याची जाण बाळगणारे खूप विरळ होते.)अशा विरळ व्यक्तींपैकी एक कल्याणकर म्हणजे वझे कुलोत्पन्न मुकुंदराव! त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांचे व त्यांच्यासारख्या समर्पित व्यक्तींचे पुण्यस्मरण करायचे याचा अर्थ, त्यांचा वसा व वारसा अधिकाधिक समृद्ध करायचा...मुकुंदरावांना विनम्र अभिवादन.



- प्रा. अशोक मोडक
@@AUTHORINFO_V1@@