संघ इतिहासाचे साक्षीदार : मा. गो. वैद्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2020
Total Views |

M G Vaidya_1  H


आदरणीय बाबुराव वैद्य हे संघकार्यातील ‘भीष्माचार्य’ म्हणता येतील, असे व्यक्तिमत्त्व होते. अनेक वर्षे रा. स्व. संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे ते सदस्य होते. रा. स्व. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरूजी, बाळासाहेब देवरस, राजेंद्रसिंहजी, सुदर्शनजी व विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत या सर्वांशी त्यांचा निकटचा संबंध होता.


आदरणीय बाबुराव वैद्य हे संघकार्यातील ‘भीष्माचार्य’ म्हणता येतील, असे व्यक्तिमत्त्व होते. अनेक वर्षे रा. स्व. संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे ते सदस्य होते. रा. स्व. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरूजी, बाळासाहेब देवरस, राजेंद्रसिंहजी, सुदर्शनजी व विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत या सर्वांशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्याअर्थाने ते संघाच्या इतिहासाचे चालते-बोलते साक्षीदार होते.त्यांच्या काही बैठकांमध्ये सहभागी होण्याचा योग मला लाभला. संघाच्या नाशिक विभागातील धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांच्या संघ कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक धुळे येथे झाली होती. तेथे त्यांचे संघकामाविषयी मूलभूत मार्गदर्शन लाभले होते.
त्यावेळी भेटायला आलेल्या एका ज्येष्ठ पत्रकाराला स्थानिक नेतृत्वाकडून काही त्रास होत होता. त्याविषयी बोलताना ते म्हणाले, “पत्रकार म्हणून समाजात मान मिळतो तसा त्रासदेखील सहन करणे, या व्यवसायात आवश्यक आहे.”१९९४मध्ये रा. स्व. संघाचा अखिल भारतीय प्रचार विभाग सुरू झाला. त्यावेळी त्यांच्याकडे अ. भा. प्रचार प्रमुख असे दायित्व आले.१९९६च्या दिवाळीमध्ये देशातील प्रांत प्रचारकांची अखिल भारतीय स्तरावरील बैठक नाशिक येथे ‘भोंसला स्कूल’ परिसरात झाली होती. त्यावेळचे वातावरण अयोध्या आंदोलन, भारतीय जनता पक्षाचा राजकीय क्षितिजावरील विजय या पार्श्वभूमीवर कार्यक्रम पत्रिकेत अपेक्षित नसताना प्रसारमाध्यमांच्या मागणीवरून एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्याचे निश्चित झाले. त्यावेळी मा. गो. वैद्य यांनी तयार करून दिलेली प्रेस नोट टाईप करून आणणे, पत्रकारांना निमंत्रित करणे यासंबंधी त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. नाशिकमधील सर्व वृत्तपत्रांचे ज्येष्ठ प्रतिनिधी या पत्रकार परिषदेत आवर्जून उपस्थित होते. त्यावेळी त्यांचा स्पष्टवक्तेपणा व मार्मिक संवादाचा प्रत्यय आला.
 

संघ समर्पित कुटुंब

त्यांच्या नाशिकमधील पुढील एका प्रवासात अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांच्या कौटुंबिक जबाबदारीविषयी विचारले असता, त्यांनी मिश्किलपणे सांगितले, “पाच मुले आहेत. त्यापैकी दोघांची पीएचडी झालेली आहे. ते दोघेही संघाचे पूर्णवेळ प्रचारक निघाले व दोघांची पीएचडी व्हायची राहिली म्हणून संसार व व्यवसाय करतात.”प्रचारक असलेले सुपुत्र म्हणजे डॉ. मनमोहन वैद्य हे रसायनशास्त्रातील डॉक्टरेट असून सध्या विद्यमान अ. भा. सहसरकार्यवाह आहेत. डॉ. राम वैद्य यांनी संस्कृतमध्ये ‘डॉक्टरेट’ पदवी मिळवली असून भारताबाहेरील विश्व विभागात प्रचारक आहेत.

शतक चुकले

प्रतिवर्षी संघाच्या प्रचार विभागाची अखिल भारतीय बैठक होत असते. २०१६मध्ये प्रचार विभागास २१वर्षे पूर्ण झाल्यामुळे व प्रचार विभागातील सर्व कार्यकर्त्यांना बाबुराव वैद्य यांचा सहवास मिळावा म्हणून नागपूर येथे बैठक झाली. योगायोगाने त्यावेळी त्यांचे सुपुत्र डॉ. मनमोहन वैद्य हे अ. भा. प्रचारप्रमुख होते. देशभरातील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी ते रेशीमबाग मैदानावरील लॉनमध्ये खुर्ची टाकून बसले होते. आम्ही काहीजणांनी त्यांना वय विचारले असता ते म्हणाले, “सात वर्षे राहिली आहेत.” म्हणजे, शंभरी पूर्ण करण्यास सात वर्ष पूर्ण राहिलेली आहेत. त्या वेळी त्यांचे वय ९३ वर्षे होते. त्यांच्या शब्दातील आत्मविश्वास जाणवणारा होता. पण, दुर्दैवाने त्यांचे शतक हुकले आहे. त्याच बैठकीत त्यांची विषय मांडणीची दोन सत्रे झाली. वयाच्या 93व्या वर्षीदेखील सुस्पष्ट मांडणी, कुशाग्र बुद्धिमत्ता, संस्कृत-हिंदी-इंग्रजी-मराठी या भाषेवरील त्यांचे प्रभुत्व व स्मरणशक्ती याचे अभूतपूर्व दर्शन झाले.

स्वयंसेवकत्वाचे दर्शन

२०१८च्या नागपूर येथील संघाच्या अ. भा. बैठकीत ते व्हीलचेअरवर बसून आले होते. त्यावेळी त्यांचा वाढदिवस असल्याने डॉ. मोहनजी भागवत यांनी मंचावरून खाली उतरून त्यांचा सन्मान केला व त्यांना वाकून नमस्कार केला. त्यावेळी मा. गो. वैद्य यांनी स्वतः खाली वाकून डॉ. मोहनजी वयाने त्यांच्यापेक्षा खूपच लहान असूनदेखील सरसंघचालक या नात्याने आदरपूर्वक त्यांना खुर्चीवरूनच वाकून नमस्कार केला व तसे आपल्या मनोगतात व्यक्त केले. संघ स्वयंसेवकत्वाचे जीवन दर्शन त्या एकाच कृतीतून सर्व काही सांगून गेले.

संघविचार भाष्यकार

गेल्या काही वर्षांतील विशेषतः राजकीय घटनांवरील त्यांचे भाष्य मिळवण्यासाठी पत्रकारांना उत्सुकता असे व ते त्यांची निराशा करीत नसत. संघ विचारांच्या मूलभूत चौकटीमध्ये आणि ‘माणिक बर्तमान शब्दावली’ मते ते परखडपणे आपली मते मांडत. अत्यंत साधी राहणी, विपुल व चौफेर वाचन, भाषाप्रभुत्व, मार्मिक संवादशैली यामुळे त्यांच्याशी होणार्‍या गप्पा या संस्मरणीय असत. पत्रकारितेतील व संघ इतिहासातील अत्यंत कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आपण आज गमावले आहे.
त्यांना विनम्र अभिवादन!


-दिलीप क्षीरसागर
(लेखक रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र
प्रांत प्रचार प्रमुख आहेत.)
९४२२२४५५८२
@@AUTHORINFO_V1@@