सिंथिया उर्फ बेटी पॅक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2020
Total Views |

article_1  H x



“जेम्स बॉण्डने जशी आपली 'Beretta’ वापरली, तसाच वापर तिने बेडरूम्सचा केला.” मरणोत्तर तिच्याबद्दल लिहिताना १९६३ सालच्या ‘टाईम’ मासिकात 'Espionagea - blonde bond’ या लेखातलं हे अवतरण! ‘ती’ म्हणजे आजवरची सर्वोत्तम गुप्तहेर म्हणून मान्यता पावलेली, ब्रिटनच्या 'MI6’ या गुप्तचर विभागातली मदनिका- बेटी पॅक!


१९१०मध्ये मिनेसोटामध्ये कर्नल जॉर्ज थॉर्पच्या घरी जन्माला आलेली एमी एलिझाबेथ बेटी थॉर्प ही अतिशय बंडखोर स्वभावाची मुलगी होती. वडिलांचा अतिशय आदर करणार्‍या बेटीचे सूर तिच्या आईशी मात्र कधीच जुळले नाहीत. कदाचित तिच्या आईची उच्चभ्रू वर्तुळातला मान मिळवण्याची व तो टिकवून धरण्याची महत्त्वाकांक्षा, बेटीच्या बंडखोर आणि बेफिकीर स्वभावाला मानवली नाही. तिच्या वडिलांच्या कामात बढती मिळत गेल्यामुळे हे कुटुंब प्रथम क्युबा आणि तिथून वॉशिंग्टन डी. सी. येथे स्थायिक झाले. प्रथितयश शाळेत जाणार्‍या बेटीला इथेच समाजाच्या उच्चवर्गीय वर्तुळात वावरण्याची संधी मिळाली. या वर्तुळात वावरण्याच्या पद्धती तिच्या अंगवळणी पडल्या. मात्र, वरवरच्या वागण्याचा, खोट्या पांढरपेशी शिष्टाचारांचा मनस्वी तिरस्कार करणारी बेटी या जीवनात रुळली नाही.शालेय जीवनात असल्यापासूनच तिच्या दैहिक वासनांच्या टोकाच्या आकर्षणाचे प्रतिबिंब तिच्या वागण्यात पडलेले दिसत होते. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी तिला दिवस राहिले, तेव्हा त्याचे पितृत्व नेमके कोणाकडे होते, हे तिलाही सांगता येत नव्हते! ती ज्या प्रतिष्ठित वर्तुळात वावरत होती, तिथे तिचे हे ‘कुमारी मातृत्व’ हे कलंक ठरेल, हे लक्षात येताच तिने एका पार्टीमध्ये आर्थर पॅक या तिच्याहून दुपटीने मोठा असणार्‍या ब्रिटिश राजनैतिक प्रतिनिधीशी तिने बघता बघता सूत जुळवले आणि लग्न करून मोकळी झाली! १९३०मध्ये ते विवाहबद्ध झाले. इथूनच तिच्या भटकंतीला सुरुवात झाली. आर्थरबरोबर राजनैतिक प्रतिनिधींच्या वर्तुळात वावरण्याची, तिथल्या पद्धती शिकण्याची संधी तिला मिळाली आणि तिच्या मूळच्याच उच्चभ्रू व्यक्तिमत्त्वामध्ये आणखी सफाई आली. उंच, शेलाट्या बांध्याची, तीन ते चार भाषांवर प्रभुत्व असणारी, अतिशय चतुर आणि तीक्ष्ण बुद्धिमत्ता असणारी सुंदर आणि आकर्षक बेटी या वर्तुळातही लक्षवेधी ठरली नसती तरच नवल! ती तिला हव्या त्या पुरुषाला तिच्याकडे आकृष्ट करून घेऊ शकत असे. तिचे 'MI6’ मधील सहकारी याची ग्वाही देताना म्हणतातच “तिच्याठायी जणू अशी एखादी चुंबकीय ऊर्जा होती की, कोणताही पुरुष तिच्यापासून लांब राहू शकत नसे किंवा तिच्या बाहुपाशात आल्यावर मनातली गुपितं उघड न करण्याइतकी ताकद कोणत्याही पुरुषात नव्हती” आणि याच गोष्टींच्या बळावर पुढे बेटी तिच्या अनेक कारवाया यशस्वी करू शकली. लहानपणापासूनच ती काहीशी चंचल मनोवृत्तीची होती. एकटं राहणं आणि कोणत्याही प्रकारची- मग अगदी भीतीपायी का असेना-उत्तेजना (excietment) असणं, या दोन गोष्टी तिच्यासाठी महत्त्वाच्या होत्या. त्यासाठी कोणत्याही टोकाला जायला ती मागे-पुढे पाहत नसे.


थंड प्रवृतीच्या आर्थरशी आपलं जमणं कठीण आहे, हे लवकरच बेटीच्या लक्षात आलं. त्याशिवाय तिच्या जन्माला आलेल्या बाळाला ‘हे मूल आपलं नाही’ या संशयावरून आर्थरने दत्तक देण्यास भाग पाडलं. त्यामुळे तिच्या मनात त्याच्याविषयी एक प्रकारचा तिरस्कारच निर्माण झाला. बेटी आपल्या या पहिल्या मुलाला आयुष्यात फक्त तीनदा भेटली. एकंदरीतच या सगळ्या प्रकाराला कंटाळून गेलेल्या बेटीने आर्थरच्या चिली आणि स्पेनमधील पोस्टिंगचा फायदा घेत विवाहबाह्य संबंध ठेवायला सुरुवात केली आणि एका राजनैतिक प्रतिनिधीचं पत्नीपद सांभाळत लोकांकडून माहिती गोळा करायला सुरुवात केली. सुरुवातीला केवळ विरंगुळा म्हणून वापरलेल्या या युक्त्या-प्रयुक्त्या तिच्या पुढील योजनांमध्ये तिच्या कामी आल्या.१९३६ मध्ये स्पेनमधील समाजवाद्यांचे धार्जिणे असणार्‍या सरकारने कित्येक पाद्री आणि प्रीस्टना कैदेत टाकले. त्यात बेटीचे संबंध असणार्‍या एका प्रीस्टचादेखील समावेश होता. तो कोणत्या तुरुंगात आहे, याची माहिती काढून ती रोममधील मुत्सद्दी दूत असणारे पोप नन्सिओ यांना भेटली आणि त्या प्रीस्टच्या सुटकेसाठी सरकारवर दबाव टाकण्याची गळ तिने त्यांना घातली. हा एक प्रकारचा जुगारच होता, पण बेटी त्यात यशस्वी झाली आणि नंतर तिने त्या प्रीस्टला स्पेनबाहेर जाण्यासाठी मदत केली. तिच्या स्पेनमधल्या या हालचाली प्रथमच ’चख6’ या ब्रिटिश इंटेलिजन्स विभागाच्या नजरेत आल्या. यानंतर काही काळातच स्पेनमध्ये यादवी सुरु झाली आणि सर्व राजनैतिक प्रतिनिधी त्यांच्या कुटुंबांसह फ्रान्समध्ये स्थलांतरित झाले. मात्र, बेटी तिकडे फार काळ राहिली नाही. ती पुन्हा स्पेनमध्ये आली. कारण, तिचा एकेकाळचा प्रियकर कार्लोस सार्तोरियसलासुद्धा तुरुंगात टाकल्याची बातमी तिला मिळाली आणि त्याच्या सुटकेसाठी ती तिथे जाऊन थडकली. याच दरम्यान व्हॅलेंन्शियामध्ये राहणारे ब्रिटिश राजदूत सर जॉन लेचे यांनी तिला एका अप्रत्यक्ष हेर-कामगिरीसाठी विनंती केली. सार्तोरियस बरोबरच तुरुंगात टाकलेल्या १७ वायुदलातील सैनिकांना सोडवण्याची हे कामगिरी होती. तिच्या प्रयत्नांना यश आलं आणि सार्तोरियसबरोबरच त्या १७ जणांचीदेखील सुटका केली गेली. ही कामगिरी संपवून बेटीने पुन्हा पुन्हा स्पेन सोडला.


१९३८मध्ये आर्थरची नियुक्ती पोलंडमध्ये झाली. नीरस नवरा आणि त्याच्या थंडपणाने कंटाळून गेलेली बेटी पुन्हा एकदा ‘रोमांचकारी’ प्रेमसंबंधांच्या शोधात असतानाच पोलंडच्या परराष्ट्र कार्यालयात काम करणार्‍या एका अधिकार्‍याशी ओळख झाली. आपल्या मनातल्या चिंता तिच्याशी बोलत असतानाच पोलंड गुप्तपणे जर्मनीला सामील असल्याचे तिला कळले. नाझींच्या विध्वसंक नीतीची कल्पना असणार्‍या बेटीला यातला धोका कळायला वेळ लागला नाही. तिने तेथील ब्रिटिश दूतावासाच्या इंटेलिजन्स प्रमुखांशी-जॉन शेले यांच्याशी संपर्क साधून ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली. थोड्याच कालावधीत शेलेंनी तिला अधिकृतपणे ’चख6’ मध्ये समाविष्ट करून घेतले आणि नाव दिले- ‘सिंथिया.’ अखेर बेटीच्या आयुष्यात बुद्धिमत्तेचा कस लागेल असा, वादळी आणि रोमांचकारी कालखंड येऊन उभा ठाकलाच! अधिकृत हेर म्हणून तिची पहिली कामगिरी होती- जोसेफ बेक या पोलंडच्या परराष्ट्रमंत्र्यांचा साहाय्यक- मिशेल ल्युबिन्स्की! एका पार्टीत भेटल्यावर मिशेलला आकृष्ट करून घ्यायला बेटीला वेळ लागला नाही. शय्यासोबत करतानाच अत्यंत चतुराईने गप्पांचा ओघ ब्रिटनला रस असणार्‍या गोष्टींकडे वळवत बेटीने कित्येक गोष्टी त्याच्याकडून जाणून घेतल्या. पोलिश लोकांनी जर्मनीच्या सुप्रसिद्ध ‘एनिग्मा कोड’ सोडवला असल्याचे यातूनच तिला समाजले आणि मग पुढच्या गोष्टी ब्रिटनसाठी फारच सोप्या होत्या. एनिग्माची पुढची सुधारित रहस्यं सोडवताना ब्रिटनला पोलिशांचीच मदत झाली.यानंतर प्रागमधील नाझी समर्थक नेता कोनराड हेनलिओन याचं कार्यालय फोडून तेथील महत्त्वाच्या वस्तू लांबवण्यात तिने मदत केली. यामध्येच जर्मनीचे मध्य युरोपवरील पुढील तीन वर्षांतील हल्ल्यांसंबंधीचे नकाशे मिळाले. यानंतर काही काळातच तिने तिचा पती आर्थर आणि मुलगी यांना सोडून वॉशिंग्टन डी.सी. येथे प्रयाण केले आणि तिची पुढची योजना तिला मिळाली- इटालियन नाविक कोड्स मिळवण्याची!


या कामासाठी तिला तिचे वडील युएस नेव्हीत काम करत असतानाचे जुने संपर्क आणि संबंध कामी आले. इटालियन नेव्हीचा इंटेलिजन्स एजंट आणि युएसमध्ये मुसोलिनीकरिता हेरांचे जाळे तयार करणारा अल्बर्टो लेईस हा तिचं पुढचं लक्ष्य होता! लवकरच तिच्या बाहुपाशात अल्बर्टो त्याची सगळी गुपितं उघड करू लागला. जरी त्यांच्यात प्रत्यक्ष शरीरसंबंध आले नाहीत, तरी अल्बर्टोला बोलतं करण्यासाठी बेटीने आपल्या सौंदर्याचा, बुद्धिचातुर्याचा आणि कसलेही विधी-निषेध न बाळगण्याच्या वृत्तीचा पुरेपूर वापर करून घेतला आणि इटलीचे नेव्हल कोड बुक मिळवण्यात यश मिळवले. त्या जोरावर ब्रिटिशांनी इटालियन नौदलाला युद्धातून तटस्थ ठेवण्यात यश मिळवले.व्हीची फ्रेंच दूतावासात घुसून तेथील फ्रेंच नेव्हल कोड्स मिळवणं ही तिची पुढची कामगिरी होती. याच कामगिरीदरम्यान तिची ओळख चार्ल्स ब्रोऊझशी झाली आणि ती अतिशय गंभीरपणे त्याच्या प्रेमात पडली. फ्रेंच दूतावासात घुसण्याचे तिचे दोन प्रयत्न फसल्यावर तिसर्‍या प्रयत्नामध्ये यशस्वी होऊन तिने ती कोड बुक्स मिळवली. मात्र, या कामगिरीनंतर लगेचच चार्ल्सच्या बायकोने असूयेपोटी तिची ओळख उघड केली आणि गुप्तहेर म्हणूनची तिची कारकिर्द संपुष्टात आली. नंतर तिने चार्ल्सशी लग्न केले आणि ते फ्रान्समधील Chateau de Castelnou येथे स्थायिक झाले.
आपल्या कामगिर्‍या यशस्वी करून बेटीने जवळजवळ पूर्ण दुसरे महायुद्ध ब्रिटन आणि दोस्त राष्ट्रांकडे खेचून आणले. तिने मिळवलेल्या माहितीच्या आधारावरच प्रत्येक वेळी मित्र राष्ट्रे आपली युद्धनीती ठरवून शत्रूच्या दोन पावले पुढे राहू शकली. तिच्याविषयी गौरवोद्गार काढताना तिचे प्रमुख सर विल्यम स्टेफन्सन यांनी तिला ‘दुसर्‍या महायुद्धाची अघोषित नायिका’ अशी पदवी दिली.हेर म्हणून काम करताना बेटीने बिनदिक्कतपणे अनेकांशी संबंध ठेवले, कित्येकांना आपल्या जाळ्यात ओढून कार्यभाग साधून घेतला.‘या गोष्टींचा नंतरच्या आयुष्यात कधी पश्चात्ताप किंवा लाज वाटली का?’ या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणते, “लाज? कशाबद्दल? मला माझ्या वरिष्ठांनी सांगितलं होतं की, तुझ्या यशामुळे कित्येक ब्रिटिश आणि अमेरिकन सैनिकांचे प्राण वाचणार आहेत! केवळ या एकाच विचारावर कोणतीही प्रतिष्ठित स्त्री करू धजणार नाही अशी कृत्ये मी केली आणि त्याची मला यत्किंचितही लाज वाटत नाही. असं पाहा- आम्ही सगळेच युद्धात सहभागी होतो आणि कोणतीही युद्धं ही कधीही प्रतिष्ठेच्या मार्गाने जिंकली जाऊ शकत नाहीत,” हे शब्द आजही विचार करायला लावणारे आहेत, नाही का?

- मैत्रियी जोशी 
@@AUTHORINFO_V1@@