नवी मुंबई महानगरपालिकेची कोव्हीड लसीकरणाची तयारी

    19-Dec-2020
Total Views |
NMC _1  H x W:




१६ हजाराहून अधिक लोकांच्या लसीकरणाचे नियोजन



नवी मुंबई: केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोव्हिड १९ लसीकरणाचा पहिला टप्पा राबविण्यासाठीची आवश्यक तयारी महापालिका आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत आहे. या पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेशी निगडीत नवी मुंबई महानगरपालिका तसेच खाजगी रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, नर्सेस, फार्मासिस्ट, कर्मचारी, आशा, अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी अशा कोव्हीड योध्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

या कोव्हीड १९ लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका मुख्यालयातील विशेष समिती सभागृहात टास्क फोर्स सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम.सुजाता ढोले यांनी मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरणाची सुयोग्य कार्यवाही पार पाडण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे असे आवाहन केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी सादरीकरणाव्दारे लसीकरण मोहीम राबविण्यासाठी आवश्यक बाबींची तसेच महानगरपालिकेच्या वतीने केलेल्या तयारीची माहिती दिली.





NMC war room_1  



लसीकरणाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसली तरी सक्षम पूर्वतयारी करीत हे नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच लसीकरण सुरू झाल्यानंतर नोंदणी झालेल्या व्यक्तीस लसीकरणाचा दिवस व स्थळाबाबत त्याने नोंदणी केलेल्या मोबाईलवर मेजेस येणार आहे. लसीकरण झाल्यानंतर त्याचे प्रमाणपत्रही मोबाईलवर प्राप्त होणार आहे. कोव्हीड १९ लसीकरण स्थळाच्या रचनेमध्ये प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष स्वतंत्र असणार असून प्रत्येक पथकामध्ये ४ व्हॅक्सीनेशन ऑफिसर व १ व्हॅक्सीनेटर ऑफिसर यांचा समावेश असणार आहे. एका केंद्रावर दररोज १०० व्यक्तींना लस देण्यात येणार आहे.



लसीकरण झाल्यानंतरही वारंवार हात धुणे अथवा सॅनिटायझरचा वापर करणे तसेच मास्क घालणे व सामाजिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. तसेच या बैठकीत सर्व संस्थांनी आवश्यकतेनुसार अपेक्षित मनुष्यबळ तसेच लसीकरणासाठी जागा अशा पूरक बाबी उपलब्ध करुन द्याव्यात, असे आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांचे मार्फत सूचित करण्यात आले आहे. कोरोनाच्या लसीला केंद्र सरकारकडून मान्यता प्राप्त झाल्यानंतर करायच्या लसीकरणासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झालेली आहे.