देशाचे पहिले ‘हिंदकेसरी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Dec-2020   
Total Views |
Hind _1  H x W:
 
 
 
महाराष्ट्रातल्या मातीतले ज्येष्ठ कुस्तीपटू आणि देशाचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचा थोडक्यात परिचय करुन देणारा हा लेख...
 
 
देशाचा स्थानिक खेळ आणि महाराष्ट्रातल्या आपल्या मायभूमीतील सुप्रसिद्ध खेळ म्हणजे कुस्ती. सध्या जगभरात कुस्ती या खेळाचा अनेक विद्यापीठांमध्ये अभ्यास केला जातो. आपली मायभूमी आणि कुस्ती याचे तसे फार जुने नाते. एकेकाळी खेडेगावांमध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलाला तालमीत प्रशिक्षण देण्याची जणू काही परंपराच होती.
 
 
 
कालानुरूप या खेळाला जागतिक दर्जा मिळाला. त्यानंतर महाराष्ट्रातला हा मातीतला खेळ सातासमुद्रापार पोहोचला. महाराष्ट्र आणि कुस्तीचे नाते हे फक्त स्पर्धांपुरते नसले, तरीही देशातीलच नव्हे, जागतिक कुस्ती स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंनी नाव कमावले आहे. भारतमध्ये ’हिंदकेसरी’ या स्पर्धेला भारतीय कुस्ती क्षेत्रात मोठे स्थान आहे.
 
 
 
देशभरातून अनेक कुस्तीपटू या स्पर्धेसाठी वर्षानुवर्षे मेहनत घेत असतात. कुस्तीच्या इतिहासात अनेक अशी नावे आहेत, ज्यांनी कुस्तीच्या विकासात भरीव कामगिरी केली आहे. १९५९ मध्ये या खेळाला सुरुवात झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रातील ‘कुस्तीची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोल्हापूरच्या एका कुस्तीपटूने भारतातील पहिले ’हिंदकेसरी’ म्हणून ओळख मिळवली. ते म्हणजे श्रीपती शंकर खंचनाळे. जाणून घेऊया त्यांच्या या जीवन प्रवासाबद्दल...
 
 
श्रीपती शंकर खंचनाळे यांचा जन्म १० डिसेंबर, १९३४ रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा गावात झाला. एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या श्रीपती खंचनाळे यांना लहानपणापासूनच कुस्तीचे बाळकडू मिळाले होते. वयाच्या सातव्या वर्षापासूनच त्यांनी कुस्तीची तालीम घ्यायला सुरुवात केली होती. एकसंबा हे गाव कृष्णा नदीच्या काठी असून दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध होते. त्यामुळे गावातील सर्वच मुले ही शरीराने राकट आणि कणखर होती.
 
 
 
गावामध्ये कुस्ती आणि तालीम यासाठी पोषक वातावरण होते. अशामध्ये श्रीपती हे या वातावरणापासून दूर कसे राहतील? मराठी माध्यमातून शिक्षण घेत असताना फक्त कुस्तीची आवड असल्याने त्यांनी त्यावेळच्या सातवीनंतर शिक्षण सोडले. पुढे तीन वर्षे त्यांनी कुस्तीचा कसून सराव केला. त्यानंतर गावाबाहेर पडत त्यांनी ’माथा’ तालीम येथे सराव करायला सुरुवात केली. कोल्हापूरच्या शाहूपुरी तालमीत त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले.
 
 
दिवसातून आठ तास ते तालीम करत असत. त्यांचे वडील शंकर खंचनाळे यांनीदेखील त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. यावेळी आपसूकच त्यांना कुस्तीची पंढरी मानल्या जाणार्‍या कोल्हापूरचे वेध लागले. साधारण १९५० मध्ये ते या पंढरीत दाखल झाले. ‘कुस्तीमधील भीष्माचार्य’ म्हणून ओळखले जाणारे विष्णू नागराळे आणि मल्लाप्पा थडके यांचाही त्यांच्यावर प्रभाव राहिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १२८ किलो वजनाचे अत्यंत मजबूत देहयष्टीचे असलेल्या श्रीपती यांचे शरीर पिळदार आणि चपळ झाले.
 
अत्यंत धिप्पाड शरीर, रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि प्रतिस्पर्धी कुस्तीपटूच्या उरात धडकी भरेल, असा करारी बाणा त्यांना लाभला होता. १९५८ मध्ये बेळगाव येथे झालेल्या ‘ऑल इंडिया चॅम्पियनशिप’ स्पर्धेतपंजाबी मल्लाला चीतपट करत विजेतेपद पटकावले. त्यांची इतक्या वर्षाची मेहनत ही १९५९ मध्ये झालेल्या ’हिंदकेसरी’ स्पर्धेत चांगलीच फळाला आली. ३ मे, १९५९ मध्ये देशाची राजधानी दिल्ली येथे आयोजित पहिल्यावहिल्या ’हिंदकेसरी’ स्पर्धेतील त्यांची ‘पंजाब केसरी’ असलेल्या बंतासिंग यांच्याबरोबर झालेला सामना अजूनही आठवणीत ठेवला जातो.
 
ही कुस्ती तब्बल दोन दिवस चालली. पहिल्या दिवशी सामना अनिर्णित करण्याच्या पंचांच्या निकालानंतर श्रीपती यांनी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांची भेट घेत स्पर्धा निकाली लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दुसर्‍या दिवशी पुन्हा एकदा कुस्तीचा थरार अनुभवता आला. मात्र, यावेळी आत्मविश्वास आणि चपळाईच्या बळावर त्यांनी बंतासिंग यांना चीतपट केले आणि भारताचे पहिलेवहिले ’हिंदकेसरी’ बनण्याचा मान मिळवला. सलग दोन दिवस हा सामना पाहायला थांबणार्‍या राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी चांदीची मानाची गदा बहाल केली.
 
तसेच, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना आमंत्रित करून उचित सन्मान केला. तसेच, तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीदेखील ‘कोल्हापुरी फेटा’ देऊन त्यांचा सन्मान केला. याचवर्षी कराड येथे झालेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेमध्ये आनंद शिरगावकर यांना अवघ्या काही मिनिटांमध्ये चीतपट करत ’महाराष्ट्र केसरी’वर आपले नाव कोरले. पुढे १९६२ रोजी जबलपूर आणि १९६५ रोजी बंगळुरू येथे झालेल्या ‘ऑल इंडिया चॅम्पियनशिप’ स्पर्धांमध्ये बंगाल तसेच सैन्यदलातील मल्लांना चीतपट करत या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे.
 
विशेष म्हणजे, श्रीपती खंचनाळे हे कोणतीही स्पर्धा न लढता थेट ’हिंदकेसरी’ जिंकणार्‍या काही मोजक्या मल्लांमध्ये मोडतात. वयाच्या ४५व्या वर्षी त्यांनी कुस्तीमधून निवृत्ती स्वीकारली. कुस्तीतून निवृत्त झाल्यानंतरही नवे मल्ल घडविण्याचे काम त्यांनी केले. त्यानंतर ‘कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघा’च्या माध्यमातून ते कुस्ती कलेच्या संवर्धनासाठी सक्रिय होते. या संघाचे ते पाच वर्षे अध्यक्षही होते. येत्या काळातही कुस्तीच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर राहील. अशा या ध्येयवादी विचारांच्या व्यक्तिमत्त्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून भावपूर्ण श्रद्धांजली...


@@AUTHORINFO_V1@@