‘बोलक्या रेषां’ची खानदानी ‘देशमुखी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Dec-2020
Total Views |
shepal _1  H x
 
घनश्याम देशमुख हे त्यांच्या ‘बोलक्या रेषां’नी कलाजगताला आणि रसिक वाचकांना ज्ञात असावे, पण व्यंगचित्रकार म्हणून! त्यांनी जे या सात-आठ महिन्यांच्या ‘लॉकडाऊन’च्या काळात जे जे काम केलं आहे, ते ‘स्त्री-सौंदर्या’च्या निखळ अभिरुचीचं दर्शन घडविलं आहे.
 
जगाच्या तुलनेने स्त्री-सौंदर्याचा सन्मान भारतीय संस्कृतीने, आदराने आणि सन्मानाने केलेला आढळतो. गायन-वादन आणि नृत्यकलेमध्ये ‘स्त्री’ला पुरुषाच्या तुलनेने अधिक महत्त्वही आहे आणि सन्मानही अधिक आहे. साहित्यातही स्त्री-वेदनेपासून तर स्त्री-सौंदर्यापर्यंत ग्रंथ लिहिलेले आहेत. (लौकिक अर्थाने) मग चित्रकार-शिल्पकार या बाबतीत मागे कसे राहतील?
 
‘गीत गाया पत्थरोंने’सारखे चित्रपट आजही तितक्याच आवडीने आणि कलाभिरुचीने रसिकमान्य आहेत. राजा रविवर्मांनी तर ‘स्त्री’ मॉडेल्स बसवून पेंटिंग्ज बनवली आहेत. त्यातूनच त्यांनी स्त्री-सौंदर्यातून हिंदू देवतांचे दर्शन घडविले. पुढे के. बी. कुलकर्णी, एस. एम. पंडित, रघुवीर मुळगावकर, दीनानाथ दलाल ही एक मोठी फळी होती, ज्यांच्या कलाकृती अजरामर आहेत. एकदा ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके म्हणाले होते, “आमच्या लहानपणी दलालांची, मुळगावकरांची स्त्री-सौंदर्यविषयक चित्रे पाहूनच आम्ही आमची सहचारिणी कशी असावी, ही स्वप्ने पाहिली.”
 
 
अर्थात, हे ‘सारं’ स्त्री-सौंदर्याकडे स्वच्छ-पारदर्शी आणि केवळ पवित्र भावनेने पाहणार्‍यांसाठी आहे. ‘स्त्री-सौंदर्या’ऐवजी ओंगळवाणं दर्शन घडविणारेही नतदृष्ट आहेत. आपण असल्या ‘समाजास्मिता’ला बाधक-घातक दृष्कृतीवीरांबद्दल कधीच लिहिण्याच्या फंदात पडत नाही. माझी लेखणी केवळ सकारात्मक, सौंदर्याभिरुची आणि रसग्रहणासह संस्कृतीपूरक असेच पाहते आणि लिहिते. त्यामुळे या लेखात स्त्री-सौंदर्यातील सात्विक भाग, स्त्री-सौंदर्यातील पावित्र्य आणि एकूणच स्त्रीला ईश्वराने फारच फुरसतीने निर्माण केले असावे. अशा आशयाच्या शायरीची आठवण करून देणार्‍या एका प्रसिद्धीपराड्मुख चित्रकाराच्या कलाकारीच्या रेखांकनापासून रंगरेखांच्या शृंगारपूर्ण कलाप्रवासाचा मागोवा घेणार आहोत.
 
 
घनश्याम देशमुख हे त्यांच्या ‘बोलक्या रेषां’नी कलाजगताला आणि रसिक वाचकांना ज्ञात असावे, पण व्यंगचित्रकार म्हणून! त्यांनी जे या सात-आठ महिन्यांच्या ‘लॉकडाऊन’च्या काळात जे जे काम केलं आहे, ते ‘स्त्री-सौंदर्या’च्या निखळ अभिरुचीचं दर्शन घडविलं आहे. हे काम पाहताना नितेश वर्मा यांनी स्त्री-सौंदर्याचं वर्णन केलेल्या हिंदी कवितेच्या काही ओळी आठवतात...
 
ते स्त्री-सौंदर्याला म्हणतात-
“मैं तुम्हारे नाम पर एक लंबी कहानी लिख दूँ...
कई हसीनाओं के दीदार की भी जवानी लिख दूँ...
एक छोटे से बच्चे की कोई शैतानी लिख दूँ...
दुनिया के असली चेहरों से कोई सावधानी लिख दूँ...
मैं धरती पर बरसता हुआ रिमझिम पानी लिख दूँ...
मैं तुम्हें खुले आसमान का रंग आसमानी लिख दूँ...
तड़पन, पीर उदासी आँसू या अपनी पीर पुरानी लिख दूँ...
मैं तुम्हें अपनी आँख से निकलते हुए निरंतर आंसू का पानी लिख दूँ...
 
मुझे जैसे चूमती हैं मां मेरी तुम्हें वो पेशानी लिख दूँ ।”
 
 
 
घनश्याम देशमुख यांनी जे स्त्री-सौंदर्य त्यांच्या रंग-रेखांकनातून व्यक्त केलं आहे, ते वरील हिंदी कवितेची आठवण करून देणारं आहे. त्यांच्या अलंकारिक शैलीतील वा व्यंगचित्रणातूनदेखील, स्त्रीविषयक पवित्र भाव दिसतो. कुठेही उथळपणा, ओंगळवाणेपणा वा अश्लिलपणा दिसत नाही.
 
मूळचे अमरावतीचे घनश्याम देशमुख यांनी त्यांचं कलाशिक्षण नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयातून पूर्ण करून १९९०ला पुण्यनगरीत प्रवेश केला आणि पुणेकरांच्या पसंतीलाच नाही, तर पुणे प्रकाशन विश्वाच्या गळ्यातले ताईत बनले. पाठ्यपुस्तक मंडळाची शालेय पुस्तके, बालसाहित्यांवरील पुस्तके, संतसाहित्यावरील पुस्तके, इतर पुस्तके यांच्यासाठी त्यांनी प्रचंड काम केले आहे.
 
चित्रकलेची आवड नव्या पिढीला या इच्छुकांना व्हावी, यासाठी त्यांनी, प्रासंगिक विषयांवर तसेच चालू घडामोडींवरील चित्रविषय बोलक्या रेषांच्या मदतीने प्रभावी रंगसंगतीत चितारायला सुरुवात केली आणि मग १९९२ पासून त्यांनी ‘बोलक्या रेषा’ या हास्यचित्र प्रदर्शनाची निर्मिती केली.
 
गेल्या २० वर्षांहून अधिक काळ, त्यांच्या व्यंगचित्र प्रदर्शनाने महाराष्ट्राला कधी हसवले, तर कधी दिड्मुढ बनवले. त्याचवेळी कलारसिकांसाठी त्यांनी सोप्या आकारांमध्ये आशयगर्भ चित्रांकनाची निर्मिती कशी करावी, हे ते फार चपखलपणे इच्छुकांना सांगतात. त्यांची प्रात्यक्षिके म्हणूनच स्मृतिप्रवण ठरतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि आधुनिक प्रचार-प्रसार माध्यमांचा सकारात्मक पद्धतीने कसा कसा उपयोग करावा, याचं बोलकं उदाहरण म्हणजे ‘बोलक्या रेषाकार’ घनश्याम देशमुख होय.
 
 
२०१२ पासून त्यांनी संगणकीय तंत्रज्ञानाचा उपयोग करुन फेसबुक या सोशल नेटवर्किंगद्वारे ‘बोलक्या रेषा’ या हास्यचित्र मालिकेला सुरुवात केली. ‘रेषा बोलू शकतात, नव्हे तर रेषा बोलतातच...’ हेच देशमुखांनी दाखवून दिले. त्यांच्या ‘बोलक्या रेषा’ सध्या दोन हजारांवर हास्यचित्र विषयांद्वारे जगप्रवास करीत आहेत. चित्रकारापेक्षा त्याच्या चित्रारेषांच अधिक स्वरुपात कलारसिकांसमोर जातात, असं चित्रं फारसं दिसत नाही.
 
बदलत्या काळाचा मागोवा घेऊन घनश्याम यांनी आपली ‘देशमुखी’ सिद्ध केली आहे. अ‍ॅनिमेशन, सोशल मीडिया, सिनेक्षेत्र आणि जे जे नवीन क्षेत्र येईल, ते सर्व बोलक्या रेषांनी व्यापलेले असल्यामुळे त्यांचा एक स्वतंत्र ठसा काळानुसार बदलत्या चित्रशैली विश्वात उमटला आहे. त्यांच्या चित्रशैलीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ते त्यांच्या रेषांना ‘देहबोली’त रुपांतरित करतात. अव्याहत आणि अखंडपणे जो संवाद चालतो ते फक्त आणि फक्त ‘नवरा-बायको संवाद.’ त्या संवादाला देशमुखांनी वळणदार रेषांनी हास्यात वळविले. त्यामुळे त्यांची हास्यचित्रे हे नेहमीच ‘एव्हरग्रीन’ ठरली आहेत.
 
आज उत्स्फूर्त रेषा स्वयंभू रेखांकन आणि रंगलेपन करणारे आर्टिस्ट विशेषतः रेखांकनकार (इलेस्ट्रेटर) अगदीच अल्प आहेत. वृत्तपत्रे वा नियतकालिकांमधून रेखांकन वा व्यंगचित्रे देणार्‍या रेखाटणार्‍या रेखांकनकारांची संख्या अत्यल्प आहे. घनश्याम देशमुख यांचं काम हे तरुण आणि उदयोन्मुख कला-विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे ठरेल, असे वाटते. स्त्रीचं, स्त्री-देहाचं ओंगळवाणे प्रदर्शन करणार्‍या जाहिराती, व्यंगचित्रे वा इतर कलाप्रकारांच्या तुलनेने ‘देशमुखी रेषा’ या खानदानी भासतात. अशा कलाकारांच्या कलाकृती नेहमीच स्मरणात राहणार्‍या आणि आनंददायी असतात. त्यांच्या कलाप्रवासाला बोलक्या शुभेच्छा.
- प्रा. गजानन शेपाळ
@@AUTHORINFO_V1@@