नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांना काही शेतकरी संघटनांकडून विरोध होत असताना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी देशातील शेतकऱ्यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांनी लिहिलेलं पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले आहे. तसेच शेतकऱ्यांना आवाहन देखील केले आहे.
"कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी बंधू भगिणींना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नम्रपणे संवाद साधण्याचा एक प्रयत्न केला आहे. सर्व अन्नदात्यांनी हे पत्र वाचावं असा माझा आग्रह आहे. देशवासीयांना आग्रह आहे की, हे पत्र त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं" असे नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे. "कृषी कायद्यांवरुन काही जण राजकारण करत असून समाजात खोटी माहिती पसरवण्याचे काम करत आहेत", असे तोमर म्हणाले. एकूण आठ पानांच्या या पत्रात नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना 'एमएसपी'च्या मुद्द्यावर लेखी आश्वासन देण्याची सरकारची तयारी असल्याचेही म्हंटले आहे. पुढे तोमर यांनी आवाहन केले की,"विश्वास ठेवा, शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या या सुधारणेमुळे भारतीय कृषी क्षेत्रातील नव्या अध्यायाची पायाभरणी होईल आणि देशातील शेतकरी अधिक स्वतंत्र व सशक्त होतील."कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी वारंवार हे स्पष्ट केले आहे की, हे कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल. आपल्या पत्राद्वारे या कृषी विधेयकांबाबत शेतकऱ्यांची सद्यपरिस्थिती त्यांनी मांडली आहे.