कारण ट्रेकिंग म्हणजे नुसती पायपीट नाही !

    17-Dec-2020
Total Views |

news_1  H x W:
 
 


ट्रेक म्हणजे नुसती पायपीट नाही, ना नुसते निसर्गाचे फोटो काढणे, ना बाकीचे करतात म्हणून आपण करणे. ट्रेक म्हणजे आपण स्वतःला निसर्गाच्या स्वाधीन करणं. आपली शारीरिक क्षमता पडताळण. नवीन लोकांच्या सहवासात जाऊन त्यांना आपलंसं करणं. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या राजाचा वारसा आणि त्याच महत्त्व जपणे आणि ते संपूर्ण जगाला दाखवणे.
 
लॉकडाऊनमध्ये राहून राहून मन आणि शरीर दोन्ही सुस्तावून पडलं होतं. तसं लॉकडाऊन थोडं मोकळं झाल्यावर ठाणाळे लेणी आणि सागरगड हे दोन ट्रेक 'भटकंती महाराष्ट्राची' सोबत करुन आलो होतो, पण हरिश्चंद्रगडाचा अनुभव आजवरच्या इतर कोणत्याही ट्रेक पेक्षा प्रचंड वेगळा होता. सकाळी साडेपाचच्या दरम्यान पायथ्याजवळच्या गावात पोहोचलो. तसं हरिश्चंद्रगड ही ट्रेकर्सची पंढरी म्हटलं जातं मग तिथे ट्रेकर्सची दाटीवाटी असणारच. आमच्या अगोदरच तिथे ३-४ ग्रुप आले होते. कांदे पोहे आणि चहा झाल्यानंतर अंधारातच हा प्रवास सुरू झाला. त्या अंधारातली ती चंद्रकोर मला अजून आठवते. एखाद्या स्त्रीच्या कपाळावर उठून दिसावी तशी ती चंद्रकोर आकाशात उठून दिसत होती. हळूहळू प्रकाश झाला चंद्राची जागा सूर्याने घेतली आणि आम्ही जुन्नर दरवाजाच्या मार्गाने ट्रेकला सुरुवात केली.
 
 
 
३० ट्रेकर्सचा ग्रुप आमचा. निम्म्यापेक्षा जास्त एकमेकांशी अनोळखी. तरीही खूप आधीपासून एकमेकांशी ओळख असल्यासारखे मिळून मिसळून आम्ही ट्रेकचा आनंद घेत चाललो होतो. खरतर त्यामागे बस मध्ये झालेली ओळख, गाण्यांच्या भेंड्या, भुतांच्या गोष्टी, एकमेकांची टेर उडवणे या सर्व गोष्टींमुळे एकमेकांशी सर्व मिसळून गेले होते. केदारेश्वर मंदिराजवळ पोहोचायला तब्बल पाच तास लागले. कारण वाट तितकी सोपी नव्हती. अर्थात कित्येक ठिकाणी आम्ही थांबलो. सोबत चहा नाश्ता केला.
 
 
आमच्यासोबत असणाऱ्या मॅडम पद्मावती या बिनधास्त स्वभावाच्या. आधी तर माझा विश्वास बसला नव्हता की खरंच त्यांचं नाव पद्मावती होतं. त्यांनी स्वतःलाच एखाद्या राणी प्रमाणे लेखल होतं आमच्याकडून ही त्या तश्याच वागणुकीची अपेक्षा ठेवत होत्या. आणि आम्ही तसे वागत ही होतो. जितू दादा, शशी मोरे दादा हे भक्कम शिलेदार प्रमाणे सर्वांना सांभाळून घेत होते. कमी तिथे आम्ही बोलत सर्वांची जबाबदारी ते घेत होते. 'कॉमेडी स्टार' विनायक माळी सारखा दिसणार शुभम शिंदे आणि त्याच्या मैत्रिणी यांची सर्वांशी शर्यत लागल्या प्रमाणे सर्वात आधी पुढे जायची घाई. विशेष म्हणजे त्याला अस्थमाचा त्रास असून देखील त्याने ते जाणवू दिलं नाही.
 
 
नाझिया आणि तिची बहीण आपल्याच धुंदीत होते. मंजू मॅडम (संतूर मॉम) त्यांना पावले कसे टाकावे याची सतत ट्रेनिंग देत होत्या. बालाजी एक वेगळे व्यक्तिमत्व होता. तो त्याच्या शारीरिक क्षमतेवर मात करत सर्व ट्रेक साध्य करत होता. अधून मधून सर्वांना हसत ठेवण्याचं काम माझा मित्र अविनाथ बाणे करतच होता. अभिषेक मुंज दादा हा वर्गातल्या सर्वात खट्याळ मुलाप्रमाणे होता, तरीही सर्वांना हवा हवासा वाटणारा. वरद शिंदे, वैष्णवी शिंदे, सोनल साटले, नवीन गावड ही सर्व मंडळी तर फुल्ल ऑफ एनर्जीने भरून आली होती.
 
 
सचिन दादा तसा फार कुणाशी न बोलणारा. पण न बोलता सर्वांची काळजी आणि फिकीर करणारा तो. आणि या सर्वात प्रशांत गोसावी हे व्यक्तिमत्व म्हणजे खाऊच्या बॅगेत एका डब्यात गूळ आणि शेंगदाण्या प्रमाणे होत. सदैव आपल्या कवितेतून सर्वांना ऊर्जा देणारे. आणि या सर्वांना सोबत घेऊन निघालेला लीडर सत्या आणि त्याची टीम, कुठे दमदाटी नाही पण तरीही शिस्तबद्ध. विशेष कौतुक वाटते ते यांच्या टीमच. प्रकाश पाटील सर, तुषार सर , सोहम घाग यांच्या चेहऱ्यावर कुठेच ताण तणाव नव्हता. अतिशय संयमी पद्धतीने मागे राहिलेल्यांना हसत खेळत ते ते पुढे आणत होते.
 
 
बरं या ट्रेकच मुख्य आकर्षण म्हणजे सातवीत शिकणारी अरीबाह शेख आणि नुकतीच दहावी पूर्ण झालेली अना ( Anna Mathias). इतक्‍या कमी वयात आणि तोही इतका कठीण ट्रेक अगदी जिद्दीने पूर्ण करत होत्या. सर्वांसाठीच ते खूप प्रेरणादायी होतं. केदारेश्वर मंदिरात पोहोचताच आपण आत्तापर्यंत केलेल्या पायपीटीचे चीज झाल्याचे समाधान मिळाले. एवढी सकारात्मक ऊर्जा मंदिरात कुठून येते हे माझ्यासाठी अजूनही न उलगडलेलं कोड आहे. त्या मंदिराची बांधकाम रचना, तिकडे असणारी पाण्याचे टाकी आणि त्यात कधीही न संपणाऱ्या गार पाण्याचा साठा हे सगळं विलोभनीय होतं.
 
 
 
आदल्या दिवशी एकादशीनिमित्त दिंडी निघाली होती आणि आज तिथे भंडारा होता. तिथले गावकरी अगदी आग्रहाने आम्हाला जेवायची विनंती करते. जास्त नाही पण आम्ही तिघे चौघांनी त्या प्रसादाचा आस्वाद घेतला. बरं त्यातही ते अगदी आपुलकीने आणि सेवाभावाने जेवू घालत होते. एकीकडे शहरात अशी गावंढळ माणसं दिसली तर त्यांना कशी वागणूक दिली जाते आणि उलट तेच गावकरी इथे गावात कुणाची ओळख पाळख नसतानाही अगदी आपलेपणाने सर्व करत होते. तिथेच त्यांना घट्ट कडकडीत मिठी मारायची माझी इच्छा झाली पण नाही मारली मिठी, आवरले स्वतःला. पण आता वाटते मारायला हवी होती मिठी, आपल्याला जेव्हा जेव्हा त्याच्या बद्दल जे वाटते तेव्हा ते व्यक्त करून टाकावे.
 
 
असो तिथून आम्ही मुख्य आकर्षण कडे वळलो, जे ' कोकणकडा '. मंदिराकडून अर्ध्या तासाची पायपीट करत हा स्वर्ग आम्ही गाठला. एखादी जत्रा भरावी तशी तिथे ट्रेकर्सची जत्रा भरली होती. उघड्या मैदानावर बऱ्यापैकी टेन्ट उभारले होते. दुपारचे जेवणाची सोय तिथेच होती. नाचणीची भाकरी, पिठलं, मिरचीचा ठेचा, भात आणि गोडी डाळ आजचा मेनू. विश्वास ठेवा अगदी पंचपक्वान ही या पुढे फिकी पडतील. अर्थातच जिभेचे चोचले पुरविण्यासाठी आलेल्यासाठी ते काही खास नव्हते. शेवटी ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न. एखाद्याला हे नाही आवडत याचा अर्थ त्याची आवड चुकीची असं म्हणता येणार नाही.
 
 
 
जेवणानंतर थोड्यावेळ टेंटमध्ये आराम केल्यानंतर साधारण चारच्या नंतर सर्व मंडळी कोकणकड्यावर जमली. अतिशय नयनरम्य आणि तितकीच चित्तथरारक ते दृश्य होतं. भीतीही वाटत होती आणि पुन्हा पुन्हा खाली वाकून बघावसं वाटत होतं. तिथून दिसणारा नजारा म्हणजे सह्याद्रीला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं. कितीही वेळ नजरेत साठवण्याचा प्रयत्न केलात तरी काही न काही राहूनच जायचं. अशा ठिकाणी गेल्यानंतर आपला मोह आवरता आला पाहिजे. कारण आपली जराशी चूक आणि आणि सरळ खाली. तुम्हाला तुमची चूक सुधारण्याची दुसरी संधीही मिळणार नाही. या सर्वात कधी संध्याकाळ निघून गेली हे समजलेच नाही. मग रात्रीच्या कॅम्प फायर साठी जंगलातली सुकी लाकडं गोळा करण्याचा टास्क सगळ्यांना मिळाला. प्रत्येकाने आपापल्या परीने जमतील तशी गोळा करून लाकडाची मोळी टेन्ट जवळ आणून ठेवली.
 
 
 
कॅम्प फायर ची तयारी झाली. यात सॅनिटायझरची मदत झाली कारण तशी ही लाकडं जळत नव्हती. मग सर्वांचे परिचय करून देण्यात आले. तेव्हा लक्षात आले यात विविध क्षेत्रातून लोकं एकत्र आली होती. त्यात बऱ्यापैकी इंजिनियर होते. आम्ही सकाळपासून ज्यांची राणीसरकार बोलून बोलून मस्करी करत होतो त्या पद्मावती मॅडम पोलिस निघाल्या, ते ही क्राइम ब्रांच. हे ऐकून आमची हवा टाईट झाली. पण इतक्या विनम्र आणि उत्साही होत्या की आम्हाला तसे कधी वाटूच दिले नाही.
हळूहळू सर्वांची छान ओळख झाली. गाणी गप्पा गोष्टी रंगल्या. रात्रीच जेवण झालं. छान चांदणं पडलं होतं. कुठे गाण्याच्या भेंड्या, स्पीकरवर गाणी लावून डान्स, तर कुठे हातातल्या टॉर्चने स्टार वॉर चालू होतं. संपूर्ण माळरान गजबजून उठलं होतं. आमच्या सारखेच कितीतरी लोक त्या शहराच्या कोंडी पासून एवढ्या दूर आले होते हा आनंद लुटण्यासाठी. रात्री उशिरापर्यंत कितीतरी वेळ ती आग आणि ती माणसे जागीच होती.
 
 
पहाटे लवकरच सर्वांना जाग आली. सकाळच्या विधीसाठी सर्वांची गडबड सुरू झाली. या बाबतीत मात्र तिथे फार गैरसोय होती. समोरच्या डोंगरावर जाऊन उघड्यावर बसूनच कार्यक्रम उरकायचे होते हे न पटण्यासारखे होते पण त्याला दुसरा काही पर्याय ही नव्हता तिथे. भविष्यात यात काही सुधारणा झाली तर निश्चितच खूप बरे होईल. अर्थात यात स्थानिक लोकांनी आणि प्रशासनाने यात पुढाकार घ्यायला हवा.
 
 
सर्व मंडळी तयार होऊन, चहा नाश्ता करून परतीच्या प्रवासाला निघाली. आणि इथे सुरू होतो या प्रवासातला सर्वात कठीण भाग. कारण परतीचा मार्ग हा बैलघाट आणि साधले घाट यातून होता. आणि हे प्रत्येकासाठी खूप मोठे चॅलेंज होतं. खोल दऱ्यामधला हा प्रवास चित्त थरारक होता. ते फोटो किंवा व्हिडिओ मध्ये बघून तुम्हाला कळेलच. तरीही एकमेकांना सांभाळत हात देत आम्ही हा टप्पा ही पार केला आणि ट्रेक पूर्ण झाला. खाली गावात आल्यावर जेवण झालं आणि घरी निघताना या ट्रेक बद्दलचा प्रत्येकाचा अनुभव घ्यायला ट्रेक लीडर सत्याने सुरुवात केली. आणि हा भाग या वेळी पूर्णपणे वेगळा झाला.
 
 
 
या ट्रेक बद्दलचा अनुभव व्यक्त करताना पद्मावती मॅडमच्या नवऱ्याला रडू कोसळले. पत्नीच्या प्रेमापोटी त्यांनी हा पहिला ट्रेक केला होता. संपूर्ण प्रवासात ती त्यांची हिम्मत बनून राहिली. ते नीट उतरतात ना, त्यांचे छान फोटो काढतात ना यावर ती लक्ष ठेऊन होती. या वयात ही दोघांचे एकमेकांबद्दल ते प्रेम बघून सर्वांचे डोळे भरून आले. वरद शिंदे या मुलाचे गेल्या चार वर्षांपासून चे स्वप्न होते हरिश्चंद्र गड सर करायचे ते आज पूर्ण झाले म्हणून तोही आनंदाने ढसाढसा रडत होता. कमलाकर चव्हाण सर हेदेखील पोलीस माणूस.
 
 
 
 
ट्रेक मधल्या त्या दोन लहान मुलींना बघून त्यांना आपल्या दोन मुलींची आठवण झाली. त्यात त्यांचे डोळे पाणावले. वाटेत अभिषेक दादा च्या बायकोने आणि बहिणीने त्यांना फोन करून दमदाटी केली होती, का तर पोचल्यावर या माणसाने फोन नाही केला म्हणून. यावरून सर्व त्याची थट्टा मस्करी करत होते. पण मला वाटतं तो इतरांपेक्षा जरा जास्त नशीबवान आहे कारण त्याला इतकं प्रेम करणारी माणसं भेटली आहे.
 
 
 
 
मी आज वरच्या कुठल्याच ट्रेकमध्ये हे सर्व पाहिलं नव्हतं. ट्रेक म्हणजे नुसती पायपीट नाही, ना नुसते निसर्गाचे फोटो काढणे, ना बाकीचे करतात म्हणून आपण करणे. ट्रेक म्हणजे आपण स्वतःला निसर्गाच्या स्वाधीन करणं. आपली शारीरिक क्षमता पडताळण. नवीन लोकांच्या सहवासात जाऊन त्यांना आपलंसं करणं. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या राजाचा वारसा आणि त्याच महत्त्व जपणे आणि ते संपूर्ण जगाला दाखवणे.
 
 
- सागर भाकरीये








news  1 1_1  H