अशा लघु-उद्योजकांपुढे हरणार ‘कोविड’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2020
Total Views |

MSME _1  H x W:

कोरोनाकाळात उद्योगधंद्यांना एकाएकी ग्रहण लागले आणि कित्येक उद्योगधंद्यांना टाळे लागले. पण, या महामारीच्या काळातही काही लघु उद्योजकांनी नवीन व्यावसायिक संकल्पनांचा अवलंब केला आणि कोरोनाचा पराभव केला. अशाच काही लघु उद्योजकांची ही यथोगाथा...
 
बहुसंख्य लघु वा मध्यम उद्योगांची सुरुवात ही उद्योजकांच्या उद्योगविषयक संकल्पनेतून होत असते. सुरुवातीला आशादायी; पण अस्पष्ट स्वरूपात असणार्‍या या संकल्पना त्यावर सातत्याने व प्रयत्नपूर्वक काम केल्यास त्यातूनच यशस्वी उद्योग साकारतात. या उद्योगातून छोट्या स्वरूपाचे पण मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतात, उत्पादन प्रक्रियेला चालना मिळते, आर्थिक उलाढाल वाढते, सेवाक्षेत्राचा विस्तार होतो व प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ‘मेक इन इंडिया’ संकल्पना साकारली जाते.
 
लघु उद्योग क्षेत्रात व्यवसाय संकल्पनेची रुजवात होऊन त्याला व्यावसायिक स्वरूप कसे साकारते, याचे उदाहरण आपल्याला ‘एसएसजी-स्टेप सेट गो’ या अ‍ॅप आधारित स्टार्टअपमध्ये मिळते. शिवजीत घाटगे, मिसाळ तुराखिया आणि अभय पै या मित्रत्रयींनी ‘शारीरिक निगा व आरोग्य’ या विषयावर आधारित संकल्पनेला उद्योजकतेची जोड दिली.
 
 
त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार देशांतर्गत सुमारे ४० कोटी नागरिकांना आपले शरीर आणि आरोग्याची काळजी घेऊन त्यासाठी काही तरी करावे, असे वाटत असते. मात्र, त्यापैकी फक्त चार-पाच कोटी जणच त्यासाठी प्रयत्न करतात. आरोग्य रक्षणासह ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या संकल्पनेला व्यावसायिक मार्गदर्शनाची जोड मिळावी व त्याचा फायदा संबंधितांना व्हावा, या दृष्टिकोनातून त्यासाठी ‘बजाज एव्हेंजर’, ‘पूमा’ व ‘डिकॅथलॉन’ या प्रस्थापित संकल्पनांचा लाभ आणि आधार घेत ‘सेट स्टार्ट गो’ ही व्यवसाय संकल्पना साकारली, हे विशेष.
 
 
दिल्लीच्या एका महिला लघु-उद्योजकाबद्दल सांगायचे म्हणजे, वाहन-दुरुस्तीसाठी आवश्यक अशा अवजारे उपकरणांची निर्मिती त्या करीत होत्या. प्रयत्नपूर्वक व दर्जेदारपणे काम केल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिळून त्यांचा व्यवसायही प्रस्थापित झाला. मात्र, या यशस्वी व्यवसायाला दृष्ट लागली ती ‘कोविड-१९’ची. कोरोना महामारीमुळे एकूणच वाहन उद्योग थंडावला. वाहनांची वर्दळ मंदावली व परिणामी, त्यांच्या व्यवसायावर मोठाच विपरीत परिणाम झाला. कर्मचार्‍यांचे पगार देण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे उरले नाहीत. अशा कठीण प्रसंगी त्यांनी वेळेत व निर्णायक निर्णय घेतला तो कोरोना मास्क बनवून विकण्याचा!
यासाठी महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी त्यांच्याकडे काम करणार्‍या कामगार-कारागिरांशी संवाद साधला. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले व प्राप्त परिस्थितीत पर्यायी व्यवसाय म्हणून मास्कनिर्मिती-विक्री करण्याची गरज प्रतिपादन केली. सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्याचा सकारात्मक परिणाम झाला. आज त्या दरमहा एक कोटी मास्कची निर्मिती-विक्री व निर्यातसुद्धा करतात. त्यांचे मास्क अल्पावधीतच आखाती देशांसह इंग्लंड-अमेरिकेपर्यंत निर्यात होत आहेत.
 
 
विद्यार्थ्यांमधूनही नवागत व यशस्वी लघु-उद्योजक कसे निर्माण होऊ शकतात, याचे उदाहरण आयआयटी-रोपडच्या शिवांशी वर्मा या विद्यार्थिनीचे देता येईल. इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या अभ्यासासह त्यांनी रोपड आणि चंदिगढ येथे ‘योबोशू’ या स्टार्टअपच्या कामातही सहभाग सुरू केला. ‘योबोशू’चा मुख्य उद्देश शरीरसौष्ठवासाठी उपयुक्त आणि आवश्यक उपकरणांचा उपयोग जन-सामान्यांमध्ये रुजविणे आणि वाढविणे हा होता.
 
यासाठी शिवांशीला उद्योगासाठी आवश्यक असे बीज-भांडवल म्हणून १५ लाख रुपये आयआयटी- रोपडतर्फे देण्यात आले व त्याचा मोठा उपयोग त्यांना आपल्या स्टार्टअपची निर्मिती, सुरुवात, स्थापना, विषयतज्ज्ञ मंडळींची जुळणी, व्यवसाय संपर्क व सुरुवात यासाठी झाला. या भांडवलाचा शिवांशी वर्माला विद्यार्थी असतानाच मोठा लाभ झाला व त्यातूनच एक यशस्वी युवा उद्योजक साकारली.
 
कोरोनाकाळात मास्कसह व्यक्तिगत सुरक्षा वेश (पीपीई कीट)ची गरजही प्रचंड प्रमाणात वाढू लागली. त्यानुसार अनेकांनी या व्यवसायाकडे लक्ष दिले व यशही संपादन केले. यापैकी विशेषतः ‘पीपीई’च्या निर्यातीलाही सतत व मोठी मागणी राहिली. जगातून आपल्याकडे अशी वाढती व आग्रही मागणी होत असतानाच, प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे, अशा कापडांचे शिवणकाम करण्यासाठी आवश्यक अशा दर्जेदार व भरवशाच्या सुयांचे उत्पादन प्रामुख्याने जर्मनीमध्ये होते व त्यासाठी आपल्याला जर्मनीतून सुया अद्यापही आयात कराव्या लागतात.
 
 
जागतिक स्तरावर उत्तम शिवण सुयांची निर्मिती कंपनी म्हणून जर्मनीतील ‘ग्रोझ बेकर्ट’ ही कंपनी प्रसिद्ध आहे. कंपनीची स्थापना १८५२ मध्ये करण्यात आली असून, आज जागतिक स्तरावर सुमारे ६० हजार प्रमुख आयातदारांना ‘ग्रोझ बेकर्ट’ कंपनी आपल्या सुयांची निर्यात करीत असते. ही निर्यात होणार्‍या देशांची संख्या सध्या १५० च्यावर आहे. ‘आत्मनिर्भरते’च्या उंबरठ्यावर असणार्‍या भारताला सुयांच्या निर्यातीचे फार मोठे काम करणार्‍या या छोटेखानी जर्मन कंपनीनेही मोठी शिकवण कोरोनाकाळात दिली. आज विशेषतः चिनी उत्पादन आणि उत्पादक या उभयतांबद्दल सर्वत्र दहशतयुक्त साशंकतेचे वातावरण असताना, जर्मन कंपनीतर्फे होणारी निर्यातही नवउद्योजकांसाठी मार्गदर्शक ठरू शकते.
 
यातूनच लघु-उद्योजकांसह स्टार्टअप कंपन्यांना मिळालेला महत्त्वपूर्ण धडा म्हणजे मुळात उद्योजकतेचे मोजमाप हे त्याच्या उद्योग-व्यवसाय संकल्पनेवर अवलंबून असते. यामध्ये उत्पादन रचना व धाटणीचे महत्त्व, उपयुक्तता व त्याची निर्यात पर्यायासह त्यांची उपयुक्तता यावर अवलंबून असते, हे या क्षेत्रात नव्याने पदार्पण करणार्‍यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

MSME _2  H x W: 
 
 
देशांतर्गत लघु-मध्यम उद्यागांसह स्टार्टअप उद्योगांच्या संदर्भातील व त्यांना व्यावसायिक संदर्भात प्रामुख्याने नमूद करण्याजोगी असते. याशिवाय त्याला कालबद्ध स्वरूपाची व त्याचबरोबर दीर्घकालीन दूरदृष्टीची जोड मिळणे व त्याला व्यवसाय प्रतिष्ठा (बॅ्रण्डिंग)ची साथ देणे निकडीचे असते. या बाबी सांभाळल्यास लघु-उद्योग वा स्टार्टअपमध्ये यशस्वी होणे सहज शक्य असते.
 
व्यवसाय संकल्पनांच्या संदर्भात असे आढळून येते की, देशात लघु-उद्योग स्टार्टअपच्या संदर्भात सुमारे १०० व्यवसाय संकल्पना पुढे येतात. यापैकी प्रत्येक संकल्पनेला व्यवसायाचे स्वरूप मिळतेच असे नाही. काही व्यवसाय कल्पना प्रत्यक्षात साकारतात. एका अनुमानानुसार प्रस्तावित व्यवसाय संकल्पनांपैकी १५ टक्के व्यवसाय कल्पनांना मूर्तरूप मिळते व अशा प्रकारे स्टार्टअपसह लघु-उद्योगआणि उद्योजकांची संख्या वाढत जाते. यशस्वी व परिणामकारक लघु-उद्योग व स्टार्टअप क्षेत्राला कोरोनादरम्यान आणि त्यानंतरच्या काळात पूर्वी कधी नव्हते एवढे महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
 
नव उद्योग संकल्पना व संशोधनांवर आधारित हे उद्योगक्षेत्र कोरोनाकाळात पण केवळ टिकूनच राहिले नाही, तर यशस्वीपणे व नव्या स्वरूप आणि संदर्भात प्रस्थापितही झाले आहे. तंत्रज्ञान, प्रक्रिया विकास, गरजेनुरूप विक्री व्यवस्था, कौशल्यप्रवणता, प्रयत्न व त्यांच्याच जोडीला व्यावसायिक मानसिकता या बाबी लघु व मध्यम उद्योगांसह स्टार्टअपच्या यशसाठी विशेषतः कोरोनानंतरच्या काळात पथदायी व दिशादर्शक ठरणार्‍या आहेत.
 
 
- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापन-मार्गदर्शक आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@