स्टील एक्सपर्ट ते ‘शेअर मार्केट एक्सपर्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2020   
Total Views |
333_1  H x W: 0
 
सध्याच्या या तंत्रयुगात तुम्ही एकाच क्षेत्रात पारंगत असून चालत नाही. तुम्हाला विविध क्षेत्रातील ज्ञान असणे आवश्यक आहे. क्रिकेटसारख्या खेळातसुद्धा ‘ऑलराऊंडर’ असणार्‍या खेळाडूचीच निवड केली जाते. मग आपण एका क्षेत्रात समाधानी का राहायचे? अजित वव्हाळ यांनी ते सिद्ध करुन दाखविले. ज्या क्षेत्रात त्यांनी रस दाखवला, त्यात ते पारंगत झाले. आपल्या क्षेत्राहून भिन्न क्षेत्रात स्वारस्य दाखविणारे उद्योजक विरळाच. म्हणूनच अजित वव्हाळ हे ‘अजित’ आहेत.
 
 
एखाद्या व्यक्तीने मनात आणले, तर ती आयुष्यात खूप काही करु शकते. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे सापडतील. ‘तो’ तरुणसुद्धा असाच. अनेक क्षेत्रात मुशाफिरी करु पाहणारा. उद्योजक म्हणून एकाच क्षेत्रात स्थिरावण्यापेक्षा आपल्या आवडत्या अशा विविध क्षेत्रांत त्याने आपलं नशीब आजमावलं. एका क्षेत्रात तर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्राप्त केला. असं करुनसुद्धा त्याचे पाय जमिनीवर आहेत, हे विशेष. सिव्हील इंजिनिअर, इंटिरिअर डिझाईनर, स्टील एक्सपर्ट, शेअर मार्केट एक्सपर्ट, ग्रॅफो मास्टर अशा एक ना अनेक भूमिका तो यशस्वीरित्या पार पाडत आहे. हा हरहुन्नरी असामी म्हणजे अजित वव्हाळ होय.
 
अजित यांचे वडील अशोक बाबुराव वव्हाळ हे आयकर खात्यात अधिकारीपदावर कार्यरत होते. आई विजया सुविद्य गृहिणी होत्या. मुळात हे वव्हाळ कुटुंब पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील काटेडे गावचे. अजित यांचे शालेय शिक्षण लोकसेवा संघ विद्यालय येथे झाले. दहावीमध्ये उत्तम गुण मिळविल्यानंतर १९९० साली वांद्रे येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयातून त्यांनी ‘सिव्हील’ विषयातून इंजिनिअरिंगची पदविका मिळवली. यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामध्ये त्यांना शिकाऊ उमेदवारी मिळाली. यानंतर रहेजा महाविद्यालयातून त्यांनी ‘इंटिरिअर डिझाईन’ विषयात पदविका प्राप्त केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुसरा क्रमांकदेखील अजित यांनी पटकावला.
 
 
अशाप्रकारे शिक्षण झाल्यानंतर अजित एके ठिकाणी नोकरीस लागले. एक कन्स्ट्रक्शन कंपनी होती. तिथे अजित यांची ड्रॉईंग्ज पाहून त्यांच्या बॉसलासुद्धा आश्चर्य वाटले. याचदरम्यान अजित यांनी स्वत:ची कंपनी सुरु केली. ‘कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट’चे काम ही कंपनी करायची. पुढे जाऊन ‘रिअल इस्टेट’ या विषयात त्यांनी अजून एक पदविका मिळवली. ‘रिअल इस्टेट’ क्षेत्रात ‘स्टील एक्सपर्ट’ म्हणून अजित वव्हाळ यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. २००७च्या सुमारास मित्र इंजिनिअर दत्ता आदाटे यांच्यासोबत ते ‘ग्रीन स्काय डेव्हलपर्स’मध्ये सहसंस्थापक म्हणून काम करु लागले. अनेक प्रकल्प त्यांनी या ठिकाणी केले.
 
 
‘वाचेल तोच वाचेल’ अशी मराठीत एक म्हण आहे. अजित वव्हाळ यांना ती तंतोतंत लागू पडते. एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल दोन हजारांच्यावर पुस्तकांचे वाचन त्यांनी केले आहे. या वाचनाचा फायदा त्यांना त्यांच्या व्यवसायात झाला. आयआयटीमधून पदवीधर असलेला त्यांचा एके काळचा बॉससुद्धा त्यांच्या वाचनामुळे आणि कामातील कौशल्यामुळे प्रभावित झाला होता. खरंतर अजित वव्हाळ हे बांधकाम क्षेत्राशी निगडित आहेत, पण त्यांचं शेअर मार्केटवरसुद्धा तितकंच प्रभुत्व आहे. एक ‘शेअर मार्केट एक्सपर्ट’ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. या सगळ्या कौशल्यांचा पाया हा वाचनच होता.
 
 
२००८ मध्ये त्यांनी ‘पथिक’ नावाचा व्यवसायविषयक एक कोर्स पूर्ण केला. या कोर्समुळे वव्हाळ यांचे अंतर्बाह्य आयुष्यच बदलून गेले. कमालीचा आत्मविश्वास वाढला. वाचनाचे प्रचंड वेड लहानपणापासून होतेच. ते वेड आता कुठेतरी दैनंदिन आयुष्याला उपयोगी पडू लागले. याचदरम्यान जागतिक मंदीचे वारे वाहू लागले होते. भारतालाही त्याचा फार मोठा फटका बसला होता. याच काळात वव्हाळांनी शेअर बाजाराचा बारकाईने अभ्यास केला. काही कोर्सदेखील त्या विषयाशी निगडित केले.
 
 
शेअर बाजार जर नीट समजून घेतला तर कोणतीही व्यक्ती श्रीमंत होऊ शकते, हे त्यांना उमगले. लहानपणापासून त्यांनी आजूबाजूस मध्यमवर्गीय जनताच पाहिली होती. मात्र, नवीत पिढीच्या आकांक्षा वेगळ्या आहेत हे वव्हांळांनी हेरले. या पिढीस जर शेअर बाजाराचे शास्त्रोक्त ज्ञान मिळाले, तर ही पिढी नक्कीच मोठ्या प्रमाणावर अर्थार्जन करेल, हा त्यांना विश्वास वाटला. या विश्वासातूनच त्यांनी ट्रेडिंग अ‍ॅकॅडमी सुरु केली. अनेक तरुणांना ते या माध्यमातून शेअर बाजाराचे धडे देत असतात.
 
 
‘ग्रॅफॉलॉजी’ अर्थात हस्ताक्षरशास्त्राचे ते अभ्यासकसुद्धा आहेत. ‘दि ग्रॅफॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट’ या संस्थेने ऑक्टोबर महिन्यात हस्ताक्षरशास्त्रासंदर्भात ‘ग्रॅफो मास्टर कॉम्पिटीशन-२०२०’ नावाची स्पर्धा घेतली होती. ही स्पर्धा जागतिक स्तरावर भरविण्यात आली होती. अनेक हस्ताक्षरतज्ज्ञांनी यात सहभाग घेतला होता. या सगळ्या स्पर्धकांमधून अजित वव्हाळ यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला होता.
मराठी मुलांनी उद्योग-व्यवसायात यावे यासाठी ते व्याख्यानेसुद्धा देतात. मार्गदर्शन करतात. उद्योजक मित्रांच्या ‘बीएसएस’ या समूहाचे ते अध्यक्ष आहेत. याच्या माध्यमातून किमान २० मुले तरी उद्योजक घडवायची, असा त्यांचा मानस आहे. विपश्यनाला वव्हाळ अनन्यसाधारण महत्त्व देतात. आपल्या मानसिक आरोग्यासाठी प्रत्येकाने विपश्यना करावी, असे ते आग्रहाने सांगतात. नेहमी हसतमुख चेहरा आणि शांत-संयमी स्वभाव विपश्यनेमुळे तयार झाला, असे ते म्हणतात.
 
 
सध्याच्या या तंत्रयुगात तुम्ही एकाच क्षेत्रात पारंगत असून चालत नाही. तुम्हाला विविध क्षेत्रातील ज्ञान असणे आवश्यक आहे. क्रिकेटसारख्या खेळातसुद्धा ‘ऑलराऊंडर’ असणार्‍या खेळाडूचीच निवड केली जाते. मग आपण एका क्षेत्रात समाधानी का राहायचे? अजित वव्हाळ यांनी ते सिद्ध करुन दाखविले. ज्या क्षेत्रात त्यांनी रस दाखवला, त्यात ते पारंगत झाले. आपल्या क्षेत्राहून भिन्न क्षेत्रात स्वारस्य दाखविणारे उद्योजक विरळाच. म्हणूनच अजित वव्हाळ हे ‘अजित’ आहेत.




@@AUTHORINFO_V1@@