जागतिक कलंक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2020   
Total Views |

Nigeria_1  H x
 
 


‘बोको हराम’ या दहशतवादी संघटनेने १६ डिसेंबर रोजी नायजेरियाच्या उत्तरी कतसिना प्रांताच्या सरकारी शाळेवर हल्ला केला. शाळेतील ३३० विद्यार्थ्यांचे त्यांनी अपहरणही केले. ‘बोको हराम’ संघटनेचे खरे नाव आहे ‘जमात-ए-हली-सुन्ना-लिदावती-वल जिहाद.’ या संघटनेच्या नावाचा अर्थ होतो की, मोहम्मद पैगंबरांची शिकवण आणि ‘जिहादा’चे जागरण करणे, त्यांना सर्वदूर पोहोचविणे. पण, अशी घृणास्पद हिंसा करून, शाळेतल्या अजाण बालकांचे अपहरण करून, या दहशतवादी संघटनेने जगाला कोणता संदेश आणि विचार दिला आहे? हा कोणता धर्मविचार आहे? हे तर मानवतेला काळिमा फासणारे राक्षसी कृत्य आहे.
 
 
 
या घटनेवरून आठवले की, २०१६ साली पाकिस्तानच्या पेशावरमध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’ समर्थक दहशतवादी संघटनेने अशाच प्रकारे शेकडो विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता. यापूर्वीही ‘बोको हराम’ने शेकडो तरुणींचे अपहरण केले होते. आता अपहरण केलेली ही बालके काय किंवा मागे अपहरण केलेल्या त्या तरुणी काय, यांनी ‘बोको हराम’चे वैयक्तिक किंवा संघटितरीत्याही कधीही कसलेच नुकसान केले नव्हते किंवा ‘बोको हराम’ला कसल्याही बाबतीत आव्हान दिले नव्हते. तरीही ‘बोको हराम’ने बालकांवर आणि तरुणींवर अत्याचार केला आहे. ‘बोको हराम’ची निर्मिती आणि इतिहास पाहिला तर वाटते की, त्यांच्या एकूणच अमानवातवादी आणि हिंस्र पार्श्वभूमीची निंदनीय परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे.
 
 
 
‘बोको’ म्हणजे ‘अवैध’, ‘हराम’ म्हणजे ‘निषिद्ध.’ इथे अवैध काय तर जे कुराणामध्ये लिहिले आहे त्याच्याव्यतिरिक्त केलेली कोणतीही कृती म्हणजे अवैध आणि म्हणूनच ती ‘हराम.’ त्यात मदरशाशिवायचे शिक्षण, मुस्लीम पारंपरिक पोषाख न घालता टी-शर्ट वगैरे घालणे, मतदान करणे वगैरे वगैरे गोष्टीही हरामच! नायजेरियाच्या मैडुगुरी शहरामध्ये ‘बोको हराम’चे मुख्यालय होते, आजही चोरून वगैरे आहेच. १९०३ साली नायजेरियामधून इंग्रजांनी आपले साम्राज्य आटोपते घेतले. तेव्हाच इथल्या मुस्लीमबहुल परिसरामध्ये इंग्रजी शिक्षणाला विरोध सुरू झाला. हा विरोध इतका टोकाचा होता की, स्थानिक लोक आपल्या मुलांना सरकारी शाळेत शिकायला पाठवत नसत. कारण, तिथे इंग्रजी आणि पाश्चात्त्य शिक्षणही शिकविले जायचे.
 
 
पुढे २००२ साली मुस्लीम धर्मगुरू मोहम्मद युसूफ याने ‘बोको हराम’ संघटना उभारली. त्याने पहिल्यांदा एक मशीद आणि शाळा काढली. तिथे नायजेरियाच्या गरीब मुस्लीम कुटुंबातील मुलांना निःशुल्क शिक्षण दिले जाऊ लागले. पहिल्यांदा या संघटनेने जाहीर केले की, पवित्र आणि शांतीच्या मार्गाने अल्लाचा धर्म शिकविणार. पण, हे वरवरचेच होते. नायजेरियाच्या अभ्यासकांच्या मते, या संघटनेला पूर्ण देश इस्लामिक देश बनवायचा होता. त्यात केवळ कुराणानुसारच सगळे अनुसरले जाईल. (अर्थातच कुराणामध्ये राजकीय निवडणूक नाही, त्यामुळे ती होणार नाहीच). असो. पुढे २००९ साली ‘बोको हराम’ने शहरातील पोलीस ठाण्यावर आणि प्रशासकीय इमारतींवर हल्ला केला. कारण ते पश्चिमी पद्धतीच्या धर्तीवर कार्य करत होते. पण, नायजेरियन प्रशासनाने ‘बोको हराम’च्या मुख्यालयावर कब्जा केला.
 
शेकडो अतिरेक्यांना ठार मारले आणि त्यामुळे हजारो अतिरेकी शहर सोडून पळून गेले. यामध्ये शेकडो जणांची धरपकड केली गेली आणि युसूफही मारला गेला. त्याचा मृतदेह ‘दूरदर्शन’वर दाखविला गेला आणि शहरात संदेश दिला गेला की, ‘बोको हराम’ संघटना संपली आहे. देश निश्चिंत आणि सुरक्षित आहे. मात्र, २०१० साली शहरातील ज्या तुरुंगात ‘बोको हराम’चे शेकडो अतिरेकी समर्थक कैदी होते, त्या तुरुंगावर हल्ला झाला.



‘बोको हराम’च्या पुढे सैन्यबराकीवर हमलाही या संघटनेने केला, तर २०११ साली नायजेरियाची राजधानी आबुजा येथे नाताळला चर्चमध्ये बॉम्बस्फोटही केला. कारण एकच की, या अतिरेकी संघटनेच्या मते ते ज्या धर्माला मानतात, त्याच धर्माचे आणि रीतीरिवाजांचे पालन कट्टरतेने व्हावे, जे करणार नाहीत त्यांना जगण्याचा अधिकार नाही. तसे पाहिले तर नायजेरिया मुस्लीम देश आहे. तिथे सत्ताधारी किंवा समाजयंत्रणाही मुस्लीमच आहे. मग ‘बोको हराम’ काय किंवा इतर अशाच संघटनांना कोणते प्रशासन अभिप्रेत आहे? मानवतेची हत्या करणे, हे एकमेव उद्दिष्ट असलेल्या या संघटना खरे म्हणजे जागतिक कलंकच आहेत.


@@AUTHORINFO_V1@@