संसाररूप नदीला पार करू या...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2020
Total Views |

Veda _1  H x W:



अश्वन्वती रीयते सँरभध्वमुत्तिष्ठत प्र तरता सखाय:।
अत्रा जहीमोऽशिवा येऽसन् शिवान्वयमुत्तरेमाभि वाजान्॥
(ऋ.१०.५३.८, यजु.३५.१०, अथर्व.१२.२.२६)
अन्वयार्थ
(अश्वन्वती) दगड-धोंड्यांनी भरलेली संसाररुपी नदी (रीयते) मोठ्या वेगाने वाहत आहे. मानवांनो! (सँरभध्वम्) तुम्ही तितक्याच गतीने व एकीच्या बळाने कार्यतत्पर व्हा. कार्यारंभ करा. (उत्तिष्ठत) उठून उभे राहा. (सखाय:) मित्र बनून या नदीला पार करा. (ये अशिवा असन्) जे वाईट, अनिष्ट आहे, (अत्र जहीम:) ते सर्व इथेच टाकून द्या. (वयम् शिवान् वाजान्) आम्ही जे काही चांगले व पवित्र असेल, असे कल्याणकारी सत्कर्म, शुभ विचार व पवित्र बळ (अभि उत् तरेम) या सर्वांना समोर व सोबत ठेऊनच या नदीला तरुन जाऊया!
 
 
विवेचन
मागील मंत्रात आम्ही कसे जगावे, या संदर्भात प्रकाश टाकला होता. अतिशय उत्साहपूर्वक आयुष्य कंठत आम्ही शतायुष्याच्या चांदण्यात विचरावे आणि परमेश्वराकडून वरदान रूपाने मिळालेली ही मानव जीवनरूपी यात्रा यशस्वी करावी, असा दिव्य बोधामृत त्यातून मिळाला. पण, ज्याच्या आधारे जीवन जगायचे आहे, ते जगतरुपी साधनदेखील तितकेच मोलाचे आहे. यासाठी त्या जगाची म्हणजेच संसाराची स्थिती व स्वरूप कसे आहे? आणि त्यात कशाप्रकारे विचरण करावे? हेदेखील जाणून घेणे अगत्याचे ठरते. म्हणूनच सदरील मंत्रात संसाररूपी नदीला तरून जाण्याचा संदेश मिळतो.
 
जग आणि संसार हे दोन्ही शब्द गतिशीलतेचे द्योतक आहेत. ‘गच्छति इति जगत्।’ म्हणजे जे नेहमी पुढे-पुढे जात राहते, ते जग होय, तर ‘संसरति इति संसार:।’ म्हणजेच जो नियमपूर्वक सतत पुढेच सरकत असतो, तो संसार होय. या सृष्टीत स्थिर असे काहीच नाही. सर्वच अस्थिर स्वरूपाचे आहे. सूर्य-चंद्र, नक्षत्र, ग्रह, तारे किंवा पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश यांमध्ये आपल्याला अनेक स्थित्यंतरे दृष्टीस पडतात. अशा या गतिमान निसर्गातील सर्व स्थूल व सूक्ष्म तत्त्वांमध्ये परिवर्तन होताना आपण अनुभवतो. यालाच जड प्रकृती तत्त्व (छर्रीीींश) असे म्हणतात. जी प्रकर्षाने म्हणजेच तीव्रतेने कृती करताना दृष्टीस पडते, ती प्रकृति (प्र+कृति) होय. फक्त आत्मा व परमात्मा ही दोनच तत्त्वे स्थिर, शाश्वत, चेतन व ज्ञानयुक्त आहेत. असो!
 
वेदांमध्ये या नश्वर जगासाठी सागर, नौका, वृक्षे, घरटे अशा विविध नावांनी संबोधित केले आहे. सदरील मंत्रात मात्र जगाला नदीची उपमा दिली आहे. खरोखरच जगरूपी नदी ही अतिशय तीव्र वेगाने वाहत आहे. ही नदी साधीसुधी नव्हे, तर यात मोठमोठाले दगड-धोंडे, शिळा, खडक वगैरे आहेत. तिला पोहून जाणे व पार करणे फारच अवघड आहे. ‘अश्वन्वती’ म्हणजेच दगड-गोट्यांनी युक्त सरिता! ती सदैव ‘रीयते’ म्हणजेच तीव्र गतीने वाहत आहे. नद्यांची उगमस्थाने वेगवेगळ्या स्वरूपाची असतात. त्या पर्वत व डोंगरावरून वाहणार्‍या असतात. पाण्यासोबतच झाडे-झुडपे, दगड-धोंडे, माती-वाळू, रेती आदी गोष्टी वाहून नेतात.
 
मंत्रोक्त नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात दगडच दगड आहेत. इथे रूपक अलंकाराद्वारे हे विशद केले आहे की, या संसाररूपी नदीतील दगड-गोटे म्हणजेच मानवी दुष्प्रवृत्ती, दुर्गुण आणि नानाविध दोष! त्याचबरोबर समाजात पसरणारे शारीरिक व मानसिक आजार किंवा अज्ञानरूपी अंध:कारातून उदयास येणार्‍या समाजविघातक अशा अंधश्रद्धा, रुढी-परंपरा इत्यादी दोष! या अडथळ्यांमुळे माणसाला जगता येत नाही. त्यासोबतच भ्रष्टाचार, दुराचार, अनैतिकता, दहशतवाद, जाती-धर्मांचा संघर्ष असे कितीतरी अडथळे या समाज व्यवस्थेत (विश्वरूप नदीत) आढळून येतात. त्यामुळे ज्ञानी काय किंवा अज्ञानी काय, सर्वांनाच पोहता येत नाही. पोहता येत असूनसुद्धा सत्प्रवृत्तींच्या लोकांना ही संसाररूपी अडथळ्यांची नदी पार करता येत नाही.
 
 
कारण, नानाविध संकटे व विघ्नांचे दगड आणि या नदीचा तीव्र वेग हे त्यांना पैलतीरावर पोहोचू देत नाहीत. म्हणूनच वेदमंत्र म्हणतो- ‘संरभध्वम्।’ ही नदी पार करण्यासाठी आम्ही सर्वांनी एकजुटीने व तितक्याच वेगाने पोहण्याकरिता तत्पर व्हावे. नदीतील अडथळे जितके कठीण आणि शक्तिशाली असतील, तितकेच आमचे तरुन जाण्याचे प्रयत्नदेखील वेगवान असावेत, तरच आपण संकटांतून वाचू शकतो. ‘योगदर्शन’मध्ये चित्तवृत्तीचा विरोध करण्यासाठीचे अभ्यास व वैराग्य हे दोन उपाय सांगून पुढील सूत्रात म्हटले आहे, ‘तीव्रसंवेगानामासन्न:।’ जे वेगवान बनून प्रयत्न करतील, त्यांच्यासाठीच नानाविध दोष व वृत्तींना अडवणे शक्य होईल.
 
आपला प्रयत्न ज्ञान व विवेकपूर्ण असावयास हवा. सर्वांनी एकजुटीने ज्ञानी बनून ही नदी पार करावयास हवी. पुढे म्हटले आहे, ‘उत्तिष्ठत।’ उठून उभे राहा. म्हणजेच जागे व्हा! आळस, प्रमाद तसेच काम, क्रोध, लोभ, मोह, इर्ष्या, अहंकार या षड्रिपूंना दूर सारत सर्वजण एकीने आजूबाजूचे नानाविध दुर्गुण व दुर्व्यसन यांचा प्रतिकार करण्यास सज्ज व्हा. कठोपनिषेदात हाच भाव विशद करताना म्हटले आहे, ‘उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत।’
 
खाच-खळग्यांची ही नदी पार करणे एकट्याला शक्य नाही, यासाठी समाज व देशातील नागरिकांनी संगठित व्हावयास हवे. आपल्यातील नाना प्रकारचे भेदभाव दूर सारून एका विचाराने व एकाच ध्येयाने प्रेरित होत या व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय, वैश्विक पातळीवरील समस्यारूप दोषांना दूर करीत ही नदी पार करावयास हवी. यासाठी म्हटले आहे-‘प्र तरता सखाय:।’ आम्ही सर्वजण एक-दुसर्‍यांचे मित्र होऊन ‘एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ हे ध्येय वचन हृदयी बाळगत ही वेगवान नदी पार करूया. मित्र हा समान विचारांचा असतो.
 
विरूद्ध व विपरीत विचारांचे लोक एक-दुसर्‍यांचे मित्र कदापि बनूशकत नाहीत. याकरिता मंत्रात ‘सखा’ होण्याचा संकेत मिळतो. हाच दृष्टिकोन योगेश्वर श्रीकृष्णांनी गीतेत व्यक्त केला आहे, ‘परस्परं भावयन्त: श्रेय: परमवाप्स्यथ।’ एक दुसर्‍याला सहकार्य करीत मैत्रीपूर्ण भावनेने परम कल्याणाला प्राप्त व्हा! कारण, एक मित्र दुसर्‍या मित्राला कधीही वाईटाकडे जाऊ देत नाही. ऋग्वेद म्हणतो, ‘सखा सखायमतरद् विषूच:।’ खरा मित्र आपल्या घनिष्ठ अशा जिवलग मित्रास अविद्या, अज्ञान, दु:ख, दारिद्रय, अविचार आदी विषमतेपासून वाचवितो. म्हणूनच सर्वांनी सज्जनांचे मित्रमंडळ स्थापन करून एका दिलाने व एकाच विचाराने प्रेरित होत राष्ट्रीय व सामाजिक कार्यात सहभागी झाले पाहिजे.
 
सार्‍या जगात आज अविचारांची नदी वाहत आहे. यात दहशतवाद, हिंसाचार, शत्रुत्व, गरिबी, अनाचार यांसारखे अडथळे आहेत. सध्या तर कोरोनासारख्या भयावह रोगाने मानवमात्राचे जगणे असाहाय्य करून सोडले आहे. अशा संकटाच्या प्रसंगी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून या संकटाला संपुष्टात आणावयास हवे. मंत्राच्या उत्तरार्धात म्हटले आहे, ‘अत्रा जहिमोऽ अशिवा: येऽ असन्।’ जे काही ‘अशिव’ म्हणजेच वाईट, दु:खदायी, अनिष्ट व अमंगल आहे, अशा गोष्टी इथेच सोडून द्या. कारण, यामुळे मानवाला ही संसाररूपी नदी पार करता येत नाही. अनिष्ट बाबी सोबत घेऊन कधीच ही नदी पार करता येणार नाही.
 
यासाठी गरज आहे कल्याणकारी सद्विचारांची! म्हणूनच शेवटी म्हटले आहे - ‘वयं शिवान् वाजान् अभि उत्तरेम।’ आम्ही सर्वांनी उत्तमोत्तम, मंगलकारी, शिवास्पद, विश्वकल्याणकारी अशा सत्कर्मांना व शक्तींना समोर ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करू! हाच भाव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी अभिव्यक्त करताना म्हटले आहे- ‘जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो...।’ मंत्रातील आशय जर प्रत्येक मानवाने आचरणात आणला, तर निश्चितच ही संसाररुपी नदी आम्हासाठी मोक्षरूप पैलतीरावर घेऊन जाण्यास अतिशय उपयुक्त ठरेल.
 
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
@@AUTHORINFO_V1@@