मासानां मार्गशीर्षोऽहम्।

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2020
Total Views |

margshirsh _1  
 
 
 
 
मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रताचा प्रारंभ होतो. दर गुरुवारी अनेक सुवासिनी स्त्रिया मनोभावे हे व्रत करतात. महालक्ष्मीची पूजा करुन उपवास करतात. सवाष्ण स्त्रियांना हळदी-कुंकू लावून वाण दिले जाते. मार्गशीर्षातील गुरुवार म्हणून हे व्रत सुविख्यात आहे.
 
 
 
बृहत्साम तथा साम्नांगायत्रीछन्दसामहम्।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनांकुसुमाकर:॥
 
 
 
श्रीमदभगवद्गीतेतील ‘विभूतियोग’ नामक दहाव्या अध्यायातील या श्लोकात योगीश्वर भगवान श्रीकृष्ण स्वतःला ‘मी मासांमधील मार्गशीर्ष आहे’ असे म्हणतात. यावरून मार्गशीर्ष मासाची महती आपल्याला लक्षात येते. भगवंत म्हणतात, “गायल्या जाणार्‍या श्रुतींमधील सामवेदातील ‘बृहत्साम’नामक प्रकरण मी आहे, छंदांमधील ‘गायत्री’, ऋतूंमधील ‘वसंत’ आणि महिन्यांमध्ये मी ‘मार्गशीर्ष’ आहे.”
 
 
दीपावलीनंतर येणार्‍या मार्गशीर्ष महिन्यात अनेक प्रकारची व्रतवैकल्ये येतात. मार्गशीर्ष महिन्यातच काश्यप ऋषींनी काश्मीर प्रदेशाची रचना केली, असे मानले जाते. मार्गशीर्षाला ‘अगहन’ किंवा ‘अग्रहायण’ असेही एक नाव आहे. ‘अग्रहायण’ याचा शाब्दिक अर्थ वर्षाचा आरंभ होतो. याचाच अर्थ कोणत्यातरी क्षेत्रात नववर्षाचा प्रारंभ मार्गशीर्षापासून होत असावा. ‘अग्रहायण’ शब्द ’आग्रहायणी’ नक्षत्राशी संबंधित आहे, जे ‘मृगशीर्ष’ किंवा ‘मृगशिरा’ नक्षत्राचे दुसरे नाव आहे. या महिन्यात सूर्यकिरणे तिरपी पडतात, ज्यामुळे थंडी पडायला प्रारंभ होतो.
 
 
वातावरणात प्रसन्नता आणि आल्हाद असल्याने आयुर्वेदिक दृष्टीने याला ‘स्वास्थवर्धक मास’ म्हटले जाते. मार्गशीर्षात शेतकरी बांधव आपली पिके कापून श्रीहरीच्या चरणी अर्पण करतात. त्यावेळी भगवंत म्हणतात, “हे पुत्र, मी तर देवशयनी एकादशीला शयनी गेल्यावर चार महिन्यांनी आता देवोत्थान केले आहे. हे सारे तुझ्याच मेहनतीचे फळ आहे.” मार्गशीर्ष महिन्यातच योगेश्वर श्रीकृष्णाने विश्वातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ श्रीमदभगवद्गीता समस्त मानवजातीला सप्रेम भेट दिला. मार्गशीर्ष शुक्ल-मोक्षदा एकादशीच्या पवित्र दिनी भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या दिव्यवाणीतून आपला प्रिय सखा अर्जुनाच्या माध्यामातून समस्त विश्वाला कुरुक्षेत्रावर गीतासंदेश दिला. ज्ञान, भक्ती आणि कर्म हेच जीवनाचे सोपान आहेत, हे भगवंताने याच मार्गशीर्षात सांगितले.
 
 
 
गोपिका आपल्या डोळ्यांनी श्रीकृष्णाचे दर्शन, कानांनी कृष्णलीलेचे स्मरण, मुखांनी कृष्णचरिताचे गायन आणि मनाने भगवंताचे सतत स्मरण करीत असत. त्यामुळेच गोपिकांचे शरीर भगवंताप्रमाणे दिव्य झाले. श्रीकृष्ण योगेश्वरेश्वर, पूर्ण पुरुषोत्तम आहे आणि गोपी शुद्ध जीव आहेत. श्रीमद्भागवतात दशम स्कंधात वर्णन केल्याप्रमाणे श्रीकृष्णाला प्राप्त करण्यासाठी गोपिकांनी याच मार्गशीर्षात ‘कात्यायनी व्रत’ केले होते.
 
 
 
हेमन्ते प्रथमे मासि नन्दब्रजकुमारिका:।
चेरुर्हविष्यं भुज्जाना: कात्यायन्यर्चनव्रतम्॥
 
 
 
मार्गशीर्षात व्रजबाला एकत्र येऊन प्राणप्रिय श्रीकृष्णाला प्राप्त करण्यासाठी पंच पंच उष:काली श्रीकृष्णाचे गुणरूपलीला वर्णन करीत यमुनातटी एकत्र येतात. यमुनेच्या तिरी स्नान करून तेथील वालुका घेऊन त्या देवीची मूर्ती तयार करीत असे. त्यानंतर सुगंधी चंदन, कस्तुरी, अक्षदा, कुंकू, पत्र, पुष्प, फळे, धूप, दीप, नैवैद्य अर्पण करून ‘कात्यायनी पूजन’ करीत असत. केवळ हविषान्न भक्षण करून हे व्रत गोपिकांनी संपूर्ण मार्गशीर्षात केले होते. कात्यायनी देवी श्रीकृष्ण मन्त्राधिष्ठात्री आहे. गोपिका हे व्रत करीत असताना खालील मंत्राचा जप करीत असत.
 
 
 

कात्यायनि महामाये महायोगिन्यधीश्वरि।
नन्दगोपसुतं देवि पतिं मे कुरु ते नम:॥
 
 
 
अर्थात, हे कात्यायनी, हे महामाये, हे महायोगिनी, हे अधीश्वरि, आपण नंदनंदन श्रीकृष्णाला आमचा पतिपरमेश्वर करावे, यासाठी आपल्या चरणारविंदी प्रणिपात असो. विदर्भातील मधुराद्वैताचार्य प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांनी इसवी सन 1905 मधील मार्गशीर्षात वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी अमरावती जिल्ह्यातील शुक्लेश्वर वाठोडा येथे श्रीमद्भागवतातील दशम स्कंधात सांगितल्याप्रमाणे ‘कात्यायनी व्रता’ची दीक्षा घेतली होती.
 
 
 
 
मार्गशीर्ष महिना हा देवतांचा ब्रह्ममुहूर्त आहे. आपल्यासाठी जेव्हा सूर्य उत्तरायणात असतो, तेव्हा देवांसाठी दिवस असतो आणि सूर्य दक्षिणायणात असताना देवतांसाठी रात्र असते. गोकुळांतील गोप-गोपिकांना या मासात श्रीकृष्ण सहवास जास्त लाभत असल्याने श्रीकृष्णानुभव देणारा हा मास सर्वश्रेष्ठ मानला गेला आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात त्याप्रमाणे ज्ञान, भक्ती आणि कर्म हेच जीवनाचे सार आहे.
 
 
 
या तीनच मार्गांवर साधक स्वतःच्या बळावर जीवनाची धारणा जोपासू शकतो. मात्र, या तिघांहून सर्वश्रेष्ठ आणि सुरक्षित असा शीर्ष (श्रेष्ठ) मार्ग कोणता असेल, तर तो साक्षात् भगवंतच आहे. म्हणजेच भगवंत हे शीर्ष (श्रेष्ठ-सर्वोच्च) मार्ग-मार्गशीर्ष आहेत. म्हणूच या मासातील व्रताला ‘मार्गशीर्ष व्रत’ म्हणतात. मार्गशीर्ष महिन्यात दत्तजयंती येत असल्याने सर्व दत्तभक्तांमध्ये या महिन्याचे विशेष महत्त्व आहे. गीतेमध्ये तर स्वत: श्रीकृष्णाने म्हटले आहे, ‘मासानां मार्गशीर्षोऽहम्।’ याचाच अर्थ असा की, मार्गशीर्ष महिना माझेच (भगवान श्रीकृष्णाचे) स्वरूप आहे.
 
 
 
स्कंद पुराणातदेखील या महिन्याचा महिमा गायला आहे. भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल महिना आहे. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी या सप्ताहात गुरुचरित्राचे पारायण केल्यास त्यास विशेष महत्त्व आहे. या सप्ताहाला ‘श्रीगुरुचरित्र सप्ताह’ असेही म्हणतात. महाराष्ट्रात या सांप्रदायिक पारायण ग्रंथाचे विशेष पारायण घरोघरी शतकानुशतके होत असून त्याची प्रचितीदेखील अनेकांना आली आहे.
 
 
 
दत्तनाम महायोगी विष्णोरंशो महीतले।
द्वितीयोऽनघो नाम लोकेऽस्मिन् परिश्रुत:॥
तस्य भार्याऽनघा नाम बभूव सहचारिणी।
अष्टपुत्राऽतीव वत्सा सवैर्ब्राह्म गुणैर्युता॥
अनघो विष्णुरूपेण लक्ष्मीश्चैषाऽनघा स्मृता॥
 
 
 
 
श्रीदत्तगुरूंचे ‘अवधूत’ हे स्वरूप तर आहेच, पण त्या व्यतिरिक्तही त्यांची अनेक स्वरूपतत्त्वे आहेत. अनेकानेक स्वरूपात साकारणार्‍या या लीलामूर्तीला एक गृहस्थ स्वरूपही आहे. याच गृहस्थ स्वरूपाला ‘अनघस्वामी’ असे नाव आहे आणि अर्थातच त्यांच्या अर्धांगीला ‘अनघालक्ष्मी’ असे म्हणतात. व्यासोक्त दत्तपुराणात व भविष्योत्तर पुराणातही या अनघ व अनघालक्ष्मी व्रताचा संदर्भ आहे.
 
 
 
 
पद्मासनस्थां पदयुग्मनुपुरां पद्मं
दधानाममयं च पाण्यो:।
योगार्थे संमीलिता निश्चलाक्षींदत्तानुरक्ताम्
अनघां प्रपद्ये॥
 
 
 
मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रताचा प्रारंभ होतो. दर गुरुवारी अनेक सुवासिनी स्त्रिया मनोभावे हे व्रत करतात. महालक्ष्मीची पूजा करुन उपवास करतात. सवाष्ण स्त्रियांना हळदी-कुंकू लावून वाण दिले जाते. मार्गशीर्षातील गुरुवार म्हणून हे व्रत सुविख्यात आहे. पैठणच्या शांतिब्रह्म एकनाथ महाराजांची श्रीदत्तप्रासादिक शिष्य परंपरा जी विदर्भात श्रीदेवनाथ मठ-सुर्जी अंजनगाव येथे स्थिर झाली, त्या परंपरेचे आचार्य परब्रह्म महारुद्र जगद्गुरू श्रीदेवनाथ महाराज यांचा जन्मोत्सवदेखील मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशीस येतो. मार्गशीर्ष मासात अखिल हिंदूंच्या इतिहासातील सुवर्णदिन म्हणजे शिवप्रतापदिन येतो. तिथी मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी यादिवशी हिंदूभाग्यभुषण छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला तो हा दिवस.
 
 
 
 
बर्‍याच समकालीन तसेच शिवउत्तरकालीन साधनांमधून या घटनेचा उल्लेख येतो. सर्वात प्रथम समकालीन आणि अत्यंत विश्वासू साधनांमधील एक साधन समजल्या जाणार्‍या ’शिवभारत’ या ग्रंथात आलेला अध्याय २१ मधील श्लोक ८३ आणि ८४ पाहा...



एकाशीत्यधिकैः पंच दशभिः संमितैः शतैः।
शालिवाहे शके संवत्सरे चैव विकारिणि॥
मासि मार्गे सिते पक्षे सप्तम्यां गुरुवासरे।
मध्याह्ने दैवतद्वेषी शिवेनाफजलो हतः॥



अर्थात, शके १५८१  विकारीनाम संवत्सरात, मार्गशीर्ष महिन्यातील, शुक्लपक्षातील सप्तमी तिथीस, गुरुवारी, मध्याह्नी देवद्वेष्टा अफजलखान छत्रपती शिवाजी मह्राराजांनी ठार मारला. अशा या मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व अपरंपार आहे. साक्षात् योगेश्वर श्रीकृष्णांनी ज्याला आपले स्वरूप म्हणून घोषित केले आहे, अशा मासोत्तम असलेल्या मार्गशीर्षाला मनोभावे वंदन करूया...
 


- डॉ. भालचंद्र हरदास




@@AUTHORINFO_V1@@