मनस्वी मनाचा ‘बाळ’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2020
Total Views |
Bal _1  H x W:
 
 
रेल्वेच्या चाकरीतून मुक्त झाल्यानंतरही लेखणीच्या माध्यमातून कामगारांसाठी संघर्ष करणार्‍या कवी मनाच्या बाळ कांदळकर या ठाणेकर चाकरमान्याचा हा छोटेखानी आलेख...
 
कवी बाळ कांदळकर म्हणजे जिंदादिल माणूस, सदैव हसत असणारा, जाता जाता अनेकांना टपल्या मारणारा, दिलखुलास; पण तेवढाच हा माणूस संवेदनशील आहे. चिरवेदनेचा दाह आपल्या काळजात घेऊन जगणारा आहे. तसेच हा माणूस क्रांतीची धगधगती मशाल आपल्या उरात सांभाळून आहे. त्यांच्यामध्ये मालवणमधील अस्सल कोकणी माणूस जसा आहे, तसाच त्यांच्यामध्ये संघर्ष करणारा कामगार नेताही आहे.
 
 
सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा एक दयावान माणूसही त्यांच्यात आहे. एक दिलदार मित्र म्हणून ते मित्र परिवारामध्ये परिचित आहेत. पण, त्यांचा पहिला कवितासंग्रह लवकर प्रकाशित होणार आहे. ‘गाझ आंतरमना’ची या नावाने येणार्‍या या कवितासंग्रहाला ख्यातनाम कवी डॉ. महेश केळुस्कर यांची प्रस्तावना आहे, तर कविवर्य अशोक बागवे यांची पाठराखण त्याला लाभली आहे.
 
 
हा कवितासंग्रह जेव्हा वाचकांच्या हाती येईल, तेव्हा बाळ कांदळकर यांच्या आतला अस्वस्थ, त्रयस्थ आणि भिडस्थ माणूस सगळ्यांसमोर येणार आहे. कधी प्रेमाने अस्वस्थ झालेला, तर कधी विरहाने दुःखी झालेला, तर क्षणात क्रांतीची तुतारी फुंकणारा बाळ कांदळकर या कवितासंग्रहात भेटेलच. शिवाय गेल्या दोन दशकांतील घडामोडींचा धांदोळा घेऊन त्यावर संवेदनशील माणूस म्हणून बोट ठेवणारा कवी, तर कधी फटकारे मारणारा भाष्यकार; या काव्यसंग्रहात आपल्याला भेटणार आहे.
 
 
बाळ कांदळकर यांचे उभे आयुष्य मोठमोठ्या साहित्यिक कवींच्या सान्निध्यात गेले. आज आघाडीचे जे कवी आहेत त्यामध्ये अशेाक बागवे, अशोक नायगावकर, डॉ. महेश केळुस्कर, अरुण म्हात्रे, मंगेश विश्वासराव यांच्या बरोबरीनेच कांदळकर यांची कविता आपली वाट चालत राहिली. ‘महाराष्ट्रभूषण पद्मश्री’ मधु मंगेश कर्णिक हे बाळ कांदळकर यांना दैवतासमान आहेत. तर चळवळीशी नाळ जोडलेले भगवान निळे यांच्यासारखे कवी त्यांना बंधुसमान आहेत.
 
 
 
महाराष्ट्राचा मोठा कवी लोकनाथ यशवंत असो, वा नाटकार प्रदीप ढवळ, अशी असंख्य माणसे बाळ कांदळकर यांच्या रोजच्या उठबसमधली, मैत्रीने जोडलेली. पण, सगळ्या वटवृक्षांखाली बाळ कांदळकर यांची कविता आपली वेल, आपला पसारा पसरत गेली. ती या सगळ्यांएवढी मोठी आहे की नाही, ती तेवढी तोलामोलाची आहे की नाही, हे त्यांचा हा कवितासंग्रह जेव्हा लोकांच्या हाती येईल, तेव्हा वाचक आणि समीक्षक ठरवतीलच. मात्र, ही कविता समकालीन नक्की आहे.
 
 
बाळ कांदळकर यांची रेल्वेची नोकरी आणि त्यानिमित्ताने त्यांनी कामगार युनियनमध्ये संपूर्ण आयुष्यभर काम केले. त्यामुळे त्यांच्या आत कामगारांच्या संघर्षाची तलवार सदैव तळपत असते. ती तलवार त्यांच्या रोजच्या बोलण्यात जशी दिसते, तशीच ही धार त्यांच्या कवितेतही वाचकांना पाहायला मिळणार आहे. गेली १२ वर्षे ते ‘नितांत’ नावाचा दिवाळी अंक काढतात. एक वाचक चळवळ म्हणून ते अंक काढतात व अनेक नव्या लेखकांना लिहिते करतात.
कविता जगता आली पाहिजे आणि कविता समोरच्याच्या चेहर्‍यावर दिसली पाहिजे. बाळ कांदळकर हा असा कवी आहे की, ज्याने कागदावर किती ताकदीची कविता लिहिली, तसे या माणसाने आयुष्यातील अनेक प्रसंगांतून कविता जगली आहे. कधी अंधांना पदरमोड करून मदत केली, तर कधी कुणाला अनाथाला मदतीचा हात दिला, तर गुणवत्ता असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मदतही ते सदैव करतात. बाळ कांदळकर यांनी ‘नितांत प्रकाशन’ काढून, या प्रकाशन व्यवसायात उडी घेतली. पण, तिथेही त्यांना व्यवसाय जमला नाही. त्यांचे मूळ नाव ‘तुकाराम’ असल्यामुळे संत तुकारामाप्रमाणे याही तुकारामाला हा व्यवसाय अजून तरी जमलेला नाही. पण, नाव मात्र झाले.
 
आज ‘नितांत प्रकाशन’कडे चांगले लेखक आहेत. अनेकांची पुस्तके तयार करण्याचे काम सुरू आहे. ‘कोकण मराठी साहित्य परिषद’च्या कार्यकारिणीवर अनेक वर्षे ते कार्यरत आहेत. कवी मनाचा हा माणूस रेल्वेच्या नोकरीतून निवृत्त होऊन सध्या पूर्ण वेळ साहित्यसेवेत रममाण आहे. आज मराठी भाषेबाबत आभाळ फाटले आहे, असे गळे काढणारे अनेक जण आहेत. त्यामध्ये कवी, लेखक, प्रकाशक सगळेच आहेत. पण, स्वतःच्या खिशातून खर्च करून मराठी भाषेची सेवा करणारे किती आहेत? जे आहेत, त्यामध्ये बाळ कांदळकर यांचे नाव अग्रणी घ्यावे लागेल. पदरमोड करून अनेक साहित्य उपक्रम  राबविणारा...लिहिणारा...धडपडणारा...काही तरी करणारा...नुसते ‘आभाळ फाटले आहे’ असे ओरडत बसण्यापेक्षा स्वतः सुई उचलून दोन टाके मारणारा हा साहित्यप्रेमी, भाषाप्रेमी माणूस आहे. त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!
- दीपक शेलार
@@AUTHORINFO_V1@@