आरं आरं थोडं थांबा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2020
Total Views |
Saurabh_1  H x
 
२०२० सालच्या म्हणजेच ‘इंडियन प्रीमिअर लीग’ स्पर्धेच्या (आयपीएल) १३व्या हंगामाचे आयोजन सप्टेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) धर्तीवर केल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी स्पर्धांसाठी सध्या जोरदार तयारी सुरू केली आहे. २०२० या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक नियोजित क्रिकेट मालिकांचे आयोजन रद्द करण्यात आल्याने ‘बीसीसीआय’ला मोठा फटका बसला. मात्र, आगामी २०२१ या वर्षात अधिक प्रमाणात क्रिकेट सामन्यांचे आयोजन करत ‘बीसीसीआय’ गेल्या वर्षीचे नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. देशांतर्गत तसेच परदेशांत एकामागोमाग एक सलग क्रिकेट मालिकांचे आयोजन करत ‘बीसीसीआय’ने गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक सामने खेळविण्याचे ध्येय निश्चित केले आहे. मात्र, यासोबतच आगामी ‘आयपीएल’च्या १४व्या हंगामासाठीही ‘बीसीसीआय’ अनेक नव्या योजना आखत असल्याची माहिती आहे. आगामी ‘आयपीएल’च्या हंगामात आणखी दोन संघांना स्पर्धेमध्ये सामील करून घ्यायची तयारी ‘बीसीसीआय’ने केली आहे. मात्र, यंदाच्या वर्षी हा निर्णय घेणे म्हणजे खूप घाई करण्यासासारखे असल्याचे मत क्रिकेट समीक्षकांचे आहे. दोन अधिक संघांना स्पर्धेत सामील करून घेतल्यानंतर ‘आयपीएल’चा व्याप आणखी वाढण्याची शक्यता आहे. दोन अधिकच्या संघांमुळे सामन्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढणार असून, संपूर्ण स्पर्धेचा कालावधी लांबण्याची शक्यता आहे. केवळ सामन्यांची संख्याच नव्हे, तर यामुळे वेळापत्रकामध्येही बदल करावे लागणार असून, अन्य काही महत्त्वपूर्ण बाबींचीही तयारी करावी लागणार आहे. ‘बीसीसीआय’ला या दोन्ही संघांना स्पर्धेत खेळविण्यासाठी स्वतंत्रपणे निविदा काढावी लागणार आहे. तसेच खेळाडूंचा लिलाव आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, स्पर्धेच्या आयोजनाशी निगडित सर्व घटकांची यासाठी संमती मिळविणे हीदेखील एक आव्हानात्मक जबाबदारी असणार आहे. त्यामुळे ‘बीसीसीआय’ने २०२१ ऐवजी नव्या दोन संघांना २०२२च्या हंगामात सामील करून घ्यावे, या महत्त्वाच्या मुद्द्याकडे समीक्षकांनी लक्ष वेधले आहे. थोडे थांबले तर भविष्यात याचा मोठा फायदा होईल, असा मतप्रवाह समीक्षकांचा आहे.
 

इतिहास जुनाच...

 
‘आयपीएल’मध्ये नव्या संघांना सामील करून घेणे, ही काही नवी गोष्ट नाही. कारण, यापूर्वीही काही संघ या स्पर्धेत सामील झाल्याचा इतिहास आहे. २००८ साली ‘आयपीएल’चा पहिला हंगाम भारतात सुरू झाला. २००९ साली लोकसभा निवडणुकांमुळे ‘आयपीएल’च्या दुसर्‍या हंगामाचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आले. भारतात आयोजन न झाल्यामुळे आणखी संघांना या स्पर्धेमध्ये सामावून घेता आले नाही. २०१० साली तीन वर्षे पूर्ण होत असताना अनेक संघांमध्ये खेळाडूंच्या लिलावादरम्यान होणारे बदल लक्षात घेता, तिसर्‍या वर्षीही नव्या संघांना ‘आयपीएल’च्या स्पर्धेत सामावून घेता आले नाही. मात्र, २०११ साली चौथ्या हंगामात दोन संघांना सामावून घेण्यात ‘बीसीसीआय’ला यश आले. चौथ्या हंगामात ‘कोची टस्कर्स केरला’ आणि ‘पुणे वॉरिअर्स इंडिया’ या दोन्ही संघांना स्थान दिले. ‘आयपीएल’चा चौथा हंगाम हा चांगलाच गाजला. चौथा हंगाम यशस्वीरीत्या संपुष्टात आला. मात्र, त्यानंतर पाचव्या हंगामात लिलाव प्रक्रियेदरम्यान सर्व संघांचे मतैक्य न झाल्यामुळे या दोन्ही संघांना ठरावीक पसंतीच्या खेळाडूंना आपल्या संघात स्थान देता आले नाही आणि या दोन्ही संघांनी येथून काढता पाय घेतला. २०१५ साली आयपीएल’मधील ‘स्पॉट फिक्सिंग’च्या प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाने ‘राजस्थान रॉयल्स’ आणि ‘चेन्नई सुपर किंग्ज’ या दोन्ही संघांवर बंदी आणल्यानंतर ‘बीसीसीआय’ने २०१६च्या ‘आयपीएल’ हंगामात ‘गुजरात लायन्स’ आणि ‘रायझिंग पुणे सुपरज्वाईंट्स’ या दोन नव्या संघांना दोन वर्षांसाठी स्पर्धेत स्थान दिले. केवळ दोन वर्षांची बंदी असल्याने इतक्या कालावधीसाठीच करार करण्यात आला होता. त्यानंतर जुन्या संघांचा पुन्हा समावेश करत पुढील हंगाम खेळविण्यात आले. त्यामुळे ‘आयपीएल’मध्ये नव्या संघांचा समावेश ही काही नवीन बाब नाही. मात्र, सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता ‘बीसीसीआय’ने थोडे थांबलेलेच बरे, असे ‘आयपीएल’मधील अनेक आयोजकांचेही म्हणणे आहे. ‘आयपीएल’ सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क मिळालेल्या ‘स्टार स्पोर्ट्स’सोबत ‘बीसीसीआय’चा करार २०२१ पर्यंत आहे. त्यामुळे २०२२ साली ‘बीसीसीआय’ला सामन्यांच्या प्रक्षेपणाच्या हक्कासाठी नव्याने निविदा काढाव्याच लागणार आहेत. त्यामुळे २०२२ साली नवीन संघांना संधी दिल्यास, ‘ब्रॉडकास्टिंग राईट्स’ आणि स्पर्धेची ‘ब्रॅण्ड व्हॅल्यू’ वाढण्यात मदत होईल, याचाही विचार ‘बीसीसीआय’ने करणे गरजेचे असल्याचे मत समीक्षकांचे आहे.


- रामचंद्र नाईक 

@@AUTHORINFO_V1@@