सकारात्मकतेची शक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2020
Total Views |

homeopathy_1  H

 

रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे आपल्या शरीरातील मूलभूत संरक्षक शक्ती, जी प्रत्येक जीवंत प्राण्यामध्ये कार्यरत असते व तिचा संपूर्ण ताबा आपण स्वत:कडे घेऊ शकतो; मात्र, आपण ठरवलं तरच...
 
 
 
प्रत्येक माणसाला जीवनामध्ये काहीना काही तणावाचा, त्रासाचा, संकटाचा सामना हा करावा लागतो. परंतु, हा सामना आपण कशा प्रकारे करतो, त्याचेच नाव म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती! बाहेरील जंतुसंसर्ग असो किंवा कुठलाही भावनिक धक्का असो, आपले मन व शरीर त्या परिस्थितीशी कसे जुळवून घेते, यावर आपले आरोग्य अवलंबून असते.
 
 
 
म्हणजेच आता तुम्हाला लक्षात आले असेल की, रोगप्रतिकारक शक्ती ही एक स्वतंत्र कार्य करणारी संस्था आहे आणि शरीर, मन व आत्मा, ज्याला आपण ‘चैतन्यशक्ती’ म्हणतो यावर ही प्रतिकार शक्ती अवलंबून असते. आपण आपल्या शरीराला व मनाला जसे तयार करतो, त्यावर त्याची ताकद अवलंबून असते. म्हणूनच परमेश्वराने जी बुद्धी माणसाला बहाल केली आहे, त्या बुद्धीचा सकारात्मक पद्धतीने वापर करुन आपण आपले मन, शरीर व चैतन्यशक्ती मजबूत करु शकतो व पर्यायाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो.
 
 
रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय तर माणसाच्या शरीर, मन व चैतन्यशक्तीचा नकारात्मक शक्तींपासून वाचवणारी व नुसतीच वाचवणारी नाही, तर शरीरातील मूलभूत सकारात्मक ऊर्जा व सर्व अवयवांचा सुसंवाद व कार्य सांभाळणारी ऊर्जा होय. आता हे आपण कसे काय करु शकतो?
 
 
 
तर जसे अंधाराला स्वत:चे असे अस्तित्व नसते, जेथे प्रकाशाचा अभाव असतो तेथे अंधार असतो, त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जेला स्वत:चे असे अस्तित्व नसते, जेथे मूलभूत सकारात्मकता व जेथे सत्य, प्रेम आणि आनंद यांचा अभाव तयार होतो, त्याच ठिकाणी नकारात्मकता दिसायला लागते व ही नकारात्मकता रोगप्रतिकारक शक्तीला मारक ठरते व माणूस कमकुवत होऊन मग बाहेरील जंतू शरीरात प्रवेश करतो. म्हणजेच काय तर जंतूंमुळे माणूस आजारी पडत नाही.
 
 
 
 
त्याउलट माणूस आधीच कमकुवत झालेला असल्यामुळेच माणसाला रोग होतो. डॉ. हॅनेमान यांनी म्हणूनच होमियोपॅथीच्या लिखाणात असे लिहून ठेवलं आहे की, 'There are no diseases, but sick people' या वाक्याचा फार गहन असा अर्थ आहे आणि तो अर्थ आध्यात्मिक पातळीवरच अभ्यास केल्याने लक्षात येऊ शकतो. या ठिकाणी आध्यात्मिक ज्ञान फार महत्त्वाचे आहे.
याठिकाणी सकारात्मकता आणि चांगले विचार येण्यासाठी हे समजले पाहिजे की, आपण सर्व या जगात काहीतरी चांगले व सकारात्मक कार्य करण्यासाठी जन्माला आलो आहोत आणि हे सकारात्मक कार्य फक्त शरीर व मन जर निरोगी असेल तरच शक्य आहे.



अपायकारक, नकारात्मक ऊर्जेला जर आपण जराही खतपाणी घातले नाही व त्याकडे दुर्लक्ष करायला शिकलो, तर हळूहळू ही नकारात्मकता निघून जाते. आपल्या मनामध्ये एकदा का ही सकारात्मकता आली की आपणच चैतन्यशक्तीला सकारात्मक बनवतो व ही सकारात्मकता मग चैतन्यशक्तीद्वारे सर्व अवयवांकडे पोहोचवली जाते व माणूस निरोगी बनतो.

- डॉ. मंदार पाटकर

(लेखक एम.डी. होमियोपॅथी आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@