आधुनिक वाल्मिकींचा श्रीराम !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2020
Total Views |

G D Madgulkar_1 &nbs


'घराघरांवर रत्न तोरणे, अवतीभवती रम्य उपवने, त्यात रंगती नृत्य गायने, मृदंग, वीणा नित्य नादती अलका नगरीपरी...' या शब्दांनी आपल्या मनात शरयूतीरावरची अयोध्या जागी होते. ग. दि. माडगूळकर या आधुनिक वाल्मिकीने आपल्याला 'गीतरामायण नावाचा एक अमूल्य ठेवा दिला. यातलं एक एक गीत एकेका अलंकारासारखं तेजस्वी. यातल्या शोकात्म गीतांनाही तत्वज्ञानाची झळाळी आहे, वीरश्रीयुक्त गीतांना संयम व सहिष्णुतेची किनार आहे, आणि आनंदगीतातून तर माधुर्याचे लोटच वाहतात. कारण, या सर्व गीतांमधे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे श्रीराम आहेत.
 
 
'अतृप्तीचा कुठे न वावर - नगरी घरि अंतरी' अशा अयोध्येच्या नृपतीला असलेली पुत्रहीनतेची खंत पायस दानानं पुसली जाते आणि कौसल्येची कूस श्रीविष्णूंच्या मानवी अंशाला प्रसवून धन्य होते. 'दिपुन जाय माय स्वतः पुत्र दर्शने' असं ते दिव्य बालरूप दशरथाच्या महाली वाढू लागतं. 'अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळांना येतो ' असा सावळा राम,चार भावंडांत 'हीरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो ' तसा शोभू लागतो ! या सुकुमार पुत्राला वनात पाठवायचा धीर पित्याला कसा व्हावा? स्वतः विश्वामित्रच मग पित्याला 'सान जरी बाळ तुझा थोर योग्यता' म्हणत त्याच्या क्षमतांची जाणीव करून देतात.
 
 
'मारिच तो-तो सुबाहू, राक्षस ते दीर्घबाहू, ठेवितील शस्त्र, पुढे राम पाहता'
 
हा विश्वास रामही सार्थ ठरवतात आणि मग -
 
'उपजत योद्धे तुम्ही धनुर्धर, निजनयनी ते धनू पहा तर'
 
या विनंतीला मान देऊन आजानुबाहू राम धनुर्भंग करतात. धरणीमातेचं आकाशाशी नातं जडतं ,सीतेसमोर सांवळं भाग्य उभं ठाकते. गदिमांनी गीतांमधल्या अनेक बारकाव्यांतून श्रीरामांची अनेक विलोभनीय रूपं दाखवलीत. जानकी जेव्हा वरमाला घेऊन येते, तेव्हा तिचा ऊर धडधडला असेलच- पण सावलीतही सौष्ठव दिसावं असं नयनमनोहर रुप असलेले राम,त्यांचं मनही थरारलं असेल! निळ्या आकाशात पाऊल टाकणार्‍या उषःप्रभेची लाली जशी त्याला माखून टाकते, तसेच जवळ येणारे जानकीचे नूपुरनाद रामांच्या अंगांगी भरलेत, असं गदिमा लिहितात! पण या मायाब्रह्माच्या मीलनाला दृष्ट लागते.. वनवासाकरता जानकीची अनुज्ञा मागणार्‍या रामांना 'जेथे राघव तेथे सीता' असं जनकनंदिनी निक्षून सांगते. 'शिळेस म्हणतिल जन सिंहासन, रघुकुलशेखर वरी बैसता' म्हणत ती त्यांच्यासह वनात जाते. आणि 'गगननील हे उषःप्रभा ही, श्री रघुनंदन सीतामाई ' यांना निरोप देताना 'आज अयोध्या प्रथम पराजित झाल्याची वेदना अनुभवते.
 
रामांना पार करणार्‍या केवटाच्या मुखातूनही गदिमा किती सुंदर दृष्टान्त देतात! हा भवसिंधूच्या पार नेणारा तारक ,त्याला आपण तारून नेतोय.. हा दाशरथी राम जिथं जातोय तो देश सुभग.. 'ऐल अयोध्या पडे अहल्या ,पैल उगवतिल कल्पतरु!' पण राम त्याच्या वर्तनातून आपल्याला आदर्श घालून देतो आहे, हे त्या नाविकालाही कळतंय..'कर्तव्याची धरुनी कास, राम स्वीकरी हा वनवास..'
 
वनवासातले राम व त्यांच्या तोंडी असलेलं निसर्गाचं वर्णन वाचताना मनोमन पटतं की सीतेच्या आयुष्यातला हा सर्वात सोनेरी काळ असला पाहिजे! 'या मंदाकिनीच्या तटिनिकटी,या इथे लक्ष्मणा बांध कुटी' इथं 'जानकीसाठी लतिका कलिका तुझिया माझ्या भक्ष्य सायका असं सारं काही आहे..' सखे जानकी करि अवलोकन, ही निसर्गशोभा भुलवी दिठी' म्हणणारे राम रसिक आहेत. नंतर जानकीच्या अपहरणानंतर सैरभैर होऊन वनातल्या लता वृक्षांशी तळमळून संवाद करताना. 'हे दुःखाचे सागर भरले, राम जाऊदे यात वाहुनी.. कोठे सीता जनकनंदिनी ' म्हणणारे राम विरही प्रेमिक आहेत. गीतरामायणात गदिमा श्रीरामांच्या अशा मानवी भावभावनांना व्यक्त करतात आणि देवत्वाचं नातं विसरुन आपल्यालाही त्या शोकविव्हल रामाचे अश्रू पुसावेसे वाटतात.
 
 
महाप्रयत्नांच्या अंती समोर आलेल्या सीतेला अग्निदिव्य करायला सांगताना 'मी केले जे उचित नृपाते होते' म्हणून 'दशदिशा मोकळ्या तुजसी - सखि सरले ते दोघांमधले नाते' म्हणणारा - आत कोसळून पडलेला पण बाहेर कर्तव्याचं कठोर चिलखत घातलेला, पतीवर मात करणारा - केवळ राजा राम आहे. लोकस्वीकारानंतर मात्र सीताच माझी निरंतर स्वामिनी आहे हे सांगताना - 'वियोगिनी सीता रडता धीर आवरेना - कसे ओलावू मी डोळे - उभी सर्व सेना - पापण्यात गोठविली मी नदी आसवांची..' किती कोवळेपणानं, हळुवारपणे गदिमा रामाची अगतिकता व्यक्त करतात.
अपहरणानंतर तिच्या वेणीतली फुलं नि तिच्या पावलांच्या खुणा पाहून 'जिता मृता वा हता भक्षिता' कोणत्या अवस्थेत ती असेल हा विचार मनात येताच मात्र त्यांच्यातला महावीर जागा होतो. 'क्षात्रबल माथी प्रस्फुरले', 'कांपविन तीन्ही लोक बले' म्हणत ते शोधाला सज्ज होतात. श्रीरामांचा पराक्रमाचं प्रथम वर्णन केलंय शूर्पणखेनं. रक्तरंजित,अपमानित रावणभगिनी आपल्या बलाढ्य पण अहंकारी भावाला रामांच्या सामर्थ्याची जाणीव करुन देते.
 
 
'बाण मारता करात त्याच्या चमके विद्युल्लता - श्रीरामांच्या पराक्रमाने कंपित दाही दिशा - देवासम तो सुपूज्य ठरला जनस्थानिचा यती ' आणि केवळ मीच नाही तर - 'माझ्यासम ते तव सत्तेची विटंबिती आकृती!' असं ती सांगतेय . पुढं सीताही रावणाला रामांचा पराक्रम सांगताना म्हणते ' ठाकता तुझ्यापुढे वीर युद्धकाम तो, ठेवणार वंश ना-असा समर्थ राम तो!' रामांच्या चरित्रात कुठेही व्यक्तीगत सुखदुःख-लाभहानी याला स्थान नाही .'स्वये जाणता असुन नेणता, युद्ध करी तो जगताकरता!' शेवटी गर्भवती सीता 'पती न राघव केवळ नृपती' असं म्हणते, पण तिलाही तिच्या राघवाचं तेच रूप प्रिय आहे .'मज सांग अवस्था दूता रघुनाथांची' म्हणताना तीही हनुमंतांना हेच विचारते, राम विरहात कर्तव्य चुकत नाहीत ना - 'करतात अजुन ना कर्तव्ये नृपतीची?' मायावी रावण पराभूत होत नाही हे पाहिल्यावर 'आज का निष्फळ होती बाण' म्हणून चिंतित झालेल्या रामांनाही स्वतःच्या पराभवाची भीती नाही, 'माझ्याहुन मज असह्य झाला विद्येचा अपमान' - त्यांना शल्य आहे आपल्या गुरुंचा अपमान होईल याचं!
 
 
रामांनी कधीही अधर्माचा आश्रय घेतलेला नाही. धर्म वा तत्वज्ञान सांगतानाही स्वतःकडे त्याचं श्रेयही घेतलेलं नाही. राज्य स्वीकारण्याची भरतानं केलेली विनंती नाकारताना मानवी जीवनाचं पराधीन असणं सांगून' पितृवचन पाळुन दोघे होऊ रे कृतार्थ ' असं हळुवारपणे पण निग्रहपूर्वक समजावलं आहे. पुढे वालीवध करताना 'मी धर्माचे केले पालन' हे सांगताना राम भरताचा मोठेपणा सांगतात. 'अखिल धरा ही भरतशासिता, न्याय नीती तो भरत जाणता, त्या भरताचा मी तर भ्राता ,जैसा राजा तसे प्रजाजन! ' असं म्हणत स्वतःकडे लहानपण घेत हे संभाषण ऐकणार्‍या सुग्रीवाला, अंगदालाही त्यांनी नकळत राजाचं कर्तव्य संगितलं आहे! रावणावर अचानक चालून जाणार्‍या सुग्रीवाची या वेड्या साहसाकरता कानउघाडणी करणार्‍या रामांच्या तोंडी 'नंतर विक्रम प्रथम योजना' हे मौलिक सूत्र घालणारे गदिमा तितकेच थोर वाटतात.
 
सेतुबंधन हा तर समूह प्रयत्नांचा चैतन्यमय अविष्कार!
 
 
'सेतू नच हा क्रतु श्रमांचा- विशाल हेतू श्रीरामांचा -महिमा त्यांच्या शुभनामाचा -थबकुनि बघती संघकार्य हे स्तब्ध दिशा दाही!' असं ते अलौकिक काम!
 
मात्र या सर्वाची साक्षीदार असलेल्या अयोध्येची वर्तमानात मात्र 'वनाहूनही उजाड झाले रामाविन हे धाम' अशी गत होते.
 
मग 'सावधान राघवा' म्हणणार्‍या लक्ष्मणाप्रमाणेच रामभक्तांना वर्षानुवर्षांचा अन्याय सहन होत नाही. 'नावरेच क्रोध हा बोधिल्या अनेकदा ,राम काय जन्मला सोसण्यास आपदा - होऊदेच मेदिनी शापमुक्त एकदा ...' असं म्हणून कारसेवक सुग्रीवासारखा अविचार करतात खरे ! पण पुढं मात्र श्रीरामांना स्मरुन विधिवत प्रक्रिया सुरु रहातात अन 'जयश्री लाभे सत्याला ' असा दिवस उजाडतोच!
 
 
आज पुन्हा अयोध्या वाट पाहू लागली आहे. तिला पुन्हा तेव्हासारखा आनंद उपभोगायचा आहे. तो धर्मपरायण श्यामराम, तो चक्रायु श्रीनारायण जगदोत्पादक त्रिभुवनतारक राम, तो खलसंहारक संतसज्जनरक्षक राम, त्याला अयोध्येत वाजतगाजत भव्यदिव्य मंदिरात विराजमान झालेलं पहायला तीही आतुर आहे. परत प्रभूंचा त्रिवार जयजयकार ऐकायला तिचे कान आसुसलेत. या कल्पनेनंच शरयू, वायू नि पृथ्वी पुलकित झालेत. 'सुसज्ज आहे तव सिंहासन करी प्रभो स्वीकार' असं म्हणून त्याला तिथं प्रतिष्ठापित करायचं आहे.
 
आणि मग आपण काय करणार आहोत?
 
 
'रामराज्य हे असता भूवर कलंक केवळ चंद्रकलेवर ' असं व्हायला हवंय .. 'विचारातले सत्य आणतिल अयोध्येत आचार ' हे वचन सत्यात आणायचंय आपल्याला. आपल्या मनाच्या अयोध्येतलं सारं कार्पण्य ,सारं मालिन्य, अन्याय ,भेदभाव - त्याच्या साक्षीनं आपल्याला विसर्जित करायचे आहेत. श्रीरामांना शोभणारं, गदिमांनी वर्णिलेलं हे स्वर्णिम वरदान श्रीराम आपल्याकडे त्याच्या पूर्तीचं अभिवचन मागत आहेत.
 
समयि वर्षतिल मेघ धरेवर
सस्यशालिनी धरा निरंतर
सेवारत जन स्वधर्मतत्पर
'शांतिः शांतिः' मुनी वांछिती
ती घेवो आकार.
त्रिवार जयजयकार रामा , त्रिवार जयजयकार !
 
 
 
- विनीता तेलंग
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@