देशात ३ लाख ५६ हजार ५४६ कोरोनारुग्ण

    13-Dec-2020
Total Views |

Covid 19 _1  H
 
 



२४ तासात ३३ हजारांहून अधिक रुग्ण ‘कोरोना’मुक्त

नवी दिल्ली : भारतातील एकूण रुग्णसंख्येपैकी सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण ३.६२ टक्के पर्यंत खाली आले आहे. दररोजच्या रुग्णसंख्येपेक्षा बरे होण्याचे रुग्णांचे प्रमाण अधिक असल्यामुळे भारताची सक्रिय रुग्णसंख्या सतत्याने कमी होत आहे रविवारी, दि. १३ डिसेंबर रोजी ती संख्या ३ लाख ५६ हजार ५४६ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली.
 
देशभरात गेल्या २४ तासात ३०,२५४ व्यक्ती कोविड बाधित असल्याचे आढळले आहे तर त्याच काळात ३३, १३६ इतकी बरे झालेल्या नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.गेल्या सात दिवसात जगभरात प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे सर्वाधिक कमी रुग्णसंख्या असणार्‍या देशांपैकी भारत एक आहे. पाश्चिमात्ये देशांच्या तुलनेत ही संख्या बरीच कमी आहे. आजवर बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ही ९३ लाख ५७हजार ४६४ इतकी आहे. नव्याने बरे झालेल्या रुग्णांपैकी ७५.२३ टक्के संख्या १० राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहे.
 
५,२६८ इतके कोविड रुग्ण बरे होऊन केरळ आघाडीवर आहे तर महाराष्ट्रात ३,९४९ इतकी बरे झालेल्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. नवीन आढळलेल्या रुग्णांपैकी ७५.७१ टक्के रुग्ण दहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहे. गेल्या २४ तासात केरळमध्ये ५,९४९ रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात काल ४,२५९ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात ३९१ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ७७.७८ टक्के मृत्यूंची नोंद ही दहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहे.