मधुकरराव बापट : एक अप्रकट स्वयंसेवक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2020
Total Views |

Madhukar rao bapat _1&nbs

रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व जनकल्याण समितीचे पूर्व अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक आणि शहरातील विविध संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या मधुकर बापट यांचे वयाच्या ७०व्या वर्षी दि. ५ डिसेंबर रोजी निधन झाले. आज त्यांच्या दशक्रिया विधीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा हा लेख...
 
दि. ५ डिसेंबर रोजी मधुकरराव बापट यांच्या निधनाची वार्ता आली आणि मनात पहिला विचार हाच आला की, आज एक संघात न आलेला स्वयंसेवक गेला आहे. असे म्हणण्याचे कारण म्हणजे रूढार्थाने स्वयंसेवक नसलेल्या मधुकररावांनी स्वयंसेवकांकडून संघाला अपेक्षित प्रामाणिकपणा, निःस्वार्थ व समाजहितैषी बुद्धीने व तळमळीने सामाजिक जीवनात काम करणे, सर्वांविषयी आपुलकी व प्रेम असणे, शिस्तीबाबत स्वतःसाठी कठोर व इतरांसाठी मात्र क्षमाशील दृष्टिकोन ठेवणे इ. संघटनेला/संस्थेला पुढे नेण्यासाठी आवश्यक गुणांचे यथार्थपणे प्रकटीकरण केलेले आपल्याला दिसते. आदरणीय दत्तोपंत ठेंगडींनी संघकार्याची अपेक्षित व्याप्ती सांगताना म्हटले होते की, “संघस्थानावर आलेले प्रत्यक्ष स्वयंसेवक आहेत, तर न आलेले अप्रत्यक्ष स्वयंसेवक आहेत. परंतु, सर्व हिंदू स्वयंसेवकच आहेत, हा आपला दृष्टिकोन आहे.” संघाला अपेक्षित असा व्यवहार करणारे मधुकरराव असे अप्रत्यक्ष स्वयंसेवकच होते.
 
माझा व मधुकररावांचा संबंध जनकल्याण रक्तपेढीमुळे आला. त्यामुळे या लेखात मी रक्तपेढीतील कार्य प्रामुख्याने लिहीत आहे. परंतु मला खात्री आहे की, ते संबंधित असलेल्या अन्य कोणत्याही संस्थांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या या गुणांचा अनुभव आलेला असणार आहे. मधुकरराव संघाच्या संपर्कात आले ते जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून, एक रक्तदान शिबीर संयोजक म्हणून. सुमारे २०-२२ वर्षांपूर्वी आपल्या सातपूरमधील इंजिनिअरिंग उद्योगात जनकल्याण रक्तपेढीने योजलेल्या रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्याने त्यांचा रक्तपेढीशी संपर्क आला आणि ते नाते दृढ होत जाऊन ते रक्तपेढीचे कार्यकर्ते कधी झाले ते त्यांनाही कळले नाही व रक्तपेढी व जनकल्याण समितीच्याही पदाधिकारी कार्यकर्त्यांनाही.
 
 
त्यांचा सदैव प्रसन्न हसरा चेहरा, पांढरी पॅन्ट व निळसर आकाशी रंगाचा बुश शर्ट, शर्टाला दोन खिसे, त्यात एक फाऊंटनपेन (ते या बॉलपेनच्या काळातही शाईचे पेनच वापरीत), नीट पॉलिश केलेली पादत्राणे, हे त्यांचे रूप कोणावरही छाप पाडत असेच. परंतु, प्रत्यक्ष संभाषण सुरू झाल्यावर त्यांच्या मनमोकळ्या आणि प्रामाणिक बोलण्याने प्रभावितही होत असेच. एक उद्योजक म्हणून व्यवसायातही ते जितके दक्ष व व्यवहारचतुर होते, तेवढेच प्रामाणिक आणि आपल्या उद्योगातील कामगारांवर प्रेम करणारे मालकही होते. आपल्या कारखान्यात काम करणार्‍या अनेकांना त्यांनी निरपेक्षपणे सर्व प्रकारची मदत करून त्यांच्या अडचणींचे निवारण केल्याचे मला माहीत आहे. ’दया करणे जे पुत्रांसी तेची दासां आणि दासी’ या संत तुकारामांच्या वचनाप्रमाणे त्यांचे वर्तन होते. काहीवेळा त्यांना विपरीत अनुभवही आले असतीलच, परंतु त्यांनी केलेल्या मदतीचा वा विपरीत अनुभवांचा कधी उच्चार केला नाही, हा त्यांचा मोठेपणा होता.
 
मधुकररावांबरोबर जनकल्याण रक्तपेढीचे काम करीत असताना त्यांच्या विविधांगी गुणवत्तेचा जसा अनुभव आला, तसाच त्यांच्या प्रशासनिक कौशल्याचा, निर्णय क्षमतेचा व शिस्तपालनाविषयीच्या आग्रहाचाही अनुभव आलाच. नेत्याने आघाडीवर राहून इतरांना आपल्या उदाहरणाने प्रेरित करावे, याचा प्रत्यय मधुकररावांनी रक्तपेढीच्या स्थलांतरावेळी स्वतः संपूर्ण रात्रभर जागून व उभे राहून मशीनरी व रक्तपिशव्या नवीन जागेत हलविण्याच्या वेळी आणून दिला. आदल्या दिवशी सायंकाळी सुरू झालेल्या कामावर स्वतः देखरेख मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी दुसर्‍या दिवशी नवीन जागेतून पहिली रक्त पिशवी वितरीत केल्यावरच थांबविले. रक्तपेढीच्या कार्यकर्ते व कर्मचारी यांच्यासाठी हे एक उदाहरणच त्यांनी ठेवले व त्याचा परिणामही सर्वांवर झालाच. ते रक्तपेढीचे व काही काळ जनकल्याण समितीचेही अध्यक्ष होते.
 
 
परंतु, अन्य सार्वजनिक संस्थांमधील अध्यक्षांसारखे नव्हते, तर स्वतःला ते एक कार्यकर्ताच मानत व तसेच वागत असत. अध्यक्ष म्हणून पालकाची भूमिका निभावतानाही त्यांचे कार्यकर्त्यांचे भान कधी सुटले नाही, त्यामुळेच स्वतःजवळ कायम एक पावतीपुस्तक ठेवून ते निधीही गोळा करीत असत. त्यांचा वैयक्तिक संपर्क, प्रभाव व प्रतिष्ठेमुळे त्यांच्या कार्यकाळात जनकल्याण रक्तपेढीला मोठे आर्थिक पाठबळ उपलब्ध झाले होते. रक्तपेढीसाठी मोबाईल रक्तसंकलन व्हॅन घेण्याचे ठरल्यावर त्यांनी त्यासाठी प्रचंड परिश्रम केले व आवश्यक असणारी सुमारे २५ लाख रुपयांची रक्कम जवळजवळ एकट्याने उभी केली व ठरलेल्या वेळापत्रकानुसार त्या व्हॅनच्या लोकार्पणाचाही कार्यक्रम पार पडला.
 
 
रक्तपेढीसाठी या क्षेत्रातील अत्याधुनिक उपकरणे आपल्या रक्तपेढीत असावीत यासाठी ते आग्रही होते. ही उपकरणे पुरविणार्‍या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिनिधींशी वाटाघाटी करताना ते त्या उपकरणांसंबंधीची पूर्ण माहिती घेत व कंपनीच्या प्रतिनिधीशी आत्मविश्वासाने बोलत. अनेकदा त्या प्रतिनिधीस उपकरणांसंबंधी असे प्रश्न विचारत की, तोही निरुत्तर होत असे. अशा वेळी त्यांच्यातील उद्योजकाचे दर्शन होत असे. मात्र, या सर्वांतून रक्तपेढीचा अधिकाधिक फायदाही व्हावा आणि रक्तपेढी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज व्हावी, हाच त्यांचा दृष्टिकोन असे. रक्तपेढीस ‘ए फेरॅसिस’ मशीन मिळवून देण्यातही मधुकररावांचे मोठे योगदान होते.
 
 
रक्तपेढीत ‘थॅलेसेमिया सेंटर’ सुरू करून रुग्ण मुलांना प्रत्यक्ष रक्त संक्रमण सुविधाही रक्तपेढीत व तीसुद्धा पूर्ण मोफत उपलब्ध करून देण्यातही त्यांचा वाटा होताच. परंतु, ठरावीक रुग्णाला ठरावीक रक्तदात्याचेच रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीतील अधिकार्‍यांचे व कामगारांचे सहकार्य मिळवण्यात तसेच त्याच कंपनीकडून या रुग्णांना औषधेही उपलब्ध करून देण्यातही मधुकररावांचे योगदान होते. ही योजना सुरू झाल्यावर ती नीट सुरू राहील, याकडे ते स्वतः लक्ष घालत.
 
 
रक्तपेढीच्या कामाशी ते इतके एकरूप झाले होते की, तीच त्यांची ओळख निर्माण झाली होती. त्यांच्याबरोबर सातपूर वा अंबड औद्योगिक वसाहतीत निरनिराळ्या कारखान्यात निधी संकलन वा रक्तदान शिबिराच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा जाण्याचा प्रसंग आला, त्या त्या वेळी बापटांची ही ओळख आहे, हे लक्षात येई. रक्तपेढीतील कर्मचार्‍यांच्या अडचणी व प्रश्नांतही ते लक्ष घालून त्यांच्या समस्या सहानुभूतीपूर्वक व कर्मचार्‍यांचे नुकसान होणार नाही, अशा पद्धतीने सोडवत असत. अशा प्रसंगी त्यांच्यातील प्रशासक व पालक, कुटुंबप्रमुख या पैलूंचे दर्शन होत असे.
 
जनकल्याण समितीने १२ वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यात वनवासी मुलांसाठी ‘फिरत्या विज्ञान प्रयोगशाळे’चा प्रकल्प हाती घेतला. त्यावेळी मधुकररावांनी ते अध्यक्ष असलेल्या ‘बापट चॅरिटेबल ट्रस्ट’ने पहिल्या तीन वर्षांसाठीच्या खर्चाची जबाबदारी घेतली व त्यासाठी समितीस आर्थिक साहाय्य केले. त्या पायावर उभ्या असणार्‍या हा प्रकल्प आता पेठ, त्र्यंबक, हरसूल, दिंडोरी या तालुक्यात आजही सुरू आहे.
 
 
मधुकररावांचा आणखी एक गुण म्हणजे ते अत्यंत वक्तशीर होते. कोणत्याही बैठकीस ते कधी उशिरा आले असे झाले नाही. केवळ बैठकीसाठीच नव्हे तर कोणास भेटण्यासाठी जायचे असले तरी ठरलेली वेळ कधीच चुकली नाही. मधुकरराव, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचेही उपाध्यक्ष होते, चित्पावन उद्योजकांच्याही संस्थेत होते, भारतीय शिक्षण मंडळ, ठाणे जनता बँक, शंकराचार्य न्यास, औद्योगिक क्षेत्रातील ‘निमा’, ‘आयमा’, श्रीगुरूजी रुग्णालय अशा अनेक संस्थांशीही ते संबंधित होते. परंतु, कुठल्याही संस्थेत ते मानमरातब मिळावा वा मिरवण्यासाठी जात नसत. आपला फोटो येण्यासाठी धडपडत नसत.
 
 
 
ते केवळ त्यांच्यावर सोपवलेले काम निरपेक्ष बुद्धीने व प्रामाणिकपणे करीत असत. त्यामुळे अशा सर्व संस्थांमध्ये त्यांचा एक आदरयुक्त दबदबा असे. या सर्व संस्थांना त्यांनी स्वतःतर भरघोस आर्थिक साहाय्य केलेच; परंतु, आपली प्रतिष्ठा वापरून इतरांकडूनही मोठा धनसंग्रह उभा करण्यास मदत केली. सार्वजनिक जीवनात माणसाला पद-प्रतिष्ठा मिळाली की ते पद त्याला सोडावेसे वाटत नाही, त्याच्या मोहात तो अडकतो व ते आपले पद कायम राहावे, यासाठी धडपड करीत राहतो. वेळप्रसंगी अवांच्छित प्रकारांचाही अवलंब करण्यास कचरत नाही. मधुकरराव अशा मोहास कधीच बळी पडले नाही. एवढेच नाही तर अगदी सहजपणाने त्यांनी आपली संस्थागत पदे सोडली, तीही कोणतीही कटुता मनात न ठेवता. ही एक फार मोठी गोष्ट होती.
 
भगवंतांनी अर्जुनाला ’तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचार।’ ‘म्हणून तू आसक्तीरहित होऊन आपले कर्तव्य-कर्म नीटपणे करीत राहा’ असा उपदेश केला आहे. मधुकररावांचे सार्वजनिक व व्यक्तिगत जीवनातलेही वागणे याला अनुरूप असेच होते. सार्वजनिक जीवनात असणारा ध्येयवादी कार्यकर्ता आपल्या कामात इतका गर्क होतो की अनेक वेळा त्याचे आपल्या कुटुंबाकडे लक्ष राहत नाही. त्यातून सुरुवातीला कुटुंबात चिडचिड सुरू होते, रागवारागवी होते, कधी भांडणेही होतात.
 
 
परिणामी, त्याच्या अंगीकृत कामाविषयीचा एक राग कुटुंबातील सदस्यांच्या मनात घर करून बसतो व त्या कार्यकर्त्यास कौटुंबिक असहकाराला तोंड देण्याची वेळ येते. मधुकररावांच्या कौटुंबिक जीवनात हे घडले नाही. हा समतोल त्यांनी कधी बिघडू दिला नाही. एकत्र कुटुंबाचे प्रमुख म्हणून त्यांनी आई-वडील, भाऊ-भावजय, पुतणे, पत्नी, मुले या सर्वांवर सारखेच प्रेम केले व त्यांचे मन:पूर्वक सहकार्यही मिळवले. त्यांच्या घरी गेल्यावर ते स्वतः घरी नसले वा वहिनीही नसल्या तरी जाणार्‍याचे त्याच आपुलकीने स्वागत व आतिथ्य होत असे. घरातील सर्वांना मधुकरराव जनकल्याण रक्तपेढीचे काम करतात म्हणजे काय करतात, हे माहीत झाले होते म्हणूनच असे सहकार्य त्यांना घरातून मिळाले. ही पारदर्शकता त्यांच्या व्यक्तिगत जीवनातही होती आणि सार्वजनिक जीवनातही होती.
 
मधुकररावांच्या या स्वच्छ, सात्त्विक, प्रेमळ, प्रामाणिक जीवनाचा अंत मात्र असा अचानक व अपघाती व्हावा, हे आपले दुर्दैव म्हणावे लागेल. त्यांच्या निधनाने केवळ बापट कुटुंबीयांचे वा जनकल्याण समिती वा ते कार्य करत असलेल्या अन्य संस्थांचेच नुकसान झालेले नाही, तर ही आपल्या सामाजिक जीवनाची मोठी हानी झाली आहे, असेच म्हणावे लागेल. कारण, मधुकररावांनी सार्वजनिक जीवनात वावरताना प्रकट केलेले गुण आता दुर्मीळ झालेले आहेत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देणार आहेच यात शंका नाही. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन व ही शब्दरूप आदरांजली!
 
- गोविंद यार्दी


(लेखक रा. स्व. संघ जनकल्याण समिती, प्रांत संस्कार आयाम प्रमुख, नाशिक आहेत.)









@@AUTHORINFO_V1@@