वीर तलक्कल चंदू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2020
Total Views |

Talakkal Chandu_1 &n
 
 
 
 
 
आपला भारत देश म्हणजे महापुरुषांची खाण! सूर्य वंश, चंद्र वंश, नाग वंश अशा अनेक पराक्रमी वंशांची परंपरा सांगणारे वीर जसे या देशात जन्माला आले, तसेच सर्वसामान्य घरात जन्माला येऊन प्रेरक जीवन जगणारे असंख्य स्त्री-पुरुषदेखील आले. त्यांच्या जीवनकथा आपल्या समोर आणत आहोत ‘आमचा देश, आमच्या प्रेरणा’ या कथामालिकेच्या माध्यमातून. प्रत्येक रविवारी एकेक कथा आपल्या समोर सादर करणार आहेत नरेंद्र पेंडसे. भगवान बिरसा मुंडा, वीरेंद्र साय सारखे अपरिचित जनजाती वीर, छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, लाचित बडफुकन अशा वीरांचे जीवन कथाकथनातून मांडणे हा त्यांचा छंद आहे आणि त्यातूनच या कथामालिकेची निर्मिती झाली आहे. २६ डिसेंबर या दिवशी जनजाती समाजात कार्य करणाऱ्या आपल्या ‘वनवासी कल्याण आश्रम’ या संस्थेचा वर्धापनदिन आहे. या निमित्ताने चार रविवारी जनजाती समाजातील प्रेरक महापुरुषांच्या कथा आपल्यासमोर सादर करीत आहोत.
 
 
 
भारतमातेची कृपा इतकी थोर आहे की, तिच्या पोटी जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये सद्गुणांचा अंश मुळातच असतो. योग्य वयात संस्कार मिळाले, तर तो अंश प्रकट होतो आणि अलौकिक तेजाने तळपतो. याचेच एक उदाहरण म्हणजे तलक्कल चंदू!
देवभूमी केरळच्या वायनाड पहाडी क्षेत्रात राहणाऱ्या जनजाती कुरुचिया आणि कुरुमा. ‘कुरुचिया’ हे नाव धनुर्विद्येवरून पडले आहे. जंगलात ३० ते ५० घरांच्या वस्त्या असतात, त्यांना ‘थरावाडू’ म्हणतात. प्रत्येक वस्तीत निर्णय प्रक्रिया स्पष्ट असावी, यासाठी एक प्रमुख असतो, त्याला ‘करानावर’ म्हणतात. पारंपरिक उपचार व्यवस्थेची माहिती असणारा वैदू प्रत्येक वस्तीत असतो. प्रत्येक व्यक्तीकडे शस्त्र असतेच. प्रत्येक पुरुषाकडे धनुष्यबाण असतो आणि मृत्यूनंतरही तो त्याची साथ सोडत नाही. प्रत्येक महिलेकडे एक मोठ्या आकाराचे खुरपे असते.
 
 
माणसाला देवाने निर्माण केले, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. विश्वाची निर्मिती कशी झाली, याची स्थानिक भाषेतील कथादेखील आहे. ही हिंदू जनजाती असल्यामुळे पुनर्जन्मावर विश्वास आहे आणि पूर्वजांची पूजादेखील केली जाते. देवी करिम्पिली ही सर्व समाजाची माता समजली जाते. त्यांच्या सोबतच वस्त्या असणाऱ्या ‘कुरुमा’ या जनजातीत देवळाबद्दल असणारी भावना अतिशय विलक्षण आहे. कुरुमा जनजातीची देवता आहे भगवती. प्रत्येक वस्तीत तिचे मंदिर असते आणि मंदिर ही वस्तीतली सर्वात मोठी वास्तू असते. तिला मोठे आवार असते, समाजाचे सर्व कार्यक्रम त्या आवारातच होतात. जनजाती समाज निसर्गाची पूजा करतो. निसर्ग तर सर्वत्र भरलेला आहे तर मग देवाचे मंदिर कशाला, या प्रश्नाचे उत्तर विलक्षण आहे. देव निसर्गात आहे. पण, तो आपल्या शेजारी राहायला येतो आणि जिथे स्थिरावतो ते स्थान म्हणजे मंदिर. त्या मंदिराचे नाव देवाप्पुरा.
 
 
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला कोट्टायम वायनाड परिसरात राज्य करीत असलेल्या केरळवर्मा या पजहस्सी राजाचा इंग्रजांशी संघर्ष सुरू झाला. राजाकडे नागरी आणि पहाडी जनतेची सेना होती. त्याने बाणासुर टेकड्यांच्या परिसरात जनजाती समाजाला आणून वसवले होते. त्यांच्या शेतीची व्यवस्था लावून दिली होती. त्यामुळे त्याच्या राज्यात हा समाज सुखी होता. त्याच्या सेनेत कुरुचिया आणि कुरुमा जमातीचे तरुण मोठ्या संख्येने होते. आधी व्यापारी परवानग्या घेऊन आलेले इंग्रज हळूहळू आपले सैन्य वाढवू लागले. राजावर सैनिकी आणि वाटाघाटींचा दबाव वाढवत नेऊन राजाच्या क्षेत्रात इंग्रजांनी जबरदस्ती करवसुली सुरू केली. ही वसुली रोख रकमेत केली जाई आणि कराचा दरही अन्यायकारक होता. त्यामुळे प्रजा आणि राजा दोघेही इंग्रजांचा विरोध करू लागले. संघर्ष होत राहिले आणि एक दिवस इंग्रज सैन्य किल्ल्यात शिरले. राजाचे बळ कमी पडले आणि त्याला स्वतःचा जीव वाचवून पळून जावे लागले. शहरी क्षेत्र इंग्रजांच्या ताब्यात गेल्यामुळे त्याने जंगलाचा आश्रय घेतला. जनजाती समाजाने त्याचे स्वागत केले आणि सैन्याची पुन्हा उभारणी करण्यासाठी कंबर कसली. नव्याने उभ्या राहिलेल्या सैन्याचा सेनापती झाला कुरुचिया वीर तलक्कल चंदू. या सैन्याकडे इंग्रजांच्या तुलनेत प्रगत शस्त्रे नव्हती, साधन सामग्री नव्हती, मग काय होते?
 
 
पारंपरिक धनुष्यबाण होते, पिढ्यान्पिढ्या जोपासलेली लढाईची विद्या होती आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे, देशाला इंग्रजांच्या गुलामीमधून मुक्त करण्याची आकांक्षा होती. तलक्कल चंदू आणि त्याच्या साथीदारांनी स्वतःची ताकद आणि इंग्रजांची ताकद, शस्त्रे यांचा विचार केला असता, तर ते लढाईला उभेच राहू शकले नसते. त्यांना इंग्रजांचे गुलाम बनून राहणे हेच स्वीकारावे लागले असते. परंतु, देशभक्तीचा रंग ज्याच्या अंगाला लागतो तो कुठे याचा विचार करतो? जमलेल्या शस्त्रांनिशी आणि सेनेनिशी तलक्कल चंदूने कोट्टायमच्या दिशेने कूच केले. आता इंग्रज किल्ल्यात होते आणि भारतीय बाहेर. किल्ल्याचा दरवाजा उघडणे शक्य नव्हते. पण, तटबंदी इतकी उंच नव्हती की, देशभक्तांना थांबवू शकेल. काही वीर चढून जाऊ लागले, तर इतरांनी त्यांना संरक्षण देण्यासाठी तटावरील सैनिकांवर बाणांचा मारा सुरू ठेवला. वर चढून गेलेल्या वीरांनी किल्ला ताब्यात घेतला. लेफ्टनंट मॅक्सवेल आणि त्याचे ७० सैनिक या लढाईत मारले गेले. या विजयामुळे कोट्टायमवर पजहस्सी राजाचे राज्य पुन्हा स्थापित झाले. हिंदू जनजाती समाजातील अशा असंख्य वीरांनी भारताच्या इतिहासातील पाने समृद्ध केली आहेत, गरज आहे आपण ती पाने उलटून पाहण्याची.
 
 
- नरेंद्र पेंडसे
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@