लेकीची माया

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2020
Total Views |

o henry_1  H x
 
 
 
टेक्सासमध्ये मुक्तभ्रमंती करीत असताना एका रात्री माझा रश किनी या समवयीन, दिलदार मेंढपाळाच्या कुरणावर मुक्काम पडला होता. किनी आणि माझी आधीची ओळख नव्हती. मावळत्या सूर्यादेखत मी त्याला अभिवादन केले आणि रात्रीपुरता आसरा मागितला, त्याने दिला. त्याचे घर छोटे, तीनच खोल्यांचे होते. बाहेरच्या खोलीत बसून आम्ही माफक मद्यपान आणि भोजन केले. भोजन सुग्रास होते. भोजनानंतर पडवीतल्या बाजेवर माझ्यासाठी अंथरूण पांघरुणाचा सरंजाम आणला गेला. किनीची बायको आत झाकपाक करीत होती. अंगणातल्या वेताच्या आरामखुर्च्यांवर बसून आम्ही आपापले पाईप शिलगावले. हवापाण्याच्या गप्पा मारीत असताना अचानक आतून पियानोचे मंजूळ आणि अभिजात स्वर डोकावले.
 
 
 
“मरिया खूप सुंदर वाजवते आणि गातेदेखील, आमचं लग्न त्यामुळेच जमलं.” माझ्या चेहऱ्यावरील पसंतीची छटा पाहून किनी म्हणाला. मी आग्रह केल्यावर त्याने आपली कहाणी सांगितली.
 
अंकल कॅल डम्सचं कुरण आमच्या कुरणापासून थोड्या अंतरावर होतं. अंकल विदूर होते. त्यांच्याकडे उंची मेरीनो जातीच्या ८०० मेंढ्या, मरिया नावाची देखणी लाडकी सुकन्या होती. लाडक्या लेकीसाठी त्यांनी तब्बल ३० डॉलर्स किमतीची घोडी आणली होती. त्या पोनीवरून गार वाऱ्यात गाणी गुणगुणत मरिया भटकंती करीत असताना आमची ओळख झाली. मी त्यांच्या घरी जाऊ लागलो. अंकल जाम गप्पिष्ट होते. आपण पृथ्वीवरच्या तमाम विद्याशाखांचे प्राध्यापक आहोत, असा त्यांचा समज होता. आपलं ज्ञान ते आल्यागेल्याला आग्रहाने देत. मी, मरियाच्या प्रेमापायी अंकलपाशी बसून तासन्तास श्रवणभक्ती केली. पण, मरियाला मागणी घालायचं धाडस केलं नाही. एक तर बापलेकीत खूपच भक्कम पाश होते. बापाला सोडून मरिया माझ्या घरी राहायला येणं कठीण वाटत होतं. मी, त्यांच्याकडे राहून माझं कुरण सांभाळणं शक्य नव्हतं.
 
गेल्या वर्षीची गोष्ट. एका संध्याकाळी मी, त्यांच्या घराकडे डोकावत असताना मरिया हर्षभरित चेहऱ्याने माझ्याकडे धावत आली. “पप्पा मला पियानो घेणार आहेत.”
 
“काय म्हणतेस? मस्त. आता तू कुठं तरी शिकून घे.”
 
“असं काय करतोस? अरे, मी केव्हाच शिकलेली आहे. घरात पियानो असलेल्या ओळखीच्या लोकांकडे जाऊन मी त्यावर सतत सराव करते. आता मात्र घरीच हे करता येईल.”
 
बोलत बोलत आम्ही आत गेलो. अंकलची तब्येत आज ठीक नव्हती. खोकत होते. “थोडंसं बरं वाटलं की, मी सॅन अँटोनियोला जाऊन झकास पियानो आणणार आहे. या वर्षी लोकर विकून साडेतीन हजार डॉलर्स मिळाले आहेत. सगळे खर्च झाले तरी पर्वा नाही. पण, माझं लेकरू हसत-गात राहिलं पाहिजे.”
 
“मरिया आणि मी, येऊ का तुमच्या सोबत? मरियाला तिथं स्वतःच्या पसंतीने...”
 
“नाही. मी, एकटाच जाऊन येईन. तिथं माझ्या खूप ओळखी आहेत.”
 
दुसऱ्या दिवशी अंकल सॅन अँटोनियोला गेले. दोन दिवसांनी दुपारी त्यांच्या अंगणात मरियाशी गप्पा मारीत बसलो होतो, एका कॅबमधून अंकल आणि दोन हमाल उतरले. दुसऱ्या टेम्पोतून त्यांनी अगडबंब पार्सल उतरवलं आणि वरच्या माळ्यावर मरियाच्या खोलीत नेऊन खिडकीजवळ ठेवलं. मागोमाग आम्ही गेलो.
 
“तीन हजार डॉलर्स पडले. उत्तम रोजवुडचं लाकूड आहे.” घामाघूम झालेले अंकल म्हणाले. हर्षभरित मरियानं आधी बापाच्या गळ्यात पडून त्याचा आणि मग पियानोला मिठी मारून त्याचा मुका घेतला. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. आम्ही खाली आलो. जरा वेळ बसलो. मी, घरी गेल्यावर थोड्याच वेळाने मरियाचा निरोप आला की, अंकलना बरं वाटत नाहीये. मी, त्वरेने तिकडे धावलो. अंकलचं दुखणं उलटलं होतं. कुरणावरचा नोकर घोडागाडी घेऊन डॉक्टरना आणायला शहरात धावला होता.
 
रात्री उशिरा डॉक्टर पोहोचले. त्यांनी अंकलना इंजेक्शन दिलं. गोळ्या दिल्या आणि पथ्यपाण्याच्या सूचना देऊन परतले. अंकलना झोप लागल्यावर मीही परतलो. पण, सकाळी पुन्हा आलो. अंकल जागे झाले होते. पण, गळून गेले होते. मरियाला जवळ बोलावून ते म्हणाले, “पियानो आवडला नं? मला त्यावर एखादं गाणं नाही ऐकवणार?”
 
“असं काय करता पप्पा? काल सगळे गेल्यावर तुम्हाला जाग आली. थंडी वाजत होती. तुम्हाला जोजवण्यासाठी मी तासभर तुमच्या आवडीची गाणी वाजविली. प्रत्येक गाण्याला तुम्ही दाद देत होता. पहाटे पहाटे तुमचा डोळा लागला.”
 
“खरंच की काय? या औषधांमुळे काही समजत नाहीये. पण, आता पुन्हा वाजवतेस?”
 
मरियाने लाडिक नकार दिला. तेवढ्यात अंकलना मोठी उबळ आली. नोकर पुन्हा डॉक्टरांना आणायला गेला. पण, डॉक्टर येण्यापूर्वीच अंकलची प्राणज्योत मालवली होती.
 
त्या गडबडीत मी काही कामासाठी वरच्या माळ्यावर गेलो. तर पियानोवरचं पॅकिंग उलगडून पुन्हा बंद केलेलं. मरिया अशी का वागली? बापाची शेवटची इच्छा पूर्ण का केली नाही?
 
या घटनेनंतर दोन महिन्यांनी मरियाने ते कुरण विकलं. आम्ही लग्न केलं. ती तिचं सारं सामान घेऊन इथं आली. तेव्हा उलगडा झाला. सॅन अँटोनियोच्या व्यापाऱ्यानं अंकलची फसवणूक केली होती. त्या पार्सलमध्ये पियानोऐवजी एक पोकळ लाकडी पेटारा होता.
 
पण, मरियाची हौस म्हणून मी तिच्यासाठी हा पियानो आणलाय, जो ती आता वाजवते आहे.
 
 
- विजय तरवडे
(‘मिसिंग कॉर्ड’ या कथेवर आधारित)
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@