अशी ही 'हेराहेरी' भाग-१

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2020
Total Views |

Spy_1  H x W: 0
 
 
'गुप्तहेर', 'हनी ट्रॅप्स' हे शब्द वरकरणी बातम्या, रहस्यकथांमुळे काहीसे परिचयाचे असले तरी त्यांच्या नेमक्या कार्यशैलीविषयी आपल्याला फारशी माहिती नसते. पण, या गूढ पेशाविषयी एक कुतूहल मात्र मनात कायम असते. अशा या हेरगिरीचे कौटिलीय अर्थशास्त्रातही उल्लेख आढळतात. तेव्हा, अशाच काही 'हनी ट्रॅप्स'ची ओळख आपण आजपासून दर रविवारी 'या मधुपाशी' या लेखमालेतून करुन घेणार आहोत.
 
 
ज्या प्रमाणे स्वयंपाकाची सुरुवात थेट गॅसवर भांडी चढवून होत नसते, तर त्यासाठी बऱ्याच पूर्वतयारीचीही आवश्यकता असते, तद्वतच थेट युद्धभूमीवर शस्त्रं चालवायला सुरुवात करणं म्हणजे युद्ध नव्हे. प्रत्यक्ष युद्धाला तोंड लागण्यापूर्वी फार मोठी पूर्वतयारी आवश्यक असते. मनात आल्याआल्या दोन दिवसांत युद्ध सुरू झालं, असं होत नाही. प्रत्यक्ष हल्ला करण्यापूर्वी प्रतिस्पर्धी राष्ट्राची युद्धतयारी, त्यांचं बळ याबरोबरच त्या राष्ट्रातील जनतेची मानसिकता, युद्धाला पाठिंबा देण्याची अथवा न देण्याची तयारी, त्या राष्ट्राच्या नेतृत्वाची मानसिकता, युद्धात कठोर व जलद निर्णय घेण्याची क्षमता आणि धैर्य, आर्थिक ताकद, तसेच या युद्धाप्रति अन्य राष्ट्रांचा कल नेमका कोणत्या बाजूला झुकेल आणि या सगळ्या बरोबरच आपल्या देशातील जनतेची मानसिकता, आपली युद्धक्षमता, आर्थिक ताकद या सगळ्याचा अचूक अंदाज घेणे अत्यावश्यक ठरते. या सर्व गोष्टींची अचूक माहिती, आजूबाजूच्या प्रत्येक हालचालीवर, घडणाऱ्या घडामोडींवर केल्या जाणाऱ्या वक्तव्यांवर बारकाईने लक्ष ठेवून अंदाज बांधत बांधत आपली युद्धतयारी पूर्ण करायची असते आणि या सगळ्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका असते ती त्या राष्ट्राच्या हेरखात्यांची!
 
 
गुप्तहेर किंवा ' spy' म्हणजे काय?
 
 
कोणतेही राष्ट्र कितीही सक्षम किंवा अक्षम असले, तरीही आपली युद्धनीती, युद्धाची तयारी, परराष्ट्र नीती, देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकणारे काही निर्णय इ. अनेक गोष्टी गोपनीय ठेवते. सहसा अशा गोष्टी सहजपणे उघड होणार नाहीत, अशी काळजी प्रत्येकच राष्ट्र घेते. याउलट, उघड शत्रू किंवा भविष्यात शत्रू ठरू शकेल, असा संशय असणाऱ्या एखाद्या राष्ट्राबाबतच्या अशा गोपनीय गोष्टी जाणून घेण्याचाही आटोकाट प्रयत्न प्रत्येकच राष्ट्र करत असते. अशावेळी एखाद्या राष्ट्राशी असणारे आपले संबंध उघड होऊ न देता, भलत्याच एखाद्या बुरख्याखाली वावरून अशी गोपनीय माहिती मिळवून आपल्या राष्ट्राला देण्याचे काम जे करतात, ते सगळे गुप्तहेर म्हटले जातात. कित्येकदा प्रत्यक्ष युद्ध लढणाऱ्या सैनिकांपेक्षा अधिक जोखीम गुप्त हेरगिरी करणाऱ्याला घ्यावी लागते; कारण युद्धातला शत्रू हा उघड आणि निश्चित असतो. हेरगिरी करणाऱ्याला आपला संशय न येऊ देण्याची काळजी घेतानाच संपर्कात येणाऱ्या प्रत्येकावरच संशय घेत आपली कामगिरी पार पाडायची असते आणि म्हणूनच गुप्तहेर निवडताना फार कठोर आणि सूक्ष्म कसोट्यांवर पारखून घ्यावे लागतात. हेरांनी मिळविलेल्या माहितीनुसारच ते राष्ट्र आपली पुढील युद्धनीती आणि परराष्ट्रनीती ठरवत असते.
 
 
 
थोडक्यात, हेरखात्याच्या सक्षमतेवर त्या राष्ट्राची युद्धनीती अवलंबून असते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. हेरांचे काम मुख्यत: दोन प्रकारचे असते. आपल्याच देशात राहून देशातील विविध महत्त्वाच्या पदांवर असणाऱ्या व्यक्ती, संस्था यांच्या कामावर गुप्तपणे देखरेख ठेवणे, त्यांच्यापैकी कोणी फितुरी करत असल्याचा संशय असल्यास त्वरित आवश्यक ठिकाणी ती माहिती पोहोचवून त्यांचा बंदोबस्त करणे. याशिवाय देशांतर्गत सुरक्षेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य घडू नये, यासाठी दक्ष असणे. याप्रकारचे काम करणारे भारतीय हेरखाते म्हणजे 'IB' अर्थात 'Intelligence Bureau' होय, तर दुसऱ्या प्रकारात आपला देश सोडून प्रतिस्पर्धी देशांमध्ये जाऊन आपली खरी ओळख लपवून माहिती मिळवणे किंवा ओळख न बदलता अप्रत्यक्षपणे माहिती मिळविणाऱ्याला मदत करणे, दुसऱ्या देशातल्या, फितूर होऊ शकतील अशा संस्था, माणसे हेरून त्यांना आपल्या जाळ्यात ओढणे, अशाप्रकारची अधिक जोखमीची कामे करायची असतात. 'Research Analysis Wing' अर्थात 'RAW' ही भारतीय संस्था दुसऱ्या प्रकारचे काम करते.
 
निष्णात आणि चाणाक्ष हेरांची पारख आणि नेमणूक कशी करावी, यावर चाणक्याने आपल्या 'कौटिलीय अर्थाशास्त्र' या ग्रंथात 'गूढपुरुषोत्पत्ति' नावाच्या अधिकरणामध्ये अगदी विस्तृत, विवेचन आणि चर्चा केलेली आहे. राज्याचे मंत्री नेमून झाल्यावर सगळ्यात आधी राजाने स्वत: अतिशय कठोर परीक्षा घेऊन आपल्या गुप्तहेरखात्यातील माणसांची नेमणूक करावी, असे चाणक्य सांगतो.
 
कापटिक : गोडगोड बोलून, कपटाने दुसऱ्यांची रहस्ये जाणून घेण्यात कुशल असणारा, धीट असणारा तो कापटिक.
 
उदास्थित : आधी संन्यास घेऊन आता त्यापासून जो ढळला आहे असा, परंतु बुद्धी आणि आचार शुद्ध असणारा. राजाच्या साहाय्याने त्याने कृषी किंवा पशुपालनासारखा उद्योग सुरू करावा, त्यातून पुष्कळ धन जमा करावे आणि त्याचा विनियोग त्या भागात फिरत फिरत येणाऱ्या परिव्रजाकांची अन्न-वस्त्रादी सोय करण्यात करावा. उदास्थिताने तिथे येणाऱ्या आणि उपजीविकेच्या शोधात असणाऱ्या परिव्राजकांना भोजन आणि धनाच्या बदल्यात परिव्राजक वेशात राहूनच राजासाठी काम करण्यासाठी तयार करावे.
 
गृहपतिकव्यंजन : बुद्धिमान आणि शुद्ध आचरणाचा शेतकरी. त्यानेही उदास्थिताप्रमाणेच शेती क्षेत्रातील विविध लोकांना मदत करून आपल्या बाजूला वळवावे. हा शेतकरी वेशातला हेर.
 
वैदेहकव्यंजन : बुद्धिमान आणि शुद्ध आचरणाचा व्यापारी किंवा व्यापारी वेशातला हेर.
 
तापसव्यंजन : उपजीविकेच्या शोधात असणारा, मुंडन केलेला किंवा जटाधारी असणारा, बुद्धिमान तापस म्हणजे तापस वेशातला हेर.
 
वरील सर्व प्रकारचे हेर हे स्थायी किंवा देशात आणि एका ठिकाणी वास्तव्य करून माहिती मिळविणारे आहेत.
 
सत्री : सामुद्रिक, अंगाविद्या, जादूटोणा, इंद्रजाल इ. विद्यांचे अध्ययन करणारे आणि त्यांचा वापर करून माहिती मिळविणारे.
 
तीक्ष्ण : अतिशय शूर, जीवाची पर्वा न करता अगदी हत्ती किंवा अन्य वन्य प्राण्यांशीही झुंजू शकतील, अशा हेरांना 'तीक्ष्ण हेर' म्हणावे.
 
रसद : ज्यांना कोणत्याही मनुष्याविषयी उपजत दया-माया नाही, वृत्तीने क्रूर आणि कपटाने एखाद्याला विषादी द्रव्ये सहज खायला घालू शकतील, अशांना रसद अशी संज्ञा आहे.
 
भिक्षुकी : म्हणजे अधिकृत स्त्री हेर. परिव्राजिका असणारी; परंतु शीत, चतूर अशी स्त्री जिला भिक्षुणी म्हणून सर्व घरांत सहज प्रवेश आणि सन्मान मिळू शकेल.
 
असे स्थायी आणि फिरते मिळून नऊ प्रकारचे हेर राजाने नेमावेत. त्यांच्या शुद्धता परीक्षेच्या अत्यंत कठोर पद्धतीदेखील सांगितल्या आहेत. यापैकी भिक्षुकी हेर म्हणजे राजाच्या हेरखात्यामधील अधिकृत स्त्री हेर होय. वृत्तीने परिव्राजिका झालेली; परंतु काही थोड्या द्रव्यप्राप्तीची अपेक्षा असणारी अशी चतूर, धीट, प्रसंगावधानी स्त्री म्हणजे भिक्षुकी प्रकारची हेर होय. मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या पत्नींशी आपुलकीचे संबंध जोडून हळूहळू त्यांच्या घरात शिरकाव करून त्या अधिकाऱ्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे, तेथील गुप्त बातम्या मिळविण्याचे काम ही भिक्षुकी हेर प्रामुख्याने करीत असे. त्याशिवायच समाजात मानाचे स्थान असणाऱ्या गणिका व त्यांच्या घरातील अन्य स्त्रिया, त्यांच्या दासी, राजमहालातील दासी, स्वयंपाकिणी, अशा विविध कामे करणाऱ्या स्त्रियांचा समावेश स्त्री हेरांमध्ये केला जाऊ शकतो. कोणतीही गुप्त सांकेतिक भाषा येत असणारी गणिका अथवा तिची दासी यांना आणखी थोडी जोखमीची माहिती मिळविण्यासाठी किंवा एखाद्याचा गुप्तपणे नाश करण्यासाठी तिच्या आप्तांच्या देखरेखीखाली नेमले जात असे. प्रतिस्पर्धी राष्ट्रातील बलाढ्य अधिकाऱ्याला अथवा मंत्र्याला आपल्या सौंदर्याच्या जोरावर, प्रेमाच्या जाळ्यात ओढून, गोडगोड बोलून, वागून, प्रसंगी त्याची वासना शमवून आवश्यक ती माहिती त्याच्याकडून काढून घेणे या प्रकारालाच 'हनी ट्रॅप' (Honey Trap) असे म्हटले जाते. जरी चाणक्याने त्यांचा उल्लेख अशाप्रकारे केला नसला, तरी ही पद्धत तेव्हाही अस्तित्वात होती यात संशय नाही. आजवर लढल्या गेलेल्या जवळजवळ सर्वच जागतिक आणि प्रादेशिक युद्धांमध्ये 'honey traps'नी फार महत्त्वाची भूमिका बजावलेली दिसून येईल. 'Honey trapping'साठी फक्त स्त्रीच नव्हे, तर पुरुषांचाही वापर केला गेलेला आढळेल. गुप्तहेर आणि 'Honey trap' यातला प्रमुख फरक चारित्र्याचा. सामान्यतः कोणताही हेर आपली कामगिरी पार पाडताना समोर येईल त्या प्रसंगाला सामोरा जातच असतो. पण, ' Honey trap'चं प्रमुख काम हे समोरच्याला जाळ्यात ओढून, प्रेमात पाडून, प्रसंगी आणि आवश्यक असेल, तेव्हा तेव्हा आपल्या देहाच्या बदल्यात माहिती मिळविणे हे आणि हेच असते. जरी अन्य हेरांप्रमाणे बाकीची कौशल्ये असणे आवश्यक असले तरी या बाबतची नैतिक बंधने न पाळण्यासाठी, प्रसंगी मानसिक इच्छा-अनिच्छांपलीकडे जाऊन असे संबंध ठेवण्यासाठी आपलं मन तयार करणं; हे सगळ्यात कठीण काम 'honey traps'ना करावं लागतं.
 
 
एकंदरच गुप्तहेरांच्या जगात सामान्य जगाचे नैतिकतेचे, शुद्ध चारित्र्याचे, एकूणच व्यक्तिमत्त्व शूचितेचे कोणतेही नियम पाळून चालत नसते. आपल्या देशासाठी आपल्याला दिलेली कामगिरी; कोणत्याही अगदी कोणत्याही प्रकाराने पार पाडणे एवढा एकच तिथला नियम! अशाच काही 'honey traps' ना भेटण्याचा, त्यांची अगदी थोडक्यात का होईना; ओळख करून घेण्याचा प्रयत्न या लेखमालेतून करणार आहोत.
 
 
- मैत्रेयी जोशी
@@AUTHORINFO_V1@@