खगोलशास्त्र : रामायण, महाभारताचा काळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2020
Total Views |

ramayan_1  H x
 
 
 
मागच्या दोन लेखांपासून आपण 'खगोलशास्त्र' (Astronomy) ही ज्ञानशाखा आर्यांच्या स्थलांतराच्या बाबतीत काय सांगते, याचा एक धावता आढावा घेत आहोत. त्यामध्ये सुरुवातीला लोकमान्य टिळकांनी केलेले संशोधन आपण पाहिले. त्यातून वेदांचा काळ त्यांनी इ. स. पूर्व ६००० पासून अजून मागे, तर महाभारत युद्धाचा काळ इ. स. पूर्व ५००० पासून अजून मागे नेऊन ठेवला. वैदिक कालखंड हा अतिशय प्रदीर्घ कालखंड आहे. त्यामध्येच रामायण, महाभारतातल्या घटनांचाही काळ येतो. रामायण, महाभारत ही महाकाव्ये प्राचीन भारतीय वाङ्मयात 'इतिहास' म्हणून मान्यता पावलेली आहेत. वैदिक साहित्य असो की रामायण-महाभारतसारखी इतिहास काव्ये असोत, त्यांची प्राचीनता निर्विवाद आहे. परंतु, आर्यांच्या तथाकथित आक्रमणाच्या नंतर इ. स. पूर्व सुमारे १५०० पासून पुढे कधीतरी वेदांची निर्मिती झाली आणि त्याच्याही नंतर ही आर्ष महाकाव्ये रचली गेली, असा क्रम जे युरोपीय संशोधक सांगतात, त्यांना या संशोधनामुळे सणसणीत चपराकच मिळाली आहे.
प्राचीन साहित्य आणि आधुनिक खगोलशास्त्र
 
 
वैदिक साहित्य आणि रामायण-महाभारतासारखे इतिहास ग्रंथ यांमध्ये खगोलीय संदर्भ असंख्य आढळतात. जसे मागच्या लेखांमध्ये सांगितल्यानुसार २७ नक्षत्रांची नावे क्रमाने तर दिसतातच. पण, त्यांचा क्रम आज आपण जसा मानतो, तसा आश्विनीपासून सुरू होणारा नसतो. कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेत दिल्यानुसार तिथे तो कृत्तिका नक्षत्रापासून सुरू होतो. साहजिकच तैत्तिरीय संहिता सर्वात शेवटी जेव्हा केव्हा संपादित झाली असेल, तो कृत्तिकेत वसंत संपात होणारा असा काळ होता, हे ओघानेच लक्षात येते. पृथ्वीच्या अक्षाला जी 'परांचन गती' (Precession of Equinoxes) असते, तिच्यामुळे संपात बिंदू आणि अयन बिंदू दर सुमारे ७२ वर्षांनी एक अंश मागे पडतात. यालाच 'संपात चलन' (Precession of Equinoxes) म्हणतात. यामुळे वसंत संपात एक नक्षत्र ओलांडून जाण्यासाठी सुमारे ९६० वर्षे लागतात. सध्या वसंत संपात उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात होतो. त्यामुळे कृत्तिकेचा काळ आजपासून सुमारे ४८०० वर्षांपूर्वी होता, हे सिद्ध होते.
 
या खेरीज या सर्व साहित्यात अनेक उल्लेख असेही आहेत, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे काळाचा निर्देश दिसतो. उदाहरणार्थ 'शतपथ ब्राह्मण' या ग्रंथात एके ठिकाणी कृत्तिका पूर्व दिशेपासून अजिबात ढळत नाहीत, असा उल्लेख दिसतो. यावरून कृत्तिका तारकासमूह क्रांतिवृत्तावर असण्याचा काळ आजच्या आधुनिक विज्ञानाच्या आधारे सहजपणे काढता येतो. हा काळ वर उल्लेख केलेल्या कृत्तिका काळाशी जुळतो. लोकमान्य टिळकांचे 'The Orion' या ग्रंथातले संशोधन मुळातून वाचताना त्यांनी दिलेले असे अनेक संदर्भ सहजपणे लक्षात येत जातात. काही उल्लेख ध्रुव ताऱ्याच्या संबंधाने आहेत, काही सप्तर्षींच्या संबंधाने आहेत, काही इतर तारकासमूहांच्या संबंधाने आहेत. अनेक ठिकाणी एखादा ग्रह आणि एखादे नक्षत्र यांच्या युतीचे वर्णन आहे, तर काही ठिकाणी दोन ग्रहांच्या युतीचेही वर्णन आहे. ग्रहणांची वर्णने तर अनेक आहेतच. याच्या जोडीने अनेक घटनांच्या वर्णनात सूर्य किंवा चंद्र कोणत्या नक्षत्रात होता, याचेही उल्लेख ठिकठिकाणी आहेत. विविध ऋतू आणि त्या ऋतूतील निसर्ग अशी वर्णनेही अनेक आहेत. ऋतूच्या वर्णनावरूनसुद्धा त्याच्या काळाचे अनुमान काढता येते, कारण ऋतू आणि वातावरणातले बदल हे पृथ्वीच्या तिरप्या अक्षामुळे आणि तिच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे होतात, हे ज्ञात आहे.
आजच्या आधुनिक काळात खगोलशास्त्रात अत्यंत अचूक अशी वैज्ञानिक माहिती उपलब्ध आहे. त्यानुसार बनवलेली Simulation Softwares सुद्धा अगदी सर्रास उपलब्ध आहेत. त्यांच्या आधारे वर सांगितलेल्या सगळ्या प्रकारच्या माहितीचे काळ ठरविता येतात. चंद्र एखाद्या विशिष्ट नक्षत्रात दर महिन्यातून एकदा येतोच, सूर्यही एखाद्या नक्षत्रात दर वर्षातून एकदा येतो. ग्रहणे सतत होतच असतात. त्याचप्रमाणे सगळे ग्रहसुद्धा त्यांच्या ठरावीक गतीच्या गणिताने दर ठरावीक काळाने एखाद्या नक्षत्रात येतातच. त्यामुळे इथे अशा माहितीपैकी फक्त एकाच गोष्टीचे Simulation करून योग्य निष्कर्ष निघत नाही. त्यासाठी या सर्व गोष्टींचे मिश्रण करून त्यानुसार काळाच्या चौकटी शोधाव्या लागतात. या शिवाय काही अशा खगोलीय गोष्टी शोधाव्या लागतात, ज्या केवळ शेकडोच नव्हे, तर हजारो वर्षांनी एखाद्या वेळीच घडताना दिसतात. अशा गोष्टी मिळाल्यास त्यातून निश्चित होणारी काळाची चौकट ही एकमेव आणि म्हणून अधिक विश्वसनीय असते. त्यानंतर मग बाकी इतर घटनांवरून त्या चौकटीच्या आतले काळाचे दाखले शोधता येतात. अशा पद्धतीने मिळालेल्या निष्कर्षांना आधुनिक विज्ञानाच्या इतरही ज्ञानशाखांमधून जोडणारे पुरावे (Corroborations) उपलब्ध होताना दिसतात.
भारतीय अभ्यासकांचे योगदान
मागे काही लेखांत आपण श्रीकांत तलगेरी, कोनराड एल्स्ट (Koenraad Elst) इत्यादी अभ्यासकांनी वेगवेगळ्या ज्ञानशाखांच्या आधारे या बाबतीत ठरविलेल्या कालानुक्रमाचा एक धावता आढावा घेतला होता. तशाच प्रकारे खगोलशास्त्राच्या आधारेसुद्धा संशोधन करून वेद, रामायण आणि महाभारत यांच्या काळावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आजवर अनेक भारतीय अभ्यासकांनी केलेला आहे, अजूनही अनेक जण यात कार्यरत आहेत. या सर्वांचे निष्कर्ष एकसमान आहेत, असे नाही. त्यांना एकमेकांचे निष्कर्ष मान्य होतातच, असेही नाही. पण, या सर्वांमध्ये समान असणारी एक गोष्ट म्हणजे, हे सर्व निष्कर्ष वैदिक काळाला आणि रामायण-महाभारताच्या काळाला युरोपीय विद्वानांनी सांगितलेल्या इ. स. पूर्व १५००च्या चौकटीच्या अनेक सहस्रके मागे नेऊन ठेवतात. यांच्यामध्ये समान असलेली दुसरी गोष्ट म्हणजे, हे सर्व अभ्यासक आर्यांच्या आक्रमण आणि स्थलांतराचा सिद्धांत एकमुखाने नाकारतात आणि तसे सिद्धही करून दाखवितात. या निष्कर्षांमध्येसुद्धा सर्वाधिक प्राचीन काळाची चौकट दाखविणारे जे निष्कर्ष आहेत, ते डॉ. प. वि. वर्तक आणि निलेश ओक या दोन अभ्यासकांचे. डॉ. वर्तकांनी वास्तव 'रामायण' आणि 'स्वयंभू' या दोन पुस्तकांच्या द्वारे अनुक्रमे रामायणाचा काळ इ. स. पूर्व सुमारे ७३००च्या सुमारास, तर महाभारत युद्धाचा काळ इ. स. पूर्व ५५६१ असा निश्चित केलेला आहे. निलेश ओक यांनी आपल्या संशोधनातून रामायणाचा काळ इ. स. पूर्व १२२००च्या सुमारास, तर महाभारताचा काळ पुन्हा इ. स. पूर्व ५५६१ असाच निश्चित केलेला आहे. यासाठी यांनी वैदिक साहित्याच्या जोडीनेच या दोन्ही इतिहास काव्यांमधले अनेक खगोलीय संदर्भ विचारात घेऊन आपली मते निश्चित केली आहेत. या दोघांच्याही मते वैदिक साहित्याचा काळ इ. स. पूर्व २२०००च्या मागे जातो. अभिजित नक्षत्राने आपली 'जागा' सोडण्याचा उल्लेख, ब्रह्मराशी तारा हा ध्रुव तारा बनल्याचा उल्लेख, अगस्त्य तारा हे दक्षिणेकडचा ध्रुव तारा बनल्याचा दाखला, सप्तर्षी तारकासमूहातला अरुंधतीचा तारा वशिष्ठाच्या ताऱ्याच्या 'पुढे' चालत असल्याचा उल्लेख इत्यादी संदर्भ हे काळाची चौकट ठरवणारे मूलभूत संदर्भ मानून त्यांच्या आधारे पुढचा अभ्यास आणि अधिक सूक्ष्म कालनिश्चिती, अशा दिशेने जाणारी ही संशोधने आहेत. वाचकांनी ती मुळातूनच वाचावीत.
या आणि अशा सर्वच भारतीय अभ्यासकांच्या निष्कर्षात आपापसात फरक पडलेला का बरे दिसतो? यासाठी आधारभूत झालेले असे जे जे खगोलीय उल्लेख या प्राचीन साहित्यात सापडतात, त्या संस्कृत वाक्यांचा अर्थ लावण्याच्या पद्धतीमुळेच असा फरक या सर्व अभ्यासकांच्या निष्कर्षांमध्ये दिसतो. विज्ञानाच्या ज्या क्षेत्रात असे संशोधन होते, त्या क्षेत्राच्या आजच्या मर्यादाही याला कारणीभूत असतात. ज्ञानाच्या कसोटीवर आणि विज्ञानाच्या सतत होणाऱ्या प्रगतीमुळे असे निष्कर्ष पुढे बदलू शकतात, चुकीचे ठरू शकतात किंवा रद्दही (Null and void) होऊ शकतात. परंतु, हे घडवून आणण्यासाठी तेवढ्याच ताकदीचे संशोधन समोर यायला हवे. ही सर्व संशोधने सांगतात, त्यानुसार वैदिक साहित्यात, रामायण-महाभारतासारख्या इतिहास काव्यात जी पात्रे आहेत आणि त्यांचे जे कर्ते ऋषी आहेत, ते सर्व 'आर्य' आहेत - अर्थात, सज्जन आहेत. ते भारताच्या विविध भूभागात इ. स. पूर्व २२०००च्या आधीपासून राहत आहेत. अर्थात, ते इ. स. पूर्व १८००च्या सुमारास बाहेरून येऊन तेथे स्थायिक झालेले नाहीत, तर त्या आधी कित्येक सहस्रके ते इथलेच रहिवासी आहेत, एतद्देशीय आहेत, तर मग कुठे आहे आर्यांचे आक्रमण? आणि कुठे आहे त्यांचे स्थलांतर?(क्रमश:)
- वासुदेव बिडवे
(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान -
अर्थात 'भारतविद्या' अथवा 'प्राच्यविद्या' (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@