बहुआयामी व्यक्तिमत्त्व डॉ. बा. शि. मुंजे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2020
Total Views |

Balkrishna Shivram Munje_
 
 
 
धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे...सुमारे १०० वर्षांपूर्वी ऐन इंग्रजी अंमल असतानाही आपल्याच मस्तीत जगणारं व्यक्तिमत्त्व. वरवर पाहता काहीसं बेबंद. पण, फक्त आणि फक्त राष्ट्रहिताचाच विचार करणारं. आपल्या जीवन श्रद्धा आणि मानवी मूल्यांशी प्रामाणिक राहून समाजकारण आणि राजकारण यांचा मिलाफ फार थोड्या माणसांना साधतो, तो डॉ. मुंजे यांच्या जीवनात सहज सुंदरपणे साधलेला दिसतो. डॉ. मुंजे यांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांच्या कार्यावर टाकलेला एक दृष्टिक्षेप...
खरं तर प्रत्येक श्वास फक्त देशहितासाठीच घेणारं एक रग्गेल व्यक्तिमत्त्व. राजकारणासाठी आवश्यक असलेली लवचिकता आणि समाजकार्यासाठी गरजेची असलेली करुणा आणि दृढता यांचा एक सुरेखसा विणलेला गोफ म्हणजे डॉ. मुंजेंचे जीवन, असे म्हणावे लागेल. देशहित आणि हिंदुहिताचा ध्यास घेतलेल्या या माणसाने आपल्या स्वतःच्या खास अशा श्रद्धाही जपल्या. खास नागपुरी मनस्वीपणा असणारं हे व्यक्तिमत्त्व. आपल्या मूल्यांची आणि हिंदुहिताची जपणूक करणाऱ्या नेत्यांचे डॉ. मुंजे अग्रणीच ठरतील. मूल्यांची जपणूक करताना गांधीजींसारख्या त्या काळातील सर्व शक्तिमान नेत्यालाही लेखी स्वरूपात आणि समोरासमोर खडे बोल सुनाविणाऱ्या चार-दोन नेत्यांमध्ये डॉ. मुंजेंचा समावेश होतो.
 
गांधींनी एकदा डॉ. मुंजेंकडे त्यांनीच घेतलेल्या भूमिकेवर अभिप्राय मागितला होता. १९४२च्या आंदोलनातील हिंसाचार व हिंसक कृत्य करणाऱ्या लोकांची जबाबदारी आपली नसल्याचे गांधीजींनी एका पत्राद्वारे व्हाईसरॉयला कळविले. त्यानंतर ते पत्र आणि संबंधित साहित्य तसेच वर्तमानपत्रात छापून आलेला मजकूर असे सगळे डॉ. मुंजेंकडे अभिप्रायासाठी पाठवले. त्यावर १९४२च्या चळवळीतील हिंसाचार व गांधीजींनी घेतलेली भूमिका याचा सविस्तर ऊहापोह करत डॉ. मुंजेंनी पत्राद्वारे आपला परखड अभिप्राय गांधीजींना दिला. या अभिप्रायात डॉ. मुंजे गांधीजींना स्पष्टपणे कळवितात की, १९४२चे आंदोलन हे गांधीजींच्याच नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली करण्यात यावे व त्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारावे, अशी विनंती काँग्रेस कमिटीने केलेली आहे. त्यामुळे या लढ्याची संपूर्ण जबाबदारी तुमचीच ठरते. दुसरे असे की, काँग्रेस कमिटीने हा ठराव पारित करताच सरकारने तुम्हाला आणि काँग्रेसच्या सर्व प्रथमश्रेणीच्या नेत्यांना अटक केली. अशाही परिस्थितीत या लढ्याचे नेतृत्व तुमच्याकडेच होते. जनता, लोकं स्वतःच्या समजुतीनुसार पण तुमच्या आज्ञेप्रमाणे वागलेली आहेत. तेव्हा या लढ्यातील प्रत्येक घटनेची जबाबदारी तुमचीच ठरते. अशा स्थितीत जबाबदारी नाकारून स्वतः नामानिराळे राहणे, हे तुम्हाला शोभणारे नाही.
 
स्पष्टवक्तेपणा डॉ. मुंजे यांचा वेगळा गुण
 
दुसऱ्या एका प्रसंगी जेव्हा समोरासमोर चर्चेदरम्यान गांधीजींनी, “ये डॉ. मुंजेजी हमारे अहिंसा के तत्त्व को नहीं मानते,” अशी टिप्पणी केली. तेव्हा त्यावरदेखील, “मी, एकदा समोरच्या माणसाच्या हिंसेला अहिंसेने उत्तर देईन. पण, दुसऱ्या वेळी मात्र जशास तसे उत्तर देईन,” असे गांधीजींच्या तोंडावर स्पष्टपणे सुनाविण्याचे धैर्य दाखविणारे त्या काळातील मोजक्या नेत्यांमध्ये डॉ. मुंजे अग्रणीच होते.
 
मूल्यांशी बांधिलकी आयुष्यभर जपली
 
सुरत काँग्रेसनंतर ‘मवाळ’ आणि ‘जहाल’ ही दुफळी झाली. मवाळांनी जहालांना राष्ट्रीय पक्षापासून दूर ठेवण्यासाठी जहालवादी नेत्यांना राष्ट्रीय पक्षात प्रवेश न मिळू देण्याचे धोरण ठेवले. जहाल-मवाळांमध्ये समेट घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांमध्ये लोकमान्य टिळक अग्रेसर होते. या समेटासाठी त्यांनी सर्व जहाल नेत्यांची अ‍ॅनी बेझंट बाई यांच्याबरोबर पुणे येथे एक बैठक आयोजित केली. इतर नेत्यांसोबत डॉ. मुंजेही बैठकीला उपस्थित होते. बैठक टिळकांच्या घरी गायकवाड वाड्यातच झाली. बेझंट बाईंनी आपली भूमिका मांडल्यानंतर जहाल पक्षातर्फे टिळक बोलण्यास सुरुवात करणार इतक्यात, डॉ. मुंजेनी, “तुम्ही इथे नव्हता, तेव्हा अनेक गोष्टी घडल्या आहेत. ज्या तुम्हाला माहीत नाहीत, तेव्हा तुम्ही थोडं थांबून घ्यावं,” अशी लोकमान्यांना सूचना केली. टिळक थांबले. डॉ. मुंजेंनी बेझंट बाईंना स्पष्टपणे विचारले की, “जे काही मुद्दे तुम्ही मांडत आहात, त्याबाबत फिरोजशहा मेहतांशी तुमचे बोलणे झालेले आहे ना आणि हे मुद्दे त्यांना मान्य आहेत ना,” अशी विचारणा केली. त्यावर मेहतांशी काहीच बोलणे झाले नसल्याने बेझंट बाई गप्प बसल्या. “जर मेहतांशी बोलणेच झाले नसेल, तर या चर्चेला काहीच अर्थ नाही,” अशी टिप्पणी डॉ. मुंजेंनी केली. बेझंट बाई संतापल्या आणि बैठक संपली. हा स्पष्टवक्तेपणा व मूल्यांशी बांधिलकी त्यांनी आयुष्यभर जपली.
 
दुसरीकडे ‘सुरत कन्व्हेन्शन’मध्ये समेटाचा ठराव मांडण्याआधी झालेल्या जहालांच्या बैठकीत लोकमान्यांना त्यांच्या तोंडावर, “तुमचा अवतार संपला, असा याचा अर्थ आहे,” हे स्पष्टपणे सांगितल्यानंतरही फक्त टिळकांच्या शब्दाखातर समेटाचा ठराव मान्य केला. ‘सुरत कन्व्हेन्शन’मधील समेटाचा ठराव असो की, लखनौ काँग्रेसमधील मुस्लिमांना विशेष सवलती देणारा ‘लखनौ करार’ असो, डॉ. मुंजेंनी फक्त लोकमान्य टिळकांच्या शब्दाखातर मान्य केले. हे टिळकांवर त्यांची असलेली निष्ठा आणि राजनैतिक लवचिकता यांचा प्रत्यय देणारे ठरते.
 
 
ग्रंथावर नजर टाकल्यास अभ्यास अन् व्यक्तिमत्त्वाची कल्पना
 
काळाराम मंदिर सत्याग्रह म्हणजे, मंदिर प्रवेश आणि अस्पृश्यांना सर्वांच्या बरोबरीने सामाजिक हक्क मिळवून देण्यासाठी ते सतत सनातन्यांशी वादविवाद करत असत. त्यासाठी त्यांनी केलेला अभ्यास त्यांनी ‘फक्त धर्म चिकित्सा’ या विषयावरील जमा केलेल्या व आजही नाशिकच्या भोंसला सैनिकी शाळेतील जतन करून ठेवलेल्या ग्रंथांवर नजर टाकली तरी ध्यानात येते.
 
हिंदुहित, हिंदुसंघटन या माध्यमातूनच हा भारत देश आपल्या पूर्वस्थानी येईल, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. १९३० आणि १९३१ ला झालेल्या गोलमेज परिषदेपासूनच भारतीय नेत्यांना राष्ट्रीय स्वातंत्र्याची चाहूल लागली होती. डॉ. मुंजेंसारख्या जग डोळे उघडे ठेवून पाहिलेल्या, अभ्यासलेल्या द्रष्ट्या नेत्याला तर स्वातंत्र्य किती वर्षांत मिळणार, याचाही अंदाज आलाच असला पाहिजे. त्यामुळेच भविष्यात मिळणारे हे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी ते पुढील तजविजेला लागले. सर्व शक्तिमान असे सैन्यच फक्त देशाच्या सीमा आणि त्याच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करू शकते. परकीय राज्यकर्त्यांनी हेतुपुरस्सर येथील जनतेला युद्धकलेपासून दूर ठेवण्याच्या कटकारस्थानाला उत्तर म्हणजे भारतीयांचे सैनिकीकरण होय, हे ध्यानात घेऊन त्यांनी याच कामासाठी पुढील संपूर्ण जीवन वाहून घेतले.
 
सैनिकीकरणाला प्राधान्यक्रम
 
सैन्याचे भारतीयकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण करण्यासाठी त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले. गोलमेज परिषदेतही भारतीय सैन्य भरतीकरिता आणि भारतीय सैनिकांना अधिक सवलती मिळाव्यात व अधिकाधिक भारतीयांना सैन्यात प्रवेश मिळावा म्हणून प्रचंड मेहनत घेतली. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून १९३५ मध्ये मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाची स्थापना केली व लगेचच १९३७ मध्ये ऐन इंग्रजी अमलात भोंसला सैनिकी शाळेची स्थापना केली. ‘देशाला सैन्याची गरजच काय?’ असा अभिप्राय देशातील शीर्ष नेतृत्व देत असण्याच्या काळात आणि काँग्रेसचे सर्वच नेते नव्याने मिळणाऱ्या स्वातंत्र्यात आपल्याला कोणते तरी पद मिळावे, यासाठी प्रयत्न करत असताना देशाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यातही सैनिकीकरणाला प्रथमस्थानी ठेवत त्यासाठी सातत्याने भरीव कामगिरी करणाऱ्या या लोकोत्तर नेत्याचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करून सहस्र प्रणाम...
 
- डॉ. विवेक राजे
@@AUTHORINFO_V1@@