क्लबमधला ‘कोरोना’ धिंगाणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2020
Total Views |

nh_1  H x W: 0
 
 
 
 
कोरोना प्रतिबंधासाठी पुकारण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’काळात झोपडपट्टी विभागात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून यायचे. छोट्या खोल्या, कुटुंबातली सदस्यांची संख्या जास्त आणि सुविधा कमी, हे त्यामागचे प्रमुख कारण होते. विशेषतः ४०० ते ५०० माणसांकडून होणारा एकाच शौचालयाचा वापर हे त्यामागचे प्रमुख कारण होते. मात्र, ‘अनलॉक’ची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू झाल्यानंतर उच्चभ्रू वस्तीत झालेला कोरोनाचा शिरकाव ‘कोरोना योद्ध्यां’ची मती गुंग करणारा होता. त्याचे कारण आता स्पष्ट होत आहे. मॉल आणि क्लब सुरू झाल्यामुळे एकाच सदनिकेचे अंतर राखून राहणारे लोक बार आणि क्लबमध्ये मात्र एकमेकांना खेटून बसू लागले. विनामास्क वावरू लागले. त्यामुळे त्यांच्यात कोरोना संसर्ग वाढू लागला. मागील शनिवारी महापालिकेच्या पथकाने परळच्या व्हिलेजच्या ‘एपिटोन नाईट क्लब’मध्ये आणि वांद्रे येथे एका क्लबमध्ये टाकलेल्या धाडीमुळे हे सिद्ध झाले. क्लबमधला धिंगाणाच उच्चभ्रू वस्तीत कोरोना वाढवतो, हे सत्य पुढे आले आहे. शिथिलीकरणाचा असा गैरफायदा घेण्यात येत असेल, तर नाईट क्लबवर काही दिवस तरी बंदी घालणेच योग्य ठरेल. कारण, या लक्ष्मीपुत्रांची बेफिकिरी सामान्य लोकांचे जीणे हराम करत आहे. कोरोनाच्या शिरकाव झाल्यापासून नऊ महिने झाले आणि ‘अनलॉक’ प्रक्रिया सुरू झाल्यापासून सहा महिने होतील. या काळात अन्नासाठी दाही दिशा होऊ नये म्हणून सामान्य माणूस रोजगारासाठी बाहेर पडत आहे. पण, त्याला त्याच्या कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत फार यातना सहन कराव्या लागत आहेत. मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेत त्याला अजून प्रवेश मिळत नाही. बसने प्रवास करावा, तर प्रवासातच त्याचे आठ तास खर्ची होतात. त्यामुळे अर्धमेला होणारा सामान्य माणूस रेल्वेत प्रवेश मिळावा म्हणून कोरोना आटोक्यात येण्याची प्रार्थना करत असतो. मात्र, अशा धटिंगांमुळे कोरोना वाढतो आणि रेल्वेत प्रवेश मिळण्याचे त्याचे स्वप्न दिवसेंदिवस धुसर होत आहे. मुंबईचे जनजीवन पूर्वपदावर आणायचे असेल, तर काही दिवस नाईट क्लबला कुलूपच लावायला हवे.
 
 
संकल्प करा रक्तदानाचा...
 
 
 
जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाने सर्वांनाच एका पातळीत आणून ठेवले आहे, याची कबुली खुद्द अभिनेते अनुपम खेर यांनीच दिली आहे. कोरोना हा अदृश्य विषाणू आहे, त्याचे चित्र वैज्ञानिकांनी कल्पनेने रंगविले आहे. मात्र, त्याने भल्याभल्यांना शरणागती पत्करायला लावली आणि प्रसंगी त्याने अनेकांचा बळीही घेतला. त्यामुळे अनेकांची घमेंड उतरली आहे. उद्या काय होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे ‘आजचा दिवस तुमचा समजा आणि मस्त मजेत जगा’ असा संदेश देणारे ‘युवर बेस्ट डे इज टुडे’ पुस्तक अनुपम खेर यांनी लिहिले आहे. मात्र, मस्त मजेत जगायला माणसाला धडपड करावीच लागणार. त्यासाठी त्याला अन्नाची गरज लागणार आणि ते मिळविण्यासाठी धडपडत असताना तो आजारी पडला तर त्याला रक्ताची गरज लागणार आणि नेमकी त्याचीच कमतरता आहे. एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी रक्त हा घटक किती महत्त्वाचा आहे, याची सर्वांना जाणीव आहे. राज्यात सुमारे ३४४ ब्लड बँक कार्यरत आहेत. त्यामध्ये काही दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे, हे खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच सांगितले आहे. कोरोनामुळे महाविद्यालये बंद आहेत. खासगी कंपन्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या मर्यादेमुळे रक्तदान शिबिरे आयोजित करण्यावर मर्यादा येत आहेत. या सार्‍यांमुळे रक्तदान कमी होत आहे. एरवी देशात रक्तसंकलनात महाराष्ट्र अग्रेसर आहे. मात्र, आता कोरोनामुळे रक्तटंचाईला सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक दान हे त्याच्या उपयुक्ततेनुसार महत्त्वाचे ठरत आहे. भुकेलेल्यांसाठी अन्नदान महत्त्वाचे ठरते, तर आजार्‍यांसाठी रक्तदान महत्त्वाचे ठरते. रक्त तयार करता येत नाही आणि संकलन केलेले रक्त दीर्घकाळ साठविता येत नाही. त्यामुळे सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक आहे. नागरिक अनेक उपक्रमांच्या वेळी अनेक संकल्प करतात. त्याप्रमाणे त्यांनी वाढदिवशी, लग्नाच्या वाढदिवशी तसेच विविध प्रसंगाचे औचित्य साधून वर्षातून दोन वेळेस रक्तदान करणे महत्त्वाचे आहे. जनहितासाठी तसा संकल्प महत्त्वाचा आहे.
 
- अरविंद सुर्वे
@@AUTHORINFO_V1@@