अफगाणिस्तानचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2020   
Total Views |

afgh_1  H x W:
 
अफगाणिस्तानच्या मलाला मैवाद या पत्रकार महिलेचा दि. १० डिसेंबर रोजी खून झाला. तिच्या गाडीवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. ती अफगाणिस्तानच्या ‘इनिकास टीव्ही’ आणि रेडिओसाठी काम करायची. आपल्या वार्तांकनामध्ये, निवेदनामध्ये सामाजिक आशय, मानवी मूल्ये अधोरेखित करण्याचा ती प्रयत्न करायची. २०२०च्या ऑगस्ट महिन्यापासून अफगाणिस्तानमध्ये अनेक पत्रकारांवर, कलाकारांवर आणि विचारवंतांवर असेच हल्ले झाले. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानमध्ये महिला पत्रकारांना किती समस्यांना तोंड द्यावे लागते, याबाबत तिने नुकतेच आपले मत जगजाहीर केले होते. मलाला मैवाद या कार्यक्षम महिला पत्रकाराच्या हत्येने माध्यमांच्या जगात वादळ निर्माण झाले आहे. तिच्या मृत्यूची जबाबदारी कोणत्याही अतिरेकी संघटनेने घेतलेली नाही. मात्र, तरीही अफगाणिस्तानातील जनता आणि जग यांना वाटते की, तिची हत्या कट्टरपंथीय अतिरेक्यांनी केली असावी. कारण, ‘स्त्रीने घरी गोषात आणि आपल्या रूढींच्या कोषात राहावे,’ असा तिथे तालिबान्यांचा कायदाच. वरवर वातावरण निवळले असले, तरी तिथे स्वातंत्र्याबद्दल बोलणारे, आम्हालाही मुक्तपणे माणूस म्हणून जगू द्या, म्हणून बोलणारे अतिरेक्यांच्या निशाण्यावरच आहेत, असे अभ्यासकांचे मत आहे. गेल्या काही महिन्यांत अफगाणिस्तानामध्ये कितीतरी पत्रकारांच्या, विचारवंतांच्या हत्या याच कारणाने तर झाल्या.
 
 
 
‘रेडिओ आझादी इन अफगाणिस्तान’साठी काम करणारे अलियास दाईज यांचीही हत्या नोव्हेंबर २०२० रोजी अशीच झाली होती. अलियास अफगाणिस्तानच्या छोट्या गावात हेलमांड येथे राहायचे. पण, पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांचा जगभरातल्या पत्रकारांशी संपर्क होता. अलियास मुख्यतः तालिबान आणि सैन्य, तसेच अफगाण नागरिक यांच्यातील घडामोडींवर लिहायचे आणि बोलायचेही. त्या रात्री ते खूप कामात होते, कारण तालिबान संदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडींवर त्यांना कार्यक्रम करायचा होता. दुसऱ्या दिवशी सगळं आटोपून ते कामाला निघण्यासाठी कारजवळ आले आणि कारमध्ये ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. नामांकित आणि धडाडीचा पत्रकार म्हणून जागतिकस्तरावर ख्याती असलेले अलियास अल्लाला प्यारे झाले. त्यांच्या मृत्यूनंतर जगभरातून निषेध व्यक्त करण्यात आले. मात्र, अलियास यांचे गुन्हेगार अजूनही मिळाले नाहीत. यामा स्लावाश अफगाणिस्तानातील ‘तोलो न्यूज चॅनल’साठी ते काम करायचे. वर्तमान घडामोडी, अफगाण राजकारणावर त्यांचे कार्यक्रम असायचे. त्यामध्ये दहशतवादावर टीका असायची. ७ नोव्हेंबर, २०२० रोजी त्यांच्या वाहनामध्ये अतिरेक्यांनी बॉम्ब ठेवला. त्या स्फोटात हा उमदा वार्ताहर निवेदक मारला गेला. त्याआधी अफगाणिस्तानच्या एकमेव महिला चित्रपट दिग्दर्शक असणाऱ्या साबा सहरवरही असाच भ्याड हल्ला झाला. कारण काय तर ती महिला असून, चित्रपटक्षेत्रात काम करते. ती अफगाणिस्तानमध्ये लोकप्रिय होती. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी मुलीबाळींना शिक्षणही नाकारले होते. तिथे साबा चित्रपटामध्ये यशस्वी दिग्दर्शक म्हणून ख्यातनाम झाली होती. त्यामुळे साबावर काही लोकांनी गोळीबार केला. ती त्यातून बचावली. मात्र, अफगाण सिनेमाक्षेत्रात आता नव्याने कुणी स्त्री दिग्दर्शक म्हणून कारकिर्द घडविण्यासाठी उत्सुक असेल का?
फौजिया कुपी यांचे पिता २५ वर्षे अफगाणिस्तानमध्ये खासदार होते. पण, १९७५ साली जेव्हा फौजिया जन्माला आली, मुलगी झाली म्हणून मरण्यासाठी नुकत्याच जन्मलेल्या फौजियाला कितीतरी तास अफगाणच्या रणरणत्या उन्हात टाकले गेले. पण, कर्मधर्म संयोगाने ती वाचली आणि शिकली. राजकारणात आली. फौजियाने मुलींच्या शिक्षणासाठी आवाज उठविला. फौजियाने तालिबान्यांना महिलांविषयक हक्क सांगितले, याची तिला जबर किंमत मोजावी लागली. दोनदा तिच्यावर जीवघेणे हल्ले झाले. पण, ती वाचली. म्यानमारच्या रोहिंग्यासाठी किंवा पाकिस्तानच्या मुस्लिमांनाही ‘सीएए’ कायदा लागू व्हावा म्हणून भारतात हिडीस प्रदर्शन करणारे अफगाणमधल्या बंधू-भगिनींवर होणाऱ्या अन्यायाबद्दल चकार शब्दही बोलत नाहीत. ‘भारत तेरे तुकडे होंगे हजार’ असे म्हणणारे ‘तुकडे तुकडे गँग’ आणि त्यांचे समर्थक अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे ढोल वाजवत असतात. अफगाणिस्तानमधल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरही बोला काही...
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@