मालेगावहून मुंबईत वन्यजीवांची तस्करी: ९२ वन्यजीव ताब्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2020
Total Views |

thane_1  H x W:


ठाणे वन विभागाची कारवाई 

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) - मालेगावहून मुंबईत वन्यजीवांची विक्री करण्यासाठी येणाऱ्या एका तरुणाला ठाणे वन विभागाने ताब्यात घेतले. बुधवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडे पोपट, ससे आणि खारीसारखे वन्यजीव सापडले. या कारवाईमधून एकूण ९२ वन्यजीवांना ताब्यात घेण्यात आले.
 

thane_1  H x W: 
 
वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत सुरक्षित असलेल्या वन्यजीवांची तस्करी करणे कायदेशीररित्या गुन्हा आहे. अहमदनगर येथील वन्यजीव तस्करीच्या एका कारवाईदरम्यान वन विभागाला मालेगावहून मुंबईत वन्यजीवांची तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. मालेगाव येथील तरुण शकील अन्सारी एका ट्रकमधून वन्यजीवांना घेऊन मुंबईत येणार होता. त्यानुसार ठाणे वन विभागातील अधिकाऱ्यांनी वाईल्डलाईफ वेलफेअर असोसिएशनच्या स्वयंसेवकांसह बुधवारी पहाटे ठाणे येथील पूर्व द्रुतगती महामार्गावर सापळा लावला. सकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास आनंद नगर टोल नाक्यावर ट्रक येताच त्यातून उतरणाऱ्या शकील अन्सारीला अटक केल्याची माहिती ठाण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र मुठे यांनी दिली. आरोपीकडून ६२ इंडियन रोझ रिंग्ड् पोपट, १२ प्लम हेडेट पोपट, ७ खार आणि १३ ससे ताब्यात घेण्यात आले. आरोपी अन्सारी हा सायन येथे या वन्यजीवांना विकण्यासाठी जात असल्याचे मूठे यांनी सांगितले. न्यायालयात हजर केला असता, आरोपीला जामीन मिळाला. वन्यजीवांना ताब्यात घेतल्यानंतर त्यामधील काही पोपटांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

@@AUTHORINFO_V1@@