जगातून वन्यजीवांच्या ३१ प्रजाती नामशेष - 'आययूसीएन'ची माहिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2020
Total Views |
iucn _1  H x W:


'आययूसीएन'ची 'रेड लिस्ट' अद्यावत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - संयुक्त राष्ट्र संघाच्या 'इंटरनॅशनल युनियन फाॅर काॅन्झर्वेशन आॅफ नेचर'ने (आययूसीएन) त्यांच्या वन्यजीवांच्या स्थितीची लाल यादी अद्यावत केली आहे. त्यानुसार जगातून वन्यजीवांच्या ३१ प्रजाती नामशेष झाल्या आहेत. यामध्ये दक्षिण चीन मधील शार्क, फिलिपिन्समधील गोड्या पाण्यातील मत्स्यप्रजाती आणि अमेरिकेतील बेडकांच्या प्रजातींचा समावेश आहे. 
 
 
'आययूसीएन' ही संस्था जगात तग धरुन असलेल्या प्रजातींच्या संवर्धनासाठी काम करते. यासाठी त्यांनी वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांच्या सद्परिस्थितीसंदर्भात यादी तयार केली आहे. त्याला 'रेड लिस्ट' म्हटले जाते. या यादीत जगातून नामशेष होण्याऱ्या प्रजातींची सद्यपरिस्थिती वेगवेगळ्या पातळ्यांवर दाखवली आहे. ही यादी अद्यावत झाली असून ३१ प्रजाती नामशेष झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दक्षिण चीनच्या समुद्रात आढळणारी 'लाॅस्ट शार्क' ही प्रजात जगातून नामशेष झाल्याची शक्यता आहे. १९३४ साली या प्रजातीचे शेवटचे दर्शन घडले होते. या भागातील अतिमासेमारीमुळे ही प्रजात जगातून विलुप्त झाल्याची शक्यता आययूसीएनने वर्तवली आहे. 
 
 
 
 
फिलिपिन्समधील लानाओ तलाव आणि त्याला येऊन मिळणाऱ्या प्रवाहांमध्ये आढळणाऱ्या गोड्या पाण्यातील १७ मत्स्यप्रजाती नामशेष झाल्या आहेत. या प्रजाती जगभरात केवळ लानाओ तलावामध्ये आढळत होत्या. म्हणजेच त्या प्रदेशनिष्ठ होत्या. या माशांना खाणाऱ्या इतर प्रजाती तलावात टाकल्यामुळे आणि मासेमारीच्या विनाशकारी पद्धती अंवलंबल्यामुळे त्या लुप्त झाल्याची शक्यता 'आययूसीए'ने वर्तवली. याशिवाय मध्य अमेरिकेत आढळणाऱ्या बेडकांच्या तीन प्रजाती नामशेष झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याशिवाय मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील बावीस बेडकांच्या प्रजाती लुप्तप्राय होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@