‘युवराजां’च्या अजेंड्याविरोधात मुंबई महापालिका प्रशासन?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2020
Total Views |

Uddhav Thackeray_1 &
मुंबई : “मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच, ‘नाईट क्लब’कडून नियम धाब्यावर बसवले जात आहेत. अशा ‘नाईट क्लब’ना इशारा देण्यात आला आहे. मात्र त्यांच्यात सुधारणा न झाल्यास ‘नाईट कर्फ्यू’ लावण्याबाबत विचार करावा लागेल,” असा इशारा मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिला आहे. आयुक्तांच्या या इशार्यानंतर राजकीय चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री असलेले आदित्य ठाकरे यांच्या ‘नाईट लाईफ’च्या संकल्पनेला छेद देणारी ही महापालिका प्रशासनाची भूमिका असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
 
 
 
“ ‘नाईट क्लब’कडून कोरोनासंदर्भात दिलेली मार्गदर्शक तत्त्वे पाळली जात नाहीत. कोरोना संदर्भातील एसओपी धुडकावल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ही निश्चितच फार गंभीर बाब आहे,” असे चहल म्हणाले. चहल म्हणाले की, “कोरोना नियंत्रणासाठी मास्क हा उत्तम उपाय आहे. त्याचप्रमाणे ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र ‘नाईट क्लब’मध्ये या सार्या उपाययोजना धुडकावल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही सार्वजनिक समारंभासाठी ५० माणसे एकत्र येण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण परळ व्हिलेज येथील ‘एपीटोम नाईट क्लब’मध्ये सुमारे दोन हजार लोक माक्सशिवाय एकत्र जमले होते. या ‘नाईट क्लब’मध्ये अशाप्रकारे लोक एकत्र येत असल्याची माहिती मिळताच पालिका प्रशासनाने शनिवारी रात्री या ‘नाईट क्लब’वर धाड टाकली. त्यावेळी तेथील चित्र चिंता करण्यासारखे होते. सुमारे दोन हजार लोक मास्क न वापरताच एकत्र जमले होते. मात्र रात्री १२ वाजताच्या सुमारास पालिकेच्या पथकाने धाड टाकल्याची खबर मिळताच तेथील लोकांची पळापळ सुरू झाली. पालिकेचे पथक तेथे पोहोचेपर्यंत सुमारे हजार लोकांनी तेथून पलायन केले होते. मात्र, हजार लोक मास्कशिवाय असल्याचे आढळून आले, असे त्यांनी सांगितले.
‘एपीटोम’विरोधात गुन्हा
 
 
‘एपीटोम नाईट क्लब’ने कोरोना नियंत्रण नियमावली धुडकावली असल्याने कोरोना प्रसार जोमात होण्याची भीती आहे. त्यामुळे त्या ‘नाईट क्लब’विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे चहल यांनी सांगितले.
 
 
‘नाईट लाईफ’चा धिंगाणा
 
 
दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येणारा कोरोना फोफावण्याची भीती असतानाच सामान्य नागरिक स्वतःवर बंधने लादून घेत आहेत. नियम धुडकावणार्या नागरिकांना दंडाची शिक्षा देण्यात येत आहे. मात्र ‘नाईट लाईफ’चा धिंगाणा चालूच आहे. परळ व्हिलेजप्रमाणेच वांद्रे, वरळी अशा ठिकाणांबरोबरच मुंबईभर ‘नाईट क्लब’ बिनबोभाट चालू आहेत. त्या ठिकाणी एसओपींचे पालन केले जात नाही, असे दृष्टोत्पत्तीस येत आहे, ही निश्चितच चिंताजनक बाब असल्याचे आयुक्त म्हणाले.
 
 
साहाय्यक आयुक्तांना अधिकार
 
 
मुंबईतला ‘नाईट क्लब’मधल्या धिंगाण्याला आळा बसावा यासाठी प्रभाग क्र. २४ च्या साहाय्यक आयुक्तांना त्यांच्या विभागातील ‘नाईट क्लब’वर केव्हाही धाड टाकण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच जे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करताना आढळणार नाहीत आणि ‘एसओपी’ धुडकावल्याचे आढळून येतील, त्यांच्यावर त्वरित कारवाईचे अधिकारही साहाय्यक आयुक्तांना देण्यात आल्याचे चहल यांनी सांगितले.
 
 
मुख्यमंत्र्यांचा सबुरीचा सल्ला
 
 
‘नाईट क्लब’मध्ये चालणार्या धिंगाण्याबाबत राज्य शासनाला कळविण्यात आले आहे. याला आळा घालण्यासाठी रात्री 11 ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करावी का, याबाबत आपण राज्य शासनाला विचारणा केली आहे. मात्र मुंबईच्या शिस्तबद्ध सामान्य नागरिकांमध्ये त्यामुळे घबराट निर्माण होईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सबुरीचा सल्ला दिल्याचे आयुक्त म्हणाले.
ही शिवसेनेच्या युवराजांची देण...
 
 
‘नाईट लाईफ’ ही शिवसेनेच्या युवराजांची देण आहे. मुंबई महापालिकेत सत्ता शिवसेनेची आणि राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीवच पर्यटनमंत्री आहेत. त्यामुळे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे लाड पुरवण्यात येत आहे. ‘नाईट क्लब’ ही त्यांचीच देण असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे युवराज पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे राज्य शासनात अनेक बालहट्ट पुरविण्यात येत आहे. त्यापैकी ‘नाईट क्लब’ हा त्यांचाच बालहट्ट असल्याचे बोलले जात आहे. मुंबई 24 तास जागी असल्याचे सांगण्यात येत असले तरी नियमानुसार मुंबईतील व्यवहार रात्री 11 नंतर बंद होतात. पण पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि मुंबईकरांना रात्रीही निर्धास्त फिरता यावे, यासाठी ‘नाईट लाईफ’ची कल्पना आदित्य ठाकरे यांनीच मांडली होती. ‘नाईट लाईफ’ला अनेक बाजूंनी विरोध झाला असला तरी सत्तेपुढे शहाणपण नसते. महापालिकेत आणि राज्यातही शिवसेनेची सत्ता असल्याने विरोधाला न जुमानता काही ठिकाणी ‘नाईट लाईफ’ला परवानगी देण्यात आली. लपूनछपून चालणारे व्यवहार आता उघडपणे होऊ लागले. त्यामुळे कोरोना काळातही धिंगाणा घालण्याची ‘नाईट क्लब’वाल्यांची हिंमत झाली. कोरोना नियंत्रणासाठी ‘सोशल डिस्टन्स’, तोंडावर मास्क ही अत्यावश्यक उपाययोजनाही ‘नाईट क्लब’वाल्यांकडून धुडकावली जात आहे. अशा क्लबवाल्यांवर त्वरित कारवाई करणे भाग होते. मात्र युवराजांमुळे कारवाई न करता, आयुक्तांना थोडे धिराने घेण्याचा सल्ला देण्यात आल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@