अन्यायग्रस्तांचा बुलंद आवाज!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2020
Total Views |

Kirit Somaiya_1 &nbs
 
 
 
कोरोना महामारीच्या काळात लोकप्रतिनिधींनी विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले. यामध्ये प्रामुख्याने गरजवंतांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यावर प्रामुख्याने भर होता. तेव्हा, अशा जीवघेण्या परिस्थितीतही केवळ जनसेवेसाठी महामुंबईतील प्रत्येक ‘हॉटस्पॉट’वर जात अन्यायग्रस्तांविरोधात सातत्याने आवाज उठविणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या ‘कोविड’काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख...

नाव : डॉ. किरीट सोमय्या
राजकीय पक्ष : भाजप
पद : भाजपचे नेते
कार्यक्षेत्र : महामुंबई

 
 
२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आलेल्या डॉ. किरीट सोमय्या यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील अनेक लोकोपयोगी कामे करत नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात यश मिळविले. २०१९ सालीही ते पुन्हा हमखास निवडून येतील, असा विश्वास मतदारांना होता. मात्र, गेल्या वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान मित्रपक्षाच्या कटकारस्थानामुळे किरीट सोमय्या यांना उमेदवारी मिळाली नाही. सलग दुसर्‍यांदा खासदार होण्याची त्यांची संधी हुकली तरी ते निराश झाले नाहीत. ते पुन्हा त्याच जोमाने कामाला लागले. कोरोना महामारीच्या काळात लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदार असणार्‍या अनेक नेत्यांपेक्षा त्यांनी दुपटीच्या वेगाने काम केले, म्हणूनच एक जबाबदार नेते अशी सर्वत्र त्यांची ओळख झाली आहे.
 
 
‘लॉकडाऊन’ जाहीर झाल्यानंतर सोमय्या यांनी अगदी पहिल्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. कोरोना महामारीच्या काळात रुग्णवाहिकांच्या अभावी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रुग्णांचे जीव जात असल्याचे पाहायला मिळत होते. राज्य सरकारचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली. सोमय्या यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे न्यायालयाने याची गंभीर दखल घेत या विषयात राज्य सरकारला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सरकारने एक विशेष संकेतस्थळ सुरू करत एका क्लिकवर रुग्णवाहिकेबद्धल सर्व माहिती मिळेल, अशी सेवा सुरू केली. या संकेतस्थळावर शिवाय रुग्णास जर तक्रार करायची असेल तर तेही आता शक्य आहे. सोमय्या यांनी केलेल्या या कामाचे सर्व नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
 
 
केवळ रुग्णवाहिकेपुरतेच मर्यादित न राहता, सोमय्या यांनी राज्यातील अन्य विविध महत्त्वांच्या प्रश्नांकडेही लक्ष दिले. कोरोनासारख्या महामारीच्या काळात अनेक जण जीव मुठीत घेऊन जगत असतानाही महाराष्ट्रात अनेक रुग्णालयांमधून रुग्ण गायब झाल्याच्या घटना घडल्या. राज्य सरकारच्या या हलगर्जीपणाच्या कारभारामुळे रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय त्रस्त असताना, या परिस्थितीत होणार्‍या रुग्णांच्या कुटुंबीयांना घेऊन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि हा विषय लावून धरला. तसेच ‘कोविड’ संकटाच्या काळात जनतेच्या विविध समस्या घेऊन वेळोवेळी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांना भेट देऊन समस्या सोडवत अनेकांना न्याय मिळवून देण्यास सहकार्य केले.
 
 

Kirit Somaiya_1 &nbs 
 
 

"कोरोना महामारीच्या काळातही रुग्णांना योग्यरीत्या उपचार न मिळणे, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचे जीव जाणे, रुग्णांना वाढीव आणि भरमसाठ बिले, मृतदेहांची अदलाबदल, रुग्ण गायब होणे, ‘क्वारंटाईन सेंटर्स’मध्ये महिलांवर बलात्कार आदी होणार्‍या घटना म्हणजे राज्यात गलथानपणाचा कारभार सुरू आहे, असे प्रकार राज्यात घडणे म्हणजे हे राज्य सरकारचे पूर्ण अपयश आहे."

 
 
जनसेवेसाठी सोमय्या यांनी मुंबई तर पालथी घातलीच, शिवाय शहराबाहेरील अनेक ‘क्वारंटाईन सेंटर’ आणि ‘कोविड केअर सेंटर्स’ना भेट देत तेथील नागरिकांना होणारा त्रास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या सर्व समस्या आणि राज्य सरकारच्या कारभारातील गोंधळ सर्वांच्या निदर्शनास त्यांनी आणून दिला. पनवेलमध्ये कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सोमय्या यांनी तेथील महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा केली. यासोबतच रायगड जिल्हाधिकार्‍यांचीही भेट घेऊन त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. रायगडनंतर त्यांनी आपला मोर्चा ठाण्याकडे वळविला. महानगरपालिका आयुक्तांकडे चर्चा करत त्यांनी या भागात कोरोना महामारीच्या संकटावर कशा प्रकारे मात करता येईल, यासंदर्भात चर्चा केली.
 
 
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाकाळात जीव गमाविलेले पोलीस कॉन्स्टेबल दीपक हाटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्याच प्रथम धावले. सोमय्या यांनी हाटे कुटुंबीयांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याचा पाठपुरावा शासनदरबारी केला. कोरोनाकाळातच पोलीस कर्मचारी असणारे मंगेश कांबळेही मृत पावले. प्रशासन त्यांची व कुटुंबीयांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवातीस मनाई करत होते. मात्र, किरीट सोमय्या यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेत हा प्रश्न सातत्याने लावून धरला. अखेरीस प्रशासनाने सोमय्या यांच्यासमोर गुडघे टेकत कांबळे कुटुंबीयांची कोरोना चाचणी केली. शेवटी कांबळे यांच्या पत्नीचा कोरोना अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. याबाबत सोमय्या यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून, मुंबई पोलिसांच्या देखभालीसाठी आवश्यक असणारी विशेष कृती योजना आखण्याची गरज असल्याचे सुचविले. केवळ पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांपुरते मर्यादित न राहता त्यांनी डॉक्टर आणि विविध रुग्णालयामधील कर्मचार्‍यांच्या समस्यांसाठीही शासनदरबारी आवाज उठविला. डॉक्टर्स आणि रुग्णालयातील कर्मचारी वर्गाच्या वेतनकपातीचा मुद्दाही त्यांनी उचलून धरला. यासाठी त्यांनी शासनदरबारी अनेकदा पत्रव्यवहार केला. कोरोनासारख्या महामारीच्या संकटकाळात डॉक्टर्स आणि विविध रुग्णालयांतील कर्मचारीवर्ग स्वत:चा जीव धोक्यात घालून योद्ध्यांप्रमाणे मोलाची कामगिरी बजावत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या वेतनामध्ये कपात करणे कितपत योग्य आहे? राज्य सरकारच्या या गलथान कारभाराची वाचा त्यांनी प्रसारमाध्यमांतून वेळोवेळी सर्वांसमोर फोडली.
 
 
रुग्णालयांच्या या मनमर्जीपणाच्या कामकाजाविरोधातही सोमय्या यांनी एल्गार पुकारला. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्र्यांसह आणि विविध शहरांतील महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहित, सोमय्या यांनी सरकारी आदेश दुरुस्त करण्यासाठी, तसेच ‘कोविड’च्या व्यवस्थापनाखाली अवास्तव रकमेचे बिल देऊन रुग्णांचे शोषण करणार्‍यांवर तातडीने कारवाई करण्याबाबत पत्रव्यवहार केला. एका ठिकाणी तर एका नामांकीत रुग्णालयाने १५ लाखांचे बिल भरा; अन्यथा रुग्णाचा मृतदेह देणार नाही, अशी धमकी रुग्णाच्या कुटुंबीयांना दिली. यावेळी हतबल रुग्णांच्या कुटुंबीयांनी सोमय्या यांच्याकडे ही कैफियत मांडली. सोमय्या यांनी रुग्णालय व्यवस्थापनापासून ते आरोग्य यंत्रणेपर्यंत सर्वांना याबाबत जाब विचारण्यास सुरुवात केल्यानंतर सर्व जण वठणीवर आले. रुग्णालय व्यवस्थापनाने रुग्णांच्या कुटुंबीयांना तातडीने मृतदेह सोपविण्याचा निर्णय घेतला. कोरोना महामारीच्या काळात एकही दिवस घरी बसून न राहता, सोमय्या यांनी सर्वसामान्य जनमानसासाठी दिवस-रात्र प्रशासनाविरोधात एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढा दिला. त्यामुळे किरीट सोमय्या यांचे कार्यही कोरोना योद्ध्याप्रमाणेच असून त्यांच्या कर्तृत्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम...!
 
 
- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@