urmila

मुंबई : राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले. उर्मिला यांचा भगवा मास्क यावेळी लक्षवेधी ठरला.
राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नावाची शिफारस करण्यात आल्यापासून उर्मिला मातोंडकर ह्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्या चर्चेला शिवसेनेतील काही वरिष्ठ नेत्यांनीही दुजोरा दिला होता. तसेच उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने शिवसेनेची महिला आघाडी भक्कम होणार असल्याचा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना या वादात उडी घेत उर्मिला मातोंडकरने कंगनावर टीका केली होती. त्यानंतर काही महिन्यातच उर्मिला मातोंडकर यांना खुद्द उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेची ऑफर दिली.दरम्यान, उर्मिला मातोंडकर या आज संध्याकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले. तुम्ही सर्वजण देत असलेल्या पाठिंब्याबाबत आभार. मी मंगळवारी संध्याकाळी चार वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहे. कृपया कोरोनाचे नियम पाळून उपस्थित राहा, जय महाराष्ट्र, असे आवाहन उर्मिला मातोंडकर यांनी काल केले होते.