दृष्टिपथात वरळी-शिवडी उन्नतमार्ग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2020   
Total Views |

Sewri-Worli_f_1 &nbs


मुंबईत कित्येक विकासमार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत. पण, बरेचदा मुंबईकरांनाही मुख्य काही विकासप्रकल्प सोडले, तर इतर महत्त्वांच्या प्रकल्पांची फारशी माहिती नसते. असाच एक गेले कित्येक वर्ष रखडलेला प्रकल्प म्हणजे वरळी-शिवडी उन्नतमार्ग. त्याविषयी आज सविस्तर जाणून घेऊया.
 
 
मुंबईत उत्तर-दक्षिण दिशेकडे जोडणार्‍या अनेक मुख्य रस्त्यांना, पश्चिम व मध्य रेल्वेने जोडलेले आहे. बहुतांशी मुंबईचे चाकरमानी रोज उत्तरेकडून दक्षिणेकडे कामाकरिता सकाळी निघतात व संध्याकाळी पुन्हा उत्तरेकडे परततात. परंतु, मुंबईची जेव्हा चौफेर वाढ झाली, तेव्हा पूर्वेकडील प्रदेशात पोहोचण्याकरिता पश्चिम व पूर्व प्रदेशांशी जोडायची गरज निर्माण झाली. काही वर्षांपूर्वी पूर्व-पश्चिम रस्ते, रेल्वे वा मेट्रो, असे त्या मानाने कमी होते. आता अंधेरी-कुर्ला, जोगेश्वरी-विक्रोळी, सांताक्रुझ-चेंबूर, माहिम-शीव रस्ते व अंधेरी ते घाटकोपरपर्यंत मेट्रो रेल्वे असे विविध रस्ते आणि मेट्रो मार्ग वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी फायदेशीर ठरले आहे. तरीसुद्धा पूर्वेकडील रहिवासी तसेच औद्योगिक क्षेत्र विस्तारल्यामुळे या सुविधा कमी पडतात. म्हणून ‘एमएमआरडीए’ने आता वरळी ते शिवडी पूर्व-पश्चिम मार्गांचीही भर घालण्याचे ठरविले आहे.
 
 
मुंबईच्या पूर्वेकडे मुंबई ते नवी मुंबई ट्रान्स हार्बर जोड (MTHL) पुलाचे काम ‘एमएमआरडीए’कडून सुरू आहे, त्याचप्रमाणे पश्चिमेकडे मुंबई महापालिकेकडून सागरी किनारामार्गाचे कामही सुरू आहे. पश्चिमेकडे वरळीच्या सीलिंकपर्यंत उत्तरेकडून गाड्या आल्यानंतर, त्या गाड्यांना पूर्वेकडे जाण्यासाठी वा परतण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने वरळी ते शिवडी उन्नत मार्गाचा प्रकल्प २०१२-२०१३ सालीच विचारात घेतला होता. दुसर्‍या लांबच्या मार्गाने वरळी ते शिवडीपर्यंत जाण्यासाठी ५० मिनिटे लागणार होती. परंतु, त्याऐवजी नवीन प्रस्तावित वरळी ते शिवडी मार्गाने प्रवासास फक्त दहा मिनिटे लागतील, हा आणखी एक फायदा मिळेल.
 
 
या प्रस्तावित प्रकल्पाकरिता प्रथम नेमलेल्या सल्लागाराने सर्व तरतुदींयुक्त प्रकल्प अहवाल (DPR) बनविला, तेव्हा प्रकल्पाची अंदाजे किंमत रुपये ५१७ कोटी होती. या प्रकल्पाकरिता निविदा मागविल्यावर कंत्राटदारांकडून पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने प्रकल्पाचे काम पुढे जाऊ शकले नाही. या प्रकल्पाकरिता बर्‍याच संस्थांकडून मंजुरी मिळणे बाकी होते आणि यात खूप विलंब झाला. २०१७ मध्ये दुसरा सल्लागार नेमला गेला आणि प्रकल्पाची अंदाजे किंमत रुपये १,२७६ कोटी झाली. या प्रकल्पाचा खर्च वाढला. त्याची ‘एमएमआरडीए’ने सांगितलेल्या काही कारणांवर एक नजर टाकूया.
हा जोड रस्ता डॉ. रफी अहमद किडवाई मार्गाला रेल्वे स्थानक शिवडी पश्चिमेच्या बाजूला आणि आचार्य दोंदे मार्गाला चढ-रस्त्याने (ramps) जोडणे जरुरी ठरले व तो चढ बांधण्याच्या खर्चाचा समावेश करावा लागला; प्रभादेवी स्थानकावरचा एकेरी मार्गाचा पूल पाडून त्या जागी दोन मार्गिकांचा पूल बांधावा लागला. या अशा जोडरस्त्याच्या कामाला सिमेंट काँक्रीटच्या जागी पोलादी गर्डरचे बांधकाम उपयोगात आणावयाचे ठरवले गेले, या अंदाजखर्चात १२ टक्के जीएसटीचा खर्चही वाढला.
 
 
पश्चिम-पूर्व वाहतूककोंडी कमी करणारा प्रस्तावित चार मार्गिकांचा साडे चार किमीचा उन्नत मार्ग बांधण्यासाठी वरळीच्या बाजूस १९५ मी. व शिवडीच्या बाजूस २५५ मी. अंतर जोडायचे होते. २०१८ मध्ये सर्व तरतुदींच्या समावेशाने प्रकल्पाची किंमत रुपये १,२७८ कोटी होत होती. या मार्गास सरकारकडून मंजुरी मिळूनही पर्यावरणाच्या मुद्द्यावरून प्रशासनास नागरिकांच्या रोषास तोंड द्यावे लागले होते.
 
 
उन्नत मार्गाचा वरळी येथील भाग सागरी हद्द नियंत्रण (CRZ-2) कायद्या-अंतर्गत येत होता. दक्षिण मुंबईतील दाटीवाटीच्या वस्तीतून हा मार्ग जात असल्याने या प्रकल्पाचे काम अवघड बनले आहे. या कामासाठी अनेक संस्थांच्या (मुंबई पोर्ट ट्रस्ट, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, वाहतूक विभाग आणि मुंबई महापालिकेचे वृक्ष प्राधिकरण) मंजुरी मिळणे आवश्यक ठरले. नागरिकांच्या विविध सूचनांमध्येही हा शिवडी-वरळी मार्ग प्रस्तावित किनारी मार्ग व ‘एमटीएचएल’ मार्गांना जोडावा, अशी मागणी जनसुनावणीतही आली होती.
 
या सर्व मंजुरी मिळाल्यावर साडे चार किमी चार मार्गिकांच्या प्रस्तावित प्रकल्पाच्या उन्नत रस्त्याचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली. अलीकडच्या ताज्या वृत्ताप्रमाणे, या प्रकल्पाच्या चालकपदी असलेल्या ‘एमएमआरडीए’ या संस्थेकडून निविदा मागविणे वगैरे कामे पुरी केल्यानंतर ‘जे. कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड’ या कंत्राटदाराकडे हे काम देण्याचे ठरले.
 
 
‘एमएमआरडीए’ने या जे. कुमार कंत्राटदाराला प्रकल्पाकरिता रचना व बांधकाम करणे व त्याचा अंदाजे खर्च रुपये १,२७६ कोटी ठरल्याचे व त्यानी ते काम तीन वर्षांत पूर्ण करणे जरुरी आहे, असे अनुमती पत्र (LOA) नोव्हेंबर २०२० मध्ये दिले आहे. कंत्राटदाराला ‘राज्य पर्यावरण प्रभाव विश्लेषण प्राधिकरणा’कडून (SEIAA) मंजुरी मिळाल्यावर प्रकल्पाच्या स्थापत्यकामाला सुरुवात करता येईल. साधारणपणे ४३८ मी. जमीन रस्त्याच्या दोन्ही टोकांच्या ‘सीआरझेड-२’ मध्ये असल्यामुळे सागरी खबरदारी घेणार्‍या संस्थेकडून रीतसर परवानगी मिळविणे जरुरी आहे.
 
 
या निर्देशित केलेल्या कंत्राटदारांनी निविदांमध्ये सर्वात कमी किंमत दिली आहे. उर्वरित निविदाकार ‘एल अ‍ॅण्ड टी’, ‘एनसीसी लिमी’ आणि ‘अफ्कॉन इन्फ्रास्ट्रक्चर’ असे होते. शहराला पूर्व-पश्चिम भाग जोडणारा आणि वांद्रे-वरळी सागरी मार्ग आणि शिवडी-चिर्ले ट्रान्स हार्बर मार्गांना जोडणारा वरळी-शिवडी उन्नत मार्ग प्रकल्प सात वर्षांनी मार्गी लागत आहे. या जोडरस्त्याचे काम शिवडी (पूर्व) रेल्वे स्थानकाजवळ सुरू होऊन, पुढे काही रेल्वे वा रस्ते ओलांडावे लागणार आहेत-पूर्वेकडील मुक्त मार्ग, हार्बर रेल्वे मार्ग, आर. ए. किडवाई मार्ग, आचार्य दोंदे मार्ग, आंबेडकर मार्गावरील उड्डाणपूल, परळचा एल्फिन्स्टन पूल, सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपूल, कामगारनगरमधून प्रवेश, डॉ. अ‍ॅनी बेझंट रोड ओलांडून शेवटी हा प्रस्तावित उन्नत रोड वरळीच्या नारायण हर्डीकर मार्गाला जोडला जाईल.
 
या प्रस्तावित साडे चार किमी लांब उन्नत मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर अंदाजाप्रमाणे २० हजार रोजच्या वाहनांच्या वाहतुकीची सोय होऊ शकते. हा मार्ग म्हणजे, एक लांब असा जोडपूल होणार आहे व तो अनेक उंच पुलांवरून व मोनोरेलवरून जाणार असल्याने तो एक गगनचुंबी ३२ मी. उंचीचा (दहा माळे उंचीचा) बनेल आणि वरळी, एल्फिन्स्टन रोड, परळ व शिवडी भागातून जाईल. या नवीन पुलामुळे २० इमारती (निवासी व व्यावसायिक) बाधित होणार आहेत. त्या इमारतीबाधितांच्या कामाकरिता काही कोटी खर्च येणार आहे.
 
जमिनीचा भाव वधारणार
 
हा प्रस्तावित मार्ग दक्षिण मुंबईत बांधला जाणार आहे व तेथील सध्याचा निवासी इमारतींच्या मालमत्तेचा दर चौ. फुटाला जास्त आहे. महालक्ष्मी स्थानकाजवळ, जेकब सर्कलला तो रुपये ३७ हजार, भायखळ्याला तो रुपये २५ हजार आहे. या जोडरस्त्याचे काम झाल्यावर तो आणखी वाढणार आहे.


शिवडी-वरळी मार्गाकरिता जनसुनावणी
 
या प्रस्तावित प्रकल्पासाठी लोकांनी डिसेंबर २०१९ पर्यंत सूचना व तक्रारी ‘एमएमआरडीए’च्या कार्यालयात द्यावयाच्या होत्या. त्यानंतर जनसुनावणी ७ जानेवारी, २०२० ला ‘एमएमआरडीए’च्या कार्यालयात झाली, तेव्हा पर्यावरणप्रेमी, स्थानिक लोक तसेच प्रकल्पबाधित उपस्थित होते. किती झाडे तोडणार? किती झाडांचे पुनर्रोपण करणार? पुनर्वसन कसे करणार? आदी प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. शिवाय हा मार्ग लवकर बांधावा, असे ठरले.
 
‘एमटीएचएल’ प्रकल्पाची प्रगती व सागरसेतूचे काम
 
 
२२ किमी लांब असलेल्या ‘एमटीएचएल’ प्रकल्पाचे काम २७ टक्के पूर्ण झाले आहे. ‘टाळेबंदी’मुळे हे काम सहा महिन्यांनी रखडले आहे. ‘एमएमआरडीए’ने स्पष्ट केले की, ‘ऑर्थोट्रॉपिक स्टिल डेक’ (OSD) पुलाच्या १८० मी.पर्यंतच्या गर्डर-अंतरापर्यंत सस्पेन्शन केबलशिवाय बसविले जात आहेत. असे काम काँक्रीट पुलांकरिता करणे अवघड असते. ‘प्रीफॅब्रिकेटेड स्टिल डेक’ समांतर व वेगाने बसविणे सोईचे बनते. पुलाच्या प्रत्येक भागात ओएसडीची लांबी ४.१ किमी व रुंदी १५.८ मी. राहणार आहे. एकूण ओएसडीकरिता लागणारे स्टिल ८५ हजार मे. टन असणार आहे. हे स्टिल डेक जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, तैवान व म्यानमार येथे बनविले जाणार आहे व त्यांची शेवटची जोडणी भारतात होईल. पुलाच्या साईटवर ओएसडी स्टिल बसविण्याचे काम एप्रिल २०२१ पासून सुरू करण्याचे ठरले आहे. हे काम फार जोखमीचे; परंतु चित्तवेधक होणार आहे.
प्रस्तावित वरळी-शिवडी मार्गाचे काम अवघड स्वरूपाचे आहे. कारण ते दहा माळ्यांच्या इमारतीएवढे उंच होणार म्हणून त्या भागात थोडे आकर्षण राहणार आहे. हे जोखमीचे काम करताना सावधगिरीने करणे जरुरी आहे. पण, हे दोन्ही प्रकल्प मार्गी लागल्यास मुंबईची गती आणखीन वाढण्यास मदत होईल, हे निश्चित!



@@AUTHORINFO_V1@@