खान-बाजवा युती संकटात?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2020   
Total Views |

Imran Khan_1  H
 
 


पाकिस्तानात सध्या इमरान खान सरकार आव्हानांचा सामना करीत आहे. गेल्या चार महिन्यांपासून सरकारविरोधी पक्षांनी इमरान खान सरकारविरोधात केलेली युती, कराचीसारख्या शहरात निघालेले लाखोंचे मोर्चे, मौलाना डिझेलसारख्या भडकाऊ नेत्याकडे तूर्तास असलेले विरोधी पक्षाचे नेतृत्व, यामुळे पाकिस्तानचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच आलेले कोरोनासंकट हे एक आव्हान इमरान खान सरकारपुढे आहेच.
 
 
 
एकत्र आलेल्या विरोधी पक्षांनी इमरान खान सरकारविरोधात निर्णायक अशा बहुस्तरीय आंदोलनाची आखणी केली आहे. त्यामध्ये संपूर्ण देशभरात आंदोलने करणे आणि अखेरीस २०२१ साली इस्लामाबाद या पाकिस्तानच्या राजधानीमध्ये निर्णायक लाँग मार्च काढणे, असा विरोधकांचा मनसुबा आहे. या सर्वांचा सामना करताना इमरान खान सपशेल अडकल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
 
 
अर्थात, विरोधकांचा लढा हा इमरान खान सरकारविरोधात नसून, पाकिस्तानची खरी सत्ता ताब्यात ठेवणार्‍या पाकिस्तानी लष्कराविरोधात आहे. कारण, अगदी सुरुवातीपासून म्हणजे पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासूनच लष्कराने आपला वरचष्मा कायम ठेवला. त्यामुळे सत्तेत येण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाला लष्कराची मदत घ्यावीच लागते, इमरान खानदेखील लष्कराच्या मेहेरबानीनेच सत्तेत आल्याचा आरोप विरोधक करीत असतात.
 
 
इमरान खान सरकारने आता माजी सैन्याधिकारी लेफ्टनंट जनरल असीम सलीम बाजवा यांना पंतप्रधानांच्या माध्यम समन्वय टीमचे प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे तो म्हणजे, पाकिस्तानी प्रसारमाध्यमांना नियंत्रित करण्याचे काम आता पाक लष्कर करणार आहे. सध्याचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी तर पाकिस्तानी सरकारवर एवढे नियंत्रण मिळविले आहे की, सध्या अप्रत्यक्षपणे पाकमध्ये ‘मार्शल लॉ’ लागू करण्यात आला आहे, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार आहे.
 
 
कारण, इमरान सरकारमध्ये नागरी उड्डयन, आरोग्य, ऊर्जा या नियामक आयोगांच्या अध्यक्षपदी विद्यमान अथवा निवृत्त लष्करी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातच जनरल बाजवा यांचा कार्यकाळही तीन वर्षांसाठी वाढवून लष्कराची पकड ढिली होणार नाही, याची पुरेपूर तरतूद पाक लष्कराने करवून घेतली आहे. मात्र, विरोधी पक्षांच्या युतीने आता इमरान खान-जनरल बाजवा यांच्या युतीविरोधात कंबर कसली आहे. गुजराँवाला, कराची आणि पेशावर या तीन शहरांमध्ये विरोधकांनी काढलेल्या विशाल रॅलीमध्ये थेट पाक लष्कराला लक्ष्य करण्यात आले. इमरान खान सरकार हे लष्कराच्या हातातील बाहुले असल्याच्या विरोधकांच्या आरोपाला आता जनतेचाही पाठिंबा मिळत आहे, हे या तीन शहरांमधील रॅलीमध्ये दिसून आले आहे.
 
 
माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी लंडनमधून एक व्हिडिओ संदेश पाठविला. त्यामध्ये त्यांनी म्हटले, “आपली लढाई इमरान खानविरोधात नाही, तर ज्या लोकांनी एका वकूब नसलेल्या नेत्याला देशाच्या पंतप्रधानपदी बसविले, त्यांच्याविरोधात आपली लढाई आहे. ज्या लोकांमुळे देशात अराजक पसरले, त्यांच्याविरोधात आपला लढा आहे.” याद्वारे नवाझ शरीफ यांनी थेट लष्करालाच आव्हान दिले आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षांनी आपला सूर बदलून केवळ इमरान खान सरकारला लक्ष्य न करता पाक लष्कराविरोधातही मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता इमरान खान-जनरल बाजवा युतीपुढे आव्हान उभे राहिले आहे.
 
 
इमरान खान सरकारविरोधात आता विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या मुलीही सहभागी झाल्या आहेत, त्यामुळे याचाही मोठा परिणाम बघावयास मिळेल. मुलतान शहरात झालेल्या विरोधी पक्षांच्या आंदोलनामध्ये नवाझ शरीफ यांची मुलगी आणि मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाची नेता मरियम नवाझ शरीफ आणि ‘पाकिस्तान पीपल्स पक्षा’चे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची कन्या असिफा भुट्टो आणि झरदारीदेखील सहभागी झाल्या. सध्या लंडनमध्ये असणारे नवाझ शरीफ, हवालाप्रकरणी तुरुंगात असणारे त्यांचे शाहबाज शरीफ, भ्रष्टाचाराचे आरोप असणारे आसिफ अली झरदारी आणि पाक राजकारणात महत्त्वाचे न ठरलेले बिलावल भुट्टो यामुळे विरोधी पक्षांच्या एकजुटीला भक्कम पाठबळाची आणि चेहर्‍याची भासणारी कमतरता मरियम आणि असिफा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@