
सातारा : राज्यातील विधानपरिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदार संघांसाठी आज मतदान पार पडत आहे. पुणे पदवीधर मतदार संघातून अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांना मतदानाआधीच धक्का बसला आहे. बिचुकले यांचं मतदार यादीतून नावचं गायब झालं आहे. यामुळे बिचुकले यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेपुणे पदवीधर मतदार संघातून अपक्ष उमेदार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेज याठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले होते. मतदार यादीत बिचुकले यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले यांचं नाव होतं. पण त्यांच्या नावाखाली अभिजीत यांचं नाव नसून नारायण बिचुकले असे दुसऱ्याच व्यक्तीचे नाव होते.यानंतर अभिजीत बिचुकले यांनी मतदान यादीत नाव नसल्याचे समजल्यानंतर काही वेळ बूथवर गोंधळ घातला आहे.
"मी उमेदवार असून माझं नाव यादीत नाही, तर सर्वसामान्यांचं काय? कोणीही येऊन इथं मतदान करेल. सर्व आपले बंधूभाव आहेत. मी कधीही जातीवर राजकारण केलं नाही. यांनी स्वत:ची नावं लिहीली. माझी नोंदणी झाली आहे. बायकोचं नाव आहे. पण माझं नाही. मी उमेदवार आहे. त्यामुळे मला मतदानापासून आता वंचित राहावं लागणार आहे. हा निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार आहे. निवडणूक आयोग अशाच प्रकारे जर काम करणार असेल तर सगळं अवघड आहे", असं अभिजीत बिचुकले म्हणाले.
अभिजीत बिचुकले यांनी यावेळी या सगळ्याचं भाजपवर खापर फोडलं. "निवडणूक आयोग नेमका कशा फॉलोअप घेत होते याची मला माहिती नाही. पण यात काहीतरी षडयंत्र आहे. उमेदवाराचं नाव नसणं हा भोंगळ कारभार नाही का? यामागे कोणता पक्ष आहे, हे यात शोधलं पाहिजे. भाजपने या सगळ्या याद्या बनवल्या आहेत'', असा थेट आरोप अभिजीत बिचुकले यांनी केला आहे.