शिवसेनेला गोडी ‘अजान’ची!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2020
Total Views |

Uddhav Thackeray_1 &

 


भगव्याला सोडून हिरव्याला गुंडाळण्यासाठी तत्पर असलेल्या शिवसेनेने अजान स्पर्धेची घोषणा करूनच थांबू नये, उलट शिवसेना भवन वा ‘मातोश्री १, २’ आणि मुंबईसह राज्यभरातल्या शाखाशाखांमध्ये भोंगे लावावेत आणि दररोज पाच वेळा नमाज पढावी, अजान द्यावी, जेणेकरून शिवसेनेच्या धर्मनिरपेक्षतेचा खुंटा आणखी बळकट होईल.
 
 
 
वर्षभरापूर्वी महाराष्ट्राच्या सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करणार्‍या शिवसेनेने आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे गेल्या ३६५ दिवसांत सातत्याने दाखवून दिले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वारंवार माघार घेणार्‍या शिवसेनेने पालघरमधील साधू हत्याकांडाच्या निष्पक्ष चौकशीसाठी कधी जोर लावला नाही, तसेच अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीस्थळी उभारण्यात येणार्‍या श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा साध्या पद्धतीने करा, असा शहाजोग सल्लाही दिला.
 
 
 
मुंबईच्या मानखुर्द भागात राहणार्‍या करिश्मा भोसले या हिंदू मुलीने मशिदींवरील भोंग्याच्या आवाजाचा त्रास होतो म्हणून तक्रार केली, तर तिची तत्काळ दखल घेण्याचे सौजन्यही कथित ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्‍यांनी दाखविले नाही. त्याच वेळी कोरोनानंतर ‘अनलॉक’ प्रक्रियेंतर्गत सर्व आस्थापना सुरू करताना ऐन दिवाळीतही देवाला मंदिराच्या कडी-कोयंड्याआड बंद करून ठेवण्याचे काम शिवसेनेने केले. मात्र, तेवढ्यानेही भागले नाही म्हणून की काय, शिवसेनेने आता थेट ‘अजान स्पर्धा’ भरविण्याचीच तयारी केली.
 
 
 
शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी ‘बसीरत ऑनलाईन’ला दिलेल्या मुलाखतीत अजानचे तोंडभरून कौतुक केले, तसेच “अजानमध्ये फार गोडवा असतो, माझ्या दिवसाची सुरुवात मी अजान ऐकूनच करतो,” असेही ते म्हणाले. इतकेच नव्हे, तर “अजानला विरोध करणारे हिंदू-मुस्लीम एकतेचे विरोधक असून, त्यांचे स्थान मिठासारखे आहे,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
 
मात्र, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार्‍या पांडुरंग सकपाळ यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मशिदींवरील भोंग्यांबाबतची भूमिका ठाऊक नाही का? बाळासाहेब ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांतून कर्णकर्कश आवाजात दिल्या जाणार्‍या बांगेचा सातत्याने विरोध केला. पण, आता त्यांचाच मुलगा आणि नातू व त्यांच्या हाताखालचेही बाळासाहेब ठाकरेंनाही एकतेच्या आड येणारा मिठाचा खडा म्हणू लागले. शिवसेनेचे याहून निराळे अधःपतन काय असू शकेल?
 
 
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत सरकार स्थापन झाल्यापासून सातत्याने, “आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही,” असे सांगत आले. पण, शिवसेनेने सत्तेसाठी लाज सोडली त्याचे काय? “मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे का,” असे संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. पण, मुस्लीम मतांच्या आणि सत्तेच्या लाचारीपायी स्वतःला धर्मनिरपेक्ष दाखविताना शिवसेना पांडुरंग सकपाळांच्या विधानांतून नागवी झाली त्याचे काय?
 
 
 
पांडुरंग सकपाळ यांच्या तोंडातून शिवसेना फक्त हिंदुत्वाचा आव आणू शकते, प्रत्यक्षात ती असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमपेक्षाही कट्टर इस्लामी झाल्याचेही स्पष्ट होते. तसेच आमचे हिंदुत्व अमके नाही, आमचे हिंदुत्व तमके नाही, आमचे हिंदुत्व मंदिरात घंटा बडविणारे नाही, असे आरडाओरडा करून सांगणार्‍या शिवसेनेने आपले हिंदुत्व ‘अजान स्पर्धे’चे आयोजन करणारे असल्याचे मात्र रोखठोक सांगितले. पण, भगव्याला सोडून हिरव्याला गुंडाळण्यासाठी तत्पर असलेल्या शिवसेनेने ‘अजान स्पर्धे’ची घोषणा करूनच थांबू नये, उलट शिवसेना भवन वा ‘मातोश्री १, २’ आणि मुंबईसह राज्यभरातल्या शाखाशाखांमध्ये भोंगे लावावेत आणि दररोज पाच वेळा नमाज पढावी, अजान द्यावी, जेणेकरून शिवसेनेच्या धर्मनिरपेक्षतेचा खुंटा आणखी बळकट होईल.
 
 
 
दरम्यान, शिवसेनेसाठी हिंदुत्व किंवा कोणतेही तत्त्व महत्त्वाचे नसून, फक्त सत्ता महत्त्वाची असल्याचेही या सगळ्यातून दिसून येते. कारण, भाजपबरोबर २५ वर्षे युतीत राहताना शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्वाचे नाव घेत हिंदू मतांवर पद्धतशीर डल्ला मारला. पण, ‘गरज सरो नि वैद्य मरो’ या उक्तीप्रमाणे आता शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोठ्यात गेली. भाजप सोबत असताना सत्तास्थानी येण्यासाठी हिंदुत्व हा शिवसेनेचा गोंद होता, तर आता दाढी कुरवाळू धर्मनिरपेक्षता तिच्यासाठी सत्तेचा गोंद झाला. तेव्हा हिंदू मतांवर विसंबून राहण्यापेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष मतांवर डल्ला मारू, असा विचार तिने केला.
 
 
 
 
कारण, शिवसेनेला फक्त सत्ता मिळण्याशी मतलब, मग कोलांटउडी, पलटी मारायची वेळ येवो; अथवा आपल्याच भूमिकांचे थडगे बांधायची वेळ येवो, शिवसेना सत्तेसाठी ते करणारच. बाळासाहेब ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारी संघटना म्हणून शिवसेनेची स्थापना केली. पण, आजच्या शिवसेनेच्या कर्त्याधर्त्यांनी शिवसेनेला पार मोगलांच्या विचारांवर आणून ठेवले. एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या दुसर्‍या-तिसर्‍या पिढीत कर्तबगारीचा र्‍हास होतो, असे म्हणतात, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंकडे पाहिले की, हे विधान चांगलेच पटते.
 
 
शिवसेनेवर ‘अजान स्पर्धा’ भरविण्याची वेळ का आली, याचे उत्तर आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दडले आहे. महापालिकेची सत्ता वर्षानुवर्षे बळकावून ठेवणार्‍या शिवसेनेने मुंबईकरांसाठी भावनिक खेळाव्यतिरिक्त दुसरे काहीही केले नाही. अशा शिवसेनेला मुंबईकरांनी गेल्या महापालिका निवडणुकीत इंगा दाखविला, यामुळे धास्तावलेल्या शिवसेनेला यापुढे महापालिका आपल्या ताब्यात राहील की नाही, ही चिंता सतावते आहे. कोरोनाकाळात तर शिवसेनेने मुंबईतील आरोग्य व्यवस्थेची पुरती वाट लावली नि साध्या साध्या सोयी-सुविधांसाठी मुंबईकर मेटाकुटीला आले. त्यातच वर्षभरापासून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी संधान बांधून मिळविलेल्या सत्तेमुळेही मतदारांच्या मनात शिवसेनेबद्दल नाराजीच आहे.
 
 
मात्र, आपल्या तत्त्व व भूमिकांवर ठाम राहून मतदारांतली नाराजीची भावना पलटवून लावण्याची धमक शिवसेना नेतृत्वात अजिबात नाही. किंबहुना, आपल्या मतदारांचा सामना करण्याचीही हिंमत शिवसेना गमावून बसलेली आहे. अशा परिस्थितीत मुंबई महापालिकेत शिवसेनेचे पंचप्राण असल्याने ते सांभाळायचे, तर खिचडी सोडून मोगलाई बिर्याणी शिजवावी लागेल, हे शिवसेनेला समजले. परिणामी, शिवसेना कामाला लागली आणि हिंदूंना वार्‍यावर सोडून मुस्लिमांना जवळ करू लागली. महत्त्वाचे म्हणजे, या लांगूलचालनातले पांडुरंग सकपाळ केवळ बाहुले आहेत आणि खरे कलाकार तर कलानगरला बसलेले आहेत.


@@AUTHORINFO_V1@@