आजारावर इलाज आरामाचा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2020
Total Views |
illness_1  H x
 


आजार कोणताही असो, काळजी घेतली, आराम केला, पथ्य नीट सांभाळले, शरीराला योग्य तो वेळ दिला तर ते स्वतः स्वतःचे दुरुस्त होते. हे खरं आहे ना? मग आपण उगाचच केवळ बिंबवलं गेले आहे म्हणून मानसिक त्रास करून घेऊन, कमकुवत होऊन संपून जाण्यात काय अर्थ आहे?



मन आणि शरीर हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शरीरात बिघाड झाला की मनात होतो आणि मनात बिघाड झाला की, त्याचे परिणाम शरीरावर उमटलेले दिसतात. चुकीच्या आहारांनी जसं शरीराचं तंत्र बदलतं, तसं एखादी गोष्ट सतत बिंबवली गेली तर मनाच तंत्र बिघडतं. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास दृढ असावा, मग परिस्थिती कोणतीही असो, त्यावर सहजच मात करता येते. तुमच्या भोवतालची परिस्थिती तुम्ही सहज बदलू शकता इतकी मनाची ताकद आहे, क्षमता आहे. आपल्या अवतीभवती आपण अभ्यास केला तर अशी अनेक उदाहरणं दिसून येतील. म्हणून निसर्गोपचारात याला प्रथम प्राधान्य दिले आहे. असाध्य रोगांवर हा रामबाण उपाय आहे. आतापर्यंत कॅन्सर, मधुमेह यांसारख्या आजारांनी माणूस खचून जात होता. पण, त्यावर उपाय आहेत, औषधे आहेत, हा आधार होता. पण, आज कोरोनामुळे बाकी सर्व आजारांचे जणू विस्मरण झाले आहे. लोकं, जी इतर आजारात येऊन भेटत तरी होती. पण, या आजाराने नातीमैत्री सगळं तोडून टाकले आहे. हे माहीत आहे की, यावर औषध नाही, तरी लोकं बरी होत आहेत. कारण काय तर तुमची प्राणशक्ती, तुमची प्राणशक्ती जर उत्तम असेल, तर तुम्हाला हा आजार होण्याची शक्यताच नाही आणि झालाच तरी सहच बाहेर पडाल. फक्त दहा ते २१ दिवस आराम करणे गरजेचे आहे. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. रसाहार घेत राहिला तर सहज मात करता येते. जोडीला काही यौगिक क्रिया करणे आवश्यक आहे. श्वासावर नियंत्रण ठेवणे, लक्ष ठेवणे आवश्यक आहे. काही लक्षात येतंय का? आजार कोणताही असो, काळजी घेतली, आराम केला, पथ्य नीट सांभाळले, शरीराला योग्य तो वेळ दिला तर ते स्वतः स्वतःचे दुरुस्त होते. हे खरं आहे ना? मग आपण उगाचच केवळ बिंबवलं गेले आहे म्हणून मानसिक त्रास करून घेऊन, कमकुवत होऊन संपून जाण्यात काय अर्थ आहे?



निसर्गोपचारासारखे दुसरे उत्तम काही नाही जे विनाऔषधी सक्षमपणे बरे होण्यास मदत करते. यामध्ये विविध प्रकारच्या चिकित्सा वापरून रोग्याला शारीरिक आणि मानसिकरीत्या सक्षम ठेवण्यास मदत करते आणि आत्मविश्वास वाढवून बरे करते. थोडक्यात सांगायचे झाले, तर तुम्ही तुमच्या आत डोकवत जा, कितीही काम असू दे, जगण्यासाठी एखादा तरी छान असा छंद जोपासा, जो तुमची आत्मिक शक्ती, ताकद वाढविण्यास, नियमित ठेवण्यास मदत करेल. कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करेल. यामध्ये संगीत ही उत्तम चिकित्सा आहे. जे ऐकल्याने मन शांत होते. झोप शांत लागते, ताणतणाव हलके होतात आणि ते दूर होण्यास मदत होते. दुसरं म्हणजे, मोकळ्या हवेत फिरणे, यानेही मनाला, शरीराला ऊर्जा मिळते, ओंकार साधना प्रकृतीशी, वैश्विक शक्तीशी जोडण्यास, ऊर्जा, प्राणशक्ती वाढविण्यासाठी अतिशय उत्तम मार्ग आहे. ज्याच्या उच्चारांनी चैतन्याचा झरा शरीरात आणि मनात निर्माण होतो. दोघांचं संतुलन साधलं जातं. पर्यायाने आपण आपल्याला झालेल्या आजारावर सहज मात करू शकतो. याच्या जोडीला लंघन किंवा रसाहार खूप छान काम करतो. पेशींना नवीन ऊर्जा मिळते आणि सक्षम होऊन लढण्याची क्षमता निर्माण होते आणि आजारावर मात करण्यासाठी मदत होते. मन चांगल्या विषयात गुंतवणे हा सर्व गोष्टींसाठी उत्तम उपचार किंवा उपाय आहे, असं म्हणता येईल.



आता हेच पाहा ना! आता थंडी सुरू होईल आणि पर्यायाने त्या ऋतूतील आजार, म्हणजे सर्दी, खोकला, ताप, श्वासाचे विकार वगैरे हे नैसर्गिक आहे. पण, मनामध्ये कोरोनाविषयी जी भीती आहे, तिच्यामुळे त्रास वाढण्याची शक्यता आहे. आज कोणी शिंकलं, खोकलं तर जग दहा हात लांब जातं. पण, हे का नाही लक्षात घेत की, पाठीवरून फिरणारा आश्वासक हात मनाला उभारी देऊन जातो, सक्षम करतो, लढण्याची क्षमता वाढवितो. तेव्हा खचून, घाबरून न जाता सक्षम व्हा, मानसिक क्षमता वाढवा. एकमेकांना आधार द्या. आजारी व्यक्तीला तू ठणठणीत आहेस, फक्त आराम कर, मस्त झोप काढ, शरीराची झीज आपोआप भरून येईल, असे म्हणून बघा, त्याला किती छान वाटतं ते. आपली आजी, आई सगळे सांगायचे बघा, लहान बाळ जितके शांत झोपेल, तितकी त्याची वाढ चांगली होईल. झोपेत आपले मन, मेंदू शांत असतो. ते जितके शांत, तितकी झीज लवकर भरून येते. याकरिता ‘मंत्रसाधना’ हा उत्तम पर्याय आहे. म्हणून पूर्वी संध्याकाळी तिन्ही सांजेला शुभंकरोती, रामरक्षा यांसारखी स्तोत्र, मंत्र, श्लोक म्हणण्याची प्रथा होती. ज्यांनी मनाला शांती मिळते. जसे अंगणात पाण्याचा किंवा शेणाचा सडा घातला तर धूळ उडत नाही, बसते. तेच काम श्लोक, स्तोत्र, मंत्र करतात. मनात उठणार्‍या अनेक वादळांचं, विचारांचं शमन करण्याचे ते एक उत्तम औषध आहे. थंडी हा ऋतू आपली प्राणशक्ती, ऊर्जा वाढविण्यासाठी उत्तम ऋतू आहे. याकाळात वातावरण आल्हाददायक असते, भूक छान लागते, अन्नपचनही इतर वेळेपेक्षा चांगले होते. आपण जरा अभ्यास केला, तर प्रत्येक ऋतूत त्या ऋतूला आवश्यक असणार्‍या भाज्या, फळं यांची निर्मिती होत असते. त्या त्या ऋतूतील भाज्या, फळं यांचा जास्तीत जास्त आहारात समावेश केला गेला, तर त्या-त्या ऋतूतील होणारे त्रासही होत नाहीत. हिवाळ्यात पालेभाज्या जास्त प्रमाणात येतात, शरीराला कमी पडणार्‍या पोषक तत्त्वांची पूर्तता यामुळे होते. हिवाळ्यात पाणी कमी प्यायले जाते, त्यामुळे मलावरोध होऊ शकतो. अशावेळी पालेभाज्यांचे प्रमाण आहारात वाढविले, तर पोट साफ होण्यास मदत होते, गाजरेही याच कालावधीत येतात जी रेषेदार असतात आणि रेषेदार आहार हा मल बांधून येण्यास मदत करतो. संत्री, मोसंबी, पेरू, आवळा सर्वच शरीराला कमी पडणार्‍या घटकांची पूर्तता करतात.
या ऋतूत वाताचा जोर जास्त असतो. हाता-पायाला मुंग्या येणे, पायात गोळे येणे, कंबरदुखी वगैरे विकार जोर धरतात. अशा वेळी जर रात्री झोपताना सुंठ पावडर आणि वेखंड पावडर समप्रमाणात एकत्र करून हाता पायाला कोरडीच लावली, तर मुंग्या येणे, गोळा येणे, यासारखे त्रास जाणवणार नाहीत. कंबरदुखी, सांधेदुखीसाठी जर मेथी आणि गुळाचे लाडू रोज दोन खाल्ले तर थंडी संपेपर्यंत तर सांधे आखडण्याचा त्रास जाणवणार नाही. डिंक, हळीव, यांचेही लाडू शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात आणि पौष्टिकताही. तेही योग्य प्रमाणात या काळात खावे.



शरीराला ऊर्जेची, उष्णतेची गरज असते म्हणून याच कालावधीत हुरडा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. बाजरीची भाकरी आणि लोणी हेसुद्धा याकाळात उपयुक्त आहे. शेंगदाण्याची चटणी किंवा लसणाची चटणीही योग्य प्रमाणात या काळात खावी. आवडते म्हणून भाजीप्रमाणे खाऊ नये. या काळात शरीराला स्नेहनाची गरज असते. ऑक्टोबर हीट संपून थंडी सुरू होते. यासाठीच कार्तिक स्नान पहाटे उठून गार पाण्याने आंघोळ सांगितली आहे. शरीरात मुरलेली उष्णता कमी करण्यासाठी केलेली धार्मिक उपाययोजना. या काळात त्वचेची विशेषतः काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूत त्वचाविकार बळावतात, त्वचा कोरडी पडते, रुक्ष होते, म्हणून तेलाने मसाज करून डाळीचे पीठ लावून सुगंधित वनस्पतींनी (मनाचा उल्हास वाढविणार्‍या) स्नान सांगितले आहे. त्यातून वाढलेल्या उष्णतेचे शमन, पित्ताचे शमन तसेच त्वचेस आवश्यक असलेले पोषक घटक मिळण्यास मदतच होते. गुलाबजल, ग्लिसरीन आणि लिंबू रस यांचे मिश्रण रात्री झोपताना शरीरास लावले, तर त्वचेचे रक्षण होते. त्वचेला मऊ, मुलायमपणा येतो. बाळ हरडा आणि छोटी पिंपळी (लेंडी पिंपळी) यांची पावडर समप्रमाणात घेऊन सकाळ-संध्याकाळ गरम पाण्यासोबत घेतली तर सर्दी, खोकला, दमा यांसारखे विकार होत नाहीत. खूपच श्वास लागला तर गरम पाण्यात पाय बुडवून ठेवले तर श्वासाचा जोर कमी होण्यास मदत होते. तसेच कोबीच्या पानांची वाफ घ्यावी, जी सर्दीसाठी उपयुक्त असते, कफ मोकळा होतो. खोकल्यासाठी पडवळाचा रस खूप उत्तम आहे. तसेच सुंठ-गुळाची गोळी किंवा आल्याची वडी (आलेपाक) तोंडात ठेवायला हरकत नाही. ओठांना साय अथवा मध लावावा, म्हणजे मऊपणा येईल.शक्यतो सुती कपडे परिधान करावे, कानाला रुमाल अथवा मफलर,  कानटोपीने झाकावे. हिवाळ्यात होणारे त्रास दूर राहतील, करून बघा, नक्कीच उपयोग होईल. शरीर आणि मन यांचे संतुलन ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे. म्हणून ते संतुलित ठेवा, सकारात्मक ठेवा, आजारी पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.शेवटी एकच सांगेन, मानवता हा धर्म आहे, तो जपण्याचा प्रयत्न करा. आज प्रत्येक व्यक्तीला सावरण्यासाठी मानसिक आधाराची गरज आहे, समजून घ्यायची गरज आहे, कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या तणावाखाली वावरत आहे. काळजी करू नका, काळजी घ्या आपली आणि दुसर्‍याचीही.


- सीता भिडे
 
@@AUTHORINFO_V1@@