वेळीच सावध व्हा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2020
Total Views |

suryakumar_1  H



सूर्यकुमारला जर आपल्याआधी इतर देशाने संधी दिली आणि ती त्याने स्वीकारली, तर हा मोहरा भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणे शक्य होणार नाही.सूर्यकुमार हा मुंबईकर खेळाडू आहे. आजवर मुंबईच्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावल्याचा इतिहास आहे. त्यामुळे सूर्यकुमारही नक्कीच उत्तम कामगिरी करेल, यात शंका नाही, म्हणूनच त्याला लवकरात लवकर संधी मिळणे गरजेचे असल्याचे क्रिकेट समीक्षकांचे म्हणणे आहे.



इंडियन प्रीमिअर लीग’ (आयपीएल) ही जगप्रसिद्ध स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असतानाच, ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’च्या (बीसीसीआय) निवड समितीने गेल्या आठवड्यात आपल्या आगामी ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी भारतीय संघाच्या नावांची यादी जाहीर केली. या यादीत सामील असणार्‍या खेळाडूंच्या नावावरून रणकंदन माजले. भारताचा माजी उपकर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला संघातून अचानकपणे वगळून त्या जागी नवख्या लोकेश राहुलला संधी दिल्यामुळे सुनील जोशी यांच्या निवड समितीला अनेकांनी खडेबोल सुनावले. ‘आयपीएल’ स्पर्धेत चांगली कामगिरी करू न शकलेल्या काही खेळाडूंनाही ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी संधी मिळाली. मात्र, उत्तम कामगिरी करूनही ऑस्ट्रेलिया दौर्‍याचे तिकीट न मिळाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवला संधी न मिळाल्यानंतर न्यूझीलंडच्या एका माजी खेळाडूने त्याला भारताकडून न खेळता इतर देशातून खेळण्याची ऑफर दिली. सूर्यकुमार यादवला संधी न मिळाल्यामुळे क्रिकेट समीक्षकांसह अनेक चाहत्यांनीही नाराजी दर्शविल्यामुळे खुद्द ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनाही याबाबत खुलासा करावा लागला. सूर्यकुमार हा एक उत्तम फलंदाज आहे. सध्या ‘आयपीएल’ सामन्यांमध्ये त्याची कामगिरीही उत्तम राहिली असून त्याला लवकरच संधी मिळेल. “सूर्यकुमार तेरा भी टाईम आयेगा...”असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. खुद्द गांगुली यांनी याबाबतीत हस्तक्षेप केला असला, तरी हे प्रकरण अजून मिटलेले नसल्याचे क्रिकेट समीक्षकांचे म्हणणे आहे. कारण, क्रिकेटच्या जगतात आतापर्यंत असे अनेक खेळाडू आहेत की, ज्यांना आपल्या मूळ देशाकडून खेळता आलेले नाही. परंतु, इतर देशाचे नागरिकत्व स्वीकारत त्यांनी क्रिकेटच्या जगतात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे सूर्यकुमारने ठरवले तर त्याला हे करणे शक्य आहे. परंतु, तो इतक्यात असे करेल, याची शक्यता फारच कमी आहे. तरी गाफील राहून चालणार नाही. सूर्यकुमारसारख्या खेळाडूला तातडीने संधी मिळणे गरजेचे आहे; अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागू शकते, असा इशारा क्रिकेट समीक्षकांनी दिला आहे. वेळीच सावध होणे हे नेहमीच हिताचे असते, असेही सांगायला समीक्षक विसरलेले नाहीत.


...अन्यथा महागात पडेल!


आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा इतिहास पाहता आतापर्यंत अनेक देशांत काही असे खेळाडू आहेत की, जे जन्मले एका देशात. मात्र, क्रिकेट खेळले हे दुसर्‍याच देशासाठी. या खेळाडूंची तशी यादी फारच मोठी आहे. त्यामुळे क्रिकेटच्या जगतात हे फार पूर्वीपासूनच चालत आहे, म्हणूनच सूर्यकुमारबाबत क्रिकेट जाणकारांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने, ‘वेळीच सावध व्हा; अन्यथा महागात पडेल,’ असा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी दिलेली काही खेळाडूंची उदाहरणे फारच महत्त्वाची आहेत.भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रॉबिन सिंग यांचे नाव या यादीत सर्वात पहिल्या स्थानी येते. रॉबिन सिंग हे मूळचे भारतीय. मूळचे अजमेर येथील रहिवासी असणारे सिंग कुटुंबीय स्वातंत्र्यानंतरच्या काळात वेस्ट इंडिज येथे व्यवसायानिमित्त स्थलांतरित झाले. रॉबिन सिंग यांचा जन्म वेस्ट इंडिजमध्येच झाला. लहानाचे मोठेही ते तेथेच झाले. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले ते मात्र भारतासाठी. रॉबिन सिंग हे एकेकाळी भारतीय संघातील महत्त्वाचे खेळाडू म्हणून ओळखले जायचे. वेस्ट इंडिजकडूनही त्यांना भविष्यात संधी मिळाली असती. मात्र, त्यांनी भारताकडून क्रिकेट खेळणे पसंत केले. एका देशात जन्मल्यानंतरही दुसर्‍या देशासाठी क्रिकेट खेळण्याचे हे भारतातीलच जीवंत उदाहरण आहे.जगभरातील अनेक देशांतील खेळाडूंनी याबाबत निर्णय घेत इतिहास घडविला आहे. त्यामुळे सूर्यकुमारबाबत वेळीच सावध होणे गरजेचे आहे; अन्यथा महागात पडू शकते, असा इशारा क्रिकेट जाणकारांचा आहे. कारण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदा एका देशाकडून क्रिकेट खेळल्यानंतर दुसर्‍या देशाकडून पुन्हा क्रिकेट खेळण्याची संधी मिळत नाही. सूर्यकुमारला जर आपल्याआधी इतर देशाने संधी दिली आणि ती त्याने स्वीकारली, तर हा मोहरा भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणे शक्य होणार नाही.सूर्यकुमार हा मुंबईकर खेळाडू आहे. आजवर मुंबईच्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावल्याचा इतिहास आहे. त्यामुळे सूर्यकुमारही नक्कीच उत्तम कामगिरी करेल, यात शंका नाही, म्हणूनच त्याला लवकरात लवकर संधी मिळणे गरजेचे असल्याचे क्रिकेट समीक्षकांचे म्हणणे आहे.


- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@