याला जबाबदार कोण?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2020
Total Views |


agralekh_1  H x


जनतेने मतदानरूपी लाथा घालून हाकललेल्या दोन पक्षांच्या कुबड्या घेऊन ठाकरेंनी सत्ता बळकाविली, तेव्हाच खरे तर महाराष्ट्राची बदनामी झाली. महाराष्ट्राच्या बदनामीचे शिल्पकार उद्धव ठाकरेच आहेत, त्यामुळे जनादेशाशी विश्वासघात करणार्‍या नि बारामती व दिल्लीपुढे झुकणार्‍या आपल्याच लाचार तोंडाकडे त्यांनी पाहावे, बदनामी म्हणजे काय, हे त्यांना नक्कीच कळेल.



अर्धवटरावांच्या हाती सत्ता दिली तर काय अनर्थ ओढवू शकतो, याचा जिताजागता अनुभव महाराष्ट्रातील दुर्दैवी जनता गेल्या वर्षभरापासून घेत आहे. सत्ता तर मिळाली. पण, नेमके करायचे काय, हेच उमजत नसल्याने जनतेच्या प्रश्नांची पुरती वाट लावून फक्त महाराष्ट्राच्या मान-अपमानावरून शंख करण्याचे काम विद्यमान ठाकरे सरकार करत आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमातून जनसंवाद साधला. पण, गेल्या आठ-नऊ महिन्यांप्रमाणेच याहीवेळी त्यांनी तोंडातून वाफा दवडण्याशिवाय काहीही केले नाही. “आपण सगळे कोरोनाशी-संकटाशी लढत असताना, महाराष्ट्रद्वेष्ट्यांनी बदनामीचा कट केला होता. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था कोलमडली असून, इथे अमली पदार्थांची शेती केली जात असल्याचे चित्र निर्माण केले होते. मात्र, त्यांचे हे कारस्थान आपण उधळून लावले,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी स्वतःचीच बिनकामाची नि बिनकण्याची पाठ थोपटून घेतली. मात्र, आपण काय बोलतो, कशासाठी बोलतो आणि त्यातून साध्य काय होणार, याची कसलीही माहिती मुख्यमंत्र्यांना नसावी, ती असती तर ते असे बडबडले नसते. कारण उद्धव ठाकरे म्हणाले, “आपण कोरोनाशी झुंज दिली.” पण, स्वतः मुख्यमंत्री तर तेव्हा भीतीने, काळजीने की, आणखी कसल्याशा कारणाने ‘मातोश्री’तच कोंडून बसलेले होते. कोरोनाच्या किंवा संकटाच्या छाताडावर पाय रोवून राज्याचा सेनापती त्याला आव्हान देत असल्याचे तर कधीच दिसले नाही. उलट कोरोनाने राज्यातहाहाःकार माजविलेला असताना, रुग्णवाहिका आणि रुग्णशय्येविना रुग्ण दगावत असताना ‘महाराष्ट्राचा निरो’ जनतेला कोमट पाणी पिण्याचे आणि गाण्याच्या भेंड्या नि कॅरम खेळण्याचे सल्ले देण्यात गुंग झाल्याचे दिसत होते. आता याला कोरोनाबरोबरचे युद्ध म्हटले जाणार असेल, तर मुख्यमंत्र्यांनी मराठी शब्दांचा अर्थ समजून घ्यावा नि खरोखर आपण त्यानुसार कृती केली की घरबशेपणा केला, हेही तपासावे.

‘महाराष्ट्राच्या बदनामीचा कट’ हा तर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील आवडता शब्द. हिंदू साधूंच्या हत्याकांडावरून कोणी सवाल विचारला, सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू किंवा बॉलीवूडमधील अमली पदार्थांच्या सुळसुळाटावर बोलले, कोरोना काळातील अव्यवस्थेवर बोट ठेवले, वाढीव वीजबिलांवरून प्रश्न विचारला, ‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्त किंवा अतिवृष्टीबाधित शेतकर्‍यांच्या मदतीबद्दल जाब विचारला, एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनाबद्दल किंवा आरोग्यसेविकांच्या सानुग्रह अनुदानाबद्दल बोलले की, महाराष्ट्राच्या बदनामीचे षड्यंत्र म्हणत, ठो-ठो बोंबा मारायच्या, हा एककलमी कार्यक्रम गेले वर्षभर ठाकरे सरकार आणि त्यांच्या नेते-प्रवक्त्यांनी राबविला; अर्थात सर्वसामान्यांना भेडसाविणार्‍या प्रश्नांपासून पळ काढणार्‍या मुख्यमंत्र्यांनाच बदनामीच्या आरोपाशिवाय अन्य काहीही करता येत नसेल, तर तिथे त्यांचे सहकारी तरी काय करणार? तेही सत्तेच्या एकाच माळेचे मणी आणि सारे एकाच सुरात एकच एक बदनामीचेच पद गाणार. पण, प्रश्न विचारले जातात ते सत्ताधार्‍यांना, महाराष्ट्राला नव्हे. त्यातून महाराष्ट्राची बदनामी कशी काय होते, याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला हवे.

तसेच ठाकरे सरकार म्हणजे, महाराष्ट्र वा मराठी अस्मिता वा महाराष्ट्राचा ‘ब्रॅण्ड’ नव्हे. तुम्हाला प्रश्न विचारल्याने बदनामी होईल, इतका महाराष्ट्र तुमच्या कृपेवर वा उपकारावर उभा नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ‘बदनामीचा डाव,’ ‘कारस्थान’ यांसारखे शब्द न वापरता आपण राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी काय दिवे लावले, याचा विचार करावा. सोबतच उद्धव ठाकरेंना राज्याच्या बदनामीची इतकीच फिकीर असेल, तर ती त्यांनी आपल्याच कर्माने गेल्या वर्षी केली आहे. जनतेने मतदानरूपी लाथा घालून हाकून लावलेल्या दोन पक्षांच्या कुबड्या घेऊन ठाकरेंनी बेइमानीने मुख्यमंत्रिपदाचे सोनेरी ताट बळकावले, तेव्हाच खरे तर महाराष्ट्राची बदनामी झाली. महाराष्ट्राच्या बदनामीचे खरे शिल्पकार तर उद्धव ठाकरे आहेत, त्यामुळे त्यांनी इतरांवर तसे आरोप करण्याआधी आपल्या जनादेशाशी विश्वासघात करणार्‍या नि बारामती व दिल्लीपुढे झुकणार्‍या लाचार तोंडाकडे पाहावे, बदनामी म्हणजे काय, हे त्यांना नक्कीच कळेल. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आपल्या जनसंवादात महाराष्ट्राची बदनामी करणारे नेमके कोण, त्यांचे नाव घेतले नाही. असे का? जर खरोखरच तसे कोणी असते तर मुख्यमंत्र्यांनी अशा महाराष्ट्रद्वेष्ट्यांचे नाव घेऊन जनतेला त्यांची ओळख करून द्यायला हवी होती, की तशी हिंमत ठाकरेंमध्ये नाही, नव्हती? किंवा तसे कोणी नसेलच आणि म्हणूनच ढगात गोळ्या मारल्याप्रमाणे महाराष्ट्रद्वेष्टे हा शब्द मुद्दाम उच्चारण्याचा प्रकार मुख्यमंत्र्यांनी केला असावा. जनतेच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीची धमक नसली की, असा खोटानाटा बागुलबुवा उभा करावा लागतो. त्याला नाव-गाव नसले तरी चालेल. पण, गोबेल्स नीतीप्रमाणे असे वागले की, जनता आपोआप आपल्या मागे येईल, अशी उद्धव ठाकरेंना आशा असावी. यातून लोकांचे खर्‍याखुर्‍या मुद्द्यांवरून लक्षही विचलित होते आणि सत्ताधार्‍यांना आपले हवे ते उद्योग करण्याची संधीही मिळते. उद्धव ठाकरेंनी तेच केले आणि म्हणूनच मनोज चौधरी या जळगाव एसटी आगारातील वाहकाला न मिळालेल्या वेतनामुळे आत्महत्येसारखा मार्ग अवलंबावा लागला.

सत्तेची झापड आणि पदरी हुजरेगिरी करणारे पत्रकार-संपादक असले की, राज्यात सारेकाही आलबेल चालल्याचे मुख्यमंत्र्यांना वाटत होते. पण, खरेतर राज्य सरकार आपल्याच कर्मचार्‍यांना दिवाळीच्या तोंडावरही तीन महिन्यांपासून रखडलेला पगार देऊ शकत नाही. कर्मचारी सत्ताधार्‍यांचे आणि शिवसेनेचे नाव सुसाईड नोटमध्ये लिहून आत्महत्या करत आहेत, याला जबाबदार कोण आणि तरीही उद्धव ठाकरेंचे महाराष्ट्राची बदनामी, महाराष्ट्राची बदनामीचेच पालुपद सुरू आहे. मागच्या आठवड्यात अन्वय नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये नाव असल्यावरून ‘रिपब्लिक’ वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना कायद्याचा गैरवापर करून अटक करण्याचे काम राज्याच्या पोलिसांनी केले होते. आता मनोज चौधरी यांनी सुसाईड नोटमध्ये नाव लिहिल्याप्रमाणे राज्यप्रमुख व शिवसेना पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरेंनीही स्वतःहून आपली अटक करून घ्यावी. कारण त्यांना महाराष्ट्राच्या बदनामीची फार चिंता आहे आणि ती होऊ नये, अशी इच्छा असेल तर मनोज चौधरी यांच्या आत्महत्येची जबाबदारी घेऊन त्यांना न्याय मिळेपर्यंत तुरुंगात राहील, अशी मुख्यमंत्र्यांनी प्रतिज्ञा करावी. जेणेकरून त्यांच्या मराठी आणि महाराष्ट्रभक्तीचा आविष्कार जनतेला पाहता येईल. पण, पण ते तसे काही करणार नाहीत, ना एसटी कर्मचारी वा अन्य कोणाचे प्रश्न सोडवतील. कारण मराठी आणि महाराष्ट्राचे नाव घेत केवळ भावना भडकावून स्वार्थ साधायचा एवढेच त्यांना जमते. त्याऐवजी अडी-अडचणी, समस्या सोडविण्याची, जबाबदारी घेण्याची धमक ते का दाखवतील आणि त्यातून त्यांचे हित ते काय साधेल?
@@AUTHORINFO_V1@@