महाराष्ट्राची सागरी जैवविविधता आता एका क्लिकवर: 'बीएनएचएस'चे नवीन वेब टूल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Nov-2020   
Total Views |

marine _1  H x
(छाया - प्रदीप पाताडे) 

 

महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यांवरी जीव आणि अधिवासांची विस्तृतपणे नोंद

 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील जैवविविधता आता आपल्याला एका क्लिकवर पाहता येणार आहे. 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) 'कोस्टल अॅण्ड मरीन बायोडायव्हर्सिटी असिसमेंट टूल'ची (काॅमबाट) निर्मिती केली असून या संकेतस्थळामध्ये महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यांवरील जीवांची आणि विविध अधिवासांची विस्तृतपणे नोंद केली आहे. सामान्य नागरिक, विद्यार्थी, संवर्धक आणि किनाऱ्यालगत होणाऱ्या विकासासंबधातील निर्णय घेणाऱ्या सरकारी संस्थांना या संकेतस्थळाचा उपयोग होणार आहे. 
 
 
महाराष्ट्राला ७२० किमी लाबांची किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीवरील जैवविविधता नोंदविण्याचे काम 'बीएनएचएस' गेल्या काही वर्षांपासून करत आहे. या उपक्रमाअंतर्गत सर्वप्रथम महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रातील समुद्री जैवविविधतेच्या दृष्टीने सात महत्त्वाच्या क्षेत्राचा शोध घेण्यात आला. या जागा निवडताना समुद्री कासवांची विणी, वाळूचे किनारे, कायद्याने संरक्षित सागरी प्रजातींचा वावर, समुद्री गवत किंवा प्रवाळ या बाबींचा विचार करण्यात आला. यामाध्यमातून पालघर ते ठाणे, काशीद ते आक्षी, वेळास ते दिघी, गुहागर ते दाभोळ, रत्नागिरी ते जयगड, देवगड-विजयदुर्ग-कशेळी आणि वेंगुर्ला-मालवण-आचरा, अशी सात महत्त्वाची सागरीक्षेत्र अंतिम करण्यात आली. त्यानंतर किनाऱ्यांच्या अनुसार या क्षेत्राची १६ छोट्या भागांमध्ये विभागणी करुन तेथील जैवविविधता नोंदविण्यात आली. या संपूर्ण उपक्रमातून संकलित केलेली माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी 'बीएनएचएस'ने एका संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.

 

'बीएनएचएस'चे हे संकेतस्थळ 'combat.bnhs.org' या नावाने उपलब्ध आहे. संकेतस्थळावर जाऊन आपण नकाशावर किनारपट्टीलगत कुठेही वर्तुळ तयार केल्यास त्यापरिसरात आढळणाऱ्या जैवविविधतेची माहिती आपल्याला दिसेल. या वर्तुळाची मर्यादा १५ किमी क्षेत्राची ठेवण्यात आली आहे. संकेतस्थळाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून त्यात किनाऱ्यालगत आढळणारी जैवविविधता, अधिवास अर्थात खडकाळ, वाळूचे किनारे, खारफुटीच्या जागा आणि त्यांचे प्रमाण पाहता येणार असल्याची माहिती 'बीएनएचएस'च्या वैज्ञानिक रेश्मा पितळे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'ला दिली. याशिवाय 'आययूसीएन'च्या रेड लिस्टमधील संकटग्रस्त प्रजातींबरोबरच 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत संरक्षित असलेल्या प्रजातींचे वावर क्षेत्रासंदर्भातील माहिती देखील संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. विविध वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या वृत्तामधील महाराष्ट्राच्या किनारी भागातून नमूद करण्यात आलेल्या प्रजातींची तथ्यता पडताळून आणि माहितीची शास्त्रीय आराखड्यात मांडणी करुनच संकेतस्थळ तयार केल्याचे पितळे यांनी नमूद केले.

 

'बीएनएचएस' आणि 'शेल' यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या 'काॅमबाट' संकेतस्थळावर किनारपट्टीवरील जैवविविधतेची सखोल नोंद करण्यात आली आहे. ही माहिती स्थानिक नागरिक, किनाऱ्यासंबंधित विविध गोष्टींचा अभ्यास करणारे विद्यार्थी किवा वैज्ञानिक, संवर्धन क्षेत्राशी निगडीत असणारे कार्यकर्ते आणि किनाऱ्यालगत होणाऱ्या विकासासंबधातील निर्णय घेणाऱ्या सरकारी संस्थांच्या उपयोगात येणार आहे. - डाॅ. दिपक आपटे, ज्येष्ठ सागरी शास्त्रज्ञ

 
 
भविष्यात काय ? 
किनाऱ्यावरील परिसंस्था आणि तिथे होणाऱ्या बदलांचे वास्तव स्वरूप तत्काळ समजून घेण्यासाठी या संकेतस्थळावर माहिती भरणे गरजेचे आहे. या उपक्रमाच्या पुढील टप्प्यामध्ये किनाऱ्यावरील बदलाचे सखोल चित्र कसे पाहता येईल, या दृष्टीने 'बीएनएचएस'चे वैज्ञानिक प्रयत्नशील आहेत. आपल्याकडे राज्याच्या किनारपट्टीवरील प्रजाती आणि भौतिक-रासायनिक घटकांविषयीची माहिती उपलब्ध असल्यास '[email protected]' या ईमेलवर संपर्क साधू शकता.



 



@@AUTHORINFO_V1@@