बॉण्ड!....जेम्स बॉण्ड!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Nov-2020
Total Views |

sean cennery_1  


सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते शॉन कॉनेरी यांच्या निधनानं जगभरातल्या कोट्यवधी चित्रपट शौकिनांना जणू ‘जेम्स बॉण्ड’ या गुप्तहेराचीच जीवनयात्रा संपल्याचं दुःख झालं, जे अगदी स्वाभाविक होतं. शॉन कॉनेरी हे अनेकांच्या मनात ‘जेम्स बॉण्ड’ म्हणूनच घर करून होते आणि आजही आहेत. जेम्स बॉण्ड या नावात जो रुबाब, दरारा, दबदबा, धाक जाणवतो, तो शॉन कॉनेरी या अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या कसलेल्या अभिनेत्यानं ती व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर ज्याप्रकारे उभी केली होती, त्यामुळेच होता...


जेम्स बॉण्ड हा प्रेक्षकांना प्रथमच दिसला, तो १९६२ साली प्रदर्शित झालेल्या ‘डॉक्टर नो’ या चित्रपटात! हॅरी साल्झ्मन आणि अल्बर्ट ब्रोकोली या हॉलीवूडच्या निर्माता जोडीनं, इयान फ्लेमिंग या ब्रिटिश लेखकांच्या गुप्तहेरकथेवरून तयार केलेला हा चित्रपट कॅरिबियन समुद्रातल्या जमैक्का या बेटावर चित्रित केला होता. बेपत्ता झालेल्या एका ब्रिटिश गुप्तहेराच्या शोधात जेम्स बॉण्ड हा दुसरा गुप्तहेर; अर्थात ब्रिटिश ‘एजंट ००७’ त्या बेटावर जातो आणि अनपेक्षितपणे त्याला ‘डॉक्टर नो’ या नावाचा चिनी वैज्ञानिक जमिनीखालील एका गुप्त प्रयोगशाळेत महाविघातक गोष्टींची निर्मिती करत असल्याचा शोध लागतो, असं काहीसं या चित्रपटाचं कथासूत्र होतं. या चित्रपटात सुरुवातीच्या एका दृश्यात, शॉन कॉनेरी हे जेव्हा त्यांचं नाव ‘बॉण्ड, जेम्स बॉण्ड...’ असल्याचं सांगतात, त्याच क्षणी ते प्रेक्षकांची मनं जिंकून जातं. त्यांची तब्बल सहा फूट दोन इंच उंची, मोहक मुद्रा आणि मर्दानी देहसौष्ठव याहीमुळे स्त्री-पुरुष, आबालवृद्ध, सगळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर फिदा असत. ज्यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्याच वर्षी १९६२साली, कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत असतानाच तो पाहण्याचं भाग्य मला लाभलं. तरुणाईला भावणार्‍या सगळ्याच गोष्टी त्यात होत्या. हॉलीवूडमधली उगवती अभिनेत्री उर्सुला अ‍ॅण्ड्रेस ही त्यात होती.


‘डॉक्टर नो’ या चित्रपटातून जेम्स बॉण्ड हा गुप्तहेर सार्‍या जगाला परिचित झाला, तर लगेचच पुढल्या वर्षी, १९६३ साली प्रदर्शित झालेल्या ‘फ्रॉम रशिया विथ लव्ह’ या चित्रपटामुळे तो जगातल्या तमाम सिनेप्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनून गेला. इयान फ्लेमिंग यांच्याच कथेवरून तो चित्रपट तयार केलेला होता. शॉन कॉनेरी यांच्या जोडीला, डॅनियाला बियांची ही रोममधली रोमॅण्टिक इटालियन अभिनेत्री यात असल्यानं चित्रपटातली रंगत वाढली होती. इस्तंबूलस्थित ब्रिटिश राजदूतावासातल्या काही घटनांमागे रशियाचा हात असल्याचा संशय व्यक्त होत असल्यानं, त्या घटनांची पाळंमुळं शोधून काढण्याच्या कामगिरीवर असलेल्या जेम्स बॉण्डला आपल्या जाळ्यात खेचणारी तातियाना; अर्थात डॅनियाला बियांची आणि तिच्याशी प्रणय करत असतानाही आपलं मिशन दृष्टीआड होऊ न देणारा जेम्स बॉण्ड या दोन्ही व्यक्तिरेखा माझ्यासारख्या लाखो प्रेक्षकांच्या मनावर जणू कोरल्या गेल्या. या चित्रपटानं त्याकाळी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला.


‘डॉ. नो’, ‘फ्रॉम रशिया विथ लव्ह’, ‘गोल्ड फिंगर’, ‘थंडर बॉल’, ‘यू ओन्ली लिव्ह ट्वाईस’, ‘डायमंड्स आर फॉरएव्हर’ आणि ‘नेव्हर से नेव्हर अगेन’, अशा सात एकाहून एक सरस चित्रपटांत शॉन कॉनेरी हे बॉण्डच्या भूमिकेत झळकले. या चित्रपटांनी त्यांना बक्कळ पैसा मिळवून दिला. ते अक्षरशः मालामाल झाले. तरीही त्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले. आपला पैसा त्यांनी अनेक संस्थांना दान केला. विशेषतः ‘स्कॉटिश नॅशनॅलिस्ट पार्टी’ जी स्कॉटलंड हा एक स्वतंत्र सार्वभौम देश म्हणून घोषित व्हावा, यासाठी कायमच प्रयत्नशील आहे, त्या पार्टीला त्यांनी आर्थिक बळ दिलं. ‘बॉण्ड’ चित्रपटात पुढेही काम करत राहणं त्यांना शक्य असूनही त्यांनी आपल्या मनाला आवर घातला आणि बॉण्डची भूमिका करायला निर्मात्यांना विनम्र नकार कळविला. त्यामुळे निर्मात्यांनी नाइलाजास्तव अन्य अभिनेत्यांना बॉण्डची भूमिका देऊन काही चित्रपट बनविले. ‘कॅसिनो रॉयल’ या चित्रपटात डेव्हिड निवेन, ‘ऑन हर मॅजेस्टिज सर्विस’ या चित्रपटात जॉर्ज लेझेन्बी, ‘मून रेकर’, ‘द मॅन विथ द गोल्डन गन’, ‘लिव्ह अ‍ॅण्ड लेट डाय’, ‘ओक्टोपसी’, ‘द स्पाय हू लव्ह्ड मी’, ‘ए व्ह्यू टू किल’ या चित्रपटांत रॉजर मूर, ‘द लिविंग डेलाईट’ आणि ‘लायसेन्स टू किल’ या चित्रपटांत टिमोथी डाल्टन, ‘गोल्डन आय’, ‘डाय अनदर डे’ आणि ‘टुमॉरो नेव्हर डाईज’ या चित्रपटांत पियर ब्रॉस्नन, तर ‘नो टाईम टू डाय’, ‘स्पेक्टर’ या चित्रपटात डॅनियल क्रेग या अभिनेत्यांनी जेम्स बॉण्ड साकारला. असं असलं तरी जेम्स बॉण्ड म्हणून प्रेक्षकांच्या सदैव स्मरणात असणार आहेत ते केवळ आणि केवळ सर शॉन कॉनेरी हेच! ‘झाले बहु, होतील बहु, आहेतची बहु; परंतु यासम’ हा हे वचन त्यांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतं.


तथापि, शॉन कॉनेरी यांचं अभिनयक्षेत्रातलं कार्यकर्तृत्व हे केवळ जेम्स बॉण्ड या एका व्यक्तिरेखेपुरतं मर्यादित नाही. १९५७ साली वयाच्या २७व्या वर्षी त्यांनी ‘नो रोड बॅक’ आणि ‘ट्रक ड्रायव्हर’ या चित्रपटात काम केलं होतं. दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सच्या नॉर्मंडी प्रांतात चित्रित झालेल्या ‘द लाँगेस्ट डे’ या प्रदीर्घ युद्धपटातही ते होतेच. उत्तर आफ्रिकेतल्या लिबिया देशात चित्रित झालेल्या, ‘द हिल’ याही युद्धपटात ते होते. ‘अगाथा ख्रिस्ती थ्रिलर्स’ म्हणून विख्यात असलेल्या, ‘मर्डर ऑन द ओरिएन्ट एक्स्प्रेस’ या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली होती, तर आल्फ्रेड हिचकॉक निर्मित, ‘मार्नी’ या चित्रपटाचे ते नायक होते. चोरी करण्याची विकृती असलेल्या एका स्त्रीच्या मानसिकतेचं मनोवैज्ञानिक रहस्य शोधण्याचा यात प्रयत्न होता. नताली वूड या विख्यात अभिनेत्रीसोबत नायकाच्या भूमिकेत ते, ‘मेटीओर’ या विज्ञानप्रधान चित्रपटात दिसले होते. पृथ्वीच्या दिशेनं सरकत असलेला डोंगराएवढा ग्रह पृथ्वीवर येऊन आदळण्यापूर्वीच त्याचा मार्ग कसा बदलता येईल आणि होऊ घातलेला विनाश कसा टाळता येईल, हा या चित्रपटाचा विषय होता. ‘हन्ट फॉर द रेड ऑक्टोबर’ या चित्रपटात शॉन कॉनेरी यांनी अमेरिकन नौदलातल्या पाणबुडीवर तैनात असलेल्या अधिकार्‍याची भूमिका बजावली होती. ‘इंडियाना जोन्स अ‍ॅण्ड द लास्ट क्रुसेड’ या चित्रपटातली त्यांची भूमिका खूपच गाजली होती. ‘वूमन ऑफ स्ट्रॉ’ या चित्रपटात विख्यात अभिनेत्री जिना लोलो ब्रिगेडा ही त्यांची सोबतीण होती, तर ‘द लीग ऑफ एक्स्ट्रॉऑर्डिनरी जंटलमेन’ या करमणूकप्रधान चित्रपटात भारतीय अभिनेता नसिरुद्दीन शाह हे शॉन कॉनेरी यांच्यासोबत सहकलाकार होते. स्वतःच्या उतारवयात त्यांनी साकारलेला वृद्ध रॉबिनहूड प्रेक्षकांना भलताच भावला होता. ‘साऊंड ऑफ म्युझिक फेम’ ऑड्री हेपबर्न ही त्यावेळी रॉबिनहूडच्या वृद्ध पत्नीच्या रूपात दिसली होती. शॉन कॉनेरी यांच्या अभिनयकौशल्याचा प्रत्यय चित्रपट समीक्षकांना विशेषकरून जाणवला तो 1987 साली प्रदर्शित झालेल्या, ‘द अनटचेबल्स’ या चित्रपटात! एका आयरिश पोलिसाची भूमिका उत्कृष्टपणे बजाविणार्‍या शॉन कॉनेरी यांना या चित्रपटासाठी साहाय्यक अभिनेत्याचा ‘ऑस्कर’ पुरस्कार प्राप्त झाला.


असे हे शॉन कॉनेरी २५ ऑगस्ट, १९३० रोजी स्कॉटलंडमधल्या एडिंबराजवळच्या फाऊन्टनब्रिज या गावात एका श्रमजीवी, कष्टकरी कुटुंबात जन्मले होते. त्यांनी स्वतःदेखील बालपणातली अनेक वर्षे दुधाच्या बाटल्या घरोघरी पोहोचविण्याचं, शवपेटिकांना पॉलिश करण्याचं, वजनदार ओझी खांद्यावरून वाहून नेण्याचं काम केलं. रॉयल ब्रिटिश नेव्हीमध्येही ते दाखल झाले होते. परंतु, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना ते काम सोडावं लागलं. व्यावसायिक फुटबॉलपटू व्हायला त्यांना खूप आवडलं असतं. परंतु, त्या दिशेनं प्रयत्न करण्यापूर्वीच त्यांचा अभिनयक्षेत्रात प्रवेश झाला आणि तिथेच ते स्थिरावले. एकेकाळी ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी नामांकित झालेली ऑस्ट्रेलियन अभिनेत्री, डाएने सिलेन्टो ही त्यांची धर्मपत्नी होती. दहा वर्षांनी ते दोघे एकमेकांपासून विभक्त झाले. त्या दोघांचा पुत्र, जेसन कॉनेरी हा आज हॉलीवूड स्टार आहे. मिशेलिन रॉकब्रून या शॉन कॉनेरी यांच्या द्वितीय पत्नी आज हयात आहेत.


शॉन कॉनेरी हे हाडाचे स्कॉटिश होते. आज युनायटेड किंग्डमचा भाग असलेला स्कॉटलंड हा काही शतकांपूर्वी स्वतंत्र देश होता. इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीमुळे तो इंग्लंडला जोडला गेला. आता त्याला आपली स्वतंत्र ओळख पुन्हा मिळायला हवी, असं म्हणणार्‍या बहुतांश स्कॉटिश लोकांपैकीच शॉन कॉनेरी हेही एक होते. तरीही इंग्लंडच्या सध्याच्या राणीसाहेबांनी, राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी देऊ केलेला ‘सर’ हा किताब त्यांनी सविनय स्वीकारला. तो स्वीकारतानाही त्यांनी स्कॉटलंडचा पारंपरिक पेहराव आपादमस्तक परिधान केला होता. स्कॉटलंड जोवर स्वतंत्र होत नाही, तोवर स्कॉटलंडमध्ये कायमचे स्थायिक न होण्याचा प्रण करूनच ते, कॅरिबियन समुद्रातल्या आपल्या आवडत्या बहामा बेटावर नासाव या शहरात राहत होते. तिथेच दि. 31 ऑक्टोबर रोजी, वयाच्या नव्वदाव्या वर्षात त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. ‘जेम्स बॉण्ड’ ही त्यांची प्रतिमा तर जनमानसावर कायम राहीलच; परंतु एक उत्तम अभिनेता म्हणूनही त्यांच्या नावाची नोंद हॉलीवूडच्या इतिहासात ठळकपणे केलेली असेल, यात शंकाच नाही!



- प्रवीण कारखानीस
@@AUTHORINFO_V1@@