सरस्वती’ची प्राचीनता : ‘आर्यां’ची वहिवाट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Nov-2020
Total Views |

sindhu culture_1 &nb


इसवी सन १९२०-३०च्या दशकात मोहेंजोदरो, हडप्पा वगैरे ठिकाणे सिंधू नदीच्या खोर्‍यात सापडलेली असल्याने, त्या नागरीकरणाला ओघानेच ‘सिंधू संस्कृती’ असे नाव दिले गेले. पण, पुढच्या काळात सिंधूच्या खोर्‍यात न येणार्‍या अशा दूरवरच्या इतरही अनेक ठिकाणी त्याच्याशी समकालीन असे आणि साधारण तशीच वैशिष्ट्ये असलेल्या नागरीकरणाचे अवशेष मिळायला लागले. त्यांच्यापैकी बहुसंख्य ठिकाणे प्राचीन ‘सरस्वती’ नदीच्या काठी होती, असे लक्षात येते. त्यामुळे या नागरीकरणाचे ‘सरस्वती संस्कृती’ हेच नाव जास्त समर्पक ठरते. ते तसेच असावे, याची कारणमीमांसासुद्धा आपण पाहिली. आता सरस्वती नदीची प्राचीन वर्णने आणि काळाच्या ओघात तिची बदलत गेलेली परिस्थिती, यांचीही थोडी माहिती घेऊया.


सरस्वतीचे वैदिक उल्लेख


सरस्वतीचे ऋग्वेदात अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. त्यांच्यापैकी काही नदी म्हणून आहेत, तर काही देवी म्हणून आहेत. उदाहरणादाखल म्हणून त्यातली एक ऋचा पाहू.अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति । अप्रशस्ता इव स्मसि प्रशस्तिमम्ब नस्कृधि ॥ ऋग्वेद २.४१.१६॥अर्थात, मातांमध्ये श्रेष्ठ, नद्यांमध्ये श्रेष्ठ, देवींमध्ये श्रेष्ठ, अशा हे सरस्वती, आम्ही असमृद्ध-क्षुल्लक लोक आहोत. आम्हाला समृद्ध कर. सरस्वती नदीचे केलेले हे वर्णन अगदी स्पष्टपणे तिला ‘नद्यांमध्ये श्रेष्ठ’ असे म्हणते. ही ऋचा गृत्समद ऋषींच्या नावे आहे. ऋग्वेदाइतक्या प्राचीन काळातल्या लोकांना ही सरस्वती नदी इतर सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ किंवा मोठी वाटते, इतकी ती आकाराने मोठी आणि तिच्या खोर्‍याचा विचार करता विस्तीर्ण अशी होती. पुढे ऋग्वेदाच्या सूक्त क्र. ६.६१ मध्ये ‘मोठमोठ्या लाटांनी काठावरचे डोंगर फोडणारी’ (६.६१.२), ‘शत्रूंच्या मनात भय उत्पन्न करणारी’ (६.६१.७), ‘मोठमोठ्याने रोरावत त्वेषाने वाहणार्‍या प्रवाहाची’ (६.६१.८), ‘नद्यांमधली श्रेष्ठ नदी’ (६.६१.१३) अशा शब्दांत भरद्वाज ऋषी सरस्वतीचे मोठेपण सांगतात. या शिवाय ऋग्वेदात इतरही अनेक ठिकाणी तिचे असेच वर्णन आहे.
वेदांच्या संहितेच्या शिवाय वैदिक साहित्यात अजूनही काही ग्रंथ येतात. त्यामध्ये ‘ब्राह्मण’ प्रकारचे ग्रंथ संहितांपेक्षा काहीसे उत्तरकालीन आहेत. त्यात काही ठिकाणी सरस्वतीचे उल्लेख तिच्या उगम आणि लोप होण्याच्या ठिकाणांसह दिसतात. उदाहरणार्थ, सामवेदाच्या परंपरेत ‘पंचविंश ब्राह्मण’ नावाचा एक ग्रंथ आहे. त्यानुसार सरस्वतीच्या काठी यज्ञदीक्षा घेण्याचे विशेष फल सांगितले आहे. त्यातही ‘विनशन’ म्हणजे जिथे सरस्वती नदी जमिनीत लुप्त होते ते ठिकाण, ते ‘प्लक्ष प्रास्रवण’ म्हणजे, सरस्वतीच्या उगमाचे ठिकाण, अशी परिक्रमा करणार्‍यांना स्वर्गप्राप्ती होते (पंचविंश ब्राह्मण २५.१०), असे वर्णन आहे. ‘जैमिनीय ब्राह्मण’ या ग्रंथात ‘तेषां सरस्वत्या उपमज्जने दीक्षा। (२.२९७)’ असे म्हणून विनशनचाच उल्लेख ‘उपमज्जन’ म्हणून केलेला सापडतो. थोडक्यात, या ब्राह्मणग्रंथांच्या काळापर्यंत सरस्वतीचा मूळचा प्रचंड मोठा असलेला प्रवाह लहान होत होत काही ठिकाणी दिसेनासाही होऊ लागला होता, हे स्पष्ट होते.


सरस्वतीचे महाभारतातील वर्णन

महाभारतात प्रामुख्याने वनपर्व, भीष्मपर्व आणि इतरही काही ठिकाणी सरस्वती नदीचे असंख्य उल्लेख सापडतात. यातले आता इथे विशेष लक्षात घेण्याजोगे वर्णन आहे ते बलरामाच्या तीर्थयात्रेचे. कौरव-पांडव युद्धात कुणाचाही पक्ष न घेता, कृष्णाचा थोरला भाऊ बलराम तीर्थयात्रेला निघून गेला. त्यात सरस्वतीचे दर्शन घेऊन तिच्या काठी विविध ठिकाणी, विविध नगरांमध्ये काही दिवस बलरामाने निवास केला. सरस्वतीच्या दक्षिणेला आणि दृषद्वती नदीच्या उत्तरेला असलेला प्रदेश म्हणजे ‘कुरुक्षेत्र’ अशी एक व्याख्या तिथे दिसते. हे सर्व वर्णन मुळातूनच वाचण्यासारखे आहे. ऋग्वेदात सरस्वती नदीचे जसे वर्णन दिसते, तसे वर्णन इथे महाभारतात मात्र दिसत नाही. वर सांगितलेल्या ब्राह्मण ग्रंथांत दिल्याप्रमाणेच बलरामाच्या काळातसुद्धा सरस्वती नदी लहान झालेली आहे. तिचा पलीकडचा काठ ‘दिसतो’, इतके तिचे पात्र काही ठिकाणी अरुंद झाले आहे. ‘विनशन’ हे ठिकाण वाळवंटात असल्याची माहिती इथे मिळते. काही ठिकाणी हे नाव ‘अदर्शन’ असेही आहे. लोमश ऋषींनी केलेल्या वर्णनानुसार तर सरस्वती अनेक ठिकाणी जमिनीत लुप्त होते, तशी पुढे काही ठिकाणी ती पुन्हा जमिनीवरही येते!


भौगोलिक कारणे


महाभारताचा काळ म्हणजे, वेदांची रचना पूर्ण झाल्यानंतरचा काळ आहे. सरस्वती नदीच्या भौगोलिक वर्णनात ऋग्वेद ते महाभारत या काळात फरक पडलेला दिसतो. थोडक्यात, महाभारत काळाच्या आणि ब्राह्मण ग्रंथांच्याही अनेक शतके आधी कधीतरी काही भूगर्भीय हालचालींमुळे नद्यांच्या प्रवाहात हे फरक पडत गेलेले दिसतात. या हालचाली अतिशय संथगतीने होतात, त्यामुळे त्यांचे असे परिणामसुद्धा अनेक शतकांनी लक्षात येतात. एकूणच ‘प्लिस्टोसीन’ (Pleistocene) नावाने ओळखल्या जाणार्‍या हिमकालानंतर नद्यांचे पाणी वाढले. पुढे ‘होलोसीन’ (Holocene) नावाने ओळखल्या जाणार्‍या हिमकालानंतर त्या पाण्याच्या वितरणात आणि नद्यांच्या प्रवाहात होणारे बदल बर्‍यापैकी स्थिर होत गेले. दरम्यान, अनेक नद्यांच्या काठाने मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती झालेली होतीच. भूकंप किंवा तशा प्रकारच्या भूगर्भीय हालचाली सातत्याने घडत असतात. त्यांचा परिणाम म्हणून नद्यांचे प्रवाह कमी-अधिक होणे, तसेच त्यांची जागा किंवा दिशा बदलणे, या गोष्टी आजही घडताना दिसतात. अशा घटनांमुळे नदी अत्यंत लहान झाली किंवा पूर्णपणे कोरडी पडली, तर त्याचा परिणाम लोकजीवनावर होणे अगदी स्वाभाविक आहे. अशा वेळी काठावरच्या लोकवस्तीतून लोक इतरत्र स्थलांतरे करू लागतात, गावेच्या गावे ओस पडतात. नेमके हेच त्या काळात सरस्वतीच्या खोर्‍यातल्या नागरीकरणातही घडले. भूजलशास्त्र (Hydrology) आणि भूशास्त्र (Geology) या ज्ञानशाखांच्या अंतर्गत सरस्वतीच्या खोर्‍यात आतापर्यंत जी संशोधने झालेली आहेत, त्यातून निघणारे निष्कर्ष प्रामुख्याने हेच सांगतात. मेरी कोर्टी (१९८६), फ्रँकफोर्ट (१९९२), खोंडे (२००७ ), भद्रा (२००९), सरकार (२०१६), सिंघ (२०१७) आणि इतरांची संशोधने आज उपलब्ध आहेत. कालिबंगन (राजस्थान) येथे सुमारे ८.१ किलोमीटरच्या रुंद पट्ट्यात यांपैकी एक संशोधन झाले आहे. इ.स. पूर्व ५० हजारच्या आधीच्या काळी यमुना नदी सरस्वतीला मिळत असे. या काळात कालिबंगन येथे सरस्वतीचे पात्र किमान ८.१ किलोमीटर रुंद होते, असे निश्चितपणे सांगता येते. पुढे कधीतरी यमुना नदी सरस्वतीपासून विलग झाली आणि पश्चिमेकडे वाहत सरस्वतीला मिळण्याच्या ऐवजी दिशा बदलून पूर्वेकडे वाहत गंगेला मिळू लागली. इ.स. पूर्व ५० हजारच्या आधी निदान आठ किलोमीटर रुंद असणारे सरस्वतीचे तेच पात्र इ.स. पूर्व २२ हजारच्या पुढे तीन किलोमीटरच्या आत अरुंद झाले. त्याचप्रमाणे उत्तरेकडून शुतुद्री (सतलज) आणि इतर लहान-मोठे प्रवाह दक्षिणेकडे येत सरस्वतीला मिळत असत. तेसुद्धा इ.स. पूर्व १३ हजारच्या नंतर कधीतरी असेच विलग होऊन पश्चिमेच्या दिशेने वाहत सिंधूला मिळू लागले. त्यामुळे याच्या पुढच्या काळात सरस्वतीचे तेच पात्र एखाद्या किलोमीटरच्या आत लहान झाले.


वैदिक संस्कृती - २४ हजार वर्षांची वहिवाट


वैदिक साहित्यातली सरस्वतीची विविध वर्णने आणि त्यात पडत गेलेला फरक पाहता, स्वाभाविकपणे वैदिक साहित्य निर्माण होण्याचा काळ वर उल्लेख केलेल्या इ.स. पूर्व २२ हजारच्या आगेमागे असा निश्चित करता येऊ शकतो. ‘घग्गर-हाक्रा’ नावाने शिल्लक राहिलेली सरस्वती इ.स. पूर्व ३०००पर्यंत तरी अडखळत का होईना, पण वाहत होती, हे ही त्यातून दिसते. वैदिक काळ, महाभारत काळ हा अशा पद्धतीने इ. स. पूर्व ३०००च्या मागे जातो. संस्कृत साहित्यात मूळचा गुणवाचक असलेला ‘आर्य’ शब्द कल्पना म्हणून जरी वंशवाचक मानला, तरी त्या तथाकथित ‘आर्यांचा’ निवास उत्तर भारतातच इ.स. पूर्व निदान २२ हजारपासून तरी असल्याचे असे सिद्ध होते. अधिक माहितीसाठी वाचकांनी श्रीकांत तलगेरी यांचे ‘ऋग्वेदाच्या कालनिश्चितीचे,’ तर डॉ. प. वि. वर्तक आणि निलेश ओक यांचे ‘सरस्वती आणि रामायण-महाभारत यांच्या कालनिश्चितीचे संशोधन’ आवर्जून पाहावे. त्यामुळे युरोपीय विद्वानांच्या मतानुसार इ.स. पूर्व १८००च्या पुढे मध्य आशियन ‘आर्यांनी’ भारतात स्थलांतर केले आणि त्याच्या नंतर पुढे कधीतरी वेद, रामायण, महाभारत वगैरे साहित्याची निर्मिती केली, हे मान्य करण्यात खूपच मोठा अडसर तयार होतो. हे विद्वान असे विविध प्रकारे तोंडघशी पडूनसुद्धा कशाच्या आधारावर आपले मत छातीठोकपणे सांगत राहतात, ते मात्र कळत नाही!


arya_1  H x W:


arya_1  H x W:





arya_1  H x W:

(क्रमश:)

- वासुदेव बिडवे
(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान -
अर्थात ’भारतविद्या’ अथवा ’प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@