कोलकात्यात ‘लोकल’ सुपरफास्ट, मुंबईत यार्डातच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2020
Total Views |
Local_1  H x W:



मुंबई लोकल कधी सुरू होणार ?

 
कोलकाता : लॉकडाऊनमध्ये दीर्घ ब्रेक घेतल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार ११ नोव्हेंबरपासून कोलकात्यात लोकल सेवा पुन्हा सुरू होणार आहे. अधिकाऱ्यांनीही या वृत्ताला दुजोरा देत दक्षिण पूर्व रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी मंजूरी देण्यात आल्याचे म्हटले आहे.
 
 
एसओपी तयार होणार
 
पूर्व, दक्षिण पूर्व रेल्वे आणि पश्चिम बंगाल सरकारच्या अधिकाऱ्यांनी कोलकाता लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी एसओपी तयार करण्यासंदर्भात गुरुवारी बैठकीत ही माहिती दिली. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, “गर्दी नियंत्रणासाठी सरकार उपाययोजना करेल त्यानुसार पुन्हा रेल्वे सेवा पूर्ववत केली जाईल.”
 
 
३६२ फेऱ्या सुरू होणार
 
प्रत्येक दिवशी लोकलच्या सर्वसामान्यांसाठी ३६२ फेऱ्या सुरू होणार आहेत. आठ महिन्यांपासून कोलकात्यात लोकल सेवेची प्रतीक्षा होती. काली पूजनानिमित्त बुधवारी लोकल सेवा पूर्ववत होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही ३ लाख ९० हजार इतकी झाली आहे त्यापैकी ३ लाख ४६ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली. एकूण मृतांचा आकडा सात हजारांवर पोहोचला आहे.
 
 
मुंबई लोकल कधी सुरू होणार ?
 
 
राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या कात्रीत अडकलेली मुंबई लोकल रेल्वे सेवा कधी पूर्ववत होणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना आहे. गर्दी नियंत्रण हा प्रश्न राज्य सरकारकडून सुटत नसल्याने ही दिरंगाई होत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, राज्यातील मंत्री याचे खापर केंद्रावर फोडत आहे. मुंबईतील कोरोना स्थितीचा आढावा घेतला असता एकूण रुग्ण संख्या ही २ लाख ६१ हजार इतकी आहे त्यापैकी २ लाख ३४ हजार ५५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. एकट्या मुंबईत कोरोना मृत्यूंचा आकडा हा १० हजार ३७७ इतका आहे.
 
 
गर्दीवर नियंत्रण मिळवायचे कसे ?
 
राज्यातील रुग्णसंख्या १७ लाख ३ हजार ४४४ इतकी असून त्यापैकी एकूण १५ लाख ५१ हजार २८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण मृतांची संख्या ४४ हजार ५४८ इतकी झाली आहे. सध्या अत्यावश्यक सेवेत सुरू असणाऱ्या लोकलमध्येही गर्दीमुळे प्रवाशांचे हाल होत आहे. हातावर पोट असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाशिवाय पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे वारंवार लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी केली जात आहे. गेल्या आठवड्यात लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा केल्याचे म्हटले जात होते. मात्र, अद्याप त्यावर केंद्रातर्फे अंमलबजावणी झाली नसल्याने ठोस निर्णय झालेला नाही.
 
 
  
कार्यालयांतर्फेही जाचक अटी
 
 
कोरोना काळात कॉर्पोरेट ऑफिस आणि खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. सकाळी लवकर उठून ऑफिस गाठावे लागते, अपुऱ्या लोकल फेऱ्या यामुळे महिला प्रवाशांवरही ताण येत आहे. कार्यालये सुरू करत असताना राज्य सरकारने वेळेत बदल करून कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने बोलवण्याची विनंती केली होती. मात्र, सर्वच कर्मचाऱ्यांसाठी एकच वेळ असल्याने गर्दीचे नियंत्रण मुंबईत करणे हे राज्य सरकारपुढे आव्हान आहे.
 
 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका
 
देशात बुधवारी इतक्या दिवसांनंतर ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण आहे. अर्थात कोरोनावर मात करून घरी जाणाऱ्यांचा आकडा याहून जास्त आहे. मात्र, युरोपीय देशांमध्ये ज्या प्रकारे कोरोनाची दुसरी लाट येत आहे त्याचा धोका ओळखून भारतातही सावध पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. वाहतूक व्यवस्थेवरील ताण दूर करण्यासाठी लोकल सेवा सुरू करणे हा मार्ग असला तरीही सोशल डिस्टंसिंगच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे हे देखील प्रशासनासमोर आव्हान असणार आहे.




@@AUTHORINFO_V1@@